सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पना डोक्यात घोळत राहतील. विचारांना नवी दिशा मिळेल. कामाच्या स्वरूपात केलेला बदल लाभदायक ठरेल. नोकरी-व्यवसायात  विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक. सहकारी वर्गाचीही मते विचारात घ्यावीत. जोडीदाराच्या योजनांना पाठबळ द्याल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याचे कौतुक होईल. मुलांसह चर्चा करून त्याच्या बाबतीतील निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. श्वसनाचा त्रास व सर्दीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या उत्साहाला आणि मंगळाच्या ऊर्जेला पोषक वातावरण निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात कामाचा वेग वाढेल. कामातील बारकावे टिपून घ्याल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. त्यांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या मदतीने योग्य वेळेत कामे पूर्ण झाल्याने आस्थापनेचा विशेष लाभ होईल. जोडीदाराला कामाच्या व्यापातून उसंत मिळणे कठीण जाईल. मुलांच्या हिताचे निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.

मिथुन चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावना आणि व्यवहार यांच्यात गल्लत न करता योग्य निर्णय घ्याल. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यातील समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात  सतर्क राहावे. वरिष्ठांसह वाद वाढवू नये. सहकारी वर्गाला साहाय्य करताना आपले नुकसान न होण्याची खबरदारी घ्यावी लागेल. जोडीदाराच्या कामाचा ताण वाढेल. घराच्या समस्या, आर्थिक प्रश्न यावर उपाय शोधाल. मुलांच्या स्वातंत्र्यावर शिस्तीचा अंकुश ठेवावा लागेल. त्वचा कोरडी पडेल.

कर्क चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे चंद्राची जिज्ञासू वृत्ती गुरूच्या ज्ञानपिपासू स्वभावाला पोषक ठरेल. नोकरी-व्यवसायात घाईघाईत निर्णय जाहीर करू नका. थोडे सबुरीने घ्यावे लागेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठी मजल माराल. जोडीदाराच्या कामात सातत्य राहणार नाही. कामाची चालढकल होईल. त्याची काळजी घ्यावी लागेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता मिळतील. मुख्य वळणावर त्यांना आपले मार्गदर्शन उपयोगी पडेल. जठर व आतडे यांच्या समस्या उद्भवतील.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे अंत:स्फूर्तीचा अनुभव येईल. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुचेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. वादविवादात सामील होणे हिताचे नाही. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नव्या संकल्पना राबवल्या जातील. कामाच्या गडबडीत त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यास थोडे समजून घ्यावे. मुलांचे फाजील लाड न करता त्यांना वेळेची किंमत पटवून द्याल. कामाचा ताण जाणवल्यास वेळेवर विश्रांती घ्यावी. व्यायाम लाभदायक ठरेल.

कन्या चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. त्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात कामाचा उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी स्वत:वर घ्याल. सहकारी वर्ग आपले काम चोखपणे पार पाडेल. तक्रारीला जागा ठेवणार नाही. जोडीदाराची काही कामे मार्गी लागली तरी डोक्याचा ताप कमी होणार नाही. मुलांचे प्रश्न चर्चेने सोडवावे. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करण्याची जबाबदारी आपण स्वीकाराल. रक्तदाबासंबंधित प्रश्न उद्भवतील.

तूळ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे कोणत्याही प्रसंगी मेहनतीची तयारी ठेवाल. जिद्दीने कामे मार्गी लावाल. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. सहकारी वर्ग स्वत:ला मनापासून कामात झोकून देईल. जोडीदाराच्या डोक्यातील विचारांनी त्याचा मनस्ताप वाढेल. त्याच्याबरोबर मोकळेपणे बोलणे आवश्यक आहे. त्याची चिडचिड समजून घ्यावी. मुलांना दिलेल्या स्वातंत्र्यावर आपला अंकुश ठेवाल. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.

वृश्चिक रवी-चंद्राच्या समसप्तम योगामुळे एकंदरीत उत्साह वाढेल. रेंगाळलेल्या कामांना गती येईल. नोकरी-व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांचा सल्ला मान्य करून पुढे गेल्याने अनेकांचा लाभ होईल. अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. हितशत्रूंना नामोहरम कराल. सहकारी वर्गाचा विश्वास जिंकाल. जोडीदार त्याच्या कामात अग्रेसर राहील. यशाची शिखरे सर करेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांकडून समाधान मिळेल. अनावश्यक चिडचिड टाळावी. प्राणायाम करावा.

धनू गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या गुणग्राहकतेला गुरूच्या प्रगल्भतेची जोड मिळेल. साहाय्यासाठी अनेकांचे हात पुढे येतील. नोकरी-व्यवसायात कामाचा मोबदला चांगला मिळेल. मानसन्मान मिळेल. सहकारी वर्गावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवाल. जोडीदाराचे प्रश्न आधी विचारात घ्यावेत. त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कुटुंबाला शिस्त लावताना प्रेमाचे शब्दही आवश्यक ठरतील. सद्य:स्थितीचा नव्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा विचार करावा लागेल. डोळ्यांचा त्रास वाढेल.

मकर शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या उत्साहाला शनीच्या शिस्तीची आणि चिकाटीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायातील किचकट कामात सातत्य टिकवून ठेवाल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्गाच्या मदतीची फारशी अपेक्षा ठेवू नका! जोडीदारासह चांगले सूर जुळतील. एकमेकांच्या सोबतीने कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाल. मुलांचे आरोग्य सुधारेल. त्यांच्या क्षेत्रात ते प्रगती करतील. शीर दबणे, श्वसनास त्रास होणे असे त्रास जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कुंभ चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे सद्य:स्थितीचा सर्व बाजूंनी साकल्याने विचार कराल. कामाची आखणी रेखीवपणे कराल. इतरांसाठी हितकारक ठरतील असे निर्णय जाहीर कराल. वरिष्ठांचा दृष्टिकोन समजून घ्याल. काही नियम आणि अटी जाचक वाटतील. सहकारी वर्ग कामात चालढकल करू बघेल. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल. जोडीदाराच्या कामाच्या स्वरूपात काही बदल होण्याची संभावना आहे. त्याने ते बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.

मीन चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे एखादे काम करण्यासाठी मनातून उत्साह वाटेल. पण प्रत्यक्षात ते काम हातून पूर्ण होईलच असे नाही. नोकरी-व्यवसायात नवी संधी उपलब्ध होईल. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. सहकारी वर्गाच्या मदतीने पुढचे पाऊल उचलावे. मित्रमंडळींकडून आनंद वार्ता समजेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. काही वेळा त्याची मनस्थिती द्विधा होईल. एकमेकांच्या साथीने घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्याल. पाठ आणि कंबरेचे दुखणे सांभाळा.