News Flash

रुचकर आणि शॉपिंग : प्रयोगांचा सीझन

येत्या काळात आपली खरेदी करण्याची पद्धत, कपडय़ांची निवड, खरेदी आणि खर्चाची समीकरणं अशा अनेक बाबतीत फरक जाणवू लागेल.

यंदाच्या ट्रेण्ड्समधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आशावाद’.

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

यंदाचं वर्ष बऱ्याच अर्थानी वेगळं ठरलं. आपल्या चाकोरीबद्ध आयुष्यात एखाद्या अनपेक्षित कारणाने व्यत्यय आला तर काय होऊ शकतं, आपण बदल स्वीकारायला तयार आहोत की नाही, आपल्या सवयींमध्ये आल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी किती लवचीकता आहे, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तपासण्याची संधी या वर्षांने सर्वानाच दिली. या बदलांचं प्रतिबिंब तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या फॅशन आणि पेहरावात आता दिसू लागेल. त्याची झलक यंदाच्या विविध फॅशन वीकमध्येही दिसली. येत्या काळात आपली खरेदी करण्याची पद्धत, कपडय़ांची निवड, खरेदी आणि खर्चाची समीकरणं अशा अनेक बाबतीत फरक जाणवू लागेल. त्यामुळे यंदाच्या ट्रेण्ड्सचा आढावा घेताना या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे.

यंदाच्या ट्रेण्ड्समधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आशावाद’. जवळपास वर्षभर अख्खं जग करोनाच्या छायेखाली होतं. स्वत:चा जीव वाचवण्याच्या उद्देशाने आपण सगळ्यांनीच हे वर्ष कडीकुलपात घालवलं. या सावलीतून बाहेर पडून पुन्हा नव्या जगात प्रवेश करताना कुठल्याही प्रकारचा बोजड देखणेपणा अंगी आणण्यापेक्षा प्रत्येकालाच स्वच्छ आशावाद आणि प्रसन्नता हवी आहे. डिझायनर्सनीही हेच लक्षात घेतलं आहे. त्यामुळे यंदाची कलेक्शन्स ही नीटनेटकी आणि देखणी आहेत.

उजळ रंगांचा वापर

या वर्षी ‘क्लासिक ब्ल्यू’ म्हणजेच आकाशी छटेच्या निळ्या रंगाला ‘कलर ऑफ द इयर’ घोषित करताना ‘पँटोन’ या ब्रॅण्डने सांगितलं हा रंग विश्वास आणि निष्ठेचा आहे. व्यक्तीच्या कामातील सातत्य आणि आत्मविश्वास यातून व्यक्त होतो. आकाशाच्या रंगाशी मिळताजुळता असलेला हा निळाशार रंग परिघापलीकडच्या कल्पनांना साद घालतो. नेमकी हीच भावना मनी बाळगत डिझायनर्सनी यंदा आकाशी, गुलाबी रंगाच्या विविध छटा, क्रीम, गडद हिरवा, लाल, झेंडूच्या फुलांचा पिवळा रंग अशा रंगांना आवर्जून पसंती दिली आहे. पांढऱ्याशुभ्र रंगातील साधेपणातसुद्धा डिझायनर्सचा जीव गुंतला आहे. त्यामुळे अगदी साडय़ांपासून ते रोजच्या वापरातील ड्रेसेसपर्यंत या रंगांमधील कपडय़ांची विविधता पाहायला मिळत आहे. हे रंग निसर्गाशी एकरूप होणारे आहेत. त्यामुळे त्यांचा उजळपणा नजरेत भरतो पण तो भडक वाटत नाही. हाच परिणाम सध्या अपेक्षित आहे. लग्नसराई लक्षात ठेवून सोनेरी, चंदेरी रंगाच्या मेटॅलिक छटांचीसुद्धा मुक्त उधळण केलेली पाहायला मिळते.

सहज, सुंदर पेहराव

मधल्या काळात साडी ड्रेस, एसिमेट्री असे बरेच प्रयोग करण्यात आले होते. यंदा या प्रयोगांना थोडी विश्रांती देण्यात आली. त्याऐवजी सध्या सोप्या पद्धतीचे पेहराव रनवेवर पाहायला मिळाले. साडीचा देखणेपणा तसाच ठेवत ब्लाऊजच्या प्रकारामध्ये वैविध्य साधण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला. पारंपरिक कापडांचा वापर साडय़ांमध्ये करण्यावर यंदा आवर्जून भर देण्यात आला. त्यामुळे साडीला पुन्हा तिचं मूळ रूप मिळालेलं पाहायला मिळालं. यंदा डिझायनर्सचा उद्देश कोणताही भन्नाट प्रयोग किंवा वेगळ्या स्वरूपातील कपडे सादर करणं हा नव्हता. त्याऐवजी कपडय़ांच्या मूळ स्वरूपाला देखणेपणा देताना त्यातील निरागसता तशीच टिकवून ठेवायचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे लेहेंगा-चोळी, अनारकली, कफ्ताना, सलवार सूट, स्कर्ट, कुर्ते असे पारंपरिक कपडय़ांचे प्रकार पुन्हा रनवेवर पाहायला मिळाले. पुरुषांच्या कलेक्शनमध्येसुद्धा शेरवानी, सूट्स, अंगरखा असे पारंपरिक प्रकार पाहायला मिळाले.

पण कपडय़ांचं मूळ स्वरूप कायम ठेवताना त्यात छोटेछोटे बदल करून त्यांना उठाव देण्याचा प्रयत्न मात्र डिझायनर्सनी केला. त्यामुळे स्लिव्हमध्ये वैविध्य पाहायला मिळालं. विशेषत: बलून स्लिव्ह, पूर्ण बाह्य यंदा पाहायला मिळाल्या. ओढणीऐवजी ड्रेप, जॅकेट, श्रगचा वापर केला गेला. कपडय़ांचा घेरेदारपणा कायम ठेवण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला. त्यासाठी मलमल, सिल्क, चंदेरी या वजनाने हलक्या कापडाचा वापर करण्यात आला. या कपडय़ांवर पारंपरिक कलाकुसरीचे अनेक नमुने पाहण्याची आणि मिरविण्याची संधी यंदा ग्राहकांना मिळणार आहे. भारतातील वेगवेगळ्या गावांमधल्या लोप पावत जाणाऱ्या अनेक कलाकुसरीच्या प्रकारांना यंदा या डिझायनर कपडय़ांवर जागा मिळाली आहे. त्यामुळे भारतीय कारागिरांना नवी संजीवनी देण्याचा प्रयत्नसुद्धा झाल्याचं दिसतं. फॅशनउद्योगाच्या नाडय़ा या कोणा एका डिझायनर किंवा ब्रँडच्या हातात नाही. विविध स्तरांवर डिझायनर ते कारागिरापर्यंत कित्येक जण या व्यवसायात गुंतलेले आहेत. गेल्या वर्षभरात यातील कित्येकांच्या हातातील कामं गेली किंवा कमी झाली. त्यामुळे यंदा या सगळ्यांना एकत्र घेऊन नवी उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बदलत्या काळाचा परिणाम

प्रत्येक पिढीगणिक समाजाचं चित्र बदलत जातं असं म्हणतात. गेल्या काही वर्षांमध्ये कॉपरेरेट संस्कृतीमध्ये कमालीचे बदल झाले आहेत. विशेषत: पेहरावाच्या बाबतीत हे बदल उल्लेखनीय आहेत. एकेकाळी भारतीय पद्धतीचा पेहराव या संस्कृतीमध्ये गावंढळ म्हणून हिणवला जायचा. आता त्याच पेहरावाच्या बदललेल्या रूपाचं कौतुक होत आहे. आजची पिढी एखाद्या मीटिंगसाठी किंवा एरवीही शर्ट-ट्राऊझरऐवजी कॉटनची साडी नेसायला पसंती देते. त्यासाठी त्यांना कुठल्याही पारंपरिक सणाची वाट पाहावीशी वाटत नाही. नेसायला आणि वावरायला सुटसुटीत अशा या साडय़ा कित्येकींना पाश्चत्त्य पेहरावापेक्षा सोयीच्या वाटतात. त्याशिवाय कुर्ता, सलवार यांचा प्रवेश ऑफिसमध्ये केव्हाचाच झालेला आहे. पण सध्या या लूकला नवीन पद्धतीमध्ये सादर केलं जातं. पुरुषांच्या एरवीच्या पट्टय़ाच्या शर्ट्सना पर्याय म्हणून वेगवेगळे प्रिंट्स असलेले शर्ट्स वापरले जातात. त्यावर हत्ती, पेझ्ली, सूर्य, फुलं, मोर असे पारंपरिक प्रिंट्स हमखास दिसतात. हे शर्ट्स पाश्चात्त्य पद्धतीच्या सूट्सबरोबरसुद्धा सहजपणे घातले जातात. कित्येकदा सूट्समध्येही या प्रिंट्सची नाजूकशी कलाकुसर पाहायला मिळते.

पारंपरिक चंदेरी, सिल्क, कलकत्ता कॉटन या कापडांचा वापर करून स्कर्ट्स, ड्रेसेस, ट्राऊझर, जॅकेट्स साकारले जातात. अगदी खणाच्या कापडाचे शॉर्ट्स, स्कर्ट्ससुद्धा तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. एरवीच्या पाश्चात्त्य पेहरावाला हे कपडे पर्याय ठरतात. यातही यंदा प्रयोग पाहायला मिळाले. विशेषत: ट्राऊझरवर किंवा वन पीस ड्रेस म्हणून वापरण्यास सोयीचे असे टय़ुनिक्सचे प्रकार दिसले.

यंदा तरुणांच्या कामाच्या स्वरूपात झालेला मोठा बदल म्हणजे घरातून काम करण्याची संस्कृती. टाळेबंदीच्या काळात या पद्धतीला पर्याय नव्हता. साहजिकच नव्या उमेदवाराची मुलाखत असो, महत्त्वाच्या मीटिंग असोत वा एरवीचं कामकाज असो सगळं ऑनलाइनच घडत होतं. अर्थात घरी आहोत म्हणून घरचे कपडे घालून मीटिंगला बसलो, हे चालत नाही. त्यामुळे प्रत्येक जण अंगावर चांगला शर्ट, कुर्ता, टी-शर्ट चढवून मीटिंगला हजेरी लावत असे. लॅपटॉपच्या स्क्रीनवर कमरेखालचा भाग दिसत नसल्यामुळे चांगली पँट घातली नाही तरी चालायचं. पण येत्या काळामध्ये टाळेबंदी पूर्णपणे संपल्यावरसुद्धा कामाची ही पद्धत कायम राहायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन मीटिंगमध्येसुद्धा रुबाबदार दिसणं ही काळाची गरज बनलेलं आहे. साहजिकच कमरेच्या वरच्या बाजूस व्यवस्थित ड्रेसअप होण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. यंदा डिझायनर्सनी कलेक्शन्समध्ये या बाबीचासुद्धा विचार केलेला आहे. त्यामुळे नेकलाइनचे वेगवेगळे प्रकार, स्लिव्हमध्ये बदल, कॉलरच्या स्टाइल्स आवर्जून पाहायला मिळाल्या. मोठय़ा गळ्याच्या टय़ुनिकवर एखादं छानसं पेंडेटसुद्धा उठून दिसतं किंवा बंद गळ्याच्या कुर्त्यांबरोबर झुलणारे डूल खुलून दिसतात. या बाबी डिझायनर्सनी हेरल्या आहेत. तसचं या मीटिंग्समुळे यंदा मेकअपमध्येसुद्धा डोळ्यांवर जास्त भर दिला आहे. काळ्या रंगाऐवजी निळ्या, नारंगी, लाल, गुलाबी रंगाची उजळ लायनर, वेगवेगळ्या रंगांचा मस्कारा वापरून मेकअप केला जात आहे. अर्थात कॉर्पोरेट  लुक लक्षात घेता कमीतकमी मेकअप वापरून डोळ्यांवर लक्ष कसं केंद्रित करता येईल याचा प्रयत्न यंदा करण्यात आला. तसचं मेटॅलिक लायनरचा वापरसुद्धा केलेला दिसून आला. हेअरस्टाइलवरसुद्धा याच कॉर्पोरेट लूकचा प्रभाव दिसला. मोकळे सोडलेले केस, उत्पादनांचा अति वापर करून कठीण हेअरस्टाइल करण्यापेक्षा सोप्या हेअरस्टाइलवर जास्त भर दिलेला दिसला. मागे बांधलेले केस, वेणीचे प्रकार, अंबाडय़ामध्ये वैविध्य आणण्याकडे डिझायनर्सनी भर दिला.

शॉपिंगचं बदलतं स्वरूप

येत्या काळात टाळेबंदी पूर्णपणे उठली तरी अंतरभान राखण्याला पर्याय नाही. त्यामुळे एरवी ज्या खुलेपणाने आपण खरेदीला जात असू, त्याला कमीअधिक प्रमाणात आळा बसणार आहे. विशेषत: कपडे खरेदी करताना ट्रायल रूमची गरज ही प्रत्येकाला असतेच. पण कित्येकांनी वापरलेली खोली र्निजतुक न करता आपण वापरायची, त्यात दुकानात कित्येकांनी वापरलेले कपडे पुन्हा अंगावर चढवायचे याबद्दल भीती वाटणं साहजिक आहेच. त्यामुळे सध्या या प्रश्नावर मार्ग शोधण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. शॉपर स्टॉपमध्ये सभासदत्व घेतल्यास प्रत्येक ग्राहकाला वेगळी ट्रायल रूम आणि खरेदी करण्यासाठी एक मदतनीस देण्याची सोय करण्यात आली आहे. तुम्ही वेबसाइटवर जाऊन दुकानात येण्याची वेळ नोंदवायची. नंतर दुकानात तुमच्यासाठी एक मदतनीस हजर असेल. तो तुमच्या गरजेनुसार कपडे निवडून आणून देईल. कपडे र्निजतुक करून तुम्हाला परिधान करण्यासाठी दिले जातील. तोपर्यंत ग्राहकांनी त्यांना नेमून दिलेल्या खोलीमध्ये आरामात बसायचं. या स्वरूपाच्या सोयींची भविष्यात गरज भासणार आहे.

ऑनलाइन खरेदीही पूर्वीइतकी सुरक्षित नाही. ‘मिंत्रा’मध्ये आता ग्राहकांना फक्त त्यांच्या साइजनुसारच नाही, तर शरीरयष्टीनुसार कपडे निवडण्याची संधी दिली जात आहे. यामध्ये ग्राहक आपल्या शरीराचं माप नोंदवू शकतात त्यानुसार शरीरयष्टीला साजेसे कपडय़ांचे पर्याय त्यांना सुचविले जातात. मध्यंतरीच्या काळामध्ये एखाद्या संगणकीय प्रणालीच्या मदतीने दुकानामध्ये ग्राहकाची त्रिमितीय प्रतिकृती तयार करून त्यावर कपडे कसे दिसत आहेत, हे तपासायची सोय ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे प्रयोग सुरू होते. भारतात या स्वरूपाचे प्रयोग ‘बिगथिंग्स’ या कंपनीमध्ये होत आहेत. या पद्धतीमध्ये ग्राहकाच्या शरीराची मापं संगणकात नोंदवून त्याची संगणकीय प्रतिकृती तयार करण्यात येईल. जेणेकरून या प्रतिकृतीवर वेगवेगळे कपडे चढवून ग्राहकाला आपली पसंती निश्चित करता येईल. यामुळे प्रत्यक्ष कपडय़ांना स्पर्श करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. व्हच्र्युअल ट्रायल रूमच्या प्रयोगांनी भारतात आता जोर धरला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रत्यक्ष कपडे घालून त्याचा अनुभव घेता येणार नाही, पण त्या कपडय़ांमध्ये आपण कसे दिसत आहोत याचा अंदाज मात्र नक्की बांधता येईल. या पद्धतीमध्ये तुम्ही निवडलेले कपडे कसे दिसतात, हे पाहता येतंच शिवाय त्याची मदत तुम्हाला स्टायलिंगसाठीही होते. तुम्ही निवडलेल्या कपडय़ांबरोबर कोणत्या अ‍ॅक्सेसरीज, शूज, बॅग जुळून येतात, कुठला मेकअप साजेसा दिसतो हे सगळं तुम्हाला या पद्धतीमध्ये दाखवलं जात. त्यामुसार तुम्ही इतर पर्यायांची खरेदीसुद्धा करू शकता.

काही मेकअप ब्रँड त्यांच्या अ‍ॅपमध्ये तुमच्या चेहऱ्याची प्रतिकृती घेतात, त्यासोबतच्या प्रश्नावलीमध्ये तुमच्या चेहऱ्याचा पोत, त्याचं स्वरूप याबद्दल माहिती विचारली जाते आणि त्यानुसार तुम्हाला उत्पादनं सुचवली जातात. ‘नायका’, ‘लॅक्मे’सारख्या ब्रँडची लिपस्टिक, ब्लश, आयश्ॉडोसारखी उत्पादने अ‍ॅपवर उपलब्ध करून दिलेल्या प्रतिकृतीवर वापरून किंवा तुमचा चेहरा स्कॅन करून त्यावर तपासून खरेदी करता येतात. त्यामुळे दुकानांमध्ये इतरांनी वापरलेली उत्पादने वापरून एखादा संसर्ग होण्याची शक्यता टाळता येते. नवीन आलेले ब्रँड ऑनलाइन विक्री करताना त्वचा आणि केसांची उत्पादनं थेट विकण्याऐवजी ग्राहकांना प्रश्नावली पाठवतात. त्यातील उत्तरांनुसार त्यांच्या चेहऱ्याला किंवा केसांना साजेसे साबण, शँपू, कंडिशनर, मॉइश्चरायझर आणि इतर उत्पादनं सुचवली जातात.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर खरेदीच्या वेळी ग्राहक अधिक काळजी घेणार हे नक्की! हेच लक्षात घेऊन दुकानांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. ग्राहकांच्या मनामधील भीती दूर करून त्यांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्याची धडपड आता सुरू होईल. त्यामुळे या नव्या नांदीच्या घंटा वाजणे साहजिकच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 7:41 am

Web Title: experiment in fashion ruchkar ani shopping dd70
Next Stories
1 रुचकर आणि शॉपिंग : ट्रेण्ड अ‍ॅक्सेसरीजचा
2 श्रद्धांजली : पर्यावरणाचा खरा शिलेदार
3 राशिभविष्य : दि. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२०
Just Now!
X