lp43धम्माल फजिती 
फजिती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी झालेलीच असते. मग तो माणूस छोटा असो की मोठा. किंबहुना फजिती न झालेला माणूस शोधून मिळणं अवघडच. अर्थात या फजितीमध्येदेखील एक धम्माल असते, ती अनुभवण्यात आणि सांगण्यात एक वेगळीच मज्जा असते. तीच मज्जा यंदाच्या ‘चिंतन आदेश’ दिवाळी अंकात वाचायला मिळते. अंकाच्या मुखपृष्ठावरील ‘फजितीची एक गंमत, कधी वेगळी तर कधी सेम. अचूक लागला नेम नाहीतरी आपलीच गेम’ ही वाक्यं आणि त्याला पूरक व्यंगचित्रं अंकात आत काय आहे याची झलक दाखवतो. पत्रकारिता, नाटय़ दिग्दर्शक, निवेदक, प्राध्यापक, व्याख्याते, लेखक, शास्त्रज्ञ, चित्रकार, कवी या क्षेत्रांतील अनेक थोरामोठय़ांनी आपल्या आयुष्यातील काही भन्नाट प्रसंग वर्णिल्यामुळे संपूर्ण अंक वाचनीय झाला आहे. अरविंद व्य. गोखले, सुधीर गाडगीळ, मंगेश तेंडुलकर, इंद्रजित भालेराव, सोनाली नवांगुळ, डॉ. विजय पांढरीपांडे, रेणू गावस्कर, डॉ. विजया वाड अशा अनेकांनी कधी ना कधी अनुभवलेली फजिती निसंकोचपणे मांडली आहे. संपादक – अभिनंदन थोरात; मूल्य रु. १२०/-

lp44आयुर्वेद आणि ज्योतिषाचा खजिना
मणिपुष्पकचा दिवाळी अंक म्हणजे आयुर्वेद आणि ज्योतिषाचा खजिनाच आहे. पहिल्या विभागात सर्वासाठी आयुर्वेद, रक्तदाब, वंध्यत्व, हृदयविकार, मधुमेह, गॅसेस अशा लाइफस्टाइल आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून थोडक्यात उपचार सुचविण्यात आले आहेत. वैद्य खडीवाले, डॉ. ह. वि. सरदेसाई, वैद्य नानल अशा वैद्यांचा समावेश करण्यात आला आहे. लाइफस्टाइल आजारांबरोबरच उचकी लागणे, गुडघेदुखी, मूळव्याध, चाळिशीनंतरचं आरोग्य, डोकेदुखी, अ‍ॅसिडिटी, कॅन्सर आदी आजारांवर या अंकातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दुसऱ्या विभागात ज्योतिषविषयक लेख आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे. कर्केतील गुरू, मंगळ, वृश्चिकेतील शनी, विवाह पत्रिका मीलन असे नेहमीचे विषय तर आहेतच, पण रत्ने, शुभफलदायी रांगोळ्या, ज्ञानदीप, मृत्यूला आमंत्रण देणारी शापित वास्तू, हातावरून आहारविचार, आध्यात्म साधना, धनलाभातील गुप्तयंत्रे अशा वेगळ्या विषयांवरदेखील नामांकित अभ्यासकांनी मार्गदर्शन केले आहे. शुक्र, शनी नवपंचम योग, संतसुखाचे सागर यावरदेखील विचार मांडण्यात आले आहेत.
मणिपुष्पक, संपादक – रमाकांत बर्डे, मूल्य रु. १००/-

lp45जनयुग
साप्ताहिक जनयुगचा दिवाळी अंक अनेक नामवंतांच्या लेखांनी सजला आहे. तसाच तो अनेक विषयांना सामावून घेणारा आहे. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, ऐतिहासिक, पर्यटन, साहित्यिक अशा अनेक विषयांवरील आधारित लेख म्हणजे खजिनाच आहे. कोकणातील समाजाचे एक वेगळे रूप यातून प्रकट होते.
संपादक – राजेंद्र देविदास खांडाळेकर, मूल्य रु. ६०/-