तरुण दिग्दर्शकांच्या लघुपटांचा ‘दर्पण’ हा छोटेखानी महोत्सव नुकताच मुंबईत झाला. या महोत्सवातून सादर झालेल्या लघुपटांमधून आजची तरुण पिढी काय आणि कसा विचार करते हे प्रतिबिंबित झाले.
पाच वेगळे विषय, तीन दिग्दर्शक आणि लघुपटाचे तीन वेगळे प्रकार असलेला दर्पण हा लघुचित्रपटांचा छोटेखानी महोत्सव नुकताच दादरच्या अमर हिंद मंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
‘फेस ऑफ श्ॉडो’, ‘अर्पण’, ‘एनएच १७’, ‘द हिडन वर्ल्ड’ आणि ‘पैसा वसूल’ हे पाच लघुपट या महोत्सवात दाखवण्यात आले. मकरंद सावंत, विक्रांत वाडकर आणि सिद्धेश सावंत या तीन तरुण युवा दिग्दर्शकांनी तयार केलेले हे लघुचित्रपट वेगळ्या सामाजिक विषयांना हात घालणारे आहेत. यातील तीन चित्रपट हे लघुचित्रपट या प्रकारात मोडणारे असून एक माहितीपट आणि एक टॉकेटिव्ह एवी आहे. एखादा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चलचित्र हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. आपल्याकडे मोठा पडदा अथवा टीव्हीच्या माध्यमातून अनेक विषय लोकांपर्यंत पोहोचवले जातात, परंतु चांगली बाब म्हणजे लघुपट हा प्रकारही अलीकडच्या काळात अधिक पॉप्युलर होत असून जनसामान्यांनाही त्याची भुरळ पडताना दिसत आहे, हेदेखील यानिमित्ताने समोर आले. विषय कोणताही असो, तो आहे तसा का मांडू नये? गरज नसताना विषयाची मांडणी किचकट का करायची? आणि लघुपटासाठी पैसेच सर्व काही नसून तो विषय महत्त्वाचा आहे, हे या पाचही लघुपटांमधून दिसून आले.
रशियन लेखक अॅन्थन चेकाव यांच्या कथेवर आधारित ‘पैसा वसूल’ हा लघुपट मानवी स्वभावाचं आणि जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीचं एक भयाण वास्तव आपल्यासमोर मांडतो. समुद्रात बुडणाऱ्या माणसाचं मरण एखाद्यासाठी कसा मनोरंजनाचा विषय असू शकतो यापासून सुरू झालेला हा लघुपट उत्तरार्धात मात्र अस्वस्थ करतो. बंगळुरू येथील एका महोत्सवात हा चित्रपट जेव्हा दाखवला गेला, तेव्हा या मालवणी चित्रपटाची मांडणी आणि संगीत याचं खूप कौतुक झालं. सध्या चित्रपटाच्या रशियन भाषेतील सबटायटल्सचं काम सुरू असून येत्या काही महिन्यांत सेंटर ऑफ रशियन सायन्स अँड कल्चरतर्फे रशियातही दाखविण्यात येणार आहे. तसेच जर्मनी, अबुधाबी आणि दुबईला प्रदर्शित होणार आहे.
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी एनएच १७ हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय उत्तम पर्याय आहे, मात्र त्या महामार्गाची झालेली दुर्दशा हा चिंतेचा विषय झाला आहे. कोकणचं निसर्गवैभव अनुभवत गाडी हाकताना येणारी मजा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रासदायक करून टाकते. लाखो मुंबई आणि कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय माहितीपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. दरम्यान, फक्त सरकारला दोष न देता या महामार्गावरील अपघातांची संख्या लक्षात घेता लोकांनीही कशा प्रकारे जबाबदारीने वागले पाहिजे, हेदेखील हा माहितीपट अधोरेखित करतो.
‘फेस ऑफ श्ॉडो’ हा चित्रपट जगभर सारख्याच भेडसावणाऱ्या जात आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेवर भाष्य करतो. प्रत्येक माणसाला ज्याप्रमाणे वेगळा चेहरा असतो तसा तो सावल्यांना मात्र नसतो. माणसाच्या बाह्य़रूपावरून अनेक आडाखे बांधले जाऊन चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याचा फटका एखाद्या निरपराध व्यक्तीला बसतो; पण जोपर्यंत ती चूक लक्षात येते, तेव्हा अनर्थ होऊन गेलेला असतो. धार्मिक हिंसेच्या बाबतीत हे कशा प्रकारे लागू होते हे विशिष्ट पद्धतीने केलेली प्रकाशयोजना आणि मोजक्या संवादांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
‘द हिडन वर्ल्ड’ ही टॉकेटिव्ह एवी आपल्या सर्वाच्याच मनाला ‘का?’ हा प्रश्न पडायला भाग पाडते. मुलगा असो वा मुलगी, एका विशिष्ट वयात पॉर्न चित्रपटाबद्दल सर्वाच्याच मनात आकर्षण असतं, पण संस्कृती आणि रूढी-परंपरांच्या जोखडात अडकलेल्या आपल्या समाजात या विषयावर बोलणं हे शिष्टसंमत मानलं जात नाही. या विषयावर कोणतंही ठोस भाष्य न करता, तरुण आणि प्रौढांशी बोलून हा विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांनी आणि मुलींनी मोकळेपणाने व्यक्त केलेली मतं ही टॉकेटिव्ह एवी मजा आणते.
भारतीय संस्कृतीमध्ये मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून काही तरी दान करायची पद्धत आहे. त्यामध्ये डोक्यावरील केसांपासून ते अन्नापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो, पण मृत शरीरामधील अवयव दान करण्याबाबत फार कमी प्रमाणात जागरूकता दिसते. हाच विषय ‘अर्पण’ या लघुपटातून मांडण्यात आला आहे. अशा विषयांवर माहितीपट तयार केला तर लोकांना तो प्रबोधनपट वाटतो, परंतु हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला कथेची जोड देण्यात आली आहे आणि लघुपटाच्या मांडणीतून तो अपेक्षित परिणाम साधतो हे विशेष.
आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवून कशा प्रकारे मांडता येऊ शकते याचे दर्पण हा महोत्सव हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. म्हणून लोकांच्या पसंतीस उतरणाऱ्या या लघुपटांची दखल पुरस्कारांनीही घेतल्याचे दिसते. किंग्स मोशन पिक्चर्सतर्फे सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ या चार महिन्यांच्या काळात या पाच लघुपटांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत सर्व लघुपटांचं आठ ते दहा ठिकाणी स्क्रीनिंग झालं आहे. केवळ फेस्टिव्हलची वारी करत न बसता, अनेक शाळा आणि सामाजिक संस्थांमध्ये हे लघुपट दाखवले गेले आहेत, हा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे तर आता या लघुपटांना महाराष्ट्र आणि देशातील विविध भागांमधून स्क्रीनिंगसाठी आमंत्रण मिळत आहे.
मकरंद सावंत – एखादा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर लघुपट हे प्रभावी माध्यम आहे. कमीत कमी पैशात आणि कुठल्याही मोठय़ा स्टार्सशिवाय एखादा विषय मर्यादित वेळेत मांडण्याचं स्वातंत्र्य हे माध्यम तुम्हाला देतं.
सिद्धेश सावंत – अनेक समस्या आपल्या आजूबाजूला असतात, पण ती समस्या आहे हे आपल्या लक्षात येत नाही. एन.एच.१७ हा विषयही त्याच पठडीतला. तर काही विषय आपण मुद्दामहून बोलायचे टाळतो. ते का टाळतो, त्याचं उत्तर ‘द हिडन वर्ल्ड’मधून मिळतं. दोन्हीसाठी वेगळे फॉर्म वापरून तो विषय अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे.
विक्रांत वाडकर – मला जागतिक विषयावर भाष्य करणारा लघुपट तयार करायचा होता, म्हणूनच धर्म आणि जातीच्या नावाने जगात होणारी िहसा हा विषय मी त्यासाठी निवडला. सुरुवातीला हा विषय करताना अनेकांनी हा विषय गुळगुळीत झाल्याचे सांगितले, पण अलीकडे मुंबईतील लालबाग परिसरात जेव्हा धार्मिक गोष्टीवरून तणाव निर्माण झाला, तेव्हा या विषयाचं महत्त्व आणि त्यावरील भाष्य सर्वाना मान्य करावं लागलं.
एन.एच.१७ (माहितीपट)
दिग्दर्शक, लेखक – सिद्धेश सावंत
* बेळगाव लघुपट महोत्सव २०१५ साठी निवड.
* आयकॉनक्लास्ट लघुपट महोत्सव २०१५, नवी मुंबईसाठी निवड.
द हिडन वर्ल्ड (माहितीपट)
दिग्दर्शक, लेखक – सिद्धेश सावंत
* बेळगाव लघुपट महोत्सव २०१५ साठी निवड.
अर्पण
दिग्दर्शक – मकरंद सावंत
लेखक – मकरंद सावंत आणि आशुतोष मिश्रा
* बेळगाव लघुपट महोत्सव २०१५ साठी निवड.
* डीसीएस लघुपट महोत्सव २०१५, पुणेसाठी निवड.
* उत्तेजनार्थ पारितोषिक – आयकॉनक्लास्ट लघुपट महोत्सव २०१५, नवी मुंबई.
फेस ऑफ श्ॉडो
दिग्दर्शक – विक्रांत वाडकर
लेखक – अमित राहंगडाले आणि विक्रांत वाडकर
* बेळगाव लघुपट महोत्सव २०१५ साठी निवड.
* आयकॉनक्लास्ट लघुपट महोत्सव २०१५, नवी मुंबईसाठी निवड.
पैसा वसूल
दिग्दर्शक – मकरंद सावंत
मूळ संकल्पना – अॅन्थन चेकाव
मराठी रूपांतर – अद्वैत दादरकर आणि इरावती कर्णिक
* बेळगाव लघुपट महोत्सव २०१५ साठी निवड.
* रंजन्स इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०१५, बंगलोरमध्ये प्रथम क्रमांकाचा डॉ. आर. राजकुमार पुरस्कार.
* मुंबई विद्यापीठात रशियन विभागातर्फे आयोजित ‘रीडिंग अँड अंडरस्टॅन्डिंग अॅन्थन चेकाव’ या विषयावर आयोजित सेमिनारसाठी आमंत्रण आणि प्रदर्शन.
प्रशांत ननावरे