कव्हरस्टोरी
बॅडमिंटनच्या कोर्टवरील तिचं पदलालित्य देखणं होतंच, पण त्याहीपेक्षा सफाईनं तिची पावलं फॅशन शोमधल्या रॅम्पवर पडली. एकामागोमाग एक फॅशन शो गाजवत तिने ‘ग्लॅमरस मॉडेल ऑफ द इयर’चं बिरुदही पटकावलं. दीपिका पडुकोण हिंदी चित्रपटसृष्टीत आली आणि पहिल्याच चित्रपटात तिला पाहून घायाळ झालेल्यांची संख्या कोटींच्या घरात पोहोचली. मधल्या काळात तिचे चित्रपट डब्यात गेले, पण दीपिका डगमगली नाही.. सरत्या वर्षांतील सर्वात जास्त लोकप्रिय आणि गाजलेली अभिनेत्री ठरलेल्या दीपिकाने आपलं वर्चस्व निर्विवाद सिद्ध केलं आहे. पण बॅडमिंटन कोर्टवर पराक्रम गाजवणारी एक खेळाडू ते झगमगत्या दुनियेतल्या जीवघेण्या स्पर्धेला सामोरं जात स्टारडम मिळवलेली अभिनेत्री हा प्रवास दीपिकासाठी नक्कीच सोपा नव्हता..
हिंदी चित्रपटसृष्टीमधील आत्ताची टॉप हिरॉइन कोण, असा प्रश्न विचारला तर सोनाक्षी सिन्हापासून कतरिना कैफपर्यंत अनेक नावं समोर येतील. कोणी सोनाक्षीने दिलेल्या एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची यादी तोंडावर फेकेल, तर कोणी कतरिना कैफच्या प्रसिद्धीचा दाखला देईल, कोणी प्रियांका चोप्राच्या ‘बर्फी’मधल्या भूमिकेची तोंड फाटेस्तोवर तारीफ करेल, तर कोणी करिना कपूरच्या झीरो फिगरचे गोडवे गाईल. ही चर्चा सुरू होऊन तात्पर्याच्या टप्प्यावर येताना अचानक एक नाव आठवेल, दीपिका पडुकोण! मग चर्चेतली मंडळी स्वत:शीच चुटपुटत म्हणतील, ‘अरेच्चा, ही तर राहिलीच की!’ दीपिका पडुकोणचं यश नेमकं त्यातच आहे. पण असं काय आहे दीपिकामध्ये की, सगळ्या तारकांबद्दल बोलून संपलं, तरी दीपिका त्यांच्या एक दशांगुळे जास्त उरतेच? वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये नाव गाजत असतानाही तो खेळ सोडून मॉडेलिंग आणि बॉलीवूड या ग्लॅमरच्या अस्थिर विश्वात पाऊल टाकण्याचा निर्णय घेण्याचे धाडस? की हा निर्णय घेतल्यानंतर पद्धतशीरपणे त्या दृष्टीने वाटचाल करताना तिने केलेली आपल्या करिअरची आखणी? की करिअरमधील दोन र्वष फ्लॉप चित्रपटांचा टॅग मागे लागूनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेपावायची तिची ताकद? थोडंसं खोलात जाऊन विचार केला, तर हे रसायन काही वेगळंच असल्याचं जाणवतं.

कतरिना किंवा करिनासारखी ती रंगानं गोरी नाही. पण तिच्या सावळेपणात मेंगळुरी मातीचा गंध पुरेपूर उतरला आहे. त्यात तिच्या गालांवर पडणाऱ्या खळ्या तर भरती आलेल्या समुद्राच्या लाटांची आठवण करून देणाऱ्या!

समृद्ध वारसा
दीपिका पडुकोणचा जन्म भारतातला नाही. ती जन्मली ती डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगन शहरात! पण तिचं कुटुंब मूळचं भारतातलं. मेंगळूरजवळच्या उडुपी जिल्ह्य़ातलं. मेंगळूर हा प्रांत निसर्गसौंदर्यासाठी भलताच प्रसिद्ध आहे. माड-पोफळीच्या बागा, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा, माडाच्या बागांमधून डोकावणारी लालचुटूक मेंगळुरी कौलांची घरं.. हा सगळा निसर्ग दीपिकाच्या सौंदर्यात पुरेपूर उतरला आहे. कतरिना किंवा करिनासारखी ती रंगानं गोरी नाही. पण तिच्या सावळेपणात मेंगळुरी मातीचा गंध पुरेपूर उतरला आहे. त्यात तिच्या गालांवर पडणाऱ्या खळ्या तर भरती आलेल्या समुद्राच्या लाटांची आठवण करून देणाऱ्या! दीपिकाची उंचीही मेंगळूरमधल्या माडाच्या झाडांसारखीच. या प्रांताने दीपिकाच्या ‘असण्यात’ फार मोलाची भर घातली.
दीपिका एक वर्षांची असताना तिचं कुटुंब कोपनहेगनवरून बंगळुरूला आलं. तिचं शालेय आणि पुढील शिक्षण बंगळुरूमध्येच झालं. तिचे वडील म्हणजेच प्रकाश पडुकोण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले बॅडमिंटनपटू. त्यांच्याकडूनच धडे घेत दीपिकानेही शालेय जीवनापासूनच बॅडमिंटनचं कोर्ट आपलंसं केलं. त्या वेळच्या आपल्या दैनंदिन वेळेबद्दल दीपिकानेच लिहून ठेवलं आहे-
‘‘दिवस भल्या पहाटे पाच वाजताच सुरू व्हायचा. त्यानंतर खडतर शारीरिक प्रशिक्षण होतं. यात धावण्यापासून सगळेच व्यायाम करावे लागायचे. मग आवरून शाळेत जायचं. शाळेतून घरी आलं की तडक बॅडमिंटन कोर्टवर धाव घ्यायची. तीन-चार तास खच्चून सराव केल्याशिवाय तिथून सुटका नसायची. मग घरी येईपर्यंत मी पार थकून जायचे. घरी येऊन जेवून थेट झोपायला गेल्यावर माझा दिवस संपलेला असायचा.’’
तिच्या या व्यग्र दिवसांमुळे तिला लहानपणी फारसे मित्रमैत्रिणी नव्हते. त्या अर्थाने ती एकलकोंडीच होती. पण या खडतर प्रशिक्षणाचा फायदा दीपिकाला आता होत आहे. त्याही वेळी तो झाला. शालेय जीवनात बॅडमिंटन कोर्ट गाजवणाऱ्या दीपिकाने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्येही आपली चमक दाखवली.

‘ये जवानी है दिवानी’  या चित्रपटात तिचा हिरो होता रणबीर कपूर! या दोघांचंही ब्रेकअप होऊन चार र्वष उलटून गेली होती. पण दोघांनीही एकमेकांसमोर येत अत्यंत उमद्या पद्धतीने या चित्रपटातील भूमिका साकारली.

बॅडमिंटन कोर्ट ते रॅम्प
दीपिकाच्या आयुष्यातील हा टप्पाही खूप मजेशीर आणि त्याच वेळी खूप गंभीरही आहे. दीपिका बॅडमिंटन कोर्टवर उत्तम कामगिरी करत होती. राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धामध्ये तिचं नाव चमकत होतं. वडील स्वत: भारतातील पहिले बॅडमिंटन स्टार असल्याने साहजिकच दीपिकाकडून स्पोर्ट्स जगताच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. मात्र दीपिकाला मॉडेलिंगचं विश्व खुणावत होतं. तिच्याच शब्दात सांगायचं तर,
‘‘बॅडमिंटन हे माझ्या रक्तात होतं. या खेळात माझे आजोबा आणि वडील दोघेही होते. परंपरेने घरात चालत आलेला खेळ असल्याने लहानपणापासून मीदेखील त्यात ओढले गेले. बॅडमिंटन मला आवडतं, यात काही वादच नाही. पण दहावीत वगैरे असताना मला मॉडेलिंगचं विश्व खुणावू लागलं. शाळेत असताना मी काही फॅशन शोजमध्ये वगैरे भाग घेतला होता. पण एक दिवस मी वडिलांना सांगितलं की, मला बॅडमिंटन पुढे खेळायचं नाही. त्याऐवजी मला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आहे.’’
दीपिकाचं नशीब एवढं चांगलं की, तिच्या वडिलांनी म्हणजेच प्रकाश पडुकोण यांनी कोणतीही खळखळ न करता तिला तिचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. निर्णय घेणं जेवढं सोपं होतं, तेवढाच तो अमलात आणणं कठीण होतं. झगमगत्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी लाखोंच्या उडय़ा पडण्याचा तो काळ होता. आजही आहे. पण त्या वेळी संधीही फारशा उपलब्ध नव्हत्या. दीपिकाने वयाच्या आठव्या वर्षी लिरिल वगैरे साबणांच्या जाहिराती केल्या होत्या. पण तेवढं पुरेसं नव्हतं. या क्षेत्रात पुढे येण्यासाठी मग तिला प्रसाद बिडापा यांचं मार्गदर्शन मिळालं. रॅम्पवरची सर्वात मोठी संधी तिच्याकडे चालून आली ती २००५मध्ये. या वर्षी डिझायनर सुनीत वर्माची मॉडेल म्हणून तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेतला आणि त्या वर्षीचा ‘मॉडेल ऑफ द इयर’ आणि ‘किंगफिशर फॅशन अ‍ॅवॉर्ड’ असे दोन पुरस्कार स्वत:च्या नावावर केले. त्यानंतर दीपिकाने मागे वळून पाहिलंच नाही. २००६मध्ये किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकत तिने या क्षेत्रात आपलं स्थान आणखी भक्कम केलं. पुढला टप्पा अर्थातच बॉलीवूड होता. पण तिथे पाऊल ठेवतानाही तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक चित्रपट स्वीकारत आपण तयार असल्याचं दाखवलं. २००७मध्ये ‘ओम शांती ओम’ या बडय़ा चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं. कशामुळे? तिच्या बिनधास्त, बेधडक आणि तरीही संयमी वागण्यामुळे!
बिनधास्त दीपिका
आजच्या तरुणाईला भावतो तो दीपिकाचा बिनधास्तपणा! हा बिनधास्तपणा तिच्यात बहुतेक खेळातून आला असावा. लहानपणी मित्रमैत्रिणींच्या गराडय़ात राहण्याची सवय नसलेल्या दीपिकाला सध्या तिच्याभोवती असलेला गराडा बघून थोडं गोंधळायला होतं. पण तरीही ती बिनधास्तपणे सगळ्याला सामोरी जाते. तिच्या या बिनधास्तपणाची झलक बघायला मिळाली ती, तिचं आणि रणबीर कपूरचं अफेअर चालू होतं तेव्हा! दोघंही चित्रपटसृष्टीतले उभरते कलाकार असल्याने साहजिकच प्रसारमाध्यमांपासून सगळ्यांनीच त्यांचा पिच्छा पुरवला होता. पण दीपिकाची कमाल म्हणजे तिने, ‘वुई आर जस्ट फ्रेंड्स’ हे साचेबद्ध उत्तर न देता प्रसारमाध्यमांना अगदी रीतसर मुलाखती देत ठामपणे रणबीर व आपण एकत्र असल्याचं कबूल करून टाकलं. ‘सावरियाँ’चं अपयश पचवून पुढे वाटचाल करणारा रणबीर आणि पहिल्याच चित्रपटात धडाकेबाज यश मिळवल्यानंतर फारशी यशस्वी न ठरलेली दीपिका हा त्या वेळी प्रसारमाध्यमांचा आवडता विषय होता. या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती,
‘‘प्रेमात पडणं ही भावनाच किती सुंदर आहे. रणबीर माझी खूप काळजी घेतो. त्याच्या घरच्यांबद्दल तर बोलायलाच नको. ऋषी अंकल आणि नीतू ऑण्टी हे दोघंही माझ्यासारखेच खादाड आहेत. त्यामुळे तर मला त्यांच्या घरी अगदी घरच्यासारखंच वाटतं. खाणं हा आम्हाला जोडणारा दुवा आहे. आपापल्या व्यग्र वेळापत्रकांतून वेळ काढत मी आणि रणबीर एकमेकांना भेटत असतो. प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नाही, तेव्हाही आम्हाला एकमेकांची काळजी वाटत असते. हे खूपच छान आहे.’’
पण वर्षभरातच या दोघांमध्ये बेबनाव सुरू झाला आणि प्रसारमाध्यमांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं. तेव्हाही दीपिकाने आपल्या बिनधास्त स्वभावानुसार थेट मुलाखत देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्या वेळी ती म्हणाली होती की, माणूस एकदा चुकू शकतो. एकदा चुकला तर त्याला संधीही दिली जाऊ शकते. पण तीच चूक वारंवार केली, तर मात्र मी सहन करू शकत नाही. रणबीरनं मला फसवलं आहे आणि त्याचा मला खूप जास्त त्रास होत आहे. रणबीरनं हे आरोप आधी फेटाळून लावले होते. मात्र नंतर त्यानेही आपली चूक असल्याचं कबूल केलं.
दीपिकाचा बिनधास्तपणा अगदीच उघडपणे दिसला, तो आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान! त्या वेळी तिचं आणि सिद्धार्थ मल्ल्याचं प्रकरण जोरदार चालू असल्याची चर्चा होती. दोघंही आपापल्या परीनं, असं काहीच नाही, हे सांगत फिरत होतं. पण आयपीएलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकल्यानंतर दीपिका आणि सिद्धार्थने एकमेकांना दिलेला किस अजूनही सगळ्यांच्या लक्षात असेल. पण त्यातही दीपिकाने कुठेही लपवाछपवी केली नाही. आजच्या तरुणाईला तिचा हा बिनधास्तपणा आवडला नसता तरच नवल!
खिलाडूवृत्ती
दीपिकामध्ये खिलाडूवृत्ती आणि जिंकण्याची जिद्द हे दोन गुण पुरेपूर उतरले आहेत. ही तिच्या बॅडमिंटनमधील छोटेखानी कारकिर्दीची कृपा! तिच्यातली ही खिलाडूवृत्ती प्रत्येक वेळी दिसून आली. २०१० आणि २०११ ही दोन्ही र्वष दीपिकासाठी अत्यंत वाईट होती. तिने स्वीकारलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटी खात होता. २००९मध्ये रणबीरबरोबर प्रकरण फिस्कटल्यानंतर दीपिका खूपच नव्‍‌र्हस झाली होती. त्यातच या दोन वर्षांत व्यावसायिक अपयशाचा सामना करावा लागल्याने कोणाच्याही मनोबलावर परिणाम झाला असता. दरम्यान, तिचं आणि सिद्धार्थ मल्ल्याचं प्रकरण जोरदार चालू असल्याच्या बातम्या फिरत होत्या. पण २०१२ मध्ये त्या दोघांमध्येही काहीतरी बिनसल्याचं पुढे आलं. दीपिकासाठी हा खूप कठीण काळ होता. पण वडिलांकडून आणि नंतर स्वत: खडतर प्रशिक्षणातून कमावलेल्या जिंकण्याच्या ईर्षेने दीपिकाने या सगळ्यांवर मात केली. व्यावसायिक अपयश तर तिने अगदीच खिलाडूवृत्तीने पचवलं. तुमचा प्रत्येक चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकत नाही. मात्र मी स्वीकारलेले चित्रपट मला स्वत:ला आवडले होते. एक अभिनेत्री म्हणून मला त्यात खूप वाव होता. म्हणूनच मी ते स्वीकारले. त्यांच्या व्यावसायिक यशाचा किंवा अपयशाचा विचार मी केला नव्हता. यापैकी प्रत्येक चित्रपट एक अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणूनही मला समृद्ध करून गेला, असं तिने स्वत:च सांगितलं.
पण वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यांमध्ये आपटी खाणाऱ्या दीपिकाने २०१३ या एका वर्षांत व्यावसायिक अपयश साफ धुवून काढलं. त्या वेळी तिच्यातील लढाऊ वृत्ती जगासमोर आली. ‘कॉकटेल’पासून सुरू झालेला हा सिलसिला ‘ये जवानी है दिवानी’ आणि नंतर ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांपर्यंत कायम राहिला आहे. तिच्यातल्या खिलाडूवृत्तीचं दर्शनही या वर्षांत घडलं. ते म्हणजे ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटादरम्यान. या चित्रपटात तिचा हिरो होता रणबीर कपूर! या दोघांचंही ब्रेकअप होऊन चार र्वष उलटून गेली होती. पण दोघांनीही एकमेकांसमोर येत अत्यंत उमद्या पद्धतीने या चित्रपटातील भूमिका साकारली. एवढंच नाही, तर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही एकत्र सगळीकडे वावरले आणि आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत, आम्हाला एकमेकांबरोबर अजूनही खूप कम्फर्टेबल वाटतं, असं सांगायलाही तिने कमी केलं नाही.
अभिनेत्री दीपिका
दीपिकाच्या अभिनयाबद्दल अनेकांची अनेक मतं असू शकतील. ‘ओम शांती ओम’मधून दीपिका बॉलिवूडमध्ये आली, त्या वेळी शाहरूखसमोर उभ्या राहणाऱ्या या नव्या मुलीचं सगळ्यांनाच खूप कौतुक वाटलं होतं. पहिलेपणाचं कौतुक सरलं आणि मग लोक व टीकाकर तिच्याकडे अधिक चौकस नजरेनं पाहायला लागले. या चित्रपटातल्या तिच्या नृत्य कौशल्याबद्दल तिच्यावर स्तुतीसुमनं उधळली गेली. पण त्यानंतर आलेल्या ‘बचना ए हसिनों’ या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेची मात्र व्यवस्थित चिरफाड झाली. दीपिकामध्ये तो स्पार्क दिसला नाही, तिने ही भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने साकारायला हवी होती, अशी मतं व्यक्त करण्यात आली.
त्याच्या पुढच्या वर्षी आलेल्या ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटात दीपिकाने डबल रोल केला होता. भारतीय सखी आणि चायनीज सुझी अशा डबल रोलमध्ये दिसलेल्या दीपिकाने या चित्रपटासाठी जुजुत्सु या जपानी मल्लविद्येचे धडेही गिरवले होते. पण ही कामगिरी तिच्या कामी आली नाही आणि टीकाकर व प्रेक्षकांनीही तिच्या भूमिकेवर नाकं मुरडली. अनेकांनी तर, दीपिकाला या चित्रपटात वाया घालवल्याचं मत नोंदवलं. एका अर्थी लोकांना तिच्याकडून असलेल्या अपेक्षाच या प्रतिक्रियेतून व्यक्त होत होत्या. पण त्याच वर्षी आलेल्या ‘लव्ह आज-कल’ या चित्रपटाने मात्र तिला कौतुकाची पावती मिळवून दिली.
२०१०-११ ही दोन र्वष दीपिकासाठी व्यावसायिकदृष्टय़ा वाईट ठरली, तरी तिच्या भूमिकांचं माफक कौतुक झालं. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ चित्रपटात दीपिकाच्या चेहऱ्यावरचे हावभाग अगदी डकवल्यासारखे वाटतात, अशी प्रतिक्रिया तिच्या वाटय़ाला आली. तर ‘हाऊसफुल्ल’ या तद्दन गल्लाभरू चित्रपटात तिला काही कामच नसल्याचं बोललं गेलं. हा काळ होता अंतर्मुख होण्याचा. या चित्रपटांच्या अपयशानंतर आणि टीकेचं धनी झाल्यानंतर मात्र दीपिका सावरली आणि तिने आपल्या करिअरचा अत्यंत गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली.
२०१३मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’ या चित्रपटाने एक अभिनेत्री म्हणून तिची ताकद बॉलिवूडला दाखवून दिली. या चित्रपटातील व्हेरोनिकाची आव्हानात्मक भूमिका दीपिकाने खूपच लीलया पेलली. इतकी की, व्हेरोनिका म्हणजे दीपिकाच, असं लोकांना वाटायला लागलं. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. या चित्रपटात ती खूपच प्रगल्भपणे वावरल्याचं अनेकांनी नमूद केलं. ै’चेन्नई एक्सप्रेस’ हा मसालापट तर शाहरूख नावाच्या एका खांबावर उभारला होता. पण त्यातही दीपिकाने साकारलेली मीनालोचिनी शाहरूखला पुरून उरली. अनेक ठिकाणी तर तिच्या खटय़ाळ भूमिकेने शाहरूखलाही बाजूला टाकलं. ‘गोलियों की रासलीला राम-लिला’ या रोमियो-ज्युलिएट नाटकावर आधारलेल्या संजय लीला भन्सालीच्या चित्रपटात दीपिकाने लीलाची भूमिका साकारली. या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. यश आलं की, ते किती हातांनी येतं, हे या एका वर्षांने दीपिकाला दाखवून दिलं. पण या यशान हुरळून जाणाऱ्यांपैकी दीपिका नक्कीच नाही. ती अजूनही अगदी नम्र आणि सतत नव्याचा शोध घेणारी आहे. ‘यह जवानी है दिवानी’च्या यशानंतर दीपिकाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, आता सुपरस्टार झाल्यावर कसं वाटतंय? दीपिकाने या प्रश्नाला दिलेलं उत्तर तिच्या विनम्रतेची साक्ष देणारं आहे,
‘‘सुपरस्टार वगैरे सगळं ठीक आहे. पण मला अजूनही चित्रपट क्षेत्रात मी नवखी असल्यासारखंच वाटतं. कोणत्याही चित्रपटातील भूमिका साकारताना मला खूपच भीती वाटत असते. ही भूमिका आपण नीट साकारू शकू की नाही, आपल्याला आणखी काय तयारी केली पाहिजे, या विचारांनी अनेकदा माझी झोप उडते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालात, तरी मेहनतीला पर्याय नाही.’’

सध्याच्या घडीला दीपिकाकडे नेस कॅफे, सोनी सायबर शॉट कॅमेरा, टिसाँ हा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध असलेला रिस्ट वॉचचा ब्रँड, फियामा हा ब्युटी प्रोडक्ट्सचा ब्रँड, गार्नियर, यामाहा, ऑरबिट असे अनेक नावाजलेले ब्रँड्स आहेत.

ब्रँड वॉर
आजकाल चित्रपटसृष्टीत ब्रँड वॉर नावाचं एक वेगळंच युद्ध सुरू झालेलं पाहायला मिळतं. कोणत्या अभिनेत्रीच्या मागे किती ब्रँड आहेत, यावरून तिचं स्टारडम ठरत असतं. २०१०-११ या दोन वर्षांत दीपिका ब्रँड वॉरमध्ये मागे फेकली गेली होती. प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, करिना कपूर या तिच्या स्पर्धकांनी आघाडी घेतली होती. त्यातही कतरिना कैफने अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशी ब्रँड्सही आपल्या खिशात टाकत सर्वावर कुरघोडी केली होती.
पण २०१३ साल उजाडलं, तेच दीपिकाच्या यशाची द्वाही फिरवत. कॉकटेल यशस्वी झाला, त्यापाठोपाठ ‘यह जवानी है दिवानी’ने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. याच दरम्यान दीपिका शाहरूखसह ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये येण्याची आणि हा चित्रपट हमखास विक्रमी गल्ला खेचण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने कोणाचीही निराशा न करता २०० कोटींचा टप्पा ओलांडला. परिणामी दीपिकाची मार्केटमधील पत अचानक वाढली. अनेक उत्तमोत्तम ब्रँड्सच्या एण्डॉर्समेंटसाठी तिला विचारणा व्हायला लागली. याच दरम्यान कतरिना आणि रणबीर यांच्या हॉट अफेअरच्या बातम्या आणि स्पेनमधील समुद्रकिनाऱ्यावरील त्यांची एकत्रित छायाचित्रे समोर आली. दीपिकाच्या अंगाचा तिळपापड झाला नसता, तरच नवल. पण दीपिकाही शांत राहिली आणि आपलं काम करत राहिली. परिणामी सलग तीन चित्रपटांच्या यशानंतर दीपिकाची ब्रँड व्हॅल्यू हा हा म्हणता वाढली. मध्यंतरी आलेल्या बातम्यांनुसार कतरिनाकडे जाणाऱ्या साबणाच्या एका बडय़ा कंपनीला स्वत:कडे खेचण्यात दीपिका यशस्वी झाली आणि तिथे कतरिनाच्या अंगाचा तिळपापड झाला. याच दरम्यान रणबीरबरोबर मश्गूल असलेल्या कतरिनाला दीपिकाने चांगलेच खडे बोलही सुनावले. त्यामुळे या ब्रँड वॉरला पर्सनल टचही मिळाला.
सध्याच्या घडीला दीपिका बॉलीवूडमधील आघाडीची ब्रँड मॉडेल आहे. तिच्याकडे नेस कॅफे, सोनी सायबर शॉट कॅमेरा, टिसाँ हा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध असलेला रिस्ट वॉचचा ब्रँड, फियामा हा ब्युटी प्रोडक्ट्सचा ब्रँड, गार्नियर, यामाहा, ऑरबिट असे अनेक नावाजलेले ब्रँड्स आहेत. त्याशिवाय ती किंगफिशर एअरलाइन्सचीही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती.
तिचा एकटेपणा!
आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या दीपिकाच्या भोवती अनेकांचा गराडा आहे. त्यात तिचे सहकलाकार आहेत, चाहते आहेत, तिला घडवण्यात हातभार लावणारेही आहेत. पण तरीही प्रभादेवीमधील एका उत्तुंग इमारतीच्या २६व्या मजल्यावरील आपल्या घरातून समुद्राकडे पाहताना तिला खूप एकटं एकटं वाटतं. लहानपणापासूनच एकलकोंडय़ा असलेल्या दीपिकाला बॉलीवूडमधल्या या गराडय़ाची फारशी सवय अजूनही लागलेली नाही. फराह खान आणि शाहरूख खान हे आपली खूप काळजी घेतात, असं तिनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण या झगमगत्या दुनियेतील तिच्या मित्रांची संख्याही अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल, एवढीच आहे. सतत पाटर्य़ाना हजेरी लावणं, हा बॉलिवूडमधला एक रिवाज असल्याने दीपिका तेवढय़ापुरतीच या पाटर्य़ामध्ये रंगते. सिद्धार्थ मल्ल्या आणि रणबीर कपूर सोडले, तर तिचं नाव फारसं कोणाबरोबरही चर्चेत नाही. रणबीर सिंगबरोबर तिचं नाव जोडलं गेलं, त्या वेळी तर तिने मुलाखतींमध्ये अगदीच स्पष्ट सांगून टाकलं की, या सगळ्या गोष्टींसाठी सध्या तिच्याकडे वेळ नाही. मोठय़ा पडद्यापलीकडची दीपिका कशी आहे, हे जाणून घेतलं तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसतो.
दीपिकाला तिच्या कुटुंबीयांबरोबर राहायला खूप आवडतं. ट्रॅव्हल एजण्ट असलेली तिची आई, वडील आणि गोल्फ खेळाडू असलेली तिची लहान बहीण, असे सगळेच बंगळुरूला राहतात. दीपिकाला सारखं सारखं त्यांच्याकडे जाणं शक्य होत नाही. पण तरीही वेळ मिळेल, तेव्हा ती आपल्या बंगळुरूच्या घरी धाव घेत असते. आपल्या आईवडिलांनी आपल्याबरोबरच राहावं, असंही तिला वाटतं. प्रभादेवीतल्या आपल्या घरी आपलं सगळं कुटुंब आलं, तर घराला घरपण येईल, असं ती बोलूनही दाखवते. पण केवळ आपल्यासाठी आपल्या कुटुंबीयांनी बंगळुरूमधला आपला सगळा कारभार आटोपता घेऊन मुंबईला स्थलांतर करावं, ही कल्पना तिला पटत नाही. या वेळी दीपिकातील प्रगल्भ मुलगी दिसते. केवळ माझ्या इच्छेखातर त्यांनी त्यांचं सगळं काम बाजूला ठेवून इथे यावं, हे मला कधीच आवडणार नाही, असं ती बोलूनही दाखवते.
दीपिकाच्या स्वभावातली आणखी एक गोष्ट म्हणजे, ती देवभोळी नसली, तरी तिची देवावर नितांत श्रद्धा आहे. वेळ मिळेल तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या तरी देवळात जाते. देवळातलं शांत आणि प्रसन्न वातावरण मला खूप आवडतं. मनात चाललेली सगळी खळबळ अगदी शांत होते आणि तलावातल्या शांत पाण्याप्रमाणे मनही खूप थंड होतं, असं ती म्हणते. पण तिला देवळं आवडतात तीसुद्धा मेंगळुरजवळची, निसर्गाच्या सान्निध्यात बहरलेली.
आपल्या एकटेपणावर मात करण्यासाठी मग ती काही ना काहीतरी शिकत राहते. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी, आपल्याला अभिनयातलं काहीच येत नाही, हे लक्षात घेत तिने अनुपम खेर यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले होते. त्यानंतर तिने श्यामक दावर याच्याकडे नृत्यही शिकून घेतलं. आता शूटिंग नसेल, त्या वेळी दीपिका विविध वर्तमानपत्रांसाठी कॉलम लिहिते. तिला हे काम खूप आवडतं. एका अर्थाने ती थोडी स्त्रीवादी आहे. चित्रपटांमधून अभिनेता व्यक्त होत नसतो. हे माध्यम दिग्दर्शक व पटकथाकाराचं आहे. मला व्यक्त व्हायला खूप आवडतं आणि लेखन ही मला आवडणारी गोष्ट आहे. सुदैवाने मला माझ्या मनासारखं लिहायला मिळतं आणि मी लिहीत असते, असं दीपिका सांगते.
या एकटेपणापासून दूर राहण्यासाठी सध्या ती स्वत:ला कामात मग्न ठेवत आहे. तिच्याकडे सध्या रजनीकांत यांच्यासह असलेली तामिळ फिल्म ‘कोचादियान’, इंग्लिश आणि कोकणी भाषेत प्रदर्शित होणारा ‘फाइंडिंग फ्रॅनी फर्नाडिस’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ असे तीन चित्रपट आहेत. रणबीर आणि सिद्धार्थ प्रकरणाने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या आहेत. अनेक गोष्टींबाबत आपण सजग झालो आहोत, असंही ती सांगते. यापुढे व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात कोणतंही पाऊल टाकताना खूपच जपून टाकणार आहे, असं ती म्हणते त्या वेळी तिच्यातली दुखरी बाजू चटकन समोर येते.
दीपिकाचा हा सच्चेपणा तिच्या चाहत्यांना खूप भावतो. ती जशी आहे, तशीच ती लोकांसमोर येते. उगवत्या ताऱ्याला सलाम ठोकण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीचा खूप जुना रिवाज आहे. इथे मावळणाऱ्यांनी कितीही रंग उधळले, तरी पश्चिमरंगी आभाळापेक्षा पूर्वेची लालिमाच लोकांना भुरळ पाडते. व्यावसायिक अपयशानंतर मिळालेल्या स्वप्नातीत यशाने दीपिकाला हा धडा नक्कीच दिला आहे. त्यामुळेच कदाचित ती स्वत:ला या क्षेत्रात अजूनही नवीनच समजते आणि दर दिवशी उगवत्या ताऱ्याप्रमाणे लोकांच्या समोर येते. दीपिका पडुकोण नावाची ही शुक्राची चांदणी येत्या काही वर्षांत मोठय़ा पडद्याचं अवकाश लखलखीत करून टाकणार, याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही.