24 September 2020

News Flash

राशिभविष्य : दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०

रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आंतरिक ऊर्जेचा योग्य उपयोग कराल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आंतरिक ऊर्जेचा योग्य उपयोग कराल. प्रयत्नांना यश मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे नीट ऐकून आणि समजून घ्याल. स्वत:च्या उन्नतीसह इतरांच्या प्रगतीचाही विचार कराल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. मनाविरुद्ध घडणाऱ्या लहान-मोठय़ा गोष्टींकडे फारसे लक्ष न देणे हेच बरे! रागावर नियंत्रण हवे. आपला रक्तदाब मर्यादेत ठेवा. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

वृषभ बुध-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे मिळालेल्या संधीचे सोने कराल. बुद्धिमत्तेला कल्पकतेची जोड देऊन कामाची पत वाढवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्ंया मार्गदर्शनामुळे योग्य निर्णय  घ्याल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घेणे आवश्यक! जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्याला भावनिक आधार देणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. शिस्तीचा बडगा दाखवाल. मूत्रविकार, त्वचाविकार यांचा त्रास सहन करावा लागेल. पथ्य पाळावे.

मिथुन चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे बुद्धिचातुर्य पणाला लावून नव्या योजना मांडाल. समाजहिताचा विचार अग्रस्थानी ठेवाल. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांची बाजू सध्या तरी वरचढ ठरेल. सहकारी वर्गातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. जोडीदाराचा भक्कम आधार मिळेल, मदत मिळेल. कुटुंब सदस्य आपली स्थिती समजून घेतील; पण याचा गैरफायदा न घेता आपणही थोडे नमते घ्यावे. पडणे-झडणे, मार लागणे संभवते.

कर्क शुक्र-शनीच्या समसप्तम योगामुळे शुक्राच्या कलात्मक दृष्टीला शनीच्या चिकाटीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात चिडचिड करून उपयोग नाही. वरिष्ठांचे निर्णय मानून घ्यावे लागतील. सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल. जुन्या व्यावसायिक संबंधातील व्यक्ती आपणाशी संपर्क साधतील. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. त्याची स्थिती समजून घेणे! कुटुंब सदस्यांना मौलिक सल्ला द्याल. वात विकार बळावतील. आहारातील पथ्य पाळणे महत्त्वाचे!

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे जवळच्या व्यक्तींकडून प्रेम, माया, आपुलकी मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अनुभवाचे बोल उपयोगी पडतील. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. सहकारी वर्गाकडून वेळेत कामे करून घेणे अत्यावश्यक ठरेल. जोडीदाराच्या कामकाजात, कार्यपद्धतीमध्ये फारसे लक्ष घालू नका. कुटुंबातील व नातेवाईकांमधील मतभेदामुळे डोक्याचा ताप वाढेल. हाडांची काळजी घ्यावी. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने बोटांचे सांधे आखडतील.

कन्या चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे अडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात उच्च पदावरील अधिकारी आपल्या कामात विशेष लक्ष घालतील. सहकारी वर्गाला आवश्यक गोष्टी, माहिती पुरवाल. त्यामुळे कामाला गती येईल. जोडीदाराचा वेळ कामापेक्षा इतर बाबी सांभाळण्यात जास्त खर्ची पडेल. त्याची दमणूक होईल. कुटुंबात ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अतिविचारांनी जास्त दमून जाल. योग्य व्यायाम व विश्रांती आवश्यक!

तूळ  गुरू-बुधाच्या नवपंचम योगामुळे गुरूच्या ज्ञानाला बुधाच्या बुद्धिमत्तेची सुयोग्य साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना सुचवाल. वरिष्ठांची मते जाणून घ्याल. सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या रागाचा पारा नियंत्रणात ठेवा. चर्चेने प्रश्न सोडावा. कुटुंब सदस्यांच्या प्रयत्नांना उशिराने यश येईल. त्यांना भावनिक आधार द्याल. हातापायाची जळजळ, फोड येणे असे त्रास संभवतात.

वृश्चिक रवी-चंद्राच्या समसप्तम योगामुळे अनेक अडचणींवर मात कराल. लांबणीवर पडलेली कामे पूर्णत्वाकडे न्याल. नोकरी-व्यवसायात स्वत:चे मत प्रभावीपणे मांडाल. वरिष्ठांची मंजुरी मिळवाल. सहकारी वर्गाला त्यांच्या कामाची पोचपावती दिल्याने त्यांचा हुरूप आणखी वाढेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. कल्पकतेला, नावीन्याला चिकाटीची जोड मिळेल. उत्साहाच्या भरात केलेल्या कामाचा शिणोटा जाणवेल. विश्रांती आवश्यक!

धनू चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे आपल्या आंतरिक ऊर्जेचा सकारात्मक उपयोग कराल. भावना आणि कर्तव्य यांचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात आर्थिक उलाढाल वेग घेईल. मेहनतीला यश मिळेल. सहकारी वर्गाकडून वेळेत मदत मिळाल्यामुळे अधिक लाभ होईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या कलागुणांना वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. श्वासाचे विकार बळावतील. उत्सर्जन संस्थेची काळजी घ्यावी लागेल.

मकर चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे उत्साहवर्धक वातावरणात हाती घेतलेली कामे मार्गी लावाल. नोकरी-व्यवसायात आपले मुद्दे ठामपणे मांडाल. सत्यापुढे परिणामाचा विचार करणार नाही. वरिष्ठांना आपला आधार वाटेल. सहकारी वर्गाची कोंडी फोडाल. जोडीदाराची कल्पक वृत्ती आणि आपली रोखठोक प्रवृत्ती यांचा सुवर्णमध्य साधणे आवश्यक! कौटुंबिक सदस्याची मानसिक व्यथा समजून घ्यावी, अन्यथा गृहशांती बिघडेल. हातापायाची शीर दबेल.

कुंभ चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे नावीन्याची ओढ स्वस्थ बसू देणार नाही. आपले छंद जोपासून मनाला नवी उभारी द्याल. नोकरी-व्यवसायात अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराल. सहकारी वर्ग अपेक्षित काम वेळेत पूर्ण करेल. त्यांच्या जागरूक निरीक्षणामुळे काही महत्त्वाचे मुद्दे हाती येतील. जोडीदाराच्या कार्यात त्याचे वर्चस्व वाढेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे असेल. नातेवाईक आस्थेने चौकशी करतील. सर्दीपडसे, मूत्रविकार बळावतील.

मीन चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे ज्येष्ठांच्या ओळखीने खोळंबलेल्या कामकाजाला गती येईल. नोकरी-व्यवसायात योग्य दिशेने केलेल्या मेहनतीने अडचणींवर मात कराल. सहकारी वर्गाची चिकाटी आणि समयसूचकता यामुळे मोठा दिलासा मिळेल. जोडीदाराच्या बौद्धिक पातळीला साजेशी आव्हाने पेलून तो आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडेल. डोळ्यांवरील अतिरिक्त ताण दुर्लक्षित करू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2020 8:01 am

Web Title: astrology from 28th august to 3rd september 2020 rashibhavisya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २१ ते २७ ऑगस्ट २०२०
2 राशिभविष्य : दि. १४ ते २० ऑगस्ट २०२०
3 राशिभविष्य : दि. ७ ते १३ ऑगस्ट २०२०
Just Now!
X