News Flash

चौकट आणि बैठक

आधी आपला लढा हा केवळ कोविड-१९ सोबत आहे, असा आपला समज होता. मात्र आता वर्षभरानंतर आपल्याला असे लक्षात आले आहे की, कोविडगुंता वाढतच चालला आहे.

कोविडोत्तर गुंता अधिक जटिलच नव्हे तर जीवघेणा ठरतो आहे. म्हणजे रुग्ण बरा झाला असे वाटते आणि नंतर अचानक दोन-तीन दिवसांत तो दगावल्याचीच बातमी येते..

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

आधी आपला लढा हा केवळ कोविड-१९ सोबत आहे, असा आपला समज होता. मात्र आता वर्षभरानंतर आपल्याला असे लक्षात आले आहे की, कोविडगुंता वाढतच चालला आहे. कोविडोत्तर गुंता अधिक जटिलच नव्हे तर जीवघेणा ठरतो आहे. म्हणजे रुग्ण बरा झाला असे वाटते आणि नंतर अचानक दोन-तीन दिवसांत तो दगावल्याचीच बातमी येते.. हे सारे कसे आणि का घडते आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकप्रभा’ने कव्हरस्टोरीमध्ये केला आहे. यात पुन्हा एकदा अधोरेखित झालेली बाब म्हणजे आपल्याकडे असलेला ‘विज्ञानसंस्कृती’चा अभाव. हे सारे आपण समाज म्हणून किंवा वैयक्तिक स्तरावर नागरिक म्हणून पाहातो तेव्हा हा मुद्दा कमी महत्त्वाचाही वाटू शकतो. मात्र हाच अभाव वैद्यक यंत्रणा हाताळणाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या बाबतीत पाहायला मिळतो तेव्हा तो मोठा न पचवता येणारा असा धोका ठरतो. म्हणूनच त्याची अतिशय गंभीर दखल घ्यावी लागते.

‘वैद्यकीय सदसद्विवेकबुद्धी’ केव्हा, कशी, कुठे वापरावी याचा समावेश वैद्यक अभ्यासक्रमातच असतो. अर्थात याला केवळ वैज्ञानिक निकषच लागू असतात. एखादा नवा रोग किंवा विकार आला ज्यावर कोणतेही औषध थेट उपलब्ध नाही, त्या विकाराबद्दल ठोस माहितीही नाही, अशा वेळेस करावयाची वैज्ञानिक उपचारपद्धती असे सांगते की, आपल्याला माहीत असलेले, अनुभव आणि निरीक्षणातून योग्य वाटेल असे औषध प्रयोग म्हणून वापरण्यास हरकत नसते. मात्र त्याच्या मर्यादा आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम यांची जाण डॉक्टरला ठेवावी लागते आणि त्याची पुरेशी कल्पनाही रुग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना द्यावी लागते. आपल्याकडे बहुसंख्य डॉक्टरांच्याही बाबतीत वैज्ञानिक चौकट आणि बैठक ही तेवढी पक्की नसल्याने शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही या चौकटीची फारशी जाण नसल्याने कोविडोत्तर गुंता वाढत गेलेला दिसतो. स्टिरॉइडचे परिणाम काय असतात, याची कल्पना डॉक्टरांना असतेच. किंबहुना त्याचे दुष्परिणाम किती भयानक असू शकतात हेही ठाऊक असल्याने त्याच्या वापरानंतर रुग्णाच्या बारीकसारीक नोंदी ठेवणे अत्यावश्यक असते. कारण त्या केल्या तर दुष्परिणाम वेळीच लक्षात येतात व पुढच्या गोष्टी टाळणे सहजशक्य होते. मात्र हे लक्षात येण्यासाठी आपल्याकडे काही काळ जावा लागला. रुग्णांचा मृत्युदर वाढत असताना हे लक्षात आले. असे व्हायला नको. ते टाळायचे असेल तर विज्ञान काटेकोरपणे वापरण्याचे भान असावे लागते. त्यात आपण खूपच कमी पडलो.

औषधे उपलब्ध असण्याच्या बाबतीतही आपल्याकडे खूपच ढिलाई आहे. म्हणजे जी औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळताच कामा नयेत ती कोणत्याही औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध असतात. औषधांच्या विक्रीवर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही हेच यातून समोर येते. हे नियंत्रण असते तरी हा कोविडोत्तर गुंता खूपच कमी झाला असता.

विज्ञानाची बैठक  रुजावी आणि त्याची चौकट समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पक्की व्हावी यासाठीचे प्रयत्न शालेय स्तरापासून होणे आवश्यक आहे. तसे झाले तर समाजामध्ये विज्ञानसंस्कृती निर्माण होते आणि मग भावनेच्या आहारी न जाता विज्ञानाधारित निर्णय घेतले जातात. आपला माणूस वाचावा, असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे रेमडेसिविरसाठी रांगा लागल्या, पण विज्ञानसंस्कृती असती तर हेही टाळता येणे सहजशक्य होते. गेल्या वर्षी कोविडच्या निमित्ताने तरी हात धुणे आणि आरोग्यासाठी स्वच्छता राखण्यासारख्या चांगल्या सवयी अंगी बाणतील असे वाटले होते. वैज्ञानिक धारणा अधोरेखित करण्यासाठी ती उत्तम संधी होती, पण आपण त्यातही वर्ष वाया घालवले. अद्याप संधी गेलेली नाही. आता तरी संपूर्ण समाजाने विज्ञानाच्या मार्गावर वाटचालीस सुरुवात करावी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 8:47 am

Web Title: conditions in india post covid 19 pandemic mahitartha dd 70
Next Stories
1 उशिरा आलेली जाग
2 विशेष मथितार्थ : गालबोट
3 उदास विचारे वेच करी!
Just Now!
X