11 July 2020

News Flash

चित्रपटांतून उलगडणारं ‘त्यांचं’ भावविश्व

मुला-मुलीचं नाव एकत्र फळ्यावर, बाकावर लिहिणं, ‘त्या’ मुलीसमोर ‘त्या’ मुलाला जोरात हाक मारणं, असे अनेक शालेय जीवनातले उद्योग. हे वय नाजूक आणि महत्त्वाचं. यांना पडणारे

| November 14, 2014 01:28 am

lp28मुला-मुलीचं नाव एकत्र फळ्यावर, बाकावर लिहिणं, ‘त्या’ मुलीसमोर ‘त्या’ मुलाला जोरात हाक मारणं, असे अनेक शालेय जीवनातले उद्योग. हे वय नाजूक आणि महत्त्वाचं. यांना पडणारे प्रश्न, शंका यांची उत्तरं कठीण. त्यांचं भावविश्वच वेगळं. हे भावविश्व टिपणारे काही मराठी सिनेमे..

मुलांच्या नावावरून मुलींना चिडवणं, मुलींना एखादा मुलगा आला की तिच्या मैत्रिणींचं खुणावणं, तो किंवा ती वर्गात आली की हळूच चोरटा कटाक्ष टाकणं, एखादी मुलगी आवडत असेल तर तिला सांगायचं कसं यावर केलेली मुलांची तासन्तास चर्चा, डान्स येत नसेल तरी ‘ती’ गॅदरिंगमध्ये आहे म्हणून त्यात घेतलेला सहभाग, पिकनिकचं निमित्त साधून त्याला दिलेली प्रेमाची कबुली.. हे सगळं घडत असतं शालेय जीवनात. आकर्षण, वेड, आवडणं, सहवास हवा असणं या सगळ्या भावनांना ‘प्रेम’ समजण्याचं ते वय. आजच्या भाषेत ‘टीन एज’. साधारण १२ ते १६ वयोगट. माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात नाजूक वय. या वयातले प्रश्न, शंका, नवं जाणून घेण्याची इच्छा, होणारे शारीरिक बदल अशा अनेक गोष्टी असलेला हा वयोगट खूप महत्त्वाचा. हेच नेमकं हेरलं मराठी सिनेमांनी. आणि गेल्या दीडेक वर्षांत मराठी सिनेमांमध्ये या वयाचं भावविश्व दिसलं. काही सिनेमांमध्ये मूळ विषय प्रेमकथेचा नसला तरी विशिष्ट ट्रॅक त्यावर बेतला आहे. ‘बालक पालक’, ‘फँड्री’, ‘टाइमपास’, ‘शाळा’, ‘टपाल’ अशा सिनेमांमध्ये या वयातलं प्रेम, या वयातल्या मुलांचं भावविश्व झळकतं.

सिनेमा आणि समाज हे एकमेकांना पूरक असतात. सिनेमामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं दर्शन हे सिनेमांमधून दिसत असतं. आणि सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रभाव समाजावर पडतो. या विषयांच्या सिनेमांची साखळी सुरू झाली ती ‘शाळा’ या सिनेमापासून. मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा. या सिनेमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलीच. कादंबरीइतकाच सिनेमाही गाजला. जोशी आणि शिरोडकर यांच्या प्रेमविश्वाची ही कहाणी. शिरोडकरच्या नकळत पाठलाग करणारा जोशी, तिच्याच टय़ुशनमध्ये जाणारा जोशी प्रेक्षकांना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन गेला. मुद्दा हा, की समाजात या गोष्टी घडत असतात. या वयाचं भावविश्व खूप वेगळं असतं. त्यांच्या फॅण्टसी असतात. कल्पनेपलीकडचे प्रश्न, शंका असतात. अमुक केलं तर काय होईल किंवा तमुकचा काय अर्थ असतो, हे म्हणजे काय किंवा मुला-मुलींच्या शारीरिक बदलांबद्दलचे प्रश्न असतील, हे भावविश्व जितकं नाजूक तितकंच महत्त्वाचं. हे वय आता आणखी अलीकडे येऊ लागलंय. पूर्वी एखादी गोष्ट समजायला मुलांचं वय १४ इतकं व्हावं लागायचं. पण, आता तीच गोष्ट १२ वर्षांच्या मुलालाही चटकन समजू लागली आहे. आताची पिढी वेगवान आहे.

‘बालक पालक’ हा उल्लेख करावा असा सिनेमा. या सिनेमात मांडलेला विषय स्तुत्यच आहे. शालेय जीवनात वाटत असलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा या सिनेमात होतो. शारीरिक संबंधासारख्या नाजूक विषयावर पालकांनी मुलांशीच थेट संवाद साधायला हवा. अन्यथा मुलं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला स्वत:चे मार्ग अवलंबतात आणि त्यातून चुकीचा संदेश त्यांना मिळू शकतो, हे या सिनेमातून सांगितलं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव सांगतात की, ‘हा सिनेमा करण्यामागचा हेतू म्हणजे माझा मुलगा हाच होता. कारण सिनेमात दाखवलेल्या मुलांच्या वयाइतकंच माझ्या मुलाचं वय होतं. पाश्चात्त्य संस्कृती आपण फॉलो करतो. पण, तिथे या वयातल्या मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या खूप गंभीर आहेत. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी याबाबत अभ्यास केला. त्यावेळी पालकांनी या वयातल्या मुलांशी आकर्षण, शारीरिक संबंध, विशिष्ट मुद्दय़ाबाबतची विचारसरणी, कल्पनाशक्ती अशा सगळ्याच बाबतीत मंोकळेपणाने बोललं पाहिजे, या निष्कर्षांपर्यंत मी पोहोचलो. आणि म्हणूनच याचा सिनेमा काढायचा ठरवलं. केवळ शारीरिक संबंधच नाही, तर इतर अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींविषयीची चर्चा पालकांनी करायला हवी असं वाटलं. आणि हाच सिनेमाचा मूळ हेतू होता.’ या सिनेमात शारीरिक संबंधावर केलेलं भाष्य मोठय़ांनाही विचार करायला लावणारं आहे.

‘फँड्री’ हा सिनेमा खरं तर तसा वेगळ्या पठडीचा. पण त्यात जब्याचा लव्ह ट्रॅक आहे. तोही शाळेतलाच दाखवला आहे. जब्याचं शालूवर असलेलं प्रेम हा या सिनेमातला साइड ट्रॅक. पण शाळेत ती आली की तिच्याकडे चोरून बघणं, तिची स्वप्न पडणं, हे सारं प्रेक्षकांना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणारं आहे. सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं. दिग्दर्शकाला जो विषय मांडायचा होता त्याला कुठेही धक्का न लागता जब्याच्या लव्ह ट्रॅकमधून तो स्पष्टपणे समोर येतो. या सिनेमाच्या साधारण दीडेक महिना आधी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता तो म्हणजे ‘टाइमपास’ या सिनेमाने. दगडू आणि प्राजक्ताची प्रेमकथा यात दाखवली. पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही, पहिलं प्रेम म्हणजे काय टाइमपास होता तो, तेव्हा कुठे काय कळतं होतं, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ठराविक वय गेल्यानंतर उमटत असतात. ‘प्रेम’ म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेण्यासाठी अनेक जण यात पडतात. त्या वयातलं ते प्रेम आजही आपण बघतो. आता ‘आय लव्ह यू’चा अर्थ ‘त्या’ वयातल्या मुलांना समजावून सांगावा लागत नाही. त्यात या सिनेमांचा प्रभाव हा असतोच. या सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव सांगतात की, ‘आजची पिढी ही खूप लवकर मोठी होणारी आहे. आता चौथी-पाचवीतच मुला-मुलींचा पहिला क्रश असतो. आठवीत पहिलं प्रेम होतं. पूर्वी हे वय थोडं पुढचं असायचं. त्यामुळे शारीरिक संबंधांप्रमाणेच मुलांच्या विचारशक्ती, कल्पनाशक्तीचा अंदाज घेणं, ते समजून घेणं हेही महत्त्वाचं असतं. अशा प्रकारचे सिनेमे मराठीत होत आहेत कारण मराठी प्रेक्षक तेवढा प्रगल्भ आहे. अशा सिनेमांमधून मिळालेला संदेश समजून घ्यायला आणि समजावून सांगण्याइतका सक्षम आहे. म्हणून मराठी दिग्दर्शक धाडस करतात. तसंच असे सिनेमे व्हायलाच हवेत. यातून चुकीचं चित्र कधीच रेखाटलं जात नाही. सिनेमा समाज बदलू शकत नाही. पण महत्त्वाचे मुद्दे प्रेक्षकांसमोर निश्चितपणे आणू शकतो. प्रेक्षकांना सतर्क करू शकतो.’

‘टपाल’ या सिनेमाच्या अवघी बॉलीवूडनगरी प्रेमात होती. हा सिनेमा खरं तर एका वेगळ्याच गोष्टीचा. पण, याची सुरुवात होते ती सिनेमातल्या रंग्यापासून. रंग्याला कुकी नावाची एक मुलगी आवडत असते. तिला इम्प्रेस करण्याचा तो जमेल तितका प्रयत्न करत असतो. तिला आपल्या भावना कळाव्यात म्हणून तो तिला एक पत्र लिहितो आणि सिनेमा इथून एक वेगळं वळण घेतो. सिनेमाची कथा वेगळी असली तरी रंग्याच्या प्रेमाचं भावविश्व सिनेमात रंगवलंय. आवडणाऱ्या मुलीला पत्र लिहिणं, एखाद्या मुला-मुलीचं नावं एकत्र फळ्यावर किंवा बाकावर लिहिणं असं सगळं शाळेत असताना अनेकांनी अनुभवलं असतं. आजही हे सगळं घडतं. फरक इतकाच आता ते ठळकपणे एकमेकांच्या समोरासमोर होत असतं. ‘किल्ला’ हा आगामी सिनेमाही खरं तर वेगळ्या विषयाचा आहे. पण, सिनेमातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या, चिनूच्या शालेय जीवनाशी संलग्न आहे. चिनू सातवीत. त्यामुळे तो आणि मित्र परिवार यांची धमाल सुरू असतेच. मुलीकडे बघणं, ती आपल्याच वर्गात आहे रे असं मित्राचं सांगणं, प्रार्थना म्हणताना तिच्याकडे बघणं असं सारं रेखाटलं आहे. शाळेतला सगळ्यांच्या आवडीचा खेळ म्हणजे एकमेकांच्या नावावरून चिडवणं. आपल्या मित्राला आवडणाऱ्या मुलीचा उल्लेख ‘वहिनी’ असा करणं हा त्या खेळाचा महत्त्वाचा भाग.

सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं. हे अनुकरण करणाऱ्यांमध्ये मोठी संख्या ही याच वयोगटातली असते. त्यामुळे अशा प्रकारचे सिनेमे दाखवताना त्यात समाजाचं चित्रणंही रेखाटलं जातं आणि त्याचा प्रभावही मुलांवर होत असतो. थोडक्यात काय, तर टीन एजमधल्या मुलांचं भावविश्व हा सिनेमाचा यूएसपी झालाय. चित्रपटाची कथा वेगळी असली तरी लहान मुलांच्या भावना, विचारप्रणाली, कल्पनाशक्ती या सगळ्याचं चित्रण या ना त्यानिमित्ताने सिनेमांमधून होताना दिसतंय. विषय महत्त्वाचा असला, त्यामागचा हेतू योग्य असला तरी सिनेमांतून हे भावविश्व रेखाटण्याचं प्रमाण अलीकडे वाढताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:28 am

Web Title: effects of movies on children
Next Stories
1 सोळाव्या वर्षी लॉग इन
2 हातात हात..तरीही मार्ग एकलाच
3 फडणवीसांच्या हाती ‘महाराष्ट्र माझा’
Just Now!
X