आपण असे म्हणतो ना की तो वाचला. कारण त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. हे अगदी खरे आहे.

या बाबतीतला माझ्याबद्दलचा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझी मुलगी केतकी ही नृत्याच्या क्लासला जाते. मी तिला सोडायला व आणायला जाते. पावसाळ्यातले दिवस होते. त्या दिवशी खूपच पाऊस पडत होता. वादळीवारेदेखील होते. पण संध्याकाळी जरा पाऊस कमी झाला. मी केतकीला क्लासला सोडून घरी आले. पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला. मी तशीच थोडय़ा वेळाने केतकीला आणायला गेले. पाऊस व वाऱ्यामुळे मी पूर्ण ओली झाले होते. केतकी व क्लासमधील मुले क्लासच्या आतच आमची वाट बघत उभी होते. मी पण चटकन क्लासच्या आत गेले व केतकीला म्हणाले की जरा थांब मी पूर्ण ओली झाले आहे. पाऊस जरा कमी झाला की निघू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केतकी आई चल ना, चल ना म्हणत होती. केतकीच्या मैत्रिणीचे वडील तिला घ्यायला आले. त्यांनी गाडी उभी केली व ते तिला घेऊन निघाले मी व केतकी दोनच मिनिटे थांबलो आणि तेवढय़ात कडाडकड आवाज झाला व कंपाऊंडमधील मोठे झाड कोसळले . मैत्रीण व तिचे वडील बाजूला झाले म्हणून वाचले. पण त्यांच्या गाडीवर ते झाड पडलेच व मी आणि केतकी दोन मिनिटे थांबल्यामुळे वाचलो. आम्ही जर त्यांच्यामागून गेलो असतो तर कदाचित ते झाड आमच्या अंगावर पडले असते. पण म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. त्या परमेश्वराच्या कृपेमुळेच आम्ही वाचलो. घरी आल्या आल्या आम्ही दोघींनी त्या परमेश्वराला नमस्कार केला. आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.
प्रियंका जोशी – response.lokprabha@expressindia.com