lp23कोणत्याही घटनांच्या नोंदीकरणाची उपेक्षा हे आपल्या भारतीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण; किंबहुना आपला समाज आणि व्यवस्था हे नोंदीकरणाच्या किचकट आणि काहीशा निरस वाटणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा केवळ साजरीकरणातच आनंद मानतात. त्यातच आपण मराठी माणसे तर काकणभर अधिकच उत्साही. मग होते काय, तर कौतुक सोहळा रंगतो आणि केवळ झगमगाटाचीच चर्चा होत राहते. बऱ्याच वेळा होते असे की, एखाद्या विषयावर चर्चा करताना आपण अनेक वेळा आम्हाला शंभर वर्षांपूर्वीच परंपरा आहे वगैरे प्रौढी मिरवतो, पण प्रत्यक्षात त्या विषयावर काही नोंदी दाखवा म्हटले की, हात आखडला जातो. अनेक क्षेत्रांबाबत जाणवणारी ही उपेक्षा आता निदान मराठी चित्रपटसृष्टीबाबत तरी दूर होत आहे. ‘व्ही. शांताराम चलचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान’मार्फत नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या ग्रंथामध्ये गेल्या शंभर वर्षांतील तब्बल २८१९ चित्रपटांच्या नोंदी संकलित करण्यात आल्या आहेत.

१९१३ ते १९३४ या काळातील ३७२ मूकपट, १९३२ ते १९७१ दरम्यानचे ५११ कृष्णधवल बोलपट आणि १९७२ ते २०१३ या काळातल्या १९३६ रंगीत बोलपटांचा समावेश असणारा एक अनमोल असा दस्तऐवज यानिमित्ताने तयार झाला आहे. चित्रपटाचे नाव, प्रकार (कौटुंबिक, साहस, प्रेम), सेन्सॉर क्रमांक, चित्रपटाची लांबी, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संगीत, इतर तंत्रज्ञ, कलाकार, गाण्यांचे बोल असा विस्तृत आढावा या ग्रंथात घेतला आहे. त्यामुळे प्रसिद्ध चित्रपटांच्या माहितीपलीकडे जाण्याचे महत्त्वाचे कार्य या ग्रंथामुळे झाले आहे.
या ग्रंथाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मूकपटांचा आढावा. गेल्या पाच-दहा वर्षांत चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी इंटरनेट माध्यमाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे; किंबहुना या चित्रपटांबद्दल काही ना काही माहिती ही इंटरनेटवर मिळतेच; पण चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्धीची माध्यमे अगदीच मर्यादित होती. त्या काळात चित्रपटांच्या पुस्तिका प्रकाशित केल्या जायच्या. अशा अनेक पुस्तिकांचा संग्रह हा प्रतिष्ठानने केला आहे, तर ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक द. भा. सामंत यांनी प्रचंड मेहनत घेऊन मूकपटांच्या नोंदी संग्रहित केल्या होत्या. अर्थातच आजच्या पिढीला कसलीच माहिती नसलेल्या मूकपटांची तोंडओळख या ग्रंथामुळे होऊ शकते. अर्थातच हा ग्रंथ द. भा. सामंतांना अर्पण करण्यात आला आहे.
या ग्रंथाची ढोबळमानाने मूकपट, कृष्णधवल बोलपट आणि रंगीत बोलपट अशी विभागणी केली आहे. प्रत्येक विभागाच्या सुरुवातीस देण्यात आलेल्या चित्रपट अभ्यासकांच्या लेखामुळे विषय प्रवेश सोपा झाला आहे. मूकपटांवर संजीत नार्वेकर, कृष्णधवल बोलपटांवर सुधीर नांदगावकर आणि रंगीत बोलपटांवर दिलीप ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे. या लेखांनी त्या काळातला झालेला बदल अगदी नेमकेपणाने टिपला आहे. तर धनंजय कुलकर्णी यांनी चित्रपटसृष्टीवर प्रकाशित पुस्तकांची सूची तयार करून ग्रंथात मोलाची भर टाकली आहे. तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांच्या सूचीमुळे एकूणच अभ्यासकांसाठी अत्यंत दुर्मीळ असा दस्तऐवज तयार झाला आहे.
हा ग्रंथ म्हणजे केवळ जंत्री नाही. अनेक चित्रपटांवरील विशेष टिप्पणीमुळे काहीशी तांत्रिकतेकडे झुकणारी ही माहिती रंजक झाली आहे. १९२८ साली प्रदर्शित झालेल्या ‘महारथी कर्ण’ या चित्रपटासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता. तब्बल आठ हजारांचा जमाव चित्रीकरणासाठी वापरण्यात आला आहे, तर १९२६ साली प्रदशित झालेल्या भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘वंदेमातरम आश्रम’ चित्रपटात पदवीधर बेकारांचे जीवन मांडताना विद्यापीठांची बदनामी होते या सबबीखाली या चित्रपटाला परवानगी देण्याठी सेन्सॉर बोर्डाने तो सात वेळा पाहिला होता. असे काही वेगळेच किस्से या ग्रंथातून कळतात.
१९१३ सालच्या ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाने जरी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली असली तर त्यापूर्वी १८९९ ते १९१२ या काळात सात लघुपट तयार करण्यात आले होते. या सातही लघुपटांची माहिती आपल्याला केवळ या ग्रंथामुळेच कळू शकते.
तर भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपटाचा मान ‘श्याम सुंदर’ या चित्रपटाला १९३२ साली मिळाला असल्याचे या ग्रंथातून कळते. हा चित्रपट न्यू वेस्टएंड (नाझ) चित्रटगृहात २७ आठवडे गर्दी खेचत होता, तर ‘औट घटकेचा राजा’ या चित्रपटात १९३३ साली शाहू मोडकांनी डबल रोल केला होता, हा मराठीतला पहिलाच डबल रोल होता याची नोंद यात सापडते.
चित्रपटनिर्मितीचा कारखाना हा अव्याहत सुरू असला तरी त्यालादेखील कधी तरी खीळ बसली होती हे यात नोंदवले आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान चित्रपटनिर्मितीच्या रॉ स्टॉकचा प्रचंड तुटवडा होता, रेशनिंगच केले जात होत, निर्मितीचा वेग कमालीचा मंदावला होता. परिणामी १९४५ साली एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
खरे तर अशा प्रकारच्या ग्रंथांची आपल्याला फारशी सवय नाही. त्यातच चित्रपटसृष्टी म्हटल्यावर वलयांकित जगाकडेच झुकण्याची शक्यता अधिक; पण किरण शांताराम यांनी या वलयाच्या पलीकडे जात प्रतिष्ठानमार्फत केलेले काम नक्कीच अभिनंदनीय आहे. चित्रपटांच्या शतकमहोत्सवी वर्षांत या ग्रंथाचे प्रकाशन वर्षभर लांबले असल्यामुळे २०१४ सालातील चित्रपटांची पुरवणी पुस्तिकादेखील तयार करण्यात आली आहे. तर यापुढेदेखील हे काम चालू राहणार असून, २०१५ पासूनची सूची ही डिजिटल स्वरूपात केली जाईल, असे किरण शांताराम यांनी सांगितले. ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी शशिकांत भगत व वसंत इंगळे याच्या साहाय्याने संपादनाचे काम केले आहे.
सुहास जोशी