अदिती पाध्ये – response.lokprabha@expressindia.com
हिवाळा विशेष
थंडी आली की तीळ, गूळ यांच्याबरोबरीने बाजरीचा वापरही वाढतो तो तिच्यामध्ये असलेल्या उष्णतेच्या गुणधर्मामुळे. म्हणूनच थंडीसाठी बाजरीचे काही हटके पदार्थ-
बाजरीचे घारगे
साहित्य :
बाजरीचे पीठ १ वाटी
तांदळाचे पीठ अर्धी वाटी
गूळ १ वाटी
पाणी १ वाटी
तीळ २ मोठे चमचे,
साजूक तूप २ चमचे
तळण्यासाठी तेल
चिमूटभर मीठ
कृती :
प्रथम एका कढईत एक वाटी चिरलेला गूळ, पाणी, तूप एकत्र करून गॅसवर ठेवा. गूळ पूर्णपणे विरघळून पाण्याला उकळी आली की त्यात बाजरीचे पीठ घालून ढवळत राहा, पूर्णपणे एकजीव होऊन शिजले की झाकण ठेवून, गॅस बंद करा. १० मिनिटांनी झाकण काढून एका ताटात पसरा. त्यात तीळ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घाला. मळून त्याचे पेढय़ाएवढे गोळे करून प्लास्टिकवर तेलाचा हात लावून थापा. मध्ये बोटाने भोक पाडा, म्हणजे चांगले तळले जाते.
हा पदार्थ मंद ते मध्यम आचेवर तळा, नाहीतर करपण्याची शक्यता असते. गार झाल्यावर खायला द्या.
बाजरी पिठाची उकड काढल्यामुळे ते मिळून येते आणि छान एकजीव होते.
तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो. हा बाजरीचा हटके पदार्थ नक्की करून बघा.
एक मोठी वाटी बाजरीच्या पिठाचे २० घारगे होतात.
बाजरी, मुगाची खिचडी
साहित्य :
२ वाटय़ा अख्खी बाजरी; १ वाटी मोड आलेले मूग,
१ चमचा तिखट; १ चमचा गोडा मसाला
२ चमचे धने जिरे पूड,
२ चमचे तेल, मोहरी, हिंग जिरे, हळद १ चमचा.
टोमॅटो २, कांदे २
कृती :
एका पातेल्यात सहा वाटय़ा पाणी उकळत ठेवा. बाजरी निवडून स्वच्छ धुवून घ्या. आणि उकळलेल्या पाण्यात बाजरी घालून १० मिनिटे मोठा गॅस करून उकळा. नंतर तसेच झाकून तीन तास ठेवा. नंतर त्यात मोड आलेले मूग घालून त्याच पाण्यात कुकरमध्ये घालून तीन शिटय़ा द्या. नंतर १५ मिनिटे गॅस बारीक करून शिजवा. थंड झाल्यावर पळीने घोटून घ्या. एका कढईत तेल, मोहरी, जिरे, हळद, हिंग यांची फोडणी करा. त्यात टोमॅटो, कांद्याचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवा. नंतर त्यात तिखट, धने जिरे पूड, गोडा मसाला आणि एक वाटी पाणी घालून उकळा. नंतर त्यात शिजवलेली बाजरी, मूग आणि चवीपुरते मीठ घाला. तूप घालून गरम गरमच खा. बाजरी लवकर शिजत नाही, म्हणून या पद्धतीने शिजवल्यास व्यवस्थित शिजते. पातळसरच करा. जास्त घट्ट करू नका.
बाजरीच्या पिठाचा केक
साहित्य : (टी टाइम)
बाजरीचे पीठ सव्वा कप; गव्हाचे पीठ अर्धा कप; कॉर्न फ्लोअर पाव कप
गूळ (किसून) १ कप; ताक १ कप + २ चमचे;
व्हॅनिला इसेन्स पावडर १ छोटा चमचा;
खायचा सोडा : १ छोटा चमचा,
सनफ्लॉअर तेल : अर्धा कप; मिल्क पावडर : २ मोठे चमचे.
कृती :
प्रथम किसलेला गूळ, ताक आणि तेल चमच्याने एकत्र फेटून घ्या, नंतर त्यात खायचा सोडा घालून पाच मिनिटे ठेवा. तोपर्यंत ओव्हन प्रीहीट करा. बाजरी पीठ, गहू पीठ, कॉर्न फ्लोअर, मिल्क पावडर एकत्र चाळून घ्या. नंतर गूळ ताकाच्या मिश्रणात चाळलेले पीठ हळूहळू एकत्र करून घाला. घट्टसर वाटल्यास थोडे ताक घाला. केकच्या भांडय़ाला तेल लावून, थोडे पीठ शिंपडून प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये केकचे मिश्रण ३५ मिनिटे १८० अंश सेल्सिअसवर बेक करा. थंड झाल्यावर स्लाइस कापा.
नेहमीच्या केकपेक्षा या केकचे मिश्रण थोडे पातळ करा म्हणजे बाजरी पिठामुळे कोरडेपणा येणार नाही.
जास्त प्रमाणात केक करायचा असल्यास प्रत्येक पदार्थ त्याच पटीत वाढवा.
बाजरीच्या पिठाचा ढोकळा
साहित्य :
बाजरीचे पीठ – दीड वाटी,
बेसन पीठ – अर्धी वाटी,
ताक (आंबट) – २ वाटय़ा,
तिखट – १ चमचा,
तेल – ४ चमचे,
मोहरी, तीळ – २,२ चमचे,
हिंग पावडर – पाव चमचा,
खायचा सोडा – १ चमचा.
साखर – अर्धा छोटा चमचा.
यात तिखटाऐवजी आले मिरची पेस्टही घालू शकतो.
कृती : बाजरी तसेच बेसन पिठात आंबट ताक घालून एकत्र करा. सात ते आठ तास ठेवा. नंतर त्यात मीठ, एक चमचा तेल आणि साखर, त्यावर खायचा सोडा घालून चमच्याने एकाच दिशेने फेटा आणि लगेच ढोकळा स्टॅण्डला लावून किंवा कुकरच्या भांडय़ामध्ये २० ते २५ मिनिटे वाफवून घ्या. छोटय़ा कढईत तेल, मोहरी, हिंग यांची फोडणी करून घ्या.
नंतर त्यात गॅस बंद करून तीळ आणि शेवटी तिखट घाला. त्यात तीन चमचे पाणी घालून थोडे त्यांच्या वडय़ा कापा. त्यावर ही फोडणी घाला. मिश्रण सोडा घालून फेटल्यावर लगेच वाफवायला ठेवा, म्हणजे ढोकळा हलका होतो.
ढोकळ्यासाठी फोडणी करताना त्यात थोडे पाणी घातल्यामुळे ढोकळा कोरडा होत नाही आणि थंड झाल्यावरही छान लागतो.
बाजरीच्या पिठाचे घावन
साहित्य :
बाजरीचे पीठ १ वाटी,
तांदळाचे पीठ १ वाटी,
मीठ चवीनुसार
आंबट ताक १ वाटी
तेल बाजूने घालण्यासाठी
ओल्या खोबऱ्याची तीळ घालून चटणी
कृती :
बाजरी पीठ, तांदूळ पीठ, थोडेसे मीठ आणि ताक घालून अर्धा तास भिजवून ठेवा. नंतर तवा तापवून त्यावर छोटे आणि जरा जाडसर पीठ पसरून घाला, बाजूने तेल सोडा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. घावन करायला घेताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. खूप पातळ करू नका. घट्टसरच असू द्या. खरपूस भाजून चटणीबरोबर गरम गरमच खा.
चटणीसाठी :
ओलं खोबरं अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या चार, तीळ दोन चमचे, कोथिंबीर एक चमचा, चवीनुसार मीठ घालून एकत्र वाटा आणि वरून तेल, मोहरी, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी घालून घावनाबरोबर खा.
बाजरीच्या पिठाबरोबरीने तांदूळ पीठ घातल्यामुळे घावन न चिकटता व्यवस्थित निघतात आणि खरपूस होतात, कोरडे होत नाहीत.
थंडीच्या दिवसात भाकरीसाठी पर्याय म्हणून हे घावन करा. चवबदल अनुभवाल.
बाजरी – टिक्की – सॅण्डविच
साहित्य :
बाजरीचे पीठ १ वाटी,
पनीर – अर्धी वाटी
किसलेला कोबी – पाव वाटी
किसलेले गाजर – पाव वाटी
गरम मसाला – ४ चमचे
तिखट – १ चमचा
लिंबाचा रस – १ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
दही – २ चमचे
गव्हाचा ब्रेड – १० स्लाईसेस
टोमॅटो केचअप
अमूल बटर
कृती :
प्रथम कोबी, गाजर, पनीर किसून त्यात दही आणि मसाले एकत्र करून घ्या. नंतर त्यात बाजरीचे पीठ घालून एकत्र करा. हवे असल्यास थोडे पाणी शिंपडा (जास्त घालू नका). मग त्याला गोल चपटा आकार देऊन तळा. ब्रेड वाटीने गोल कापून घ्या. दोन स्लाईस घेऊन एकावर बटर आणि दुसऱ्यावर टोमॅटो केचअप लावून घ्या आणि दोन्हीच्या मधोमध टिक्की ठेवून आस्वाद घ्या.
यात पनीर, भाज्या असल्यामुळे हे सॅण्डवीच प्रथिने तसेच जीवनसत्त्वांनी परिपूर्ण होते.
गव्हाचा ब्रेड आणि बाजरीचे पीठ यामुळे हा पोटभरीचा पदार्थ आहे.
बाजरीचे कोफ्ते आणि पालक करी
साहित्य :
कोफ्त्यासाठी :
बाजरीचे पीठ – १ वाटी,
पनीर आणि बटाटा – प्रत्येकी १ वाटी
गरम मसाला, हिरवी मिरची आले पेस्ट १ चमचा, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल,
करीसाठी : पालक प्युरी -१ वाटी, बाजरी पीठ -२ चमचे, गरम मसाला -१ चमचा,
मीठ -चवीनुसार, मीरपूड – अर्धा चमचा
कृती :
कोफ्त्याचे सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या आणि कोफ्ते करून तळून घ्या. करीसाठी पालक प्युरीमध्ये बाजरी पीठ, मसाले आणि मीठ घालून एक उकळी काढा. करीमध्ये कोफ्ते घालून गरम खायला द्या.
बाजरीच्या पिठात पनीर आणि बटाटा घातल्याने कोरडेपणा न रहाता, मिश्रण एकजीव होते. आणि कोफ्ते खाताना पालकामध्ये एकजीव होतात.
कोफ्ते तळलेले असल्यामुळे पालकाच्या करीमध्ये तेलाचा वापर केला नाही.
त्यामुळे पौष्टिक पदार्थ पोटात जातो आणि फार उष्मांकही मिळत नाहीत.
बाजरीचे वडे
साहित्य :
बाजरीचे पीठ -२ वाटय़ा तांदळाचे पीठ – अर्धी वाटी,
दही – १ वाटी तिखट, मीठ चवीनुसार,
धने जीरेपूड – २ चमचे तेल तळण्यासाठी
कृती :
प्रथम बाजरीच्या पिठात तिखट, मीठ, धने जीरेपूड, दही एकत्र करून घ्या. त्यात दोन चमचे तेल घालून मळून घ्या. कोरडे वाटल्यास पाणी घाला. गोलाकार थापून मध्ये भोक पाडून तळा. गरम गरमच खायला द्या.
या वडय़ात दही घातल्यामुळे ते खुशखुशीत होतात.
तांदळाचे पीठ घातल्यामुळे थापतांना त्रास न होता कुरकुरीत होतात.
शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे वडे अधिकच चविष्ट लागतात आणि थंडीत शरीराची झीज भरून निघते.
बाजरीची इडली
साहित्य :
बाजरी -२ वाटय़ा,
तांदूळ -दीड वाटी,
उडीद डाळ – १ वाटी,
मेथी दाणे – १ चमचा
मीठ -चवीनुसार
तेल-
नारळाची चटणी
कृती : बाजरी स्वच्छ धुुवून गरम पाण्यात आठ ते दहा तास भिजवून ठेवा. तांदूळ आणि उडीद डाळ चार तास वेगवेगळे भिजवा. उडीद डाळ भिजवताना त्यात मेथीदाणे घाला. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून एकत्र करा, आणि आंबण्यासाठी आठ ते दहा तास ठेवा. थंडीच्या दिवसात १२ तास तरी ठेवावे लागते. नंतर त्याच्या इडल्या करून खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरमच खायला द्या.
बाजरी गरम पाण्यात भिजवल्यामुळे छान वाटली जाते आणि इडली करतांना एकजीव होते.
थंडीच्या दिवसात बाजरी, तांदूळ भिजवताना गरम पाणी घातल्यास पीठ लवकर आंबण्यास मदत होते.