ऑनलाइन अपरिहार्य..

चिन्मय पाटणकर – response.lokprabha@expressindia.com

परदेशांतील विद्यापीठांच्या तोडीस तोड उभे राहण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतातील उच्चशिक्षण संस्था, विद्यापीठांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकूण शिक्षण व्यवस्थेवर करोनासंसर्ग आणि अभूतपूर्व टाळेबंदीचा परिणाम येत्या काही वर्षांत निश्चितपणे होऊ घातला आहे. शिक्षण व्यवस्थेचं पारंपरिक वेळापत्रक बदलण्यापासूनच कदाचित त्याची सुरुवात होऊ शकेल. आतापर्यंत ई साहित्य, ऑनलाइन अध्यापनाकडे प्रयोग म्हणून पाहिले जात होते. करोनानंतरच्या काळात ऑनलाइन माध्यमांचा वापर ही अपरिहार्यता असेल. भारतातील भरमसाट विद्यार्थी संख्या पाहता काही आव्हानांनाही सामोरे जावे लागेल. वसतिगृहे, वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा येतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा कायापालट होऊ शके ल. त्यासाठी शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवाव्या लागतील. त्यामुळे धोरणात्मक बदलांपासून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत नवा विचार, मोठी गुंतवणूक करणं ही अपरिहार्यता आहे. रखडलेले शैक्षणिक कामकाज पूर्ण करणे, आगामी शैक्षणिक वर्षांची तयारी करणे यासाठी करोनानंतरचा काळ आव्हानात्मक आहेच, पण त्यापुढील काळ अधिक कसोटीचा आहे. कारण शिक्षण व्यवस्था सक्षम करणं ही सुदृढ भविष्यासाठीची गरज आहे.

वैद्यकीय शिक्षणात बदल क्रमप्राप्त

देशातील वैद्यकीय शिक्षणामध्ये अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथी, सिद्धा या प्रमुख वैद्यकीय शाखा आहेत. अ‍ॅलोपॅथीत एमबीबीएस, दंतवैद्यक, कान-नाक-घसा या प्रमुख अभ्यासक्रमांसह वैद्यकीय पूरक अशा नर्सिग, पॅथोलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी देशात प्रचंड चुरस असते. नीट या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. खासगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. यंदा नीट ही प्रवेश परीक्षा ३ मे रोजी नियोजित होती. मात्र करोना विषाणूसंसर्ग सुरू झाल्यामुळे सुरू करण्यात आलेल्या प्रतिबंधक उपायानुसार ही प्रवेश परीक्षा स्थगित करावी लागली. आता के ंद्र सरकारने टाळेबंदी उठवल्यानंतरच ही परीक्षा होऊ शकणार आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या काळात देशातील वैद्यकीय व्यवस्थेचे महत्त्व समोर आले आहे. रुग्णालयांची, डॉक्टर आणि सहायकांची संख्या वाढवण्याची मोठी गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. करोना विषाणूविरुद्धच्या या युद्धात वैद्यकीय कर्मचारी धोका पत्करून योद्धय़ांप्रमाणे लढत आहेत. टाळेबंदीमुळे वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापनाचे कामकाज बंद करण्यात आले आहे. काही महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारून शैक्षणिक कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न के ला आहे. मात्र करोना विषाणू संसर्गामुळे वैद्यकीय शिक्षणावरही परिणाम झाला आहे. त्यामुळेच आता वैद्यकीय शिक्षणातही काही बदल करणे क्रमप्राप्त होणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, की आतापर्यंत समाजात डॉक्टरांना महत्त्वाचे स्थान दिले जात होते. मात्र करोना विषाणू संसर्गामुळे निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) कर्मचाऱ्यांचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. संसर्गजन्य आजार काय असतो, याची खऱ्या अर्थाने सर्वानाच जाणीव झाली. संसर्गामुळे काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे करोना आहे. वैद्यक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अभ्यासक्रम चालवले जातात. पारंपरिक विद्यापीठांप्रमाणेच वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा होतात, तर प्रात्यक्षिक परीक्षा रुग्णांवर होतात. त्यात रुग्णांचा आजार, त्याची लक्षणे, उपचार या विषयीचे सादरीकरण विद्यार्थ्यांना करावे लागते. त्यात विद्यार्थ्यांचा थेट रुग्णांशी संपर्क येतो. मात्र, आता प्रत्येक रुग्णाकडे संसर्गाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे. एक तर रुग्णाकडून होऊ शकणारा संसर्ग किं वा विद्यार्थ्यांकडून रुग्णाला होऊ शकणारा संसर्ग अशा दोन्ही शक्यता त्यात असू शकतात. त्यामुळे रुग्णांची तपासणी कशी करायची, असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्याशिवाय अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना परस्परांत अंतर ठेवणेही अत्यावश्यक होणार आहे. पदव्युत्तर पदवी स्तरावर परस्पर अंतर पाळणे शक्य आहे. मात्र पदवी स्तरावर विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने त्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. पण ते करावे लागेल.

पारंपरिक विद्यापीठे गरजेनुसार ऑनलाइन परीक्षा घेऊ शकतात, पण वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये प्रत्येक परिषदेने तसे निर्देश विद्यापीठांना देणे गरजेचे आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणातील प्रात्यक्षिक परीक्षा हे मोठे आव्हान आहे. या सगळ्याचा विचार करता करोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा पद्धतीने सुधारणा करण्याची नितांत गरज असल्याचे लक्षात आले आहे. ऑनलाइन परीक्षेचा, ऑनलाइन के स स्टडीजचा विचार करणे आवश्यक झाले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना के स स्टडी दाखवून त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेता येऊ शके ल. पण वैद्यकीय शिक्षणात रुग्ण तपासणी अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही, तर ते सक्षम कसे होणार? विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकासाठी रुग्ण तपासले नाहीत, तर त्यांना निदान करता येणार नाही, शस्त्रक्रिया करता येणार नाहीत. त्यामुळे आता प्रात्यक्षिकासाठी काय पद्धत वापरायची, हा मोठा प्रश्न आहे.

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळेच देशभरातील काही वैद्यकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन बैठक झाली. त्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली. त्याचा प्रस्ताव तयार करून वैद्यक शिक्षण परिषदेला दिला जाणार आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षण हे जगातील सर्वोत्तम वैद्यकीय शिक्षण मानले जाते. विद्यार्थ्यांना उत्तम अनुभव घेता येत असतो. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये एक पर्याय असा असू शकतो, की प्रात्यक्षिकासाठीच्या रुग्णांच्या आधी सर्व चाचण्या करून घ्याव्या लागतील.

करोना संसर्गात निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे महत्त्व दिसून आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या सहकार्याने एक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा सहा आठवडय़ांचा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. बारावीनंतर हा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. रुग्णालयातील वॉर्डात काम कसे करायचे, रुग्णाला हाताळायचे कसे, संसर्ग असल्यास रुग्णाचे विलगीकरण कसे करायचे, स्वत: काय काळजी घ्यायची हे धडे या अभ्यासक्रमात दिले जातील. हा अभ्यासक्रम करणाऱ्यांना लगेच रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. तसेच नर्सिगच्या अभ्यासक्रमातही संसर्गजन्य आजारांच्या अनुषंगाने स्वतंत्र अभ्यासक्रम समाविष्ट करणे आवश्यक ठरणार आहे. या अभ्यासक्रमात के वळ संसर्गजन्य आजार, रुग्णांना कसे हाताळायचे त्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. कारण नर्सिग कर्मचारी रुग्णालयातील सर्वात महत्वाचा घटक असतो.

आता यंदाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी बोलायचे तर २०१६ मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा २४ जुलैला झाली होती. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया झाली होती. पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत असते. त्यामुळे टाळेबंदीनंतर प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश प्रक्रिया राबवली जाऊ शकते.

एकू णात टाळेबंदी आणि करोनानंतरच्या काळात वैद्यकीय शिक्षणात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. हे बदल करताना व्यावहारिक विचार करावा लागेल. करोनामुळे एक मोठा अनुभव आला आहे. या पुढील काळात असे आणखी काय होईल हे सांगता येत नाही. काही देशांमध्ये इबोला, सार्स असे संसर्गजन्य आजार येऊन गेले, त्याचा आपल्यावर विशेष परिणाम झाला नाही. पण करोनामुळे आपल्याला मोठा धडा मिळाला आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून त्यानुसार वैद्यकीय शिक्षणात बदल करणे भाग आहे.

ऑनलाइनशी मेळ आवश्यक

करोना संसर्गामुळे शाळा आणि महाविद्यालये, विद्यापीठे सर्वात आधी बंद करण्यात आली. विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत उपलब्ध के लेल्या ई-साधनांचा वापर या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात सुरू झाला. प्राध्यापक आणि विद्यार्थी डिजिटल व्यासपीठांचा वापर करून एकमेकांशी जोडले जाऊ लागले. झूम, गुगल क्लासरूम अशी माध्यमे वापरली जाऊ लागली. विद्यार्थी घरबसल्या ई-साहित्याचा वापर करू लागले. आतापर्यंत ई-साहित्याविषयी मोठय़ा प्रमाणात जागृती नसल्याने विद्यापीठे आपापल्या परीने ई-साहित्याची निर्मिती करत होती. मात्र, करोना संसर्गामुळे ई- साहित्याची कायमस्वरूपी उपलब्धता गरजेची असल्याचे दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षणातही येत्या काळात मोठय़ा प्रमाणात बदल करावे लागणार आहेत. हे बदल दोन टप्प्यांत करावे लागतील. सर्वात आधी संसर्ग थांबून टाळेबंदी हटवल्यानंतर महाविद्यालये, विद्यापीठे सुरू होतील तेव्हा काही प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील. तसेच पुढील शैक्षणिक वर्षांपासून एकू णच उच्चशिक्षणातील धोरणात्मक बदलांची सुरुवात होईल.

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना असे वाटते की, करोनामुळे येत्या काळात शिक्षणव्यवस्थेवर व्यापक परिणाम होतील. त्यासाठी शासकीय पातळीवरून आणि विद्यापीठांच्या स्तरावर महत्त्वपूर्ण धोरणे आखावी लागतील. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑनलाइन शिक्षणाचा असेल. अशा स्वरूपाच्या शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. कारण ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे, कित्येक विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप घेणे आर्थिकदृष्टय़ा शक्य नाही. किफायतशीर दरांत ही साधने उपलब्ध करावी लागतील. ‘करोनामुळे परस्पर अंतर राखणे महत्त्वाचे झाले आहे. पुढील किमान वर्षभर वसतिगृहांमधील गर्दी कमी करावी लागेल. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण हा येत्या काळातील सर्वात महत्त्वाचा घटक होईल. ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष अध्यापन-शिक्षण प्रक्रिया यांचा काहीतरी मेळ घालावा लागेल. अर्थात ऑनलाइनचा वापर वाढल्यास पारंपरिक शिक्षण पद्धत थोडीशी मागे पडेल. आता येत्या काळात विद्यार्थ्यांमधील कौशल्यवृद्धी करावी लागेल. मशीन लर्निग, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी अशा कौशल्यांवर भर करावा लागेल. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी अशा सर्वच शाखांमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. शिक्षणात ई-साहित्याची निर्मिती, त्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासह तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढू शके ल. ही नवी पद्धत आत्मसात करणे विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठीही आव्हानात्मक, तरीही आवश्यक असेल. विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी शिक्षकांना नवी कौशल्ये शिकावी लागतील,’ असे डॉ. करमळकर म्हणाले.

करोना संसर्गामुळे आणखी काही महत्त्वाचे बदल होतील ते असे की आता देशातील शिक्षणावर सरकारकडून होणारी गुंतवणूक आणि खर्च काही प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ग्रामीण भागातून शहराकडे शिक्षण, रोजगारासाठी येण्याचे प्रमाणही काही प्रमाणात कमी होऊ शके ल. टाळेबंदीनंतर मोठय़ा शहरांतून गावांकडे परतण्याचे प्रमाण वाढणे हे त्याचेच उदाहरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्याच भागात शिकू  शकतील, रोजगारसंधी शोधू लागतील. परराज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शके ल. परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शके ल. त्याशिवाय परदेशातील विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठांतील  देवाणघेवाण वाढेल, गुंतवणूक वाढेल,’ याकडेही डॉ. करमळकर यांनी लक्ष वेधलं.

शिक्षण संस्थांमधील अध्यापनाचे कामकाज बंद होऊन ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी-शिक्षक संवाद सुरू झाला आहे. करोनानंतरच्या काळातही ऑनलाइन माध्यमांचा वापर सुरूच राहणार आहे. म्हणजे महाविद्यालयांतील-विद्यापीठांतील अध्यापन बंद होणार असा त्याचा अर्थ नाही. तेही सुरू होईल. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर किमान चार ते पाच महिने परस्परांत अंतर ठेवावेच लागेल. वर्गामध्ये एकत्र बसणे, सभागृहांमध्ये एकत्र येणे, क्रीडा स्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रमांवर र्निबध ठेवावे लागतील. त्याशिवाय वर्गातील प्रत्यक्ष अध्यापन आणि ऑनलाइन अध्यापन यांबाबतही निर्णय घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाइन व्यासपीठे वापरणे आणि प्रत्यक्ष संस्थेत येणे हे आलटून-पालटून करावे लागेल. एकावेळी जास्त विद्यार्थी वर्गात बसवता येणार नाहीत. काही वर्ग पूर्णत: ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावे लागतील. तसेच काहीसे परीक्षांच्या बाबतीतही होऊ शके ल. विद्यार्थ्यांनी तीन तास बसून परीक्षा देण्यापेक्षा गृहपाठासारखी परीक्षा, ओपन बुक अशा पर्यायांचा विचार करावा लागेल. हे पर्याय आताही उपलब्ध आहेतच, पण येत्या काळात धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना प्रवाहात आणावे लागेल. ऑनलाइन अध्यापनही कठीण आहे, होऊ शकणार नाही म्हणून आतापर्यंत टाळले जात होते, पण करोनामुळे नाइलाज म्हणून का होईना त्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत आणि आता त्याचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. विषयानुरूप ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शिक्षण यांचा मेळ घालण्याचं स्वातंत्र्य द्यावं लागेल. ऑनलाइन माध्यमांचा वापर वाढला, तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थेत येणेही तितके च आवश्यक आहे. कारण एकत्र शिकण्यातून समाजातील वावर, सहजीवन, जीवनानुभव मिळतो, जीवनकौशल्ये अवगत करण्याची संधी मिळते, हे सारे घरी बसून शिकता येत नाही. भारतात आजवर शिक्षण क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. अनेक दशके  फळा-खडू अशा पद्धतीने शिकवले जात होते. पुढे व्हाइट बोर्ड आले, इंटरनेट, डिजिटल बोर्ड यांचा वापर सुरू झाला. आता ई-शिक्षण सुरू झाले आहे. हे बदल आपल्या शिक्षण व्यवस्थेने स्वीकारले आहेत. आता करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीतून धडा घेऊन काही बदल निश्चितच करावे लागतील. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादातून पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने बदल होतील, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी नमूद के ले.

शिक्षणतज्ज्ञांना काय वाटते?

येत्या काळात करोना आणि टाळेबंदीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होणार असल्यामुळे त्यातून आपली शिक्षणव्यवस्थाही सुटणार नाही. मग, पुढील काळात प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत कोण-कोणते परिणाम होतील, याची भाकितं तज्ज्ञांकडून मांडली जात आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन सांगतात की, ‘‘विद्यार्थ्यांचं शिक्षण हे विविध अंगाने होत असतं. करोनामुळे हे आणखी प्रकर्षांनं जाणवलं आहे. त्यामुळे याचा उपयोग करून आपल्याला आपली शिक्षणपद्धती अधिक व्यापक आणि प्रगल्भ करता येईल. खरंतर विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या गरजा, आवडीनिवडी यांचा विचार केला पाहिजे. मात्र, आताच्या पारंपरिक शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांला गृहीत धरलं जातं. त्यातून ८० टक्के विद्यार्थी उद्योगधंद्याला पात्र नाहीत, असे अहवाल येत आहेत. ब्रिटिशांची कालबाह्य़ शिक्षणपद्धती आपण तशीच चालू ठेवली म्हणून नुसत्या पदव्यांना महत्त्व आलेलं आहे. पठडीबाज शिक्षण पुरेसं नाही. हे सगळं बदलण्याची गरज होती. आणि त्याची सुरुवात करोनामुळे झालेली आहे. या संकटाला संधी समजून आपण शिक्षणक्षेत्रात संधी म्हणून उपयोग करून घेऊ शकतो. शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं, या उद्देशामध्ये ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व आहेच. त्यातून फक्त माहितीच नाही तर जीवन उपयोगी शिक्षण मिळू शकतं. यामध्ये विविध शिक्षणसंस्थांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. करोनानंतरचा समाज कसा असेल, याचा मूलभूत विचार करून शिक्षण-व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्या देशातील इंटरनेट आणि इतर तांत्रिक साधनांचा मुद्दा पुढे केला जातो. मात्र, जगाच्या तुलनेत आपला देश व्यवस्थित वाटचाल करत आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या आपल्या देशात अफाट आहे. ते साधन वापरण्याची पद्धतीही आपण लवकर आत्मसात केली आहे. त्यामुळे येत्या काळात काही शाखा वगळता ऑनलाइन शिक्षणव्यवस्था अंगीकारणं महत्त्वाचं आहे. करोनामुळे या सर्व गोष्टींचा विचार सुरू झाला आहे.’’

एकीकडे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला जात असला तरी काही तज्ज्ञांना असं वाटतं की, करोना किंवा टाळेबंदीमुळे शिक्षणव्यवस्थेत फारसा फरक पडेल असं वाटत नाही. या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात असं सांगतात की, ‘‘करोना आणि टाळेबंदीच्या पाश्र्वभूमीवर सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग फारच कमी विद्यापीठे, शिक्षणसंस्थांमधून होत आहे. परंतु, आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेला ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्यावर मर्यादा येतात. ऑनलाईनसाठी ज्या सुविधा लागतात (टॅब, संगणक, इंटरनेट, वीज आदी) त्या शिक्षण व्यवस्थेत उपलब्ध आहेत आणि त्याद्वारे आपण परीक्षा किंवा शिकवण्या घेऊ शकतो, असं समजणं पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर करोनानंतर शिक्षणव्यवस्थेत आमुलाग्र बदल होतील, असं सांगत सद्यस्थितीचा बाऊ केला जात आहे. अशी अनेक संकटं यापूर्वीही आलेली आहेत. त्यावेळी वेगवेगळ्या कारणाकरीता परीक्षा दोन-दोन महिन्यांनी ढकलण्यात आल्या होत्या. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून आंदोलन, मोर्च, उपोषणे होत असतात. त्यातून विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे करोना आणि शिक्षणव्यवस्थेतील बदल यावर मोठय़ा चर्चा योग्य नाही. फार तर एखादं सेमिस्टर पुढे ढकलावं लागेल. ऑनलाईन शिक्षणपद्धती हा कायमचा पर्याय असू शकत नाही. करोनानंतर विद्यार्थ्यांच्या शिकवण्यांमध्ये किंवा परिक्षांमध्ये काही तडजोडी करून आपलं शिक्षण पूर्वपदावर येऊ शकतं.’’

करोनामुळे शिक्षणव्यवस्थेत होणाऱ्या बदलांवर वेगवेगळे मतप्रवाह दिसत असले तरी नेमके कोणते बदल होतील किंवा आपल्याला करावे लागतील, याचे काही आखाडे बांधता येतील. मात्र, हे नेमके बदल कोणत्या स्वरूपाचे असतील याविषयी अ‍ॅक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक व प्रयोगशील शिक्षक भाऊ चासकर सांगतात की, ‘‘शिक्षणात गॅजेटचा वापर वाढून स्क्रिनटाइम वाढेल. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवायला लागेल. शाळांमध्ये समुपदेशक आवश्यक ठरतील. करोनाग्रस्त शहर आणि परिसरात तसेच इतरही शाळा सुरू झाल्यावर मुलेही शाळेत येतील का, किती मुले येतील? करोनाग्रस्त कुटुंबातल्या मुलांकडे कोणत्या नजरेने बघितले जाईल, या बाबी विचारात घ्यावा लागतील. शारीरिक अंतर ठेवून मुलांना बसवायला लागेल का? बैठकव्यवस्था कशी असेल? हेही ठरवायला लागेल. करोनानंतरच्या काळात आर्थिक स्थिती बिघडलेले पालक एकवेळ मुलांना शाळेत पाठवतील. मात्र, मुलींना रोजंदारीसारख्या कामाला जायला लागू शकते. परिणामी शाळाबाह्य़ मुलींची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढू शकते. अर्थात त्यात मुलांचीही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिजिटल अ‍ॅक्सेस नसलेली मुले शिक्षणाच्या परिघाबाहेर ढकलली जाऊ  नयेत, यासाठी लॉकडाउनमध्ये आणि नंतरही ‘ऑफलाइन’ पालकांच्या मुलांचा विचार प्राधान्यक्रमाने करायला लागेल. अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तकांसोबत जीवन कौशल्यकेंद्री शिक्षणाचा जास्त गंभीरपणे विचार करायला लागेल. परीक्षाकेंद्री शिक्षणात मोठे बदल करायला लागतील. ताणतणावाचे व्यवस्थापन, समस्या निराकरण, चिकित्सक विचार करणे, परस्पर सहकार्य, सामूहिक सहजीवन, सृजनशीलता यावर भर देऊन प्रकल्प आणि प्रात्यक्षिक यावर जास्त भर द्यावा लागेल. मुलांच्या ठायी रोगप्रतिकारक क्षमता वाढवायला लागेल. शाळांमधल्या मध्यान्ह भोजन योजनेतून अधिक कसदार जेवण पुरवायला लागेल. आरोग्यासाठी मुलांच्या खेळाकडे लक्ष द्यायला लागेल. दर्जेदार डिजिटल माहिती आणि भौतिक सुविधांयुक्त शाळा तयार करायला लागतील’’

आपल्या शिक्षणव्यवस्थेला करोनानंतर या सर्व मतप्रवाहांचा विचार नक्कीच करावा लागेल. टाळेबंदीमुळे शिक्षणव्यवस्थेतील उणिवाही अधोरेखित झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता शिक्षणव्यवस्थेतील बदल ही परिस्थितीची गरज आहे.

– अर्जुन नलवडे