विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

कोविड-१९ ने अख्ख्या जगात धुमाकू ळ घातलाय. संपूर्ण देश बंद पडलाय. या संसर्गापासून वाचण्यासाठी सर्व जण आपापल्या घरी असताना, एक असा वर्ग आहे, जो दिवस-रात्र या संकटाशी दोन हात करतोय. हा वर्ग आहे आरोग्य कर्मचाऱ्यांचा. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. पण सध्या संकटकाळात या यंत्रणेची कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.

जवळपास सर्वच सेवांचं खासगीकरण होत असलेल्या या काळात एखादी आपत्ती ओढावते तेव्हा; सरकारी यंत्रणांचं अस्तित्व जाणवतं, त्यांचा कस लागतो. सध्या करोनाच्या पाश्र्वभूमीवर असा कस लागण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्यविषयक सेवा-सुविधांच्या आघाडीवर आपण इटली, स्पेन, चीन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिके सारख्या देशांच्या आसपासही नाही, हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मान्य केले. सार्वजनिक आरोग्याबाबतची उदासीनता तर रोजच उघडी पडत असते. पण अपुऱ्या पायाभूत सुविधा, तुटपुंजं मनुष्यबळ, आवश्यक साधनांची कमतरता यावर मात करत आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आज मोठय़ा हिमतीने करोनाच्या संकटाचा सामना करतेय. एरव्ही जेवढय़ा हक्काने आपण या व्यवस्थेवर ताशेरे ओढतो, आज तेवढय़ाच मोकळेपणाने या व्यवस्थेचं आणि ती राबवणाऱ्या प्रत्येकाचं कौतुकही करायला हवं.

सरकारी रुग्णालय म्हटलं की, सर्वप्रथम आठवतात के सपेपरसाठी लागलेल्या लांबलचक रांगा, पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, भटक्या श्वानांचा मुक्त संचार, एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या आणि सदैव अपुऱ्या पडणाऱ्या खाटा. त्या खाटांमधून उरलेल्या चिंचोळ्या

मार्गिके तही झोपलेले रुग्ण, अस्वच्छ प्रसाधनगृहं आणि औषधांच्या दरुगधीने गुदमरलेले श्वास. या रुग्णालयांपासून चार हात दूर राहाणंच उत्तम, असं बहुतेकांना वाटतं. बृहन्मुंबई महापालिके चं कस्तुरबा रुग्णालय असो वा पुणे पालिके चं नायडू रुग्णालय.. थोडय़ाफार फरकाने सर्वत्र हीच स्थिती असते. या रुग्णालयांतल्या कर्मचाऱ्यांचा रुग्णांविषयी असलेला बेदरकार दृष्टिकोनही नेहमीच असंतोषाचा, टीके चा मुद्दा ठरतो. मात्र आज करोनासारख्या अतिशय वेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराचं संकट समोर असताना हीच रुग्णालयं आणि हेच कर्मचारी ठामपणे उभे ठाकले आहेत. संकटाशी दोन हात करत आहेत.

करोनाची आपत्ती ओढवल्यापासून सरकारने उचललेल्या पावलांविषयी राज्याच्या साथरोग नियंत्रण विभागाचे संचालक डॉ. प्रदीप आवटे सांगतात, ‘या आजाराचा संसर्ग परदेशांतून आलेल्या व्यक्तींनाच झाला होता आणि त्यांच्याद्वारे इतरांना होत होता. त्यामुळे सर्वात पहिला टप्पा होता तो देशात प्रवेश करण्याचे मार्ग सील करण्याचा. त्यासाठी राज्यातल्या सर्व विमानतळांवर आणि बंदरांवर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली. ज्यांच्यात करोनासदृश लक्षणं आढळली त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करणं आवश्यक होतं. त्यासाठी सुरुवातीला मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. वाढत्या प्रसाराच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा रुग्णालयं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. आता खासगी रुग्णालयांतही ही व्यवस्था उभी करण्यात येत आहे. मुंबईत सुमारे आठ आणि पुण्यात ११ खासगी रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.’

‘संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक उपकरणं तातडीने उपलब्ध करून देण्यात आली. तपासणीसाठी जानेवारीपर्यंत पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीशिवाय पर्याय नव्हता. मात्र अवघ्या दोन महिन्यांत देशभरात १०७ ठिकाणी तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे निदान तातडीने होऊ  लागलं. परदेशांतून आलेल्या ज्या व्यक्तींमध्ये लक्षणं आढळली नाहीत, त्यांना १४ दिवस घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या आणि पालिके च्या आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली. ते रोज दूरध्वनीद्वारे संपर्क साधून काही लक्षणं दिसत आहेत का याची माहिती घेऊ  लागले. लक्षणं आढळल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात बोलावून त्यांच्या तपासण्या के ल्या जाऊ  लागल्या. १४ दिवस घरी राहण्याची सूचना देण्यात आलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना ओळखणं शक्य व्हावं यासाठी त्यांच्या हातांवर शिक्के मारण्यात आले.’

हा आजार ज्या प्रमाणात पसरत आहे, त्याचा विचार करता तो ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचला तर तिथेही त्याच्याशी लढण्याची क्षमता विकसित झालेली असावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचं डॉ. आवटे सांगतात. ‘प्रत्येक जिल्ह्य़ात पाच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याद्वारे तालुका पातळीपर्यंत प्रशिक्षण पोहोचवण्यात आलं. या साथीच्या दरम्यान अनेक अफवा पसरल्या. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी रेडिओ जिंगल्स तयार करण्यात आल्या. डॉ. अमोल कोल्हे यांची चित्रफीत तयार करून ती प्रसारित के ली गेली. नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली. या हेल्पलाइनला एवढा प्रतिसाद आहे की तिच्या चारही लाइन्सवर सतत कॉल येत असतात. या व्यतिरिक्त स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे.’

१३ मार्चपासून साथरोग नियंत्रण कायदा १९९७ लागू करण्यात आला, त्याचा फायदा झाल्याचं डॉ. आवटे सांगतात. ‘‘या कायद्यामुळे साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणांना काही विशेषाधिकार बहाल के ले जातात. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांवरही नियंत्रण आणण्याचा अधिकार यंत्रणांना प्राप्त होतो. उदाहरणार्थ घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींच्या संचारस्वातंत्र्यावर मर्यादा घालून त्यांना घरात राहाणं बंधनकारक करता येतं. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करता येते. मास्क, सॅनिटायझर आदी साधनांच्या उत्पादनाचं, वापराचं, खरेदी-विक्रीचं आणि किमतीचं नियमन करता येतं. गरज पडल्यास एखादं संपूर्ण हॉटेल विलगीकरण कक्षासाठी रिकामं करवून घेता येऊ  शकतं.’’

बहुतेक करोनाग्रस्त रुग्ण परदेशांत जाऊन आलेले आहेत. आर्थिक सुस्थितीतील या रुग्णांपैकी अनेकांचा पालिका रुग्णालयांशी प्रथमच संबंध येत आहे. या रुग्णालयांच्या स्थितीविषयी काहींनी नाराजीही व्यक्त के ली आहे. त्याविषयी विचारले असता, डॉ. आवटे सांगतात, ‘‘सुरुवातीला के वळ पालिका रुग्णालयांतच विलगीकरण शक्य होतं. त्यामुळे दुसरा पर्यायच नसल्याचं रुग्णांना समजावून सांगण्यात आलं. रुग्णालयांत स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली गेली. आता खासगी रुग्णालयांतही विलगीकरण कक्ष उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांपुढे आता पर्याय आहेत.’’

न्यूयॉर्कहून परतल्यानंतर तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात काही तास राहावं लागलेल्या अबिरा धर सांगतात, ‘‘परदेशातून परतल्यानंतर मला करोनासंबंधित कोणतीही लक्षणं नव्हती. दोन दिवसांनंतर मला पालिका अधिकाऱ्यांचा कॉल आला. त्या वेळी घसा दुखत असल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितलं गेलं. तिथे मी काही तास होते. मी करोनाबाधित नसल्याचं तपासणीतून स्पष्ट झाल्यामुळे मला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. पालिका रुग्णालयात जाताना माझ्याही मनात धाकधूक होती. पण तिथली स्वच्छता आणि संसर्ग टाळण्यासाठी घेतली जाणारी काळजी पाहून मी चकित झाले. बेड आणि प्रसाधनगृह अतिशय स्वच्छ होते. सर्व कामांमध्ये सुसूत्रता होती.’’ त्यांनी आपल्या या अनुभवासंदर्भातली एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित के ली आहे.

अभिनेता अमेय वाघ नुकताच अमेरिके चा दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. तो पुढचे १४ दिवस घरीच राहणार असून त्यानेही आपला अनुभव समाजमाध्यमांवर सांगितला आहे. ‘‘विमानतळावर तपासणीसाठी सात-आठ तास थांबावं लागतं असं ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात अगदी तातडीने तपासणी करून आम्हाला सोडून देण्यात आलं. संसर्गाचा धोका असूनही अतिशय तरुण डॉक्टर तिथे आमची तपासणी करण्यासाठी तैनात होते, त्यांच्या धैर्याचं कौतुक वाटलं,’’ असं अमेयने म्हटलं आहे.

परदेशातून मुंबईत परतलेल्या एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या ६८ वर्षीय महिलेलाही हा संसर्ग झाला. आता ती महिला ज्या झोपडपट्टीत राहाते तिथल्या व्यक्तींची तपासणी करण्याचं आव्हान पालिके समोर आहे. अवघ्या एक किलोमीटर परिसरात सुमारे २३ हजार रहिवासी दाटीवाटीने राहातात. त्यातून करोनाबाधितांना शोधून काढण्याचं अशक्यप्राय काम पालिके ला करावं लागणार आहे.

विलगीकरण कक्षात राहावं लागलेल्या काहींनी रुग्णालयांतल्या गैरसोयींविषयी तक्रारीचा सूरही आळवला आहे. अस्वच्छता, भटक्या प्राण्यांचा संचार आणि बेचव अन्न दिलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

करोनासंदर्भात सरकारने उचललेल्या पावलांबाबत डॉ. अमोल अन्नदाते सांगतात, ‘‘प्रशासन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे वैद्यकीय अधकारी आणि कर्मचारी यांच्यात योग्य संवाद नाही असं लक्षात आलंय. करोनाशी लढा देण्याची तयारी डिसेंबरमध्येच सुरू होणं आवश्यक होतं. विलगीकरणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी विलगीकरण कक्षांत करण्यात येत नाही. ओस पडलेली रुग्णालयं, सरकारी अतिथीगृहं, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने, एवढंच नाही तर मुंबईतले रिकामे फ्लॅट विलगीकरणासाठी सज्ज करणं आवश्यक आहे. भविष्यात कृत्रिम श्वसन यंत्रणेचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे.’’ या सूचनांसंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचंही त्यांनी सांगितलं.

पालिका रुग्णालयांतली अस्वच्छता आणि गैरसोयी हा नेहमीच टीके चा विषय ठरत आला आहे. पण तुटपुंजी आर्थिक तरतूद, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अतिशय नाममात्र दरांत के ले जाणारे उपचार यांचा विचार करता, पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची तुलना खासगी रुग्णालयांशी करू पाहाणं अन्यायकारक ठरेल. तरीही कस्तुरबामधल्या स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी एक खासगी संस्था नेमण्यात आली आहे. त्या संस्थेचे कर्मचारी दर तासाला साफसफाई करतात. शिवाय विलगीकरण कक्षात राहणाऱ्यांना वृत्तपत्रं, मासिकं  आदी साहित्यही उपलब्ध करून दिलं जात आहे.

करोना संसर्गजन्य असल्यामुळे रुग्णसेवेत कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेणंही अतिशय महत्त्वाचं आहे. यासंदर्भात परिचारिका संघटनेच्या सचिव त्रिशिला कांबळे सांगतात, ‘‘कस्तुरबा रुग्णालयात सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. संपूर्ण शरीर झाकणारे गाऊन आणि अन्य सुरक्षा साधनं देण्यात आली आहेत. एन ९५ मास्क देण्यात आले असून रोज नवा मास्क दिला जातो. विलगीकरण कक्षातले कर्मचारी दर १० दिवसांनी बदलले जात आहेत.’’ मात्र याच रुग्णालयात नुकत्याच रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने पुरेशी संरक्षण साधनं उपलब्ध नसल्याबद्दल ट्विटरवर नाराजी व्यक्त होती. ‘‘सैनिकांकडे ढालच नसेल, तर युद्ध लढणार कसं?’’ असा प्रश्न तिने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना के ला होता. मात्र नंतर तिने हे ट्वीट डिलीट के लं आणि ‘‘कृपया यावर राजकारण करू नये. प्रशासनाने आवश्यक साधनं पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्याची पूर्तता होत आहे,’’ असं ट्वीट के लं.

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेप्रमाणेच अन्य यंत्रणांचाही कस लागतो आहे. रात्रंदिवस धावणारी मुंबई, पुण्यासारखी शहरं पूर्णपणे बंद करणं हे काही सोपं काम नाही. मात्र जनता संचारबंदी, जमावबंदी अशा सर्व उपाययोजना राबवण्यासाठी पोलीस सदैव सज्ज आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था पुरवली जात आहे. त्यांच्या कामात या र्निबधांमुळे कोणतेही अडथळे येणार नाहीत, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील आजाराच्या प्रसाराची सद्य:स्थिती, के ल्या जाणाऱ्या उपाययोजना, सर्वसामान्यांवरचे र्निबध यांची नि:संदिग्ध  माहिती प्रसारमाध्यमांद्वारे वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि खातरजमा न करता अशास्त्रीय उपचार न करण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीवर नियंत्रण आलं आहे.

एकीकडे पालिका आणि सरकारी यंत्रणा हा वेगाने पसरणारा रोग काबूत ठेवण्यासाठी एवढा खटाटोप करत असताना काही जण आपल्या बेजबाबदार वर्तनाने संकटात भर घालत आहेत.  परदेशातून परतलेल्या आणि घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या काहींनी लोकल ट्रेनमधून प्रवास के ला. काही रुग्णांनी विलगीकरण कक्षांतून पळून जाण्याचा प्रयत्न करून इतरांच्या जिवाला धोका निर्माण के ला. त्यामुळे रुग्णालयांतली सुरक्षा वाढवावी लागली आहे. पंतप्रधानांनी आपापल्या घराच्या खिडकीत उभं राहून टाळ्या, थाळ्या वाजवण्याचं आवाहन के लं असता, लोक चौकाचौकांत दाटीवाटी करून वाद्य वाजवताना, मिरवणुका काढताना दिसले. पाच मिनिटांची कृतज्ञता राहिली बाजूलाच, अतिउत्साही व्यक्तींचं ‘सेलिब्रेशन’ अर्धा तास झाला तरी संपत नव्हतं. आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबई-पुण्यातल्या रेल्वे स्थानकांवर झुंबड उडत होती. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचं आश्वासन वारंवार देण्यात येत असूनही भाजी बाजारांत सकाळी-सकाळी प्रचंड गर्दी उसळत होती. टाळेबंदीच्या काळात रस्त्यावर टवाळक्या करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्याची, उठाबशा काढायला लावण्याची वेळ पोलिसांवर येत आहे. सरकारी स्तरावरच्या प्रयत्नांना वैयक्तिक स्तरावरही सहकार्य मिळणं आवश्यक आहे. करोनाने आपल्या काही अगदी मूलभूत सवयींवर प्रश्नचिन्ह उपस्थित के लं आहे. नाका-तोंडावर रुमाल न धरताच शिंकणं- खोकणं, रस्त्यावर थुंकणं, हात न धुताच खाणं असे अगदी शिशू वर्गात शिकवले जाणारे शिष्टाचार आपण पाळत नाही. त्याचा किती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, हे करोनाने दाखवून दिलं आहे. आतातरी आपण आपल्या सवयी सुधारायला हव्या. थुंकणाऱ्यांना हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला आहे, पण अंमलबजावणीही व्हायला हवी.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कित्येक दशकं  मुरलेली उदासीनता चुटकीसरशी दूर होणं शक्य नाही. आरोग्यसेवेत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीनेही या गंभीर साथीपुढे अक्षरश: हात टेकले आहेत. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या दफनासाठीही तिथे जागा अपुरी पडू लागली आहे. सुरुवातीच्या काळात के लेलं दुर्लक्ष त्यांना फारच महागात पडलं आहे. संसर्ग मर्यादित ठेवणं एवढा एकच उपाय आपल्या हाती आहे. रुग्णसंख्या वाढली तर आपली आधीच तुटपुंजी आणि कमकु वत असलेली आरोग्ययंत्रणा या साथीच्या रेटय़ाखाली पूर्णपणे कोलमडून पडेल. शाळा-महाविद्यालयं-कार्यालयं बंद करणं,  रेल्वे-बस वाहतूक थांबवणं, जिल्ह्य़ांच्या सीमा सील करणं, बाधित देशांतून येणाऱ्यांवर बंदी या उपाययोजना करण्यास विलंब झाल्याचा सूर उमटत आहे. पण सध्या तरी देशभर अभूतपूर्व आणि भयाण शांतता आहे. पुढचे काही दिवस कसोटीचे आहेत.

एक काळ होता जेव्हा देवी, प्लेगने धुमाकू ळ घातला होता. त्यानंतर फ्लूच्या साथींनी जगाला बेजार के लं. सार्स, मार्स, इबोला, स्वाइन फ्ल्यूसारख्या जीवघेण्या आजारांनी वैद्यकीय व्यवसायापुढे त्या-त्या काळात मोठी आव्हानं उभी के ली. जग जसजसं जवळ येत आहे, तसा या साथींचा राक्षस अधिकाधिक अक्राळविक्राळ होत आहे. आज जगाच्या कोणत्याही एका कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीपासून सुरू झालेली साथ अवघ्या काही दिवसांत जगभरात पसरून लाखोंचे जीव घेऊ शकते. त्यात कोविड-१९ हा ‘नोव्हेल करोना व्हायरस’ म्हणजे करोना वर्गातला नव्या प्रकारचा विषाणू आहे. त्याच्यावरची औषधं आणि लस निर्माण होईपर्यंत बराच काळ जाईल. तोवर या विषाणूला दूर ठेवणं हा एकच उपाय आहे. तोपर्यंत या संकटाशी अपुऱ्या साधनांनिशी दोन हात करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला गरज आहे, सर्वाच्या संयमी सहकार्याची.