05 April 2020

News Flash

कॉलेज लाइफ : ‘डोळस’ दुनियादारी

कॉलेज कट्टय़ावर धमाल करणारे अनेक ग्रुप्स दिसतील. पण, त्याच कट्टय़ावर काही असेही असतात, ज्यांना दृष्टी नसते. पण तरीही त्याचं दु:ख न करता कॉलेजचा मनमुराद आनंद

| July 17, 2015 01:09 am

कॉलेज कट्टय़ावर धमाल करणारे अनेक ग्रुप्स दिसतील. पण, त्याच कट्टय़ावर काही असेही असतात, ज्यांना दृष्टी नसते. पण तरीही त्याचं दु:ख न करता कॉलेजचा मनमुराद आनंद घेणाऱ्या या दोस्तांची ही ‘डोळस’ दुनियादारी काही वेगळीच असते.
त्यांचं कॉलेज कँटीनमधलं खिदळणं, गप्पांचे विषय, चेष्टा-मस्करी असं सगळं अगदी तुमच्या-आमच्यासारखंच. गप्पा मारताना मोठय़ांदा हसलं की क्षणभर आजूबाजूला होणारा ‘सन्नाटा’ त्यांनी खूप वेळा अनुभवलाय. पण पुढच्या क्षणात त्यांच्या गप्पा, हसणं, एकमेकांची मस्करी करणं पुन्हा सुरू झालेलंही असतं. तसं म्हटलं तर हाताला धरून ‘तुला कुठे जायचंय? मी सोडू का?’ असं विचारणाऱ्या एखाद्यावर विश्वास ठेवावा की नाही? नेहमी आपली हजेरी लावणारा वर्गातला कुणी तरी एखाद्या दिवशी आपला हजेरी क्रमांक विचारायलाच विसरतो तेव्हा आपली त्या लेक्चरची हजेरी लागते का? इथपासून या दोस्तांच्या दिवसाची सुरुवात होते. मात्र हे सगळे जण एकत्र भेटले की यांच्या मजामस्तीला स्थलकालाच्या कुठल्याच सीमा उरत नाहीत. रूढार्थाने डोळस असणारे आपणही इतका निखळ आनंद कदाचित अनुभवू शकणार नाही. पण त्यांच्या जगण्यातली सकारात्मकता, आयुष्याकडे पाहण्याची एक लख्ख नजर आपल्याला नक्कीच देऊन जाते. असे हे अंध पण, मनाने डोळस असणारे तुमचे-आमचे मित्र दिलखुलासपणे कॉलेज लाइफ एन्जॉय करताना दिसतात.
कॉलेजमधल्या या गटाचं इतरांना नेहमीच विशेष अप्रूप असतं. याच कुतूहलातून कॉलेजमधले डोळस विद्यार्थी त्यांच्याशी कशी मैत्री करतात?, शारीरिक मर्यादांमुळे डोळस विद्यार्थ्यांशी मैत्री करणं सुरुवातीला अवघड जातं का? या गटात असलेल्यांची आपापसांतली यारी, दुश्मनी, अफेअर्स, गॉसिप्स असं सगळंच जाणून घेण्यासाठी रुईया कॉलेजच्या ‘सेल्फ व्हिजन सेंटर’मधल्या दृष्टिहीन दोस्तांशी मनसोक्त गप्पा मारल्या. ‘डोळस विद्यार्थ्यांनी आम्हाला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. त्यामुळे कॉलेजमधला वावर आणि त्यांच्याशी होणारा संवाद अगदी सहज घडू लागला. त्यातूनच मैत्री वाढत गेली,’ असं ही मंडळी सांगतात. या सगळ्यांना शाळेत असताना त्यांच्यासारख्याच दृष्टिहीन विद्यार्थ्यांसोबत मैत्री करण्याची सवय असल्यामुळे कॉलेजमध्ये आल्यावर सुरुवातीला डोळस मुलामुलींशी मैत्री करणं त्यांना थोडं अवघड जायचं. शारीरिक मर्यादांमुळे दिसण्यासंबंधीच्या गोष्टींवर गप्पा सुरू झाल्या की काय बोलावं ते सुचायचं नाही. हळूहळू मैत्री वाढत गेली आणि हे डोळस मित्रमैत्रिणी ‘सेल्फ व्हिजन सेंटर’मध्ये यायला लागले. ‘आम्हीही संगणक वापरू शकतो, टाइप करण्यासाठी टाइप रायटरसारखाच आमच्याकडे ‘ब्रेलर’ असतो, रुईयाच्या कॉड्रेन्गलमध्ये आम्ही फुटबॉल आणि क्रिकेट खेळतो हे ऐकून त्यांना गंमत वाटायची. आमचा व्हॉइस बॉल, व्हॉइस कॉम्प्युटर बघून त्यांना वाटणारं कुतूहल त्यांच्या आवाजातूनही आमच्यापर्यंत पोहोचायचं. डोळस मित्रमैत्रिणींना आम्ही त्यांचं नाव ब्रेल लिपीत लिहून दाखवलं की खूप मजा वाटायची’, ही सगळी गंमत हे मित्रमैत्रिणी आनंदाने सांगतात. डोळस विद्यार्थ्यांशी मैत्री करताना त्यांना तीन प्रकारचे डोळस मित्रमैत्रिणी भेटले. केवळ कुतूहलापोटी मैत्री करणारे एक, खरोखरच मदत करण्याची इच्छा असल्यामुळे स्वत:हून मैत्रीचा हात पुढे करणारे दुसरे आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा असते पण, संवाद नेमका कसा सुरू करावा असा प्रश्न पडल्यामुळे बोलणं टाळतात किंवा दृष्टिहीन विद्यार्थ्यांशी अगदी जुजबी बोलणारे तिसरे; अशा तीन प्रकारची माणसं त्यांना भेटत असल्याचं ते सांगतात.
जन्मापासूनच अंधत्व आलेला शिवम त्याचा बाऊ न करता नवनवीन गोष्टी शिकत आयुष्य जगतोय. शिवमसारखी असंख्य मुलं कॉलेजेसमध्ये सहजपणे वावरताना दिसतात. कॉलेजमधलं रंगबेरंगी आयुष्य दृष्टी नसतानाही मनापासून एन्जॉय करतात. शिवम सध्या ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये बारावी कला शाखेत शिकतोय. शिकवण्याची प्रचंड आवड असल्यामुळे त्याला अंध मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. शिक्षक बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. आपली आर्थिक, शारीरिक क्षमता वाढली की आपल्या गरजा वाढतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत की त्याचं वाईटही तितकंच वाटतं, पण ज्यांना जन्मत:च शारीरिक कमतरता आहेत त्यांना त्यांच्या गरजा अपूर्ण राहिल्याचं दु:खं वाटत नाही. तसंच शिवमचं आहे. जन्मापासून दृष्टी नसली तरी त्याचं कधीच तो वाईट वाटून घेत नाही. उलट कॉलेजमध्ये अभ्यासाबरोबर मित्रांसोबत मस्ती-मजा करण्यात तो मशगूल असतो, पण ही धमाल करताना तो त्याच्या करिअरचाही गांभीर्याने विचार करतो.
lp62दृष्टिहीन मित्रमैत्रिणी एकत्र बसून चर्चा करून अभ्यास करतात. अभ्यासाव्यतिरिक्त इतर अवांतर पुस्तकांचं वाचन करणं शक्य होत नसलं तर ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ ही संस्था दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तकांचे रेकॉर्डिग्ज पुरवते. त्याद्वारे पुस्तकं ‘ऐकण्याचा’ वेगळा अनुभव त्यांनी शेअर केला. पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ या कवितेप्रमाणे दृष्टिहीन मित्रांच्याही बाबतीत अगदी आपल्यासारखंच सेम असतं. प्रेमात पडणं, धडपडणं, ब्रेकअप्स, पॅचअपच्या गुजगोष्टी यांच्याही आयुष्यात रंगतात. एकवेळ बॉलीवूडची गॉसिप्स कमी पडतील, पण आम्हाला माहीत असलेल्या अफेअर्सची गणती नाही, असं एक जण मिश्कीलपणे म्हणाला आणि त्याच वेळी ‘प्रेम आंधळंच असतं मित्रा’ असं म्हणत एक उत्स्फूर्त हाय-फाय समोरून आली आणि पुन्हा एकदा हशा पिकला.
आपल्या जीवनात रंगांचं महत्त्व खूप असतं. विशिष्ट रंगाने वस्तूला एक ओळख प्राप्त होते. दैनंदिन जीवनात लाल, हिरवा, तपकिरी (ब्राऊन) हे प्रमुख रंग असतात. या रंगांपासून बहुतांश गोष्टी बनलेल्या असतात, पण काहींना या रंगांची जाण नसते. या आजाराला रंगांधळेपणा असे म्हणतात. मिथिलेश पाटील याला आजार आहे. तो लाल आणि हिरवा हे रंग पाहू शकत नाही. असं असूनही मिथिलेशच्या चित्रकलेच्या आवडीने त्याला जे जे स्कूल ऑफ आर्टकडे खेचत आणलं. लहानपणी मिथिलेशला वस्तू ओळखता यायच्या नाहीत. मग त्याच्या पालकांनी त्याला अमुक वस्तू लाल किंवा हिरव्या रंगाची आहे हे सांगत. त्याचे आई-वडील खंबीर असल्यामुळेच त्यांनी त्याला अंधशाळेत घातले नाही. शाळेत इंटरमिजिएटच्या परीक्षेला त्याने सूर्यफुलाला पिवळ्या रंगाऐवजी काळा रंग दिला होता. त्यावरून शिक्षक ओरडल्याचा किस्सा त्याने सांगितला. तो सध्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कमर्शिअल पेंटिंगच्या तिसऱ्या वर्षांला शिकत आहे. ‘चित्रकलेत प्रत्येक टप्प्यावर रंगांचा अभ्यास करावा लागतो. लाल आणि हिरवा या रंगांचा वापरही त्यात असतोच. मला हे रंग ओळखता यायचे नाही. प्रत्येक वेळेला अडायचं. चित्र नीट यायचं नाही. खूप चुका व्हायच्या, पण त्यामुळे खचून न जाता प्रत्येक रंगाचे नाव लक्षात ठेवायला सुरुवात केली. वेगवेगळे प्रयोग करत ठरावीक रंग न दिसण्याची भीती मनातून काढून टाकली,’ असं मिथिलेश सांगतो. त्याला बाईकची प्रचंड आवड आहे. रोज तो शिवडी ते जे जे स्कूल ऑफ आर्ट असा प्रवास बाईकने करतो. त्याला हस्तकलेचीही खूप आवड आहे. पुढे हस्तकलेतच करिअर करायचं त्याने ठरवलं आहे. रंगांधळेपणा असूनही रंगाशी निगडित क्षेत्र निवडून मिथिलेश त्याचं आयुष्य रंगवतोय. एकाअर्थी तो त्याचं कॉलेज लाइफ एन्जॉयच करतोय.
आजची युवापिढी टेकसॅव्ही. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपशिवाय जगणं म्हणजे त्यांच्यासाठी अपूर्णच. एक दिवस सोशल साइटपासून दूर ठेवलं तर यंगिस्तानला तुरुंगवास वाटू लागतो. मग अशा जमान्यात दृष्टिहीन तरुण मित्र या गोष्टींचा लाभ कसा घेत असतील याविषयीही कुतूहल होतंच. पण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि यूटय़ूबचा अशा सोशल साइट्सचा विषय सुरू झाल्यावर ही मित्रमंडळी भरभरून बोलू लागली. अशा विषयांवर हे दोस्त इतकं कसं बोलू शकतात याचं सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण नंतर तंत्रज्ञानाची कमाल लक्षात आली. अ‍ॅण्ड्रॉइड आणि अ‍ॅपल फोन्समध्ये ‘टॉकबॅक’ची इनबिल्ट सोय असते. त्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर गप्पाटप्पा करणं, यूटय़ूबवर व्हिडीओ पाहणं त्यांच्यासाठी सहजशक्य झालंय. हा ‘टॉकबॅक’ अगदी स्माईलीजही वाचून दाखवतो. अंकिता राजे ही विद्यार्थिनीही अशाच एका सॉफ्टवेअरबद्दल सांगते. अंध व्यक्ती चित्रपट कसे बघू शकतात हा सर्वसामान्यांना पडलेला नेहमीचा प्रश्न असतो. पण या शंकेचं, प्रश्नाचं ‘हॉग्स’ हे सॉफ्टवेअर उत्तर देतो. अंकिता सांगते, ‘चित्रपट बघण्याची खूप आवड आहे. हॉग्स नावाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आम्ही चित्रपट बघतो. आता बरीचशी पुस्तकं ब्रेल भाषेमध्ये रूपांतरित झालेली आहेत. त्यामुळे आवडती पुस्तक वाचण्याचा मार्गही सोपा झाला आहे. परीक्षेला कॉलेजतर्फे रायटर दिला जातो. आता सरकारतर्फे गरजू अंध मुलांना नॅशनल ब्लाइंड असोसिएशनतर्फे कमी किमतीत ब्रेल भाषेची पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत.’ अशा अनेक समस्या विविध तंत्रज्ञानाने सोप्या करत कमतरतांवर मात केली आहे.
नेहमीपेक्षा काही तरी वेगळं करायचं म्हणून मध्यंतरी या एस.व्ही.सी.(सेल्फ व्हिजन सेंटर) सदस्यांनी रुईया कॉलेजमध्ये चक्क सेल्फ मेड चॉकलेटचा स्टॉल उभारला. त्यांच्या या उपक्रमाला कॉलेजनेही भरभरून पाठिंबा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला. फेस्टीवल्सच्या काळात डोळस विद्यार्थी जसे उत्साही दिसतात तितकाच उत्साह ‘लुई ब्रेल दिना’च्या आधी या दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये संचारतो. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रमांची तयारी संपत नाही. नाटकं लिहिणं, ती बसवणं, त्यात काम करणं अशा तिहेरी भूमिका ही मंडळी आत्मविश्वासाने करतात. हे झालं लुई ब्रेल दिनाचं. पण, वर्षभर वेगवेगळ्या सहलींना एकत्र जाणं, एकत्र मिळून चित्रपट ऐकणं, समोरच्याला कंटाळा येईपर्यंत पुढचे काही दिवस चित्रपटांतल्या हिट झालेल्या संवादांची पारायणं करणं असे सगळे उद्योग ही मंडळी करत असतात.
दृष्टी नसल्यामुळे घडणारे काही मजेशीर किस्सेही त्यांनी बिनधास्त शेअर केले. एस.व्ही.सीतली एक मैत्रीण एकदा कॉलेजला जात असताना कुणी तरी गप्पा मारत तिला कॉलेजपर्यंत सोडलं. गप्पा मारत असताना आवाजावरून नेमकं त्या व्यक्तीला अरे म्हणावं की आदराने संबोधावं हे काही तिला कळेना. ‘माझी चौकशी करताना मी कुठल्या वर्षांला शिकतेय, असं त्यांनी मला विचारलं. मी मात्र त्यांची चौकशी केली नाही. नंतर तेच स्वत:हून म्हणाले की ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. नशीब मी त्यांना ‘अरे’ असं संबोधलं नाही’, असं ती म्हणते. या मैत्रिणीची फजिती होता होता वाचली आणि त्यांच्या ग्रुपमध्ये याच ताई ठरल्या मस्करीचं नवं टार्गेट.
आपल्यातल्या कमतरतेचा तसूभरही लवलेश न बाळगता ‘आनंद’ जगणारी आणि जगायला शिकवणारी ही मंडळी खऱ्या अर्थाने वेगळी ठरतात, ती त्यांच्या दृष्टिहीनतेपेक्षाही अधिक जगण्याकडे बघण्याच्या त्यांच्या ‘डोळस’ दृष्टिकोनामुळे.

lp58नवनवीन गोष्टी शिकण्याकडे माझा कल असतो. दिसत नसलं तरी आयुष्यात इतर अनेक गोष्टी असतात त्यांची मजा घेता येते. रंगांचा अनुभव घेता येत नसला तरीही मला माझं आयुष्य रंगबेरंगीच दिसतं. मला शिकवण्याची खूप आवड आहे. अंध मुलांसाठीच मला काही तरी काम करण्याची इच्छा आहे.
– शिवम पाटील, जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे

lp59‘मला अभ्यासात रुची आहे तसं कॉलेज एन्जॉय करण्यात फार रस असतो. आर्ट्सचं पहिलं र्वष असल्याने सध्या अभ्यास आणि धमाल असं दोन्ही सुरू असतं. त्यामुळे मी माझ्या मित्रपरिवारासोबत खूप धमाल करते. माझे मित्रमैत्रिणी मला नेहमीच मदत करतात. एखादं लेक्चर नसेल तर आम्ही सगळे फिरायला किंवा कट्टय़ावर जातो.’
पल्लवी पाटील, जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे.

lp60लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे जे.जे. मध्ये आलो. माझ्यातली रंग न ओळखण्याची कमतरता बाजूला सारत मी चित्रकलेतच करिअर करायचं ठरवलं. मला त्यात आनंद मिळतो. करिअर म्हणून त्याकडे गंभीर विचार करत मी माझं कॉलेज लाइफही मस्त एन्जॉय करत असतो.
मिथिलेश पाटील, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई

lp61मी बघू शकत नाही, याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. गुगल वॉइस रेक्ग्निशनच्या मदतीने मी मोबाइल वापरते. तसंच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या आहेत. म्हणूनच अंध असल्याचं अजिबात दु:ख होत नाही. या तंत्रज्ञानामुळे अंधत्वावर मात करायला शिकले.
– अंकिता राजे, वझे-केळकर कॉलेज, मुलुंड
लीना दातार, मानसी जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2015 1:09 am

Web Title: college life of blind students
टॅग College,Study
Next Stories
1 डान्स स्टुडिओ
2 स्मार्ट ती : मेंढरे बनू नका…
3 रमणीय पॉइंट प्लेझंट बीच
Just Now!
X