27 October 2020

News Flash

राशिभविष्य : दि. २२ ते २८ मे २०२०

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या जोमाने कामाला लागाल

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या जोमाने कामाला लागाल.  रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार कराल. सहकारी वर्गाची धडाडी वाखाणण्याजोगी असेल. त्यांच्या कामाचे श्रेय त्यांना द्याल. जोडीदाराशी जुळवून घ्याल. न पटणाऱ्या गोष्टींवर अधिक ऊहापोह नको. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. आत्तापर्यंत संयम बाळगलात तसा अजूनही बाळगा.

वृषभ गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे अडचणीच्या परिस्थितीतही मोलाचा आधार मिळेल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभकारक ठरेल. वरिष्ठांच्या नव्या योजनांवर अंमल कराल. सहकारी वर्गाला त्यांच्या समस्यांमधून बाहेर काढाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात विशेष भूमिका बजावेल. कुटुंबाचे आर्थिक गणित नव्याने मांडाल. कुटुंब सदस्यांसह जुन्या आठवणीत रमाल. श्वसनाचे त्रास झाल्यास विशेष काळजी घ्यावी. प्राणायाम उपयोगी ठरेल. धीर सोडू नका.

मिथुन चंद्र-बुधाच्या युतीयोगामुळे बुद्धी, विचार, भावना आणि कृती यांच्यात ताळमेळ राहील. नोकरी-व्यवसायात नव्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवाल. वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत वागाल. सहकारी वर्गाचा निर्भीडपणा, एकजूट कामी येईल. कार्यक्षेत्रातील आव्हाने त्यांच्या मदतीने स्वीकाराल. थोडय़ाफार प्रमाणात यश मिळेल. जोडीदाराला भावनिक आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. घरात उत्साहवर्धक योजना राबवाल.

कर्क लाभस्थानातील बुध-शुक्राच्या युती योगामुळे कलात्मक दृष्टिकोन आणि व्यवहारी वृत्ती याचा सुरेख मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात वेगळ्या संकल्पनेचा संस्थेला लाभ होईल. सहकारी वर्गाचे विशेष साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारींकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. कामातील त्रास आणि तणावामुळे त्याची चिडचिड वाढेल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक! कुटुंबातील इतर सदस्य आपले मनोबल वाढवतील. उष्णतेचे विकार सतावतील.

सिंह चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, परंतु मनाच्या चंचलतेतही वाढ होईल. नोकरी-व्यवसायात उत्साहाने कामाला सुरुवात कराल. अविचाराने पाऊल पुढे टाकू नका.  मिळालेल्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पहा. सहकारी वर्गाला आवश्यक ते साहाय्य कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील काही प्रकरणांमुळे त्याच्या डोक्याचा ताप वाढेल. तरुणांच्या अतिउत्साहाला लगाम घालाल. आरोग्य चांगले राहील.

कन्या चंद्र-प्लुटोच्या नवपंचम योगामुळे समाजोपयोगी गोष्टींमध्ये सहभागी व्हाल. कुटुंबाचे पाठबळ मिळेल. नोकरी-व्यवसायात नवनिर्मितीचा अनुभव घ्याल. नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांना व सहकारी वर्गाला सांभाळून घ्याल. गरजूंना मदत करण्यास पुढे जाल. जोडीदाराच्या समाजसेवेचा अभिमान वाटेल. त्याच्या कार्यक्षेत्रातही त्याची कामगिरी कौतुकास्पद असेल. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्याल. सांधे व पचनसंस्था सांभाळा.

तूळ  बुध-प्लुटोच्या षडाष्टक योगामुळे बौद्धिक प्रगतीत अडथळे येतील. नवीन शोध व संशोधने यात अडचणी येण्याची शक्यता! नोकरी-व्यवसायात आपले मत ठामपणे मांडण्याचा प्रयत्न कराल. विरोधकांची फारशी पर्वा करू नका. सहकारी वर्गाच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही तरी धीर सोडू नका. कौटुंबिक वातावरणावर निराशेची छाया पसरेल. जोडीदाराच्या साथीने कुटुंब सदस्यांना नवी आशा दाखवाल. अपचन आणि पित्त विकार त्रास देतील. पथ्य पाळणे आवश्यक!

वृश्चिक बुध-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे विचार आणि भावना यांमध्ये संघर्ष होईल. संवेदनशीलता वाढेल. नोकरी-व्यवसायात धाडस व सर्जनशीलता यांच्या समन्वयातून नव्या कल्पना साकाराल. सहकारी वर्गाला विशेष प्रशिक्षण द्याल. जोडीदाराच्या उदात्त विचारांचे आणि समाजोपयोगी कार्याचे कौतुक कराल. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयोगी पडेल. कुटुंबात शिस्तीचे वातावरण ठेवाल. पाठीचा मणका व रक्ताभिसरण संस्था यांची काळजी घ्यावी.

धनू  चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे बुद्धिमत्तेचा योग्य वापर कराल. युक्तिवादाने आपले कार्य साधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळवाल. जनहितार्थ कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल.  त्यांच्या अडचणी समजून घ्याल. कायद्याच्या चौकटीत राहून जोडीदार अनेक कार्यात भाग घेईल. कौटुंबिक वातावरण सेवाभावी वृत्तीचे राहील. सर्दी पडसे व कफ विकाराचा त्रास संभवतो. कामाच्या धावपळीत विश्रांतीचीही गरज भासेल. याकडे दुर्लक्ष नको.

मकर रवी-शनीच्या नवपंचम योगामुळे संयमाने व चिकाटीने प्रगतीकडे वाटचाल कराल. उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात यश मिळवण्यासाठी केलेली मेहनत फळास येईल. आपला मुद्दा ठामपणे मांडाल. सहकारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यात मदत कराल. कौटुंबिक गोष्टींबाबत योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराची घालमेल समजून घेऊन त्याला भावनिक आधार द्याल. कुटुंब सदस्यांना नवे मार्ग दाखवाल. उष्णतेमुळे कोरडय़ा त्वचेच्या समस्या डोकं वर काढतील. विशेष काळजी घ्यावी.

कुंभ मंगळ-हर्षलच्या लाभ योगामुळे बुद्धिमत्तेला नवीन चालना मिळेल. कठीण आव्हाने स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी पार पाडाल. अतिउत्साहाच्या भरात उतावीळपणा मात्र टाळावा. सहकारी वर्गाकडून जास्ती अपेक्षा न ठेवणे बरे! जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात नेटाने काम करेल. याचे श्रेय त्याला मिळाले नाही तरी तो काम करणे सोडणार नाही. ओटीपोटाचे दुखणे सांभाळा. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक!

मीन चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे विचारांना कृतीची जोड मिळेल. हाती घेतलेल्या कामाची आकर्षक आखणी कराल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाला प्रोत्साहन द्याल. जोडीदार त्याच्या आवडीनिवडी जपेल. छंद जोपासेल. कौटुंबिक वातावरणातील कटुता कमी करण्यासाठी सर्वाची बाजू समजून घ्या. आपलेच म्हणणे खरे करण्याचा अट्टहास नको. मायग्रेन किंवा सायनसचा त्रास होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:15 am

Web Title: astrology from 22nd to 28th may 2020 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १५ ते २१ मे २०२०
2 राशिभविष्य : दि. ८ ते १४ मे २०२०
3 राशिभविष्य : दि. १ ते ७ मे २०२०
Just Now!
X