25 February 2021

News Flash

राशिभविष्य : दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२१

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या उत्साहाची जोड मिळेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या उत्साहाची जोड मिळेल. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. अडचणीतून पुढे जाण्याचे मार्ग सापडतील. नोकरी-व्यवसायात सत्याची खात्री केल्याशिवाय कोणतीही कृती करू नका. सहकारी वर्गासह शांत डोक्याने विचार करून बोला. जोडीदारासह समजूतदारपणे वागाल. कुटुंब सदस्यांच्या इच्छा पूर्ण कराल. स्वत:साठी थोडा वेळ राखून ठेवाल. रसवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास वैद्यकीय सल्ला उपयुक्त ठरेल.

वृषभ आपल्या भाग्य स्थानातील शुक्र-शनीच्या युतियोगामुळे मेहनतीचे चीज होईल. चिकाटी सोडू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. त्यांचा आपणावरील विश्वास खरा करून दाखवाल. सहकारी वर्गाच्या मदतीने मोठी जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. त्याच्या कार्यक्षेत्रात लहानमोठे अडथळे निर्माण होतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. स्नायूंचे दुखणे अंगावर काढू नका.

मिथुन रवी-बुधाच्या युतियोगामुळे काही निर्णय घेताना मानसिक स्थिती द्विधा होईल. चंचलता वाढेल. नोकरी-व्यवसायात अडचणींची मालिका पार करत पुढे जावे लागेल. सहकारी वर्गावर संपूर्णपणे विसंबून न राहता कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नव्या योजना आखाल. जोडीदार प्रगतिकारक पाऊल उचलेल. त्याच्या जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी कराल. उष्णतेमुळे उत्सर्जनाच्या तक्रारी वाढतील.

कर्क शुक्र-चंद्राच्या लाभ योगामुळे शुक्राच्या कल्पकतेला चंद्राच्या नावीन्याची साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात तडकाफडकी निर्णय घेऊ नका. मानहानी सहन करण्याचे प्रसंग येतील. धीराने घ्या. सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदारासह मनमोकळेपणाने बोलल्याने हलके वाटेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुले समजूतदारपणा दाखवतील. नातेवाईकांच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी धावपळ कराल. शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज भासेल.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे लहानशा कारणाने भावनांच्या आहारी जाण्याची शक्यता दिसते. रागावर नियंत्रण ठेवा! स्वाभिमान जपण्यासाठी जवळच्या व्यक्तींचा अपमान करू नका. नोकरी-व्यवसायात शिस्तीचा बडगा दाखवाल. वरिष्ठांना साहाय्य कराल. अधिकाराचा उपयोग करून सहकारी वर्गाकडून कामे वेळेत पूर्ण करून घ्याल. जोडीदाराच्या कामातील नेमकेपणा विशेष उल्लेखनीय असेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याच्या कष्टाचे चीज होईल. मणक्याचे दुखणे बळावेल.

कन्या चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे आत्मविश्वास वाढेल. मित्रांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेत घेऊ शकाल. नजीकच्या भविष्यात त्याचे लाभ मिळतील. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांवर जास्त लक्ष केंद्रित कराल. योग्य दक्षता घेऊन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. जोडीदारासह लहानमोठे वाद मिटून जातील. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. अपचन आणि सांधेदुखी यांचा त्रास वाढल्याने वैद्यकीय औषधोपचार घ्यावे लागतील.

तूळ चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे बुद्धिमत्तेला बळकट मानसिक स्थितीची जोड मिळेल. हाती घेतलेली कामे वेग घेतील. आत्मविश्वासाने मोठे व महत्त्वाचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गावर सोपवलेली कामे पूर्ण करताना त्यांची तारांबळ उडेल. जोडीदाराच्या कामातील अडचणींमुळे तो अधिक त्रस्त होईल. कुटुंबाकडे फारसे लक्ष देऊ शकणार नाही. अशा वेळी एकमेकांना समजून घेणे आवश्यक! शारीरिक समस्यांचा गुंता वाढेल. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे ज्ञानाचा कारक गुरू मनोबलाचा कारक असलेल्या चंद्राला उत्तम साथ देईल. निर्णय योग्य प्रकारे विचार करून घ्याल. वरिष्ठांचे विचार पटले नाहीत तरी फारसा विरोध न दर्शवता ती कृती लांबणीवर टाकाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नाव काढेल. खूप मेहनत घेईल. कुटुंब सदस्यांना लहान-मोठय़ा प्रवासाचे योग येतील. मुलांची वाटचाल प्रगतिकारक असेल. अतिविचार करून डोके सुन्न होईल. मानसिक, भावनिक विश्रांती घ्यावी.

धनू चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा उत्तमरीत्या उपयोग होईल. नवी यंत्रणा कार्यान्वित कराल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कामकाजातील महत्त्वाचा टप्पा पार कराल. आर्थिक लाभ होतील. सहकारी वर्गाचे प्रश्न समजून त्यांना आवश्यक ती मदत कराल. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे कुटुंबाला लाभ होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नातेवाईकांकडून आनंदवार्ता समजेल. आतडी आक्रसल्याने पचनसंस्था बिघडेल.

मकर उत्कर्षांचा कारक रवी आणि कृतिशीलतेचा कारक चंद्र यांच्या लाभ योगामुळे हाती घेतलेली कामे तडीस न्याल. विरोधकांना समर्पक उत्तरे द्याल. वरिष्ठांना सत्य परिस्थितीची जाणीव करून द्याल. सहकारी वर्गाची मदत मिळेलच असे मात्र नाही. जोडीदाराला आपल्या कार्यात अधिक सतर्क राहावे लागेल. तरच त्याला त्याचे ध्येय गाठता येईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुले आपल्यातील गुणांची चुणूक दाखवतील. वैद्यकीय उपचारात सातत्य ठेवा. हाडांचे दुखणे आटोक्यात राहील.

कुंभ शुक्र-गुरूच्या युतियोगामुळे शुक्राचा कलात्मक दृष्टिकोन आणि गुरूची परिपक्वता यांचा मिलाफ होईल. हाती घेतलेल्या कामांना गती येईल. नोकरी-व्यवसायात उन्नती होईल. आर्थिक गणिते बदलतील. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. सहकारी वर्गाची मदत घेताना त्यांना सूचना देणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराचा त्याच्या कामातील पवित्रा थोडा चुकीचा ठरेल. त्याने आपल्या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक! मुलांचे प्रश्न दोघे मिळून सोडवाल. उत्सर्जनाच्या तक्रारी वाढतील.

मीन चंद्र-शनीच्या लाभ योगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या चिकाटीची सकारात्मक जोड मिळेल.  नोकरी-व्यवसायातील कामगिरी चोखपणे पार पाडाल. वरिष्ठांचे विचार अमलात आणाल. सहकारी वर्गाच्या संपूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग करून घ्यावा लागेल, तरच कामे वेळेत पूर्ण करू शकाल. जवळच्या नातेवाईकांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. आठवडा धावपळीत जाईल. स्वत:च्या हाडांची, सांध्यांची काळजी घ्यावी. व्यायाम आणि विश्रांती आवश्यक!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2021 2:50 pm

Web Title: astrology from 5th to 11th february 2021 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२१
2 राशिभविष्य : २२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१
3 राशिभविष्य : १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२१
Just Now!
X