विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

‘काल-परवापर्यंत लोक प्लाझ्मा शोधत होते आणि आज अचानक ही थेरपीच निरुपयोगी ठरली? असं कसं?’, ‘इतके दिवस पॉझिटिव्ह असणाऱ्या सगळ्यांचंच सीटी-स्कॅन केलं जात होतं आणि आज म्हणतायत की स्कॅन घातक ठरू शकतं?’, ‘अरे, आठवडय़ाभरापूर्वी तो बरा होऊन आला होता ना? आणि आज व्हेन्टिलेटरवर?’, ‘औषधांमुळे काळी बुरशी पसरते? आणि ती माणसाचा जीवही घेऊ शकते?, कसं शक्य आहे?’.. अशा अनेक शंका-कुशंका, प्रश्न, चिंता, अनिश्चितता, संशय आणि संदिग्धतेने सध्या सर्वानाच घेरलंय. कोविडचं कोडं अद्याप उलगडलेलं नसताना कोविडनंतरच्या गुंतागुंतीचं नवं जंजाळ समोर उभं ठाकलं आहे. काहींच्या सहव्याधींनी गंभीर रूप धारण केलंय, तर काहींना यापूर्वी नसलेल्या व्याधी जडतायत. ज्यांच्याकडे औषध म्हणून पाहिलं जात होतं, तीच नवी दुखणी निर्माण करतायत. काहीतरी चुकतंय असं वाटणं स्वाभाविकच आहे आणि काही प्रमाणात खरंही! पण वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, विज्ञान याच वाटेने जातं. प्रयोग, चाचण्या, निरीक्षणं, नोंदी, निष्कर्ष आणि नव्या अनुभवांनुसार वारंवार सुधारणा.. हाच त्यातला अपरिहार्य मार्ग आहे. पण रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मात्र, हे स्वीकारण्यास तयार नाहीत. या प्रयोगांमध्ये रुग्णाच्या आरोग्याशी खेळ होतोय, अजिबात प्रभावी नसलेल्या औषधोपचारांवर पाण्यासारखा पैसा आणि वेळ खर्च होतोय, आमच्या जिवाभावाच्या माणसांना गिनीपिग करून ठेवलंय, अशी रुग्णांच्या नातेवाईकांची भावना आहे.

‘सार्स सीओव्ही- २’ जगभरात धुमाकूळ घालू लागला, तेव्हा वैद्यकीय क्षेत्रापुढचं पहिलं आव्हान होतं- शक्य ते सर्व औषधोपचार आजमावून रुग्णाचा जीव वाचवणं. औषधांच्या लहान-मोठय़ा दुष्परिणामांची चिकित्सा करण्याची ती वेळ नव्हती. आज या विषाणूचा उपद्रव सुरू होऊन जवळपास दीड वर्ष लोटलं आहे. प्रभावी म्हणून स्वीकारलेल्या अनेक उपचारपद्धतींपैकी काहींच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत, काहींचे गंभीर दुष्परिणाम पुढे आले आहेत आणि काही तर पूर्णच रद्दबातल ठरल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाच्या प्रमाणाने तर शिखर गाठलंच, पण त्यापाठोपाठ प्रश्न निर्माण झाला तो कोविडोत्तर गुंतागुंतीचा. खरं तर विषाणू एकच, पण त्याचे दुष्परिणाम व्यक्तीगणिक वेगळे, त्यामुळे उपचार वेगळे आणि उपचारांचे दुष्परिणामही भिन्न. काही व्यक्तींना संसर्ग होतो, पण एकही लक्षण नसतं. काहींचा आजार साध्या ताप-खोकल्यावर निभावतो, काहींना व्हेन्टिलेटर लावण्याची वेळ येते, तर काही बरे झाल्यावर पुन्हा आजारी पडतात आणि पुन्हा महिनोन्महिने अंथरुणाला खिळतात. कोविडोत्तर गुंतागुंत हा सध्या गंभीर प्रश्न झाला आहे. सहव्याधी, कमकुवत प्रतिकारशक्ती, औषधांचे दुष्परिणाम अशा विविध कारणांमुळे अनेकांना आजारांचा, संसर्गाचा सामना करावा लागत आहे. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अचानक उद्भवलेला मधुमेह, मूत्रपिंडं निकामी होणं, फुफ्फुसांचं कार्य मंदावणं अशा अनेक समस्यांशी झुंजणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

सध्या सर्वाधिक दहशत आहे ती काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिसची. या बुरशीला स्टिरॉइड्सच्या अतिवापरामुळे वाढलेली रक्तशर्करेची पातळी कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्टिरॉइड्स दिल्यामुळे कोविडबाधित रुग्णांच्या शरीरातलं प्राणवायूचं प्रमाण वाढतंय, रुग्णाचा जीव वाचतोय हे पाहून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्टिरॉइड्स दिली गेली. सायटोकाईन स्टॉर्म रोखण्यासाठी त्यांचा वापर केला गेला. सायटोकाईन स्टॉर्मचा ढोबळ अर्थ असा की आपल्या शरीरात प्रतिकारशक्तीला कारणीभूत असलेली प्रथिनं मोठय़ा प्रमाणात तयार होतात आणि ती विषाणूवर हल्ला करण्याऐवजी आपल्याच शरीरातल्या पेशी आणि उतींवर हल्ला करतात. या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही स्टिरॉइड्सचा वापर केला गेला. तज्ज्ञांच्या मते ही स्थिती उद्भवल्यानंतर स्टिरॉइड वापरणं उपयुक्त ठरू शकतं, मात्र तो प्रतिबंधात्मक उपाय नाही. तरीही रुग्णाला वाचवण्याच्या धडपडीत प्रतिबंधात्मक म्हणून स्टिरॉइड्सचा वापर करण्यात आला आणि त्याचे परिणाम आपण पाहत आहोतच. परिणामी आता कोविडबाधितांना प्रतिबंधात्मक म्हणून स्टिरॉइड्स देणं बंद करण्यात येणार आहे. जिथे आवश्यक आहे, तिथे म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होत आहेत, प्राणवायूचं प्रमाण अतिशय कमी आहे, अशा रुग्णांसाठी स्टिरॉइड वापरावंच लागेल, पण त्यानंतर रक्तशर्करेवर काटेकोर लक्ष ठेवलं जाईल. स्टिरॉइड देतानाच मधुमेह नियंत्रणात ठेवणारी औषधं किंवा इन्शुलिन दिलंच जाईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण स्टिरॉइड्समुळे रक्तशर्करा वाढते, ते प्रतिबंधात्मक औषध नाही हे आधीपासूनच ज्ञात असताना, त्याच्या वापराबाबत आधीच ही काळजी का घेतली गेली नाही, हा प्रश्न उरतोच.

रेमडेसिविरचा तुटवडा हा दोन्ही लाटांमध्ये गाजलेला मुद्दा. सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणं असणाऱ्या कोविडबाधितांना रेमडेसिविरची आवश्यकता नसतानाही केवळ पुढचा धोका टाळण्यासाठी ही इंजेक्शन्स दिली गेली. ज्यांच्या शरीरातल्या प्राणवायूची पातळी खालावली आहे, अशा रुग्णांना पहिल्या पाच ते १० दिवसांतच हे औषध दिल्यास फायदा होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. रेमडेसिविर हे जीव वाचवणारं औषध नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं होतं, मात्र तरीही भारतात या इंजेक्शनचा आग्रह कायमच राहिला. त्यामुळे झालं असं, की सगळीकडे त्याचा तुटवडा निर्माण झाला, रांगा लागल्या, काळाबाजार होऊ लागला. अनेक गरजू वंचित राहिले आणि विनाकारण रेमडेसिविर दिल्यामुळे अनेकांना त्याचे दुष्परिणाम सोसावे लागले.

मधल्या काळात कोविड पॉझिटिव्ह असलेल्यांच्या आणि चाचणी निगेटिव्ह असूनही कोविडसदृश लक्षणं असलेल्या व्यक्तींच्या रांगा सीटी-स्कॅन सेंटरसमोर लागत होत्या. काही जण आरटीपीसीआरचा अहवाल पालिकेकडे जाणार आणि मग घर सील होणार, या भीतीने चाचणी टाळून स्कॅन करत होते. हे सगळंच विलगीकरणाचा नियम पायदळी तुडवत निरोगी व्यक्तींनाही विषाणूवाटप करण्यासारखं होतं. काही रुग्ण हे स्वत:च्या मर्जीने तर काही डॉक्टरांच्या सल्ल्याने सीटी-स्कॅन करत होते. मेच्या आरंभी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक स्कॅन केलं जातं तेव्हा ३०० एक्स-रे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रेडिएशनचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट केलं. त्यासाठी त्यांनी ‘इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी कमिशन फॉर रेडिएशन प्रोटेक्शन अ‍ॅण्ड मेडिसिन’च्या अभ्यासाचा दाखला दिला. त्यानंतर सीटी-स्कॅनच्या दुष्परिणामांची चर्चा सुरू झाली. पण सीटी-स्कॅनच्या दुष्परिणामांची माहिती तोवर कोणालाच नव्हती का, असा प्रश्न ज्यांचं शरीर चार-चार वेळा त्या रेडिएशनमधून गेलं आहे आणि या संभाव्य विकतच्या दुखण्यासाठी पैसे मोजून ज्यांचे खिसे रिते झाले आहेत, असे अनेक रुग्ण विचारत आहेत.

प्रभावी उपचार पद्धत म्हणून प्लाझ्मा थेरपीचाही गवगवा बराच काळ झाला. परिणामी रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करत होते. करोनाबाधितांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं जात होतं. विज्ञानात अशी प्रत्येक शक्यता पडताळू पाहाणं योग्यच, पण ही उपचार पद्धतही फारशी परिणामकारक ठरत नसल्याचं आणि त्यातून म्युटेशनची शक्यता असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी वर्तवलं. अलीकडेच आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपी कोविड उपचारांतून वगळण्याचा निर्णय घेतला.

लसीकरणाचा घोळ तर आणखीनच वेगळा आहे. लशींचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून मिरविणाऱ्या भारताच्या विविध भागांत मात्रांअभावी कित्येक दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ सरकारवर आली. आजही लसीकरण रडतखडतंच सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर दोन मात्रांमधलं अंतर सरकार सातत्याने वाढवत का आहे, लशींच्या अपुऱ्या मात्रा, हे तर यामागचं कारण नाही ना, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण जागतिक स्तरावर ज्या देशांत लशींच्या मुबलक मात्रा उपलब्ध आहेत, त्यांनीही याच स्वरूपाची निरीक्षणं नोंदवली आहेत. ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध जर्नलनेही त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लशी नाहीत हे वास्तव असलं, तरी त्यामुळे दोन मात्रांमधलं अंतर वाढवलं जातंय, हा संशय अनाठायी म्हणावा लागेल. आता २-डीजी या औषधाला करोनावरंच औषध म्हणून डीआरडीओने मान्यता दिली आहे. किमान त्याबाबतीत तरी सावध भूमिका घेतली जाणं आणि काही गंभीर दुष्परिणाम तर नाहीत ना, यावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

विषाणू नवा आहे, जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. कोणत्या औषधाचे काय दुष्परिणाम होतील, उपचार कुठे चुकीचं वळण घेतील, हे आधीच सांगता येणं शक्य नाही. पण प्रत्येक पाऊल सावधपणे उचललं जाणं, आधीच्या अनुभवांच्या आधारे उपचारांचे दुष्परिणाम किमान स्तरावर ठेवण्यासाठी प्रयत्न होणं, कोणतीही नवी उपचार पद्धती स्वीकारताना तिच्या उपयुक्ततेची पुरेपूर खात्री करून घेतली जाणं आवश्यक आहे. रुग्णांनीही व्हॉट्सअ‍ॅप- फेसबुकच्या नादाने स्वत:च स्वत:चे डॉक्टर होण्याचा मोह टाळणं आवश्यक आहे. १७ दिवसांचं विलगीकरण संपलं म्हणजे आपण पूर्णपणे बरे झालो, हा भ्रम जीवघेणा ठरू शकतो. पुन्हा दीर्घकालीन आजारपणात अडकायचं नसेल, तर त्यानंतरही स्वत:च्या आरोग्याच्या नोंदी नियमितपणे ठेवणं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार-विहार ठेवणं आवश्यक आहे. विषाणूने आधीच बेजार झालेल्या शरीरावर आणि आरोग्य व्यवस्थेवरही कोविडोत्तर आजारपणांचा अतिरिक्त भार पडत आहे. तो काही प्रमाणात हलका करण्यासाठी, जीवन जगण्याची संधी कायम ठेवण्यासाठी हे करावंच लागेल.

१०० दिवस महत्त्वाचे – डॉ. शशांक जोशी, कोविड डास्क फोर्सचे सदस्य

कोविडोत्तर आजारांचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या आजाराचा कालावधी तीन आठवडय़ांचा आहे, हे लोक विसरतात. कित्येकांचे आरोग्य दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात ढासळते. काही वेळा शरीरातील प्राणवायूचे प्रमाण अचानक अतिशय कमी होते. काही रुग्णांना त्यात जीवही गमावावा लागतो. त्यामुळे तीन आठवडे रोज प्राणवायूचे प्रमाण, ताप, श्वसनाचा वेग, रक्तातील शर्करेचे प्रमाण, रक्तदाब मोजला पाहिजे. विषाणू स्वत:सारखेच अनेक विषाणू तयार करतो. कोविडचा संसर्ग झाल्यापासून १० दिवसांनी ही प्रक्रिया थांबते. त्यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते; पण तरीही १७ दिवस विलगीकरण आवश्यक आहेच. विलगीकरणाचा कालावधी संपला म्हणजे आता काही धोका नाही, असे गृहीत धरून चालत नाही. पुढचे १०० दिवस काळजी घेणे आवश्यक आहे.

विविध अवयवांवरचे दुष्परिणाम

फुप्फुस, हृदय, मेंदू-मज्जातंतू आणि स्वादुपिंडांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हृदयरोग असणाऱ्यांना रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे. काही वेळा त्यांना रक्तदाब नियंत्रित ठेवणाऱ्या गोळ्या द्याव्या लागतात. त्या हृदयरोगतज्ज्ञाच्या सल्लय़ानेच घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा अचानक मृत्यू होण्याचीही शक्यता असते. कोविडमुळे पार्किन्सन्स, इम्युनॉलॉजिकल नव्‍‌र्ह डिसऑर्डर्स किंवा स्ट्रोक होऊ शकतो. कोविडनंतर अपवादात्मक स्थितीत मज्जातंतूंचे आजार होतात. विलगीकरणामुळे काही रुग्णांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस दिसू लागतो. म्हणजे युद्धावर जाणाऱ्या सैनिकांवर जसा एकटे राहून मानसिक परिणाम होतो, तसाच परिणाम काही रुग्णांच्या मनावर झाल्याचे दिसून येते. काही रुग्णांमध्ये क्रॉनिक फटिग सिन्ड्रोम दिसून येतो. यात रुग्ण खूप थकतात. त्यांना अजिबात ताजेतवाने वाटत नाही. संध्याकाळी ताप आल्यासारखे किंवा हृदयाचे ठोके वाढल्यासारखे वाटते. फुप्फुसांवर कोविडमुळे खूप दुष्परिणाम होतो. याला लंग फायब्रॉसिस म्हटले जाते. हे टाळण्यासाठी अनुलोम विलोम, योगासने, सूर्यनमस्कार करावेत. जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम करावा. बरे वाटले की लगेच पूर्वीसारखा व्यायाम सुरू न करता, त्याची तीव्रता हळूहळू वाढवावी.

स्टिरॉइड्स आणि रक्तशर्करा

भारतात मधुमेहींची संख्या सात कोटी एवढी प्रचंड आहे. ज्यांना आधीच मधुमेह आहे त्यांच्या शरीरातले शर्करेचे प्रमाण प्रचंड वाढते. मधुमेहाआधीच्या टप्प्यात असणाऱ्यांना मधुमेह होतो. उपचारांसाठी स्टिरॉइडचा वापर केल्यामुळे ज्यांना मधुमेह नाही, अशांनाही तो होण्याची दाट शक्यता असते. रक्तातल्या शर्करेचे प्रमाण वाढल्यास एरवी न होणारे अनेक संसर्ग होऊ लागतात. ज्यात जिवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गाचा समावेश आहे. हे दुय्यम संसर्गघातक ठरू शकतात. त्यामुळे कोविडमधून बरे झाल्यानंतर पुढचे १०० दिवस साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी औषधांबरोबरच काही रुग्णांना इन्शुलिनचीही गरज भासू शकते. ज्यांना आधी मधुमेह नव्हता आणि कोविडदरम्यान झाला अशांच्या स्वादुपिंडावर दुष्परिणाम झाल्यास मधुमेह पुढेही कायम राहण्याची शक्यता असते.

काळ्या बुरशीविषयी सगळेच जाणतात. त्याव्यतिरिक्त पांढरी बुरशी कॅन्डिडियासिसला कारणीभूत ठरते. यात त्वचेवर पांढरे चट्टे दिसू लागतात. हे सगळे टाळण्यासाठी कोविडच्या रुग्णांनी रक्तातल्या शर्करेचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रित ठेवावा. नाक, तोंड आणि घशाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. आयोडिनच्या गुळण्या कराव्यात. स्टिरॉइड्स अधिक मात्रेत दिली जाणे हे काळ्या बुरशीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे. कोविडच्या उपचारांत प्रामुख्याने दोन स्टिरॉइड्स वापरली जातात. एक म्हणजे डेक्सामेथॉझॉन. त्याचा ६ मिलिग्रॅमपेक्षा जास्त डोस देऊ नये. दुसरे म्हणजे मिथाइलप्रेडनिसोलॉन. ते दिवसातून दोनदा जास्तीत जास्त ४० मिलिग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात वापरू नये. माझ्या मते येत्या काही दिवसांत काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल आणि साधारण १५ दिवसांत ती नगण्य झालेली असेल.

चाचण्या, स्कॅन, रेमडेसिविर

रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आहे आणि रुग्णाला लक्षणे मात्र कोविडची आहेत. अशा स्थितीत केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच सीटी-स्कॅन करणे आवश्यक असते. सर्व रुग्णांना याची गरज नसते. ज्यांना असते त्यांचे सीटी-स्कॅन पहिल्या पाच ते दहा दिवसांतच करावे लागते. रेमडेसिविर हे जीव वाचवणारे औषध नाही. फक्त रुग्णालयात दाखल असण्याचा आणि रुग्ण बरे होण्याचा कालावधी १-२ दिवसांनी कमी होतो. ज्या रुग्णांच्या शरीरातल्या प्राणवायूचे प्रमाण ९३ टक्कय़ांपेक्षा कमी आहे, अशाच रुग्णांना रेमडेसिविर देण्याचा सल्ला दिला जातो. तेसुद्धा पहिल्या ५ ते १० दिवसांत दिले तरच उपयुक्त ठरते.

..काळ्या बुरशीवर लवकरच नियंत्रण –  डॉ. अशेष भुमकर, कान, नाक, घसा तज्ज्ञ

काळ्या बुरशीमुळे अनेक रुग्ण धास्तावले आहेत. यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा संसर्गजन्य आजार नाही. दुसरे म्हणजे रुग्णांना प्राणवायू देताना वापरण्यात येणाऱ्या साधनांची स्वच्छता राखल्यास, त्यात र्निजतुक पाण्याचा वापर केल्यास आणि रुग्णाच्या रक्तातल्या शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्यास ही समस्या दूर ठेवता येऊ शकते. येत्या तीन महिन्यांत या संसर्गावर आपण पूर्णपणे नियंत्रण मिळवू असा विश्वास आम्हाला आहे.

संसर्गाचे स्वरूप

काळ्या बुरशीचे अस्तित्व सगळीकडेच असते. शरीरातल्या शर्करेची पातळी वाढली की शरीरात काही प्रक्रिया घडतात आणि लाल रक्तपेशींतून फ्री आयर्न बाहेर पडते. म्युकोर म्हणजेच काळी बुरशी या फ्री आयर्नला चिकटते. कोविड झालेल्या आणि मधुमेह असलेल्या किंवा कोविडवरील उपचारांदरम्यान रक्तशर्करेची पातळी वाढलेल्या किंवा ज्यांना उपचारांदरम्यान स्टिरॉइड देण्यात आले आहे अशा रुग्णांना हा आजार होण्याची भीती असते. अशा रुग्णांनी बरे झाल्यानंतरही १०० दिवस रोज रक्तशर्करेचे प्रमाण मोजणे आवश्यक आहे. ते १४० ते १८० च्या आत असायला हवे. त्यापेक्षा वाढले, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

खर्चीक उपचार आता मोफत

या रुग्णांना राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’मुळे मोफत उपचार मिळणार आहेत. प्रत्यक्षात हे उपचार अतिशय खर्चीक आहेत. यात शस्त्रक्रियेद्वारे बुरशी पूर्णपणे काढून टाकावी लागते आणि त्यानंतर १० ते १२ दिवस इंजेक्शनद्वारे औषधे दिली जातात. यातील ‘अ‍ॅम्फोट्रेसिन बी’ या औषधाच्या एका मात्रेची किंमत आहे २५० रुपये. त्याच्या दिवसाला पाच मात्रा दिल्या जातात. अशा प्रकारे १०-१२ दिवस उपचार सुरू ठेवावे लागतात. मात्र या औषधाचे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे ज्यांची मूत्रपिंडे पूर्णपणे निरोगी आहेत, त्यांनाच हे औषध देता येते. मूत्रपिंडांवर अतिशय कमी दुष्परिणाम करणारे औषध म्हणजे ‘लायपोसोमल’. त्याच्या एका मात्रेची किंमत आहे आठ हजार रुपये. अशा दिवसाला सहा मात्रा या प्रमाणात साधारण १० दिवस उपचार करावे लागतात. आता त्याची किंमत आणखी वाढली आहे. म्हणजे दिवसाला साधारण ५० हजार रुपये केवळ इंजेक्शनवर खर्च होतात. ही इंजेक्शन्स दिल्यावर रोज मूत्रपिंडांचे कार्य तपासावे लागते. त्यासाठी रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात, तो खर्च वेगळाच.

औषधांचा तुटवडा

काळ्या बुरशीच्या रुग्णांचे प्रमाण आजवर वर्षांतून दोन-तीन रुग्ण एवढेच होते. त्यामुळे औषध कंपन्या त्यावरच्या औषधांचे मर्यादित उत्पादन करत होत्या. आता गेल्या महिनाभरात रुग्णांचे प्रमाण अचानक वाढून दिवसाला १० रुग्णांपर्यंत पोहोचले आहे. त्याचा परिणाम असा की, देशभर औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागला आहे; पण येत्या आठवडय़ाभरात तो सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. रेमडेसिविर तुटवडय़ाच्या अनुभवातून आता काळ्या बुरशीवरच्या औषधांचा विनाकारण वापर होऊ नये आणि ज्या रुग्णांना खरोखरच गरज आहे त्यांना ती सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.

नियंत्रण

या समस्येचा अनियंत्रित रक्तशर्करेशी थेट संबंध आहे. त्यामुळे आता कोविडवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातली शर्करेवर लक्ष ठेवण्यासंदर्भात आणि ती नियंत्रित ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वेगाने कमी होत जाईल आणि तीन महिन्यांत आपण या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले असेल.

डॉक्टरांचे प्रबोधन

राज्यात अनेक निष्णात शल्यविशारद आहेत. अगदी गावोगावच्या कान-नाक-घसातज्ज्ञांकडे या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणेही आहेत; पण हा आजार दुर्मीळ आहे. त्यामुळे डॉक्टरांना योग्य माहिती मिळावी म्हणून राज्यभरातल्या कान-नाक-घसातज्ज्ञांना शल्यचिकित्सेचे लाइव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे. अशा स्वरूपाचे कार्यक्रम आठवडय़ातून दोनदा आयोजित केले जातील. कमीत कमी वेळात अधिकाधिक डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. म्युकर हा सायनसच्या मागे लपलेल्या खोल्यांपर्यंत पोहोचला, तर तिथून त्याचे पूर्णपणे उच्चाटन कसे करायचे याविषयीची माहिती यातून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्यभरातल्या तज्ज्ञांना आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण करता येणार आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार २००० रुग्णांना काळ्या बुरशीचा संसर्ग झाला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार बारामती, कोल्हापूरमध्ये कोविडचे रुग्ण नाहीत. नागपूर, अमरावती, नाशिकमध्ये मात्र रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यावर सध्या अभ्यास सुरू आहे. तिथल्या मातीत किंवा हवेत काही वेगळे आहे का, हे पाहावे लागेल.

मधुमेह

स्टिरॉइड्समुळे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण वाढते, हे आपल्याला पूर्वीपासूनच माहीत आहे. ज्यांना यापूर्वी मधुमेह नव्हता अशा अनेकांना उपचारांदरम्यान मधुमेह झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्याला हायपर ग्लायसेमिया म्हटले जाते; पण मी याला हायटन्ड हायपर ग्लायसेमिया म्हणून संबोधतो. यात शर्करेचे प्रमाण प्रचंड वाढते आणि ते बरेच दिवस तसेच वाढलेले राहते. एक दिवस शर्करेची पातळी वाढली आणि दुसऱ्या दिवशी नियंत्रणात आली, तर लगेच बुरशीसंसर्ग होत नाही, पण शर्करा वाढलेल्या स्थितीत बराच काळ राहिली, तर मात्र संसर्ग होऊ शकतो.

रक्तवाहिन्यांचा आजार?

कोविड हा फुप्फुसांचा आजार आहे, असे आपण आजवर मानत आलोय, पण आता तो रक्तवाहिन्यांचा आजार म्हणून समोर येऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याविषयी अभ्यास सुरू आहे. यात रक्तवाहिन्यांच्या भिंतींना सूज येते. म्हणजे जर फुप्फुसांच्या भिंतींना सूज आली, तर श्वास घेणे जिकिरीचे होऊन प्राणवायूचे प्रमाण घटते, स्वादुपिंडाच्या रक्तवाहिन्यांना आली तर मधुमेह होतो, मूत्रपिंडांना आली तर त्यांचे काम बिघडते. हृदयातल्या रक्तवाहिन्यांना सूज आली, तर त्यांच्या कार्यात अडथळे येतात. यावर सध्या अभ्यास सुरू आहे.

शरीराबरोबरच मनावरही आघात – डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मनोचिकित्सक

कोणत्याही विषाणूसंसर्गात व्यक्तीला शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक थकवाही जाणवतोच, पण कोविडच्या रुग्णांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. विलगीकरण आणि कोविड रुग्णाविषयी विनाकारण निर्माण होणारे संशयाचे वातावरण त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. अन्य आजारांत किमान कुटुंबीय बरोबर असतात, मित्रमंडळी विचारपूस करतात; पण कोविडच्या रुग्णाला बराच काळ एकटे राहावे लागते. आपल्याला अचानक काही झाले, तर कोणी मदतीला येईल का, वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर मृत्यू ओढावेल का, आपल्यामुळे इतरांना तर संसर्ग होणार नाही ना, अशा अनेक शंकाकुशंकांनी हे रुग्ण ग्रासलेले असतात. कोविड बरा झाल्यानंतरही लोक रिपोर्ट निगेटिव्ह आला की नाही, तुझा कोविड पूर्ण बरा झालाय ना, असे प्रश्न विचारत राहतात, त्यामुळे समाज आपल्याला स्वीकारेल की नाही, ही भीतीही वाढते. काही वेळा विषाणूचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो. अनेकदा औषधांच्या दुष्परिणामामुळेही या समस्या उद्भवू शकतात.

आर्थिक कारणे

काहींचा उपचारांदरम्यान प्रचंड खर्च होतो. लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागतात, काहींच्या मित्रमंडळींनी पैसे गोळा करून रुग्णालयाची बिले भरलेली असतात. अशा वेळी तो ताणही असतो. या आजारात प्रदीर्घ काळ रजा घ्यावी लागते. काहींच्या नोकऱ्या जातात, त्यामुळे आर्थिक चिंतेत आणखी भर पडते. संकटांची अशी मालिकाच सुरू राहिली की आज ना उद्या सगळे काही ठीक होईल, ही आशाच ती व्यक्ती गमावून बसते.

लक्षणे

अशा रुग्णांना झोप न येणे, भूक न लागणे किंवा गरज नसतानाही खात राहणे, विनाकारण रडू येणे, मानसिक मरगळ, उदास वाटणे, आपण नीट काळजी नाही घेतली म्हणून आपल्याला संसर्ग झाला, आपल्यामुळे घरच्यांना झाला, अशी अपराधी भावना.. अशा अनेक समस्या दिसतात. काहींना गोंधळून गेल्यासारखे वाटते, लक्ष केंद्रित करता येत नाही. अतिताणामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. ज्यांना तीव्र स्वरूपाची लक्षणे असतात, दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागते त्यांच्यात पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर दिसते. म्हणजे बरे होऊन घरी आल्यानंतरही दीर्घकाळ त्यांना आपण अजूनही रुग्णालयातच आहोत, प्राणवायूचा मास्क अजूनही लावलेला आहे, असे भास होत राहतात. असे रुग्ण दचकून उठतात. एखाद्या मनोरुग्णासारखीच त्यांची अवस्था होते. अशा रुग्णांच्या कुटुंबाचेही मानसिक स्वास्थ्य बिघडते.

उपचार

कोविडने ग्रासलेले तुम्ही एकटेच नाही, संपूर्ण जग याचा सामना करतेय, ही स्थिती आज ना उद्या बदललेल आणि सारे काही पूर्ववत होईल, तोपर्यंत वाट पाहणे गरजेचे आहे, हे रुग्णाच्या मनावर बिंबवणे महत्त्वाचे ठरते. मानसिक समस्यांचा समना करणाऱ्या रुग्णांना कुटुंबीयांचे खंबीर पाठबळ मिळणे आवश्यक असते. दुसरे म्हणजे रुग्णाने त्याची दैनंदिन कामे सुरू ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपले आपल्या आयुष्यावर नियंत्रण आहे, याविषयी विश्वास वाटू लागतो. हा विश्वास खूप बळ मिळवून देतो. याव्यतिरिक्त मनाला उभारी देणारी, सकारात्मकतेकडे नेणारी गोष्ट म्हणजे छंद. गेल्या वर्षभरात आमच्या किती तरी रुग्णांनी अनेक कला जोपासल्या, त्यांच्यात प्रचंड सुधारणा झालेली मला दिसली. आपण काही तरी निर्माण करू शकतो, ही खूप आश्वासक भावना असते. ती मानसिक आजारांतून तारून नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.