सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष बुध-हर्षलच्या षडाष्टक योगामुळे बुधाच्या बुद्धीला हर्षलच्या वैचित्र्यपूर्ण नावीन्याची जोड मिळेल. विचार भरकटू न देता त्यांना सकारात्मक मार्गावर वळवा. नोकरी-व्यवसायात संशोधन क्षेत्रात अपयश आले तरी खचून जाऊ नका. वरिष्ठांना आपले म्हणणे पटवून देण्याची ही वेळ नव्हे. सहकारी वर्गाला समजून घ्यावे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवा. पोटाचे विकार, अपचन, उत्सर्जन संस्थेसंबंधित त्रास सहन करावे लागतील.

वृषभ शुक्र-मंगळाच्या षडाष्टक योगामुळे आवडीनिवडी आणि कर्तव्य यात संघर्ष होईल. आर्थिक गुंतवणूक करताना सतर्क राहा. नोकरी-व्यवसायात करारातील छुपे नियम, अटी यांची कसून तपासणी करा. वरिष्ठांच्या मार्गदर्शन लाभेल. सहकारी वर्गाचा उत्साह वाढेल असे नवे आयोजन कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अडीअडचणींची मालिका सुरू होईल. त्याला आपल्या आधाराची, सल्लय़ाची गरज भासेल. उत्सर्जन संस्था सांभाळा. आहार व व्यायामाकडे लक्ष द्या.

मिथुन शुक्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे कलात्मक दृष्टिकोनाचा लाभ होईल. संकटातून संधी शोधाल. कला आणि तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाची मतांकडे फारसे लक्ष देऊ नका. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. त्याच्या कामाबद्दल चर्चा करा. समस्येवर तोडगा सापडेल. कौटुंबिक वातावरणातील तणाव आपल्या खेळकर स्वभावाने हलका कराल. अपचन आणि त्वचा विकार सतावतील.

कर्क चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे चंद्राची क्रियाशीलता आणि बुधाचे कुतूहल यांचा सुंदर मिलाप दिसून येईल. नित्यनेमाच्या गोष्टींमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून फारसे पाठबळ मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. सहकारी वर्गातील विशेष गुण ओळखून त्यांना योग्य न्याय द्याल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. तो मेहनतीने यश संपादन करेल. कौटुंबिक  वातावरण खेळीमेळीचे राहील. सांधेदुखीमुळे त्रस्त व्हाल. व्यायाम आवश्यक!

सिंह मनाचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या केंद्रयोगामुळे मनातील भावना आणि विचार यांच्यात संघर्ष निर्माण होईल. कर्तव्यपूर्तीमध्ये हयगय करू नका. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा योग्य उपयोग केल्याने व्यवसाय वृद्धी होईल. सहकारी वर्गाची समस्या व अडचणी समजून त्यांची कार्यक्षमता वाढवावी लागेल. जोडीदारासह सूर जुळतील. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. जखमेत पू होऊन ती चिघळण्याची शक्यता!

कन्या चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कामात नवा उत्साह येईल. सद्य:स्थितीत सकारात्मक विचारांनी स्वत:ला उभारी द्याल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाची मोठी मदत होईल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. जोडीदाराचा त्याच्या कामाच्या ठिकाणी चांगला प्रभाव पडेल. कुटुंब सदस्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. शिक्षणात प्रगती करतील. कामासाठी लहान-मोठे प्रवास करण्याचे आपले योग आहेत. अतिविचारांनी दमणूक होईल. योगासने व प्राणायाम करावा.

तूळ चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे आप्तस्वकीयांना मदत कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायातील महत्त्वपूर्ण कामे जिकिरीने पूर्ण कराल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढाल. सामाजिक बांधिलकीचे भान राखाल. जोडीदाराच्या कामाच्या व्यापामुळे त्याची थोडी धावपळ आणि चिडचिड वाढेल. कुटुंब सदस्यांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. रक्तासंबंधित त्रास होतील. जखम चिघळेल.

वृश्चिक गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.  नोकरी-व्यवसायात आपली स्वतंत्र छाप पाडाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाची तारांबळ उडेल. त्यांना कामाची योग्य आखणी करून द्याल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचा मान वाढेल. त्याच्या शब्दांना वजन येईल. कुटुंब सदस्य कामानिमित्त प्रवास करतील, परंतु त्यात काही ना काही अडचणी येतील. अनपेक्षित संकटांना सामोरे जाताना चिडचिड होईल. शांत राहा.

धनू चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे चंद्राची भावुक वृत्ती आणि शुक्राची कल्पकता, सर्जनशीलता यांचा उत्तम मेळ जमेल. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशाशी संपर्क साधाल. कर्तृत्वाला नवे आयाम मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. सहकारी वर्गाला सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधित तक्रारी डोकं वर काढतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवणे आपल्या हाती राहील. त्वचा विकार बळावू देऊ नका.

मकर चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे आपला उत्साह आणि उमेद वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाचे प्रश्न सर्वांपुढे मांडाल. अन्यायाला वाचा फोडाल. घाई घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. दोघे मिळून कुटुंबासाठी नव्या योजना आखाल. लहान-मोठे कौटुंबिक वाद दुर्लक्षित करा. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी लांबणीवर पडतील. रसवाहिन्यांच्या संबंधित तक्रारी निर्माण होतील.

कुंभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे नव्या ओळखी लाभदायक ठरतील. यश, कीर्ती, मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सूचनांचा स्वीकार करावा. आपल्या कार्यपद्धतीत काही सकारात्मक बदल कराल. सहकारी वर्गाकडून विशेष मदत मिळेल. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. त्याचे आराखडे चुकल्यास त्याला सावरून घ्याल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आपणास विशेष आधार वाटेल. इतरांच्या चुकीची शिक्षा स्वत:ला देऊ नका.

मीन गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे मोठय़ांच्या ओळखीमुळे अडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करून पुढील मार्गक्रमण आखाल. सहकारी वर्गाचे ज्ञान आणि मेहनत याचा चांगला उपयोग होईल. जोडीदाराची प्रगती होईल. कुटुंब सदस्यांच्या मेहनतीचे फारसे लाभ मिळणार नाहीत. मणका सरकणे, त्यात पाणी होणे असे त्रास संभवतात.