सौरभ नाईक response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत म्हणजे काय?’ सहसा कधीही ऐकू न येणारा हा प्रश्न सिनेमात अनपेक्षितरीत्या समोर येतो आणि या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड सिनेमाच्या माध्यमातून करतात.  फिल्म फेस्टिव्हल्समध्ये नावाजलेला ‘फँड्री’ आणि बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरलेला ‘सैराट’नंतरचा नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदूी सिनेमा, त्यामुळे अपेक्षा कणभर वाढलेल्या होत्या हे निश्चित! इंडिया आणि भारत यांच्यातील भिंत डोळसपणे या सिनेमातून मांडली गेली आहे.

सिनेमाची कथा सुरू होते ती नागपूरमधील एका झोपडपट्टीमधील दृश्याने. तिथल्या लोकांचं जगणं, तिथल्या मुलांचं आयुष्य, उदरनिर्वाहासाठी ते करत असलेल्या गोष्टी, नशेत चूर असलेली अल्पवयीन मुलं हे सगळं अगदी ठळकपणे सिनेमात दाखवलं गेलं आहे. पूर्वीदेखील हिंदूीत काही सिनेमांमध्ये झोपडपट्टीमधील मुलांचं आयुष्य चितारण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो इतका बेधडक नव्हता जेवढा ‘झुंड’मध्ये झालाय.‘झुंड’ने कुठलाही आडपडदा न ठेवता सगळं प्रेक्षकांसमोर आणून ठेवलंय, त्यामुळे प्रेक्षक वास्तवतेच्या अधिक जवळ पोहोचतात. सिनेमाची कथा विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या मुख्य भूमिकेत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आहेत. तरीही या सिनेमाला स्वतंत्र असा नायक नाही. सिनेमाची कथाच सिनेमात नायकाची भूमिका पार पाडते. नागपूरच्या गड्डीगोदाममधील ही ‘झुंड’ दिशाहीन असल्याने चोऱ्यामाऱ्या आणि नशापाणी करत आयुष्य काढत असते. एके दिवशी नागपूरच्या कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक असणाऱ्या ‘बोराडे’ सरांची नजर त्यांच्यावर पडते. या ‘झुंड’मध्ये फुटबॉल खेळण्याची क्षमता आहे हे त्यांच्या लक्षात येतं. त्या दृष्टीने ते प्रयत्न करू लागतात. आधी या मुलांना फुटबॉलची सवय आणि शिस्त लावणं गरजेचं असतं. त्यासाठी बोराडे सर विविध उपाय करून पाहातात. त्यांची स्पर्धा कॉलेजमधील टीमशी लावली जाते आणि मग त्यानंतर या ‘झुंड’चा ‘टीम’च्या दिशेने प्रवास सुरू होतो. ही ‘टीम’ होताना अनेक सामाजिक आणि आर्थिक अडचणी येतात, पण त्या सगळय़ांवर मात करत अखेर ती ‘टीम’ तयार होतेच. आणि बिग बी यांचं ‘झुंड नहीं टीम कहिए’ हे वाक्य सार्थ ठरतं.

सिनेमाची कथा साधी-सोपी वाटत असली तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. हे कंगोरे सिनेमात नसते तर खेळांवर आधारित अशा ‘चक दे इंडिया’, ‘लगान’सारखाच हा अजून एक तशाच पठडीतला सिनेमा ठरला असता. पण हा सिनेमा वेगळा ठरतो त्यात हाताळल्या गेलेल्या विषयांमुळे. खेळ हे या सिनेमाचं मुख्य अंग नाहीए, तर खेळ हे एक माध्यम आहे. आणि या माध्यमातून नागराज मंजुळे ह्यांनी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे. नागराज मंजुळे यांचं ‘पिस्तुल्या’पासूनच काम पाहिलं तर सामाजिक संवेदनांना हात घालण्याचा ते प्रयत्न करताना दिसतातं. फँड्रीमध्ये तर ते अगदी ठसठशीत दिसून आलंय. सैराटलादेखील ‘व्यावसायिक टच’ असला तरी मूळ धागा त्यांनी धरून ठेवला आहे. तीच गोष्ट ‘झुंड’ची. ‘झुंड’ हा सिनेमा म्हणजे विविध सामाजिक विषयांची ‘थाळी’ आहे असं म्हणावं लागेल. थाळीत अनेक पदार्थ असतात, काहींचं प्रमाण कमी असतं, काहींचं जास्त असतं. आपल्याला जे पदार्थ आवडतात ते आपण जास्त खातो, पण उरलेल्याकडे दुर्लक्ष करत नाही, चवीपुरते का होईना आपण ते खातोच. नागराज यांनी झुंडमध्ये सामाजिक विषयांची थाळी दिलेली आहे. तुम्हाला जे झेपतील, जमतील, विचारांना पटतील ते विषय समजून घ्यायचे, त्याचं आकलन करायचं. आणि बाकीचे विषय नाही पटले तरी त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. ते तुम्ही आत्मसात नाही केले तरी तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून इथे यशस्वी ठरतात. ‘झुंड’मध्ये त्यांनी ‘ट्रिपल तलाक’, ‘स्त्री-पुरुष समानता’, ‘नागरिकत्व कायदा’, ‘अंधश्रद्धा’ अशा अनेक विषयांना हात घातलाय. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी धडपड, कागदपत्रांची पूर्तता करताना होणारा त्रास, त्या वेळेस पात्रांच्या तोंडी दिलेली वाक्ये प्रेक्षकांना विचार करायला  भाग पाडतात आणि यंत्रणेला खडा सवाल करतात. सामाजिक विषयांना हात घालताना त्यासोबतच क्रीडा क्षेत्रात असलेली अनास्था हीदेखील भारतीयांसाठी चिंतेची बाब असल्याचं सिनेमातून लक्षात येत. एकूणच भारतीय समाजासाठी आणि यंत्रणेसाठी ‘झुंड’ हा एक रिअ‍ॅलिटी चेक आहे असं म्हणावं लागेल.

नागराज मंजुळे यांच्या सिनेमातील व्यक्तिरेखा सिनेमाचं बलस्थान असतं. नागपूरच्या झोपडपट्टीमधून सिनेमासाठी त्यांनी मुलं गोळा केली आणि त्यांना घडवलं. त्यांचं प्रामाणिक काम पडद्यावर दिसून येतंय. अंकुश, बाबू, विशाखा यांचा अभिनय प्रकर्षांने लक्षात राहतो. ‘फँड्री’मधील राजेश्वरी खरात हिला सोडलं तर आपल्या आधीच्या सिनेमांतील जवळपास प्रत्येक मुख्य नायक-नायिका आणि त्यांच्यासोबत भूमिका असणाऱ्या मुलांना त्यांनी याही सिनेमात काम दिलं आहे. आकाश ठोसर, िरकू राजगुरू यांनी आपापली कामं चोख केली आहेत. मात्र विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ‘फँड्री’मधील सोमनाथ अवघडेचा. सोमनाथने या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी बारसे सरांची भूमिका अक्षरश: जगले आहेत असं दिसतंय. या नव्या दमाच्या मुलांसोबत ते समरसून गेले आहेत. बॉलीवूडचा महानायक असल्याचा कुठलाही अभिनिवेश चित्रपटात दिसत नाही आणि हेच त्यांचं वेगळेपण त्यांना महानायक असणं अधोरेखित करतं. नेहमीप्रमाणे नागराज मंजुळे स्वत:सुद्धा एका छोटय़ा भूमिकेत आहेत. छोटय़ाशा भूमिकेतदेखील ते भाव खाऊन जातात.

नागराज मंजुळे हे मुळातच ताकदीचे दिग्दर्शक आहेत आणि बऱ्याचदा ते संवादापेक्षा फ्रेम्समधून अधिक बोलतात. या सिनेमातील फ्रेम्स प्रचंड बोलक्या आहेत. नेमका आशय त्या फ्रेम्समधून मांडला जातो आणि तो सामान्य सिनेरसिकसुद्धा सहज समजू शकतो. काही काही प्रसंगांत पाटय़ांमधून लिहून दाखवण्यात आलं आहे इतकी फ्रेम्सची सोपी निवड केली आहे. यातून थेट भाष्य तर केलं जातंच. पण एक सिनेरसिक म्हणून प्रेक्षकांना वेगळा अनुभवही येतो. सिनेमाची गाणी अजय-अतुल यांनी केली असून ती अर्थपूर्ण झाली आहेत. पण सैराटमध्ये जितकं संगीत प्रभावी ठरत होतं तितकं इथे निश्चितच होताना दिसत नाही. किंबहुना ती मूळ कथानकाची गरजही नसावी. लिखाणाच्या दृष्टीने सिनेमा बऱ्याच अंशी उजवा ठरतो. त्यातले काही संवाद एक सुजाण समाज म्हणून आपल्यासमोर प्रश्न उपस्थित करतात आणि आत्मचिंतन करायला भाग पाडतात. विशेषत: अमिताभ बच्चन ह्यांचा कोर्टरूममधील मोनोलॉग डोळय़ात झणझणीत अंजन घालतो.

सिनेमाची एकच नकारात्मक बाजू म्हणजे त्याची लांबी. हा सिनेमा जवळपास तीन तास चालतो. एकूणच सध्या नव्या सिनेमांची लांबी कमी कमी होत चाललीय, परिणामी प्रेक्षकांचा सिनेमागृहात जाऊन लक्ष देण्याचा कालावधी कमी होत चाललाय. हेच प्रेक्षक वेब सीरिज माध्यमामध्ये ८-९ तासांचा कण्टेण्ट सहज पाहतात, पण सिनेमागृहात मात्र तग धरू शकत नाहीत. ‘झुंड’चा मध्यंतरापूर्वीचा भाग ताणल्यासारखा वाटतो. विशेषत: त्यातील एका मॅचचा प्रसंग खेचल्यासारखा वाटतो. कथानकाची गरज म्हणून तीन तासांचा अवधी योग्य वाटत असला तरी त्याची विभागणी मात्र योग्य झालेली नाही. मध्यंतरापूर्वी टेस्ट मॅच आणि मध्यंतरानंतर टी-20 सारखं खेळून सिनेमा संपवल्यासारखा वाटतो. पण शेवटी मॅच जिंकणं जसं महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे सिनेमाच्या लांबीत आणि विभागणीमध्ये गडबड झाल्यासारखी वाटत असली तरी शेवटी सिनेमा जिंकला आहे एवढं मात्र निश्चित! एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे ह्या सिनेमाचा शेवट सुन्न करणारा नाही. फँड्री आणि सैराटमध्ये ज्या पद्धतीने शेवट अंगावर येतो तसा इथे मुळीच येत नाही. पण हा दिग्दर्शकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणत्या प्रसंगाला किती जडत्व द्यायचं हे नागराज मंजुळेंसारख्या हुशार दिग्दर्शकाला व्यवस्थित कळतं. त्यामुळे शेवटी जो संदेश द्यायचा आहे तो त्यांनी एका प्रसंगातून चपखल दिलेला आहे. मात्र प्रेक्षक अवाक होऊन बाहेर पडत नाही हेही तितकंच खरं.

ह्या सिनेमाबाबत बरीच मतमतांतरे आहेत. तो पाहावा की पाहू नये ह्याबद्दलदेखील चर्चा झडतायत. समाजातील एक मोठा घटक, त्यांच्यावर वर्षांनुवर्षे होणारा अन्याय, भारतीय क्रीडा क्षेत्राला आलेली उदासीनता ह्याच्यावर समाजात मतभिन्नता जरी असली तरी सिनेमात मांडलेला आशय प्रामाणिक वाटतो. व्यवस्थेला हादरवून सोडण्याचं आणि सामाजिक जाणिवा समृद्ध करण्याचं कसब ‘झुंड’मध्ये आहे. त्यामुळे ‘भारत म्हणजे काय?’ हा प्रश्न स्वत:ला विचारल्यानंतर त्याचं उत्तर काही निमिषात डोळय़ांपुढे चमकत नसेल तर ‘झुंड’ जरूर पाहावा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director nagraj manujle jhund movie based on the life of social worker vijay barse zws
First published on: 11-03-2022 at 03:23 IST