lp-09ऑनलाइन ट्रेडिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्ट बघणे, तो वाचता येणे आणि समजणे. अतिशय तीक्ष्ण नजर असली, सतत आणि भरपूर सराव केला तर चार्ट बघता येणे ही अजिबात अवघड गोष्ट नाही. या लेखातून आपण चार्टसंदर्भातली मूलभूत गोष्टी समजून घेणार आहोत.

एके दिवशी रत्नागिरीवरून फोन आला, ‘हॅलो, मी गेल्याच आठवडय़ात एका ब्रोकरकडे शेअर ट्रेडिंगचे खाते उघडले आहे. पण मला चार्ट कसे बघतात आणि त्यात नक्की काय पाहायचे असते ते सांगाल का?’ ही व्यक्ती नुकतीच सेवानिवृत्त झालेली आहे आणि तिला घरी बसून शेअरचे ट्रेडिंग करायचे आहे असे त्यांच्याशी बोलल्यावर कळले. परंतु हे फोनवरून सांगण्यासारखे नाही, आणि ते तुम्हाला कळणारही नाही असे सांगितल्यावर, या विषयावर मराठीत कोणते पुस्तक आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर माझ्या वाचण्यात तरी अजून आलेले नाही आणि काही बोलणे झाल्यावर संभाषण बंद झाले. आणि तेव्हापासून मलाही हाच प्रश्न पडला आहे की मराठीत या विषयावर काही पुस्तके का नाहीत?

हा लेखही चार्ट या विषयाची जुजबी ओळख करून देणाराच आहे, कारण चार्ट हा खूप मोठा विषय इतक्या कमी शब्दांत मांडणे शक्य नाही. पण तरीही आपण आपल्या कामापुरती या विषयाची ओळख करून घेऊ. चार्ट बघण्यासाठी संगणक आणि चांगल्या वेगाचे इंटरनेट कनेक्शन असणे महत्त्वाचे आहे. बाजार चालू असताना चार्ट बघायचे असल्यामुळे इंटरनेटचा वेग हा टू एमबीपीएस किंवा अधिक असल्यास उत्तम.
lp-11
तसेच तुमच्या ब्रोकरने त्यांच्या प्रणालीमध्ये चार्ट उपलब्ध करून दिले असल्यास चांगले पण नसल्यास, गुगलमध्ये इन्व्हे
स्टिंग डॉट कॉम (Investing.com) टाइप केल्यास एनएससी आणि बीएससीवरचे चार्ट हे मार्केट चालू असताना बघता येतात.
चार्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेत शेअरच्या किमतीची शृंखला वा मालिका क्रम संख्याशास्त्रीय पद्धतीने ठरावीक अथवा वेगवेगळ्या कालावधीत नोंद करणे. ज्यांच्या किमतीची माहिती उपलब्ध आहे असे कोणत्याही रोख्यांची ती माहिती वापरून वेगवेगळ्या कालावधी नुसार चार्ट आखता येतात. उदाहरणार्थ २९ फेब्रुवारी २०१६ रोजी निफ्टी ६९८७ ला बंद झाला आणि २० मे २०१६ रोजी ७७४९ ला बंद झाला. या कालावधीत ज्या किमतीच्या पातळीमध्ये निफ्टी फिरत होता त्याची माहिती एनएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध असते, त्याचे संख्याशास्त्रीय पद्धतीने पृथक्करण करून त्या कालावधीचा चार्ट काढू शकता. म्हणजेच ज्या रोख्याच्या किमतीची माहिती उपलब्ध आहे त्याचा चार्ट आलेखन करू शकता.
lp-12
चार्टचे मुख्यत्वे चार प्रकार असतात, लाइन चार्ट, बार चार्ट (OHLC), जापनीज कॅण्डलस्टिक्स आणि एरिया चार्ट. बार चार्ट आणि कॅण्डलस्टिक चार्ट समजून घेण्यास आणि त्याची सवय होण्यास वेळ लागतो. त्या मानाने लाइन चार्ट समजायला थोडा सोपा. चार्टवर कोणत्या गोष्टी प्रामुख्याने बघाल, तर कल (ट्रेंड), मूिव्हग अ‍ॅव्हरेज क्रॉस करतोय का, आधार आणि विरोध पातळी, पॅटर्न, आर एस आय कितीवर आहे आणि एमएसीडी (MACD) कोणत्या घरात आहे.
आकृती एक बघा. आपण या लेखात लाइन चार्टविषयी माहिती घेणार आहोत. प्रत्येक चार्ट प्रकारचा फायदा तोटा असतो तसा लाइन चार्टचापण आहे. यात त्या दिवसाला शेअर कोणत्या किमतीला बंद झाला एवढेच कळते. तो बाजार चालू झाला तेव्हा कोणत्या किमतीला उघडला, दिवसभरात किती उच्चांक-नीचांक गाठला हे कळत नाही. पण त्या शेअरचा कल किंवा दिशा चार्ट बघितल्यावर समजते. तसेच काही सातत्यपूर्ण हालचाली (चार्ट पॅटर्नस्) किंवा एखाद्या किमतीला त्या शेअरची प्रतिक्रिया हे व्यवस्थित कळते. त्याच्या चालीचे ठोकताळे (चार्ट पॅटर्नस्) दिसून येतात. नमुना वैशिष्टय़े आकृती दोन प्रमाणे असतात.
चार्ट कशासाठी वापरावा, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे रोख्यातील किमतीचा बदल कळण्यासाठी चार्टचा उपयोग होतो, तसेच ट्रेडर दररोज बाजारात खरेदी-विक्री करत असतात त्यांना किमतीतील किंवा पातळीतील बदल कळण्यासाठी होतो. याचा फायदा गुंतवणूकदारांना योग्य किमतीच्या पातळीवर गुंतवणूक करण्यासाठी होतो. ते योग्य निर्णय घेऊ शकतात. ज्या गुंतवणूकदारांचा कालावधी सहा महिने अथवा १८ महिने असतो किंवा जे बाजारात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी रक्कम गुंतवतात तेही चार्ट बघून निर्णय घेतात. मोठे म्युच्युअल फंड व्यवस्थापक, मोठय़ा दलाल पेढय़ा यांचे निर्णय चार्ट बघून घेतले जातात. अर्थात चार्ट हा निर्णयातील एक घटक असतो. गुंतवणूक करत असताना इतर बाबीही खूप महत्त्वाच्या असतात, जसे बाजाराचा कल, जागतिक घडामोडी, भारतीय अर्थव्यवस्था इत्यादी.
चार्टमध्ये काय बघाल, प्रथम खरेदी-विक्री अथवा गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करा. तुम्ही शेअर खरेदी करून ३० दिवसांत छोटा नफा घेऊन बाहेर पडणार की सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तो शेअर राखून ठेवणार. ३० पेक्षा कमी दिवसांसाठी गुंतवणूक असेल तर सहा महिन्यांचा रोजचा चार्ट बघा आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दोन वर्षांचा, आठवडय़ाचा आणि नंतर महिन्याचा चार्ट बघा. ज्या शेअरची खरेदी करायची असेल त्याचा वर जाण्याच्या सातत्याचा चार्ट बघा आणि जर वायदामध्ये विक्री करणार असाल तर खाली जाण्याचा सातत्याचा चार्ट (आकृती तीन – ट्रेंड ओळख) बघा.
lp-13
शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा कल बघा. थोडक्यात तो कोणत्या दिशेला जातोय, वर की खाली की नुसताच सरळमार्गी चालतोय. वरची आणि खालची दिशा असेल तर ठीक, पण सरळमार्गी असेल तर एका ठरावीक पातळीत गुंतवणूक अडकून बसेल. आकृती चारमध्ये रिलायन्स इण्डस्ट्रीचा चार्ट बघा.
आकृती चार- (रिलायन्स इंड.) एका पातळीत अडकला आहे. त्याने एक तर वरची पातळी तोडावी किंवा खालची. पण आज आठ वष्रे तो या पातळीत आहे. गुंतवणूकदार खूप निराश आहेत. पण ट्रेडर आहेत. ते यात कमाई करत आहेत.
आकृती तीन बघा. हा निफ्टीचा डेली चार्ट आहे. हिरवी रेषा खालून वरची दिशा दर्शवते आहे तर लाल रेषा ही वरून खालची दिशा. हिरव्या रेषेवर निफ्टीने दोन वेळा त्या रेषेचा आधार घेतला आणि वरच्या दिशेने कूच चालू ठेवली. त्यातील दोन टप्प्यांवर त्याने थोडा श्वास घेतला जो निळ्या रेषेने दाखवला आहे. आणि परत वर जात राहिला. तेच डावीकडे बघाल तर वरच्या पातळी वर विरोध झाल्यावर निफ्टी परत खाली आला पुन्हा वर गेला पण दोन वेळा अवरोधामुळे तिसऱ्यांदा त्याने खालचा आधारही तोडला आणि ६८२५ वर येऊन थांबला. म्हणजेच त्याने वर जाण्यास अवरोध झाल्यामुळे पातळीतून बाहेर पडला. त्यानंतर त्याचा प्रवास वरच्या दिशेने चालू झाला तो ७९९२ पर्यंत. ११६७ अंकाने खालून वधारला. या खालच्या आधारावर कोणी निफ्टीचा वायदा खरेदी केला असेल ते निफ्टीने जेव्हा हिरवी रेषा वरती तोडली असेल तेव्हा विकला असेल. कारण तिथून तो सरळमार्गी झाला. यालाच म्हणतात शेअरची दिशा ओळखणे.
lp-14
एकदा दिशा ओळखली की, त्याची आधार पातळी आणि अवरोध पातळी कळायला सोपे जाते. आता मुख्य मुद्दा योग्य किमतीला शेअर घेणे. त्यासाठी आकृती दोन पाहा. शेअर एखादी पातळी तोडून वर किंवा खाली जातो ती किंमत विकत घेण्यासाठी योग्य. अर्थात तुमचा गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करून विकत घेणे. हे तितकेही सोपे नाही पण पेपरवर सहा-आठ महिने सराव केलात तर हळूहळू जमेल. पण अजूनही काही बघायचे बाकी आहे, नुसते पातळी तोडून खाली आणि वर जाणे म्हणून शेअर घ्यायचा नाही. त्यासाठी अजून काही गोष्टी चार्टवर लावाव्या लागतात, मूिव्हग अ‍ॅव्हरेज म्हणजे चलत सरासरी.
lp-17
चलत किंवा दिवसाची सरासरी म्हणजे एखाद्या शेअरची सरासरी बंद किंमत ठरावीक दिवसांच्या कालावधीत काय होती ते दाखवतो. जसे ५, ७, १०, १५, २०, ५०, १००, २०० दिवसाच्या बंद किमतीची सरासरी दर्शवतो. ज्यांचा गुंतवणुकीचा कालावधी सहा महिने किंवा एक वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांनी ५०, १००, २०० दिवसांचा चलत सरासरी बघावा. ज्यांचा गुंतवणुकीचा कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी असेल त्यांनी ५, १०, २०, ५० दिवसांचा चलत सरासरी पाहावा. आकृती पाच बघा यात निळी रेषा पाच, तर लाल रेषा दहा दिवसांचा अ‍ॅव्हरेज दाखवला आहे.
हा टाटा मोटर्सचा चार्ट आहे. यावर ५ आणि १० दिवसाचा चलत सरासरी लावला आहे. आकृती दोनमधील अ‍ॅसेिन्डग ट्रॅन्गल हा नमुना बघा, तोच इथे आपल्याला पाहायला मिळतो. चार्टवर जिथे खरेदीचा बाण दाखवला आहे तिथून विरोधाला तोडून रेषेबाहेर गेला आणि त्याच्या खाली पाच दिवसांच्या लाल रेषेने दहा दिवसाची निळी चलत सरासरी रेषा खालून वरच्या दिशेने ओलांडली आहे. हे तुमच्या खरेदी च्या निर्णयाला पुष्टी देते. तुम्ही ३२० ला खरेदी केलात. शेअरने जो तळ गाठला होता त्यानंतर त्याने वरच्या दिशेने जाताना प्रत्येक वेळेला खालचा तळ परत गाठला नाही. याचा अर्थ शेअरची दिशा वरची होती. आता चार्टवर डाव्या बाजूला वरती दोन तुटक लाल रेषा दिसत आहेत. त्या किमतीला शेअरला विरोध आहे. तुम्ही वाट बघितली शेअरने दोन्ही लाल तुटक रेषा ओलांडल्या नाहीत. आणि शेवटचा तळ तोडून खाली आला आणि तुम्ही तो ४११ला विकून टाकला. तुमच्या याही निर्णयाची पुष्टी चलत सरासरीने केली जेव्हा दहा दिवसाच्या चलत सरासरी निळ्या रेषेने पाच दिवसाची लाल रेषा वरून खालच्या दिशेने ओलांडली. आणि बघा तुमचा निर्णय योग्य होता. तुम्ही हा शेअर बाजाराच्या कामकाजाच्या ३५ दिवस खात्यात ठेवला होता. ३५ दिवसात २८.४३ टक्के नफा मिळवलात. हा या साध्या चलत सरासरीचा फायदा आहे. हा डेली चार्ट आहे. पण जर तुम्हाला ५, १०, १५, ३०, ६० मिनिटांचा चार्ट बघायचा असेल तर त्या कालावधी मध्ये बदल करा. चार्टच्या वरच्या बाजूला एक टूल बार दिसतो त्यातून हे बदल करता येतात. ट्रेंड लाइन, मूिव्हग अ‍ॅव्हरेज हे डेली चार्ट वर सेट करून ठेवले की जरी त्याचा कालावधी बदलला तरी चार्ट वरील रेखांकन तशीच राहतात.
lp-16
आकृती पाचमधील चार्टवर खालील बाजूला लाल आणि हिरव्या उभ्या पट्टय़ा दिसत आहेत, त्या दिवशी त्या शेअरमध्ये एकूण किती व्यवहार झाला ते दर्शवतात. हिरव्या पट्टय़ा अर्थातच खरेदी तर लाल विक्री दर्शवतात. त्याला व्हॉल्यूम म्हणतात. ज्या शेअरमध्ये व्हॉल्यूम जितका जास्त तितकी तरलता जास्त आणि ज्यात व्हॉल्यूम जितका कमी तितकी तरलता कमी. कमी तरलता असलेल्या शेअर मध्ये ट्रेिडग करू नये, आणि गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी.
काही शेअर्स हे सरळ मार्गात चालत असतात. एक तर ते जास्त काळ वरच्या किंवा खालच्या ट्रेंडमधून निघून एका किमतीला पाया रचत असतात आणि मग पुन्हा दिशा पकडतात. पाया बनवण्याची क्रिया आणि कालावधी कितीही काळ असू शकतो. तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूकदार असाल तर ठीक आहे, नाही तर तुमच्या सहनशीलतेची परीक्षा असते. खालील काही चार्ट पॅटर्न बघू या.
कोणत्याही शेअरचा आधार आणि विरोध पातळी महत्त्वाची असते. शेअरची किंमत एखादी विशिष्ट पातळी तोडून खाली जात नसेल त्याला त्या शेअरची आधार पातळी (Support) म्हणतात. आणि जर शेअर एखादी विशिष्ट किमतीची पातळी तोडून वर जात नसेल तर त्याला विरोध (Resistance) म्हणतात. आकृती सहा बघा.
lp-15
आकृती क्र. आठ हा एलआयसी हौसिंगचा चार्ट आहे. हिरवा पट्टा ही आधार पातळी आहे. या पट्टय़ात शेअर आला की खरेदी करायचा. आणि वरच्या लाल पट्टय़ाला विरोध पातळी म्हणतात. या पातळीत तो विकावा. या पातळीतील अंतर जेवढे जास्त तेवढा फायदा जास्त. पण कधी कधी ही आधार किंवा विरोध पातळी तोडली जाते, यासाठी खरेदी केल्यावर लगेच स्टॉपलॉस (Stop Loss) लावावा. स्टॉपलॉस कसा लावतात हे वरती टाटा मोटर्सच्या चार्टमध्ये दाखवले आहे.
वरील माहितीत तुम्ही ट्रेंड, मूव्हिंग अ‍ॅव्हरेज, आधार आणि विरोध, पॅटर्नस बघितले. आता आरएसआय (RSI) आणि एमएसीडी (MACD) समजून घेऊ. आकृती नऊ पाहा
आकृती नऊ – (आरएसआय आणि एमएसीडी)
आरएसआय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (Relative Strength Index) हा एक टेक्निकल मूव्हमेंट दर्शक आहे. शेअरच्या वर्तमान स्थितीतील किमतीत नफा आणि नुकसानीत किती बळ आहे ते तो दाखवतो. चार्टमध्ये सगळ्यात खाली हा दर्शक दिसतोय. याचे शून्य ते १०० असे मापन असते. आणि त्यात ३० ते ७० या दोन्ही पातळींच्या बाहेर शेअरची किंमत असेल तर अति खरेदी अथवा अति विक्री शेअरमध्ये झाली असे मानले जाते. ३० च्या खाली शेअरचा भाव आला की अतिविक्री आणि ७०च्या वरती भाव गेला की अतिखरेदी झाली असे मानले जाते. चांगला शेअर ३० च्या पातळीवर आला की खरेदी करणे योग्य आणि ७० किंवा त्यावरील पातळीवर विक्री करणे हे फायद्याचे मानले जाते.
lp-18

एमएसीडी हा शेअरच्या दिशेचा पाठलाग करीत असतो. दोन मूव्हिंग अ‍ॅव्हरेजचे शेअरच्या किमतीबरोबर दुवा सांधण्याचे काम करतो. २६ आणि १२ दिवसांच्या जलद मूव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या किमतीशी असलेली जवळीक दाखवतो. जशी चार्टवरील किमतीची निळी रेषा वरवर जाते तसे एमएसीडी त्या किमतीचा पाठलाग करतो. यात +१०० हे उच्च आणि -१०० हे नीच मापन असते आणि मध्ये शून्य रेषा असते. शून्य ते +१०० हे सकारात्मक तर शून्य ते -१०० हे नकारात्मकता दर्शवते. आपण शेअर शून्य ते -१०० नकारात्मक ठिकाणी खरेदी केला होता त्याला कारण होते आरएसआय ३० च्या वर आला होता. चार्टवर दुहेरी आधार तळ होऊन किमतीची रेषा वरील दिशेने जात होती, त्यात जोर होता. म्हणून तो खरेदी केला. विक्रीच्या वेळीही आरएसआय ८० च्या पातळीवर होता, एमएसीडी +१०० या सकारात्मक पातळीवर होता. पण सकारात्मक असले तरी ती सर्वोच्च पातळी समजली जाते. तिथे क्रॉस झाला. आणि व्हॉल्यूम कमी झाला. इथे मूव्हिंग अ‍ॅव्हरेज एकदम जवळ आले आहेत. या सगळ्या गोष्टी विक्रीसाठी जुळून आल्या. चार्टवर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या असतात हे आपण पाहिले.
चार्ट पाहणे ही एक कला आहे. एखादे चित्र पाहताना त्यातील विषय, भावना, इत्यादी स्वभाव कळतात. तसेच चार्टचे आहे. चार्ट तुम्हाला सगळी सूचना देत असतो. त्यासाठी नजर तीक्ष्ण असणे गरजेचे आहे. पण त्यासाठी खूप सराव करावा लागतो. खूप वेळ द्यावा लागतो, तेव्हा हळूहळू चार्ट कळायला लागतात. लाइन चार्टवर चांगला सराव झाला की इतर चार्टचे प्रकार कळायला वेळ लागणार नाही. हा एक निरंतर चालणारा अभ्यास आहे. संदर्भासाठी खालील पुस्तके आणि वेबसाइट बघा.
पुस्तके :
१) The Psychology of Technical Analysis By Tony Plummer
२) Charting Made Easy by John Murphy.
वेबसाईट :
१) Topstockresearch.com
२) Thepatternsite.com
३) चार्टवर आधारित छान खेळ. सराव करता करता शिकता येते. http://chartmantra.economictimes.indiatimes.com/GameBoard.htm
(लेखक शेअर बाजार विश्लेषक/ टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि गुंतवणूक सल्लागार आहेत).

मिलिंद अंध्रुटकर – response.lokprabha@expressindia.com