26 October 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑक्टोबर २०२०

झटपट  निर्णय घेऊन पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून संशोधन कार्यात प्रगती कराल.

संग्रहित छायाचित्र

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष झटपट  निर्णय घेऊन पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून संशोधन कार्यात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाचा कामात रस वाढेल अशी नवी योजना आखाल. जोडीदाराच्या हुशारीचे आणि मेहनतीचे कौतुक होईल. त्याच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. जठराचे आरोग्य जपा. पचनक्रिया सुधारा.

वृषभ रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे नवे करार लाभदायक ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. सहकारी वर्गाशी जुळवून घ्यावे लागेल. जोडीदाराच्या डोक्याचे तापव्याप वाढतील. शांतपणे निर्णय घ्यावेत. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. श्वसनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. नाक चोंदणे, डोके जड होणे असे त्रास संभवतात.

मिथुन रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे सुरळीत चाललेल्या कामात अडथळे येतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. नोकरी-व्यवसायात शब्दाने शब्द वाढवू नका. वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घेण्यातच हित आहे. सहकारी वर्गाची अरेरावी अनुभवाल. जोडीदाराचा  सल्ला मानावा. मुलांच्या हुशारीचे कौतुक वाटेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. हातून सामाजिक कार्य घडेल. उष्णतेचे विकार बळावतील. मूळव्याधीचा त्रास होईल. तळपायाला खाज येईल.

कर्क चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे मनातील भावना आणि डोक्यातील विचार यांचा योग्य मेळ साधाल. नोकरी-व्यवसायात आशादायक घटना घडतील. सहकारी वर्गाकडून मनाप्रमाणे कामे पूर्ण करून घ्याल. त्यांच्या बुद्धिमत्तेची त्यांना योग्य पोचपावती द्यावी. जोडीदाराच्या नकारात्मक विचारांमुळे आपले पाय मागे खेचले जातील. तरी हाती घेतलेली कामे सोडू नका. सद्य:स्थितीत नियमांचे पालन करा. श्वसनाचे त्रास होतील. मानसिक स्वास्थ्य बिघडेल. प्राणायाम करावा.

सिंह गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वरिष्ठांचा करारी बाणा अनुभवण्यास मिळेल. हाती घेतलेली कामे काटेकोरपणे पूर्ण कराल. आपला अहम् भाव बाजूला सारून सहकारी वर्गाची मदत घ्यावी लागेल. नवे करार  कराल. आपल्या क्षेत्रातील सादरीकरण प्रभावीपणे कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडचणींमुळे त्याला ताणतणाव जाणवेल. अपचनामुळे पोटदुखी सहन करावी लागेल.

कन्या रवी-गुरूच्या केंद्र योगामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी येतील. द्विधा मन:स्थिती होईल. मोठय़ांचे अनुभव मार्गदर्शक ठरतील. कामे हळूहळू मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ होतील. सहकारी वर्गाला मोठय़ा मनाने मदतीचा हात पुढे कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी पार पाडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांची रखडलेली कामे सुरू होतील. अनावश्यक खर्च टाळा. ओटीपोटाचे दुखणे बळावेल. औषधोपचार घ्यावेत.

तूळ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे विचार, भावना आणि वर्तन यांच्यात समतोल साधाल. समविचारी लोकांशी केलेली बौद्धिक चर्चा फायदेशीर ठरेल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यात उत्तम दुवा साधाल. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीची चिंता सतावेल. जोडीदाराच्या हट्टीपणामुळे चालून आलेली संधी गमवावी लागेल. वारंवार त्रास देणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको. पित्तावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नावीन्याची ओढ जाणवेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात सर्जनशीलतेला वाव मिळेल. सहकारी वर्गाला मदत कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावेल. त्याच्या अधिकारात वाढ होईल. कौटुंबिक वातावरणात प्रेमासह शिस्तीचेही महत्त्व राहील. कुटुंब सदस्यांना कामानिमित्त लहान-मोठे प्रवास करावे लागतील. अचानक पोटदुखी व पायात पेटके येणे असे त्रास सहन करावे लागतील.

धनू चंद्र-गुरूच्या समसप्तम योगामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सातत्याने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या प्रगतीसह इतरांचाही लाभ होईल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. वैचारिक चर्चा रंगतील. आपल्या छंदातून गरजवंताला काम मिळेल. समाजाचे ऋण फेडाल. नातेवाईकांच्या अनारोग्यामुळे धावपळ करावी लागेल. कोरडय़ा त्वचेमुळे हाता-पायाला खाज सुटेल.

मकर बुध-शुक्राच्या लाभ योगामुळे कला आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय साधाल. हाती घेतलेले काम चिकाटीने पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात अनेक अडथळे पार करत पुढे जावे लागेल. आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओळखून वागावे. सहकारी वर्गावर विसंबून राहू नका. नव्या योजनांचा अधिक बारकाईने अभ्यास कराल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कुटुंबात शिस्तीचा अवलंब करावा लागेल. गुडघ्याजवळील स्नायूबंधांचे त्रास निर्माण होईल.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे उत्स्फूर्तपणे लेखन आणि सादरीकरण कराल. जनसामान्यांच्या भावना शब्दात व्यक्त कराल. वादग्रस्त मुद्दय़ांवर अभ्यासपूर्वक वाचन कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय मोठय़ा चतुराईने घ्याल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. नवे करार करताना छुपे अर्थ लक्षात घ्यावेत. जोडीदार त्याच्या कामात अधिक व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना नातेवाईकांची मदत होईल. आरोग्य चांगले राहील.

मीन चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे कलात्मक दृष्टिकोनाचा लाभ होईल. भावनांना प्राधान्य द्याल. खरेदीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाच्या मेहनतीचे कौतुक होईल. कामासाठी लहान-मोठे प्रवास कराल. जोडीदाराच्या मनाप्रमाणे त्याला कामाचा परतावा मिळणार नाही. उत्सर्जन संस्थेचे विकार डोके वर काढण्याची शक्यता! आहारावर नियंत्रण ठेवावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 7:24 am

Web Title: astrology from 9th to 15th october 2020 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २ ते ८ ऑक्टोबर २०२०
2 राशिभविष्य : दि. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२०
3 राशिभविष्य : दि. १८ ते २४ सप्टेंबर २०२०
Just Now!
X