आषाढी विशेष
भागवत धर्माचं वैशिष्टय़ म्हणजे काळाच्या सगळ्या मर्यादा पार करून  तो एकविसाव्या शतकातही टिकून आहे, एवढंच नाही तर त्याचा विचार आजही सयुक्तिक आहे. भागवत धर्माच्या या शतकानुशतकं टिकून राहण्यामागचं रहस्य काय आहे?  एखाद्या धर्मामध्ये हा प्रवाहीपणा येतो तरी कशामधून?
‘भागवत धर्म’ ही संतमंडळाने मराठी सामाजिक-सांस्कृतिक विश्वाला प्रदान केलेली बहुमोल देणगी आहे. मराठी संस्कृतीचा कणा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला अधिष्ठान लाभलेले आहे ते भागवत धर्माच्या तत्त्वविचाराचेच. किंबहुना, भागवत तत्त्वविचार या भूमीमध्ये रुजविणे हेच वारकरी सांप्रदायिक संतपरंपरेने आपले जीवितकार्य मानल्याचे दिसते. ‘‘आम्हां सांपडले वर्म। करू भागवत धर्म ।। ’’ या नामदेवरायांच्या वचनामध्ये संतांच्या जीवितध्येयाचा हुंकार स्पष्टपणे ऐकू येतो. मराठी आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक पर्यावरणाचे भरणपोषण आज कित्येक शतके करणाऱ्या भागवत धर्माच्या रूपवैशिष्टय़ांची आणि या विचाराच्या मुळाशी असणाऱ्या तात्त्विक भूमिकेची म्हणावी अशी तपशीलवार मांडणी, उकल आणि मीमांसा साहित्यव्यवहारात फारशी झालेली दिसत नाही.
भागवत धर्म हे प्राचीन वैदिक धर्माचेच एक उत्क्रांत आणि मधुर रूप आहे, इथवर आजवरचे बहुतेक अभ्यासक व सांप्रदायिक येऊन स्थिरावलेले आहेत. परंतु, भागवत धर्मविचाराची अंगभूत बलस्थाने कोणती, आज २१व्या शतकातही या विचाराचे आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसते ते कशामुळे? निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंतच्या वारकरी संतमालिकेच्या कार्यातच केवळ नव्हे, तर आजच्या काळातील गाडगेबाबा, तुकडोजीमहाराज, गुलाबरावमहाराज आदी संतांच्या उक्ती-कृतीमध्येही भागवत धर्माने प्रवíतत केलेल्या प्रेरणांचे पडसाद ऐकू येतात ते कशामुळे.. यांसारख्या काही मूलभूत पलूंबाबत मात्र चौफेर चर्चा घडत असल्याचे फारसे जाणवत नाही. महात्मा जोतिराव फुल्यांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या सुधारकांच्या मांदियाळीला संतविचाराने तात्त्विक बठक कशी पुरविलेली आहे, यांबाबत अलीकडील काळात विपुल असे मौलिक संशोधन-लेखन झालेले आहे. संतविचाराला भागवत धर्माचे जे अधिष्ठान आहे, त्यांतील कोणत्या प्रेरणा या सुधारकाग्रणींनी नेमक्या हेरल्या आणि अंगीकारल्या यांबाबत अधिक बारकाईने अभ्यास हाती घेतला गेला पाहिजे.

भागवत धर्म हा निखळ ऐहिक आणि प्रवृत्तिपर असल्यामुळेच त्याचे आकर्षण व प्रस्तुतता आजवर टिकलेली आहे आणि म्हणूनच ती पुढेही टिकून राहील.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी

एकोणिसाव्या शतकातील तीन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी भागवत धर्माबाबत प्रगल्भ विवेचन केलेले आपल्याला दिसते. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोिवद रानडे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ते तीन लोकाग्रणी. डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे हे दोघेही जण प्रार्थना समाजाचे महाराष्ट्रातील अध्वर्यू. या उभयतांची भागवत धर्मपर व्याख्याने प्रकाशित झालेली आहेत. भागवत धर्म हे वैदिक धर्माचेच विलक्षण प्रगत व उत्क्रांत असे मधुर स्वरूप होय, असे न्यायमूर्ती रानडे यांचे प्रतिपादन होते. राजकीयदृष्टय़ा लोकमान्य टिळकांची प्रकृती भांडारकर व रानडे यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असली तरी लोकमान्यांना भागवत धर्मविचाराबाबत कमालीची आस्था होती. श्रीमद्भागवत आणि श्रीमद्भगवद्गीता हे भागवत धर्माचे दोन बीजग्रंथ. यांतील श्रीमद्भगवद्गीता लोकमान्यांना अतीव प्रिय. त्याच वेळी  लोकमान्यांचे तत्कालीन वारकरी सांप्रदायिक धुरिणांशी जवळचे व स्नेहाचे संबंध होते. वैकुंठवासी विष्णुबुवा जोग, श्रीपतीबुवा िभगारकर आदी सांप्रदायिकांशी टिळक वेळोवेळी तात्त्विक चर्चा करीत असत. टिळकांनी सिद्ध केलेल्या गीतारहस्यात, त्यामुळेच, भागवत धर्माबाबत त्यांनी अतिशय विश्लेषक, तपशीलवार विवेचन केलेले सापडते. किंबहुना, श्रीमद्भगवद्गीतेचा कर्मपर अन्वय लावण्यास लोकमान्य सरसावले ते भागवत धर्माचे त्यांचे आकलन विलक्षण पायाशुद्ध असल्यामुळेच, असे म्हणणे अजिबातच चुकीचे ठरणार नाही. महाभारत या बृहग्रंथाचा लोकमान्यांनी आस्थेने आणि बारकाईने अभ्यास केलेला होता. भागवत धर्माचे औरसचौरस विवरण प्रथम महाभारतामध्येच केलेले आढळते. त्यामुळे, भागवत धर्मासंबंधाने टिळकांनी गीतारहस्यामध्ये केलेले प्रतिपादन हे भांडारकर व न्यायमूर्ती रानडे यांनी केलेल्या विश्लेषणापेक्षा अगदी वेगळे दिसते. थोडक्यात सांगायचे तर, लोकसंग्रहाबाबत असणाऱ्या लोकमान्यांच्या कटाक्षाची बीजे भागवत धर्माच्या तत्त्वविचारात रुजलेली सापडतात. लोकमान्यांनी मांडलेल्या कालगणनेप्रमाणे इ.स.पूर्व १४०० हा महाभारताचा निर्मितीकाल ठरतो. सनपूर्व १४व्या शतकापासून ते आजच्या २१व्या शतकापर्यंत जो भागवत तत्त्वविचार आपली सोबत करत आहे, त्यांतील कालातीत मूल्ये व प्रेरणा कोणत्या, हे आस्थेने शोधणे या संपूर्ण पाश्र्वभूमीवर उद्बोधक ठरावे.
जीवनविन्मुख असणारा कोणताही तत्त्वविचार हा काळाच्या प्रवाहात टिकून राहत नसतो. सनपूर्व १४ व्या शतकातील महाभारतामध्ये ज्याचा ऊहापोह केलेला आढळतो असा भागवत तत्त्वविचार आजही प्रस्तुत ठरतो यांत या विचाराचे वैशिष्टय़ सामावलेले आहे. भागवत धर्मविचाराचे हे आद्य व गाभा वैशिष्टय़ कोणते याचा विस्तृत खुलासा लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये केलेला आहे. भागवत धर्म हा प्रवृत्तिपर आहे, हे या विचाराचे गाभावैशिष्टय़ टिळक त्यांच्या प्रबंधात ठसठशीतपणे अधोरेखित करतात. तुम्ही-आम्ही जे जीवन जगतो ते ऐहिक जीवन समृद्ध, संपन्न बनावे यासाठी कार्यरत होण्याची प्रेरणा भागवत धर्म पुरवितो, हे टिळक स्पष्ट करतात. किंबहुना, अशा प्रवृत्तिपर भागवत धर्माचे विवरण महाभारतामध्ये आलेले असल्याने महाभारतामध्ये प्रवíतत केला गेलेला धर्म हाही प्रवृत्तिपरच आहे आणि श्रीमद्भगवद्गीतेचा जन्मही महाभारतामध्येच झालेला असल्याने गीताप्रणीत धर्म हा प्रवृत्तिपर असा भागवत धर्मच आहे, अशी तर्कसंगत उपपत्ती लोकमान्य मांडतात. सनपूर्व १४व्या शतकापासून ते आजच्या २१व्या शतकापर्यंत भागवत तत्त्वविचाराची प्रस्तुतता टिकून राहण्याचे रहस्य हेच. भागवत धर्म हा निखळ ऐहिक आणि प्रवृत्तिपर असल्यामुळेच त्याचे आकर्षण व प्रस्तुतता आजवर टिकलेली आहे आणि म्हणूनच ती पुढेही टिकून राहील.


‘प्रवृत्ती’ आणि ‘निवृत्ती’ या दोन शब्दांनी आपल्या एकंदरच तत्त्वचच्रेमध्ये भयंकर उत्पात घडविलेले आहेत. प्रवृत्ती या शब्दाचा वास्तवातील अर्थगाभा पूर्णपणे ऐहिक आहे. ‘‘समाजाच्या अभ्युदयासाठी आणि ऐहिक वैभवासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे’’ हा ‘प्रवृत्ती’ या शब्दाचा मूळ अर्थ. म्हणजेच, आमच्या परंपरेने ऐहिक जीवनाबाबत नकारात्मक दृष्टिकोण कधीच बाळगलेला नव्हता व नाही. ऐहिक सुखाची व वैभवाची आकांक्षा, भौतिक ज्ञानाची आवड आणि जोपासना, विज्ञान-अर्थशोस्त्र-इतिहास यांसारख्या विषयांबाबत जिज्ञासा, जड विश्वावर विजय मिळविण्याची ईर्षां व त्यासाठी लागणारी साहसी वृत्ती, कार्यनिष्ठा हे सगळे प्रवृत्तिधर्माचे घटक आहेत. अशा या प्रवृत्तिपर, इहवादी भूमिका रुजविणाऱ्या प्रवृत्तिधर्माचे प्रतिपादन महाभारतामध्ये अनेक ठिकाणी केलेले दिसते. श्रीकृष्ण, व्यास, भीष्म यांसारख्या तत्त्ववेत्त्यांनी याच प्रवृत्तिधर्माची गुणमहती गायलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ आपल्या परंपरेत मानले जातात. गमतीचा भाग म्हणजे, अगदी सुरुवातीला धर्म, अर्थ आणि काम हे तीनच पुरुषार्थ गणले जात असत. ‘मोक्ष’ या चौथ्या पुरुषार्थाचा अंतर्भाव बराच नंतर झालेला आहे. महाभारतामध्येही, त्यामुळेच, धर्म-अर्थ-काम या त्रिविध पुरुषार्थाचाच ऊहापोह केलेला दिसतो. कोणतेही राष्ट्र हे समर्थ आणि आत्मसंरक्षणक्षम असणे आणि कोणत्याही अराजकाचा प्रादुर्भाव राष्ट्राला न होणे हे समाजाच्या सुखशांतीसाठी अनिवार्य ठरते. त्यासाठी बुद्धिबल, बाहुबल आणि धनबल या तिघांचीही आवश्यकता असते. धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाची उपेक्षा करून केवळ मोक्ष या चौथ्या पुरुषार्थाचीच उपासना केल्याने आधीच्या तीन पुरुषार्थाची हानी होऊन समाजजीवनाची घडीच बिघडून जाते, यांबाबत महाभारतकार कमालीचे स्पष्ट होते.

अज्ञानात खितपत असलेल्या, भुकेने गांजलेल्या, गरिबीने पिडलेल्या समाजसमूहांचा आणि मोक्षाचा अर्थाअर्थी काहीही संबंध असत नाही, अशी महाभारतातील पक्की धारणा आहे. महाभारतातील प्रवृत्तिपर धर्माचा गाभा हा असा आहे.

अर्थात, माणसाच्या जीवनामध्ये ‘प्रवृत्ती’ आणि ‘निवृत्ती’ या उभय मूल्यांचे महत्त्व आहेच. किंबहुना, अगदी पुराणांचा दाखला आपण घेतला तरी ‘प्रवृत्ती’ आणि ‘निवृत्ती’ या दोन मूल्यांदरम्यान मानवी जीवनात एक सुंदर समतोल साधला जाण्याबाबतची भूमिका आपल्याला सर्वत्र दिसते. पुराणांतील कथनानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्या वेळी त्याला एकूण १४ मानसपुत्र होते. या १४ जणांची पुन्हा सात आणि सात अशा दोन गटांत पुढे ब्रह्मदेवानेच विभागणी केली. सनत्कुमारादी सात जे मानसपुत्र होते, ते जन्मतच विरक्त आणि संन्यास अथवा निवृत्तिमार्गाचे पांथिक होते. आपण निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये निवृत्तिमार्गाचा आदर्श प्रस्थापित करण्याचा आदेश ब्रह्मदेवाने या सात मानसपुत्रांना दिला. त्याच वेळी, मरीचीसह अन्य जे सात मानसपुत्र होते त्यांना ब्रह्मदेवाने प्रवृत्तिपर मार्गाची दीक्षा दिली, असा कथाभाग आहे. आपण निर्माण केलेल्या सृष्टीचा क्रम निर्वेधपणे चालू राहावा यासाठी संन्यास न घेता, निवृत्तिमार्गाचा अवलंब न करता अखंड प्रवृत्तिपर जीवनरहाटी अंगीकारण्याचा आदेश ब्रह्मदेवाने त्याच्या सात मानसपुत्रांच्या या दुसऱ्या गटाला दिला.
महाभारतकारांनी भर दिला तो मानवी जीवनाच्या प्रवृत्तिपर अंगावर. अर्थात, मोक्ष या चौथ्या पुरुषार्थाची महती महाभारतकारांनाही मान्य आहे. मात्र, त्यांचा कटाक्ष आहे तो धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थाच्या प्राप्तीवर. हे पहिले तीन पुरुषार्थ समाजाने प्राप्त केल्यानंतरच मोक्षाची आराधना करावयाची, यांबाबत महाभारतकार स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. किंबहुना, मोक्षासारखी अत्यंत उन्नत व प्रगत अवस्था ही समाजाच्या तितक्याच प्रगत व प्रगल्भ अवस्थेत शक्य बनते, असा महाभारताचा सांगावा आहे. समाजाच्या ज्या अवस्थेत लोकांचे आचार-विचार सरासरीने शुद्ध आहेत, समाजमानस प्रगल्भ बनलेले आहे, राज्यव्यवस्था उत्तम आहे, लोकव्यवहार सुरळीत प्रकारे चालू आहेत, समाज विद्यासंपन्न आणि पराक्रमी असून परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यास राष्ट्र समर्थ असेल अशा जीवनाच्या स्तरावरच मोक्षाची आराधना व अपेक्षा रास्त ठरते, असा महाभारतकारांचा निसंदिग्ध निर्वाळा आहे. त्यामुळे, समाजव्यवस्था जोवर अशा भौतिकदृष्टय़ा उन्नत अवस्थेमध्ये पोहोचत नाही तोवर धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थाची उपासना केली पाहिजे, असा या प्रतिपादनाचा निष्कर्ष निघतो. अज्ञानात खितपत असलेल्या, भुकेने गांजलेल्या, गरिबीने पिडलेल्या समाजसमूहांचा आणि मोक्षाचा अर्थाअर्थी काहीही संबंध असत नाही, अशी महाभारतातील पक्की धारणा आहे. महाभारतातील प्रवृत्तिपर धर्माचा गाभा हा असा आहे. श्रीमद्भगवद्गीतेतील धर्मही प्रवृत्तिपर आहे तो याच अर्थाने, असे लोकमान्यांचे या संदर्भातील प्रतिपादन दिसते. भागवत धर्म प्रवृत्तिपर आहे तोही याच अर्थाने.

समाजपुरुष योग्य आणि नीतिमान मार्गाने चालत राहावा यासाठी ज्ञानी व्यक्तीने त्या समाजाबरोबर राहूनच त्याला मार्गदर्शन करण्याचे व्रत आमरण निभावले पाहिजे, हा भागवत धर्माचा गाभासंदेश होय.

‘भागवत धर्म’ या संज्ञेचे पुन्हा तीन अर्थ आहेत. ‘स्वत भगवंताने जो प्रतिपादन केला तो धर्म’ हा झाला या संज्ञेचा पहिला अर्थ. भागवत पुराणामध्ये याचे विवरण आलेले असल्यामुळे या धर्माला भागवत धर्म असे म्हणतात ही या संज्ञेची दुसरी व्याख्या. तर, ‘भागवत’ म्हणजे ‘भक्त’ या अर्थाने, ‘भक्तांचा जो धर्म तो भागवत धर्म’ असा या संज्ञेचा तिसरा अर्थ प्रचलित आहे. भागवत पुराणामध्ये भागवत धर्माचे जे रूपवर्णन आलेले आहे त्यांत भागवत धर्माची प्रस्तुतता सार्वकालिक का व कशी असावी, याचे गम्य सापडते. भक्ती हे भागवत धर्माचे सारसर्वस्व असले तरी भागवत पुराणामध्ये प्रतिपादित भागवत धर्म कर्माला हीन मानत नाही. इथे भक्तीची सांगड ज्ञान आणि कर्म यांच्याशी अत्यंत बिनबोभाटपणे घातलेली दिसते. हे कर्म ज्या शरीराच्या माध्यमातून घडते ते शरीर भागवत धर्म िनद्य गणत नाही. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, भागवत धर्माला प्रपंचाचे वावडे मुळीसुद्धा नाही. भागवत धर्माचे आचरण करणाऱ्या साधकाला वा भक्ताला संसारात राहूनही कर्मबंध बाधत नाही, असे भागवत पुराणाचे स्वच्छ प्रतिपादन आहे. व्यक्ती आणि समाज यांच्या दरम्यानच्या नात्याचा जो आकृतिबंध भागवत धर्माला अभिप्रेत आहे तो खरोखरच ऐहिक स्तरावरील सामाजिक जीवनाची धारणा करणारा असा आहे. समाजातील दुखी व पीडितांच्या दुखाचे निराकरण करणे, हे भागवत धर्माने शिरोधार्य मानलेल्या भक्तीचे एक अनिवार्य गमक गणले जाते. जगातल्या प्रत्येक जीव अथवा वस्तूच्या ठिकाणी भगवद्भाव ठेवणे, हे भागवत धर्मप्रणीत भक्तीचे मुख्य सूत्र. त्यामुळे, श्रांत व क्लांत, पीडित, वंचित, उपेक्षित अशा समाजघटकांचे ताप व दुख दूर करण्यासाठी प्रयत्नशील बनणे हे भगवद्भक्ताचे जीवनकार्य वा जगण्याचे उद्दिष्ट ठरते. भागवत धर्माचा गाभा असणाऱ्या भक्तीचे सामाजिक परिमाण हे असे आहे.
भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम, हे भक्तीचे आद्यसूत्र. भागवत धर्माचा प्राण समजल्या जाणाऱ्या भक्तीचे वैशिष्टय़ असे की, परमेश्वराबाबतचे प्रेम आणि जगातल्या प्रत्येक जीव व वस्तुमात्राबाबतचे प्रेम हे परस्परपूरक समजले जाते. सगळ्याच प्राणिमात्रांवर दया, प्रेम व करुणा करणे हे भागवत धर्माचे तात्पर्य. त्यामुळे, समाजाकडे पाठ फिरवून केवळ भगवंताच्या भक्तीमध्येच रममाण होणारा भक्त हा भागवत धर्माच्या लेखी अपूर्ण ठरतो. किंबहुना, अशा समाजविन्मुख भक्तीलाच व्यभिचारी भक्ती गणले जाते. भगवंतावरील प्रेम आणि जगातल्या सगळ्याच जीवमात्रांबाबत करुणा बाळगून पीडितांच्या दुखांचे निराकरण करण्यासाठी कर्तव्यसन्मुख बनणे हा भक्तीच्या दोन्ही अंगांचा समन्वय जिथे घडून येतो तीच अव्यभिचारी भक्ती गणली जाते. भागवत धर्माला व्यक्तिगत मुक्तीचे अथवा उद्धाराचे माहात्म्य वाटत नाही ते याच अर्थाने. मानवी जीवनाच्या व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही परिमाणांची एकात्मता भागवत धर्माने प्रवíतत केलेल्या भक्तितत्त्वामध्ये अपेक्षित आणि अध्याहृत आहे. ‘‘अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक’’ अशी प्रतिज्ञा ज्ञानदेव करतात ते भागवत धर्माच्या याच प्रेरणेला अनुसरून. ‘‘बुडती हे जन देखवेना डोळां। येतो कळवळा म्हणोनियां’’ ही दुखी-पीडितांच्या तापहरणाची तुकोबांच्या पोटी दाटणारी ऊर्मी भागवत धर्माच्या गाभातत्त्वातून उमललेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे.
भागवत धर्माची प्रस्तुतता आजवर टिकण्यास आणि याही पुढे टिकून राहण्यास कारणभूत ठरणारा मूल्यसाठा हा नेमका हाच ठरतो. लोकमान्यांनी भागवत धर्माचे नेमके हेच बलस्थान अचूक हेरले. भागवत धर्माला अभिप्रेत असलेल्या भक्तीच्या सामाजिक अंगाची उपपत्ती करण्यासाठी ‘प्रवृत्ती’ या शब्दाचा टिळकांनी स्वीकारलेला अर्थ मननीय आहे. ‘‘ज्याच्या त्याच्या वर्णधर्मानुसार वाटय़ाला आलेले काम ज्याने त्याने संन्यास न घेता निष्काम भावनेने आमरण करीत राहणे’’ हा लोकमान्यांनी लावलेला ‘प्रवृत्ती’ या संज्ञेचा अर्थ. भागवत धर्माचा प्राण असणाऱ्या भक्तितत्त्वाचा नामस्मरण भक्तीवर असलेला भर या ठिकाणी लक्षणीय ठरतो. नामस्मरण, चित्तशुद्धी आणि निष्काम कर्म या तिघांची लोकमान्यांनी लावलेली आंतरिक सुसंगती खरोखरच अंतर्मुख बनविणारी आहे. सगळ्याच संतांनी भगवंताच्या नामचिंतनावर भर दिलेला आहे. नामचिंतनामुळे माणसाचे अंतकरण विकारमुक्त होते; अंतकरणातील अहंकाराचा नाश होतो आणि असा अंतर्बाह्य शुद्ध झालेला मनुष्य भक्तीचे जे अंतिम साध्य परमात्मप्राप्ती तेथवर जाऊन पोहोचतो, असा कार्यकारणभाव सर्वच संतांनी जगापुढे मांडलेला आहे. नामस्मरणामुळे एकदा का माणसाचे हृदय विकारशून्य आणि शुद्ध झाल्यावर मग त्या मनुष्याने काय करायचे, हा खरा पुढचा प्रश्न उरतो. लोकमान्यांनी लावलेल्या उपपत्तीनुसार, नामचिंतनामुळे अहंकाराचे विसर्जन घडून आलेल्या मनुष्याच्या हातून घडणारे प्रत्येक कर्म हे अनिवार्यपणे निष्कामच असते. त्यामुळे, निर्वषिय मन झालेल्या त्या भक्ताने जगाच्या कल्याणासाठी आमरण झटायचे असते, हा भागवत धर्माचा प्रवृत्तिपर गाभा होय, असे मोठे मार्मिक विश्लेषण टिळक करतात. असा निष्काम अंतकरणाने केलेला लोकसंग्रह भक्ताला बाधक होत नसल्याने त्याच्या व्यक्तिगत उद्धाराबरोबरच सामाजिक उन्नयनाची सांगडही आयतीच घातली जाते.

व्यक्तिगत पातळीवरील आध्यात्मिक उन्नती आणि निरपेक्ष बुद्धीने लोकसंग्रह करण्याची प्रेरणा यांची अशी बेलाग जोड भागवत धर्माने घातलेली आहे.

भागवत धर्माचे हे वैशिष्टय़ त्याच्या प्रस्तुततेशी अभिन्नपणे जोडलेले आहे. संतांनी याच भूमिकेतून भागवत धर्माची ध्वजा खांद्यावर घेतली. ‘‘जे खळांची व्यंकटी सांडो’’, या ज्ञानदेवांच्या मागण्याशी भागवत धर्माचे सार असणाऱ्या भक्तितत्त्वाची सांगड पडलेली आहे. नामचिंतनामुळे अंतकरण निर्मळ झाले की बुद्धीला आलेले वाकडेपण आपोआपच दूर होते, इतके हे साधे समीकरण आहे. भागवत धर्मातील भक्तीचा धागा नीतीशी जोडलेला आहे तो असा. स्वार्थाने प्रेरित झालेली आणि म्हणूनच वाकडय़ा वाटेने जाणारी बुद्धी (व्यंकटी) मनुष्याला अनीतिमान वागायला भाग पाडते. बुद्धीला आलेले वाकडेपण नामचिंतनामुळे एकदा का दूर झाले की त्या माणसाच्या हातून घडणारे सगळे व्यवहार हे नीतिमानच असावेत, हे ओघानेच येते. समाजातील प्रत्येक माणूस नीतिमानपणे वागायला लागला तर सगळाच व्यवहार निकोप बनण्याचा मार्ग सुकर बनतो. मानवी व्यवहारांतील नतिकता हे शाश्वत मूल्य नाही का? समाजकारण नीतीने चालावे हे मूल्य कालप्रस्तुत होते परंतु पुढे मात्र ते अप्रस्तुत ठरेल, असे आपण म्हणणार आहोत का? दुसरे म्हणजे, ज्याचे मन निर्मळ झालेले आहे, अशा मनुष्याने निष्कामपणे समाजाच्या भल्यासाठी अखंड कार्यरत राहावे, ही बाबही सार्वकालिक महत्त्वाचीच गणायला हवी. समाजव्यवस्थेला ज्ञानदेवांनी ‘लोकसंस्था’ असा मोठा गोड शब्द योजलेला आहे. हजारो वष्रे उत्क्रांत होत आलेली ही लोकसंस्था जतन करणे हे प्रत्येकच जबाबदार व संवेदनशील व्यक्तीचे कर्तव्य ठरते. त्यासाठी लोकसंग्रह हा अनिवार्यच असतो. नामचिंतनाद्वारे मन शुद्ध झालेल्या मनुष्याने जर संन्यास घेऊन जंगलाचा रस्ता धरला तर मग लोकसंस्थेचे संगोपन कोणी करायचे? भागवत धर्माने म्हणूनच नामचिंतन आणि निष्काम अंतकरणाने केलेला लोकसंग्रह यांची सांगड घातलेली आहे. भागवत धर्माच्या प्रवृत्तिपरतेचे हे अनोखे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे. भक्तपदाला पोहोचलेल्या व्यक्तीला संन्यास घेण्याची अनुमती भागवत धर्म देत नाही. अशा व्यक्तीने समाजात राहूनच समाज नावाची ही प्राचीन लोकसंस्था योग्य मार्गाने, नीतीला अनुसरून चालत राहावी यासाठी दक्षपणे अहोरात्र कार्यरत राहण्याचा संदेश भागवत धर्मविचार आग्रहाने पुढे मांडतो. भागवत धर्माची प्रस्तुतता या अर्थाने कालातीत ठरते.
लोकसंग्रहावर असलेला संतविचारातील भर या अंगाने आपण ध्यानात घ्यायला हवा. भागवतधर्मीय संतांनी आणखीही एक गोष्ट इथे केलेली आहे. नामचिंतनाने ज्याचे मन निखळ शुद्ध झालेले आहे अशा भक्ताने लोकसंग्रहासाठी कार्यरत राहायचे किंवा नाही ही बाब संतांनी ऐच्छिक ठेवलेली नाही, ही मोठी मार्मिक मेख फार सूक्ष्म आहे. ‘‘देख पां जनकादिक। कर्मजात अशेख। न सांडितां मोक्षसुख। पावते झाले ॥’’ अशा शब्दांत ज्ञानदेव लोकसंग्रह हा मोक्षप्राप्तीच्या आड येत नाही, हे स्पष्ट करून टाकतात. परंतु, त्याच वेळी, ‘‘देखे प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयांही कर्तव्य असे उरले। लोकालागी॥’’ असा स्वच्छ निर्वाळाही ते देऊन टाकतात. धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ हस्तगत झालेल्या साधकाने लगोलग संन्यासाची कास धरायची नाही तर, लोकसंग्रहासाठी, समाजनामक लोकसंस्थेच्या संगोपन-संवर्धनासाठी तिने अखंड क्रियाशील राहायचे असते, एवढेच सांगून ज्ञानदेव थांबत नाहीत; तर लोकसंग्रह हा अशा साधकाच्या इच्छेचा विषय नसून ते त्याचे अनिवार्य कर्तव्यच ठरते, हे ज्ञानदेव ठणकावून सांगतात. सर्व काही प्राप्त झालेल्या साधकाला स्वतसाठी म्हणून काहीही नको असले तरी लोकसंग्रहासाठी, समाजाच्या भल्यासाठी त्याने कार्यरत राहिलेच पाहिजे, यावर भागवत धर्माचा कटाक्ष आहे तो असा. भक्तपदाला जाऊन पोहोचलेल्या व्यक्तीने या जगात काय काम करायचे याचेही दिग्दर्शन ज्ञानदेव करतात. ‘‘मार्गाधारे वर्तावे। विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे। लोकांप्रति॥’’ हे अशा व्यक्तीचे अनिवार्य कर्तव्य होय. समाजपुरुष योग्य आणि नीतिमान मार्गाने चालत राहावा यासाठी ज्ञानी व्यक्तीने त्या समाजाबरोबर राहूनच त्याला मार्गदर्शन करण्याचे व्रत आमरण निभावले पाहिजे, हा भागवत धर्माचा गाभासंदेश होय. व्यक्तिगत पातळीवरील आध्यात्मिक उन्नती आणि निरपेक्ष बुद्धीने लोकसंग्रह करण्याची प्रेरणा यांची अशी बेलाग जोड भागवत धर्माने घातलेली आहे. भागवत धर्माचे हे आवाहन आज हजारो वष्रे ताजे आणि प्रस्तुत राहिलेले आहे, त्याचे रहस्य हेच.
व्यक्तिगत पातळीवरील अंतकरणशुद्धी आणि निष्काम मनोवस्थेमध्ये स्थिर होऊन केलेले समाजकारण यांचा समसमा संयोग घडवून आणणारे भागवत धर्माचे हे तत्त्वज्ञान त्याच्या उगमापासून सततच लोकाभिमुख आणि समाजसन्मुख राहिलेले आहे. एका अर्थाने या तत्त्वविचाराची प्रस्तुतता आणि कालातीतता अशी स्वयंसिद्धच ठरते. त्यामुळेच, निवृत्तिनाथांपासून ते आजच्या तुकडोजी महाराजांपर्यंतच्या सगळ्याच संतमाहात्म्यांनी या तत्त्वविचाराचे अभिसरण समाजामध्ये घडवून आणण्यासाठी वाणी आणि शरीर झिजवल्याचे आपण पाहतो. या तत्त्वविचाराचे आवाहन आजही तितकेच प्रस्तुत ठरते. व्यक्तिगत जीवनातील नीतिमान व्यवहार आणि निकोप समाजव्यवस्था या दोन चिरंतन गरजेच्या बाबीच नव्हेत का?
सर्व छायाचित्रे : दीपक जोशी