निसर्गात बदलत्या ऋतुमानाप्रमाणे फळं बदलतात. त्या त्या ऋतूत येणारी ही विविध प्रकारची फळं खावीत असं सांगितलं जातं. कारण त्यांचे गुणधर्मही त्या काळातल्या हवामानाला अनुसरूनच असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवठ
कवठ हे चवीने तुरट, गोड व काही प्रमाणात आंबट असते. पिकलेले कवठ अरुची दूर करते. उत्तम पाचक व वातानुलोमन करते. कवठाबरोबर गूळ किंवा जिरेपूड व चवीला मीठ अशी चटणी फारच चांगली व पौष्टिक आहे. कवठ हे उचकी व उलटीवर उत्तम औषध आहे. पिकलेल्या कवठाचा गर वाळवून त्याचे चूर्ण नियमाने घ्यावे. जुनाट संग्रहणी, अतिसार, पोटदुखी आजार बरा होतो. कफप्रधान अम्लपित्तात त्याचे वाळलेले चूर्ण चांगले कार्य करते. छातीतील जळजळ, ढेकर याकरिता कवठ व ओवा चूर्ण एकत्र करून खावे. कवठाच्या चूर्णाचा वापर एक काळ, पाचक चूर्णात उत्तम घटकद्रव्य म्हणून केला जायचा. कवठाचा गर पाण्यात कुस्करावा. पाणी गाळून घ्यावे व त्या पाण्याच्या भावना ओवाचूर्णाला द्यावा. असे ओवाचूर्ण पाचक चूर्णाकरिता वापरले की एकाच वेळी अरुची व अग्निमांद्यावर मात करता येते. कच्चे कवठ कदापि वापरू नये.
केळे: खावे, न खावे
आयुर्वेदीय ग्रंथात केळय़ाचे गुण सांगितलेले आहेत, तशा गुणाची केळी क्वचितच बाजारात मिळतात. आजकालची केळी ही भट्टी लावून एका रात्रीत पिकवलेली केळी असतात. त्यामुळे निसर्गनियमाने झाडावर पिकलेल्या केळय़ांपेक्षा या हिरव्या सालीच्या केळय़ांचा गुणांचा असा सापेक्ष विचार करावयास हवा. बंगलोर ते म्हैसूर अशा प्रवासात वाटेत एका गावात वेगळय़ाच जातीची, हिरवीगार केळी मिळतात. आपण चिक्कू किंवा पेरू खातो तशी ही केळी साल न काढता सरसकट खाल्ली जातात. केळय़ाच्या वेफर्सकरिता वापरली जाणारी केळय़ाची जात काही वेगळीच असते. त्या केळय़ांचे घडचे घड वाहून नेणारे ट्रक माटुंगा, मुंबई येथे नेहमी येत असतात.
केळय़ाच्या सर्वमान्य गुणांत पौष्टिक, थंड, जड, स्निग्ध, शुक्रवर्धक, दाहनाशक, क्षत व क्षय विकारात उपयुक्त असा शास्त्रांचा सांगावा आहे. ग्रंथाप्रमाणे केळे हे कफकारक व मलावरोध निर्माण करणारे आहे. प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते व रुग्ण अनुभवाने आपण काय शिकावयाचे. ‘केळय़ाचे पथ्यापथ्य’ कसे सांभाळायचे हे पाहू. कारण अजून तरी गरीब माणसाकरिता केळे ही एकमेव चैन राहिली आहे.
ज्यांचे वजन खूप कमी आहे. नोकरी मिळवण्यात वजनाची अडचण येते किंवा लग्नाच्या बाजारात मुलामुलींना पंचाईत पडते, त्यांनी प्रयत्नपूर्वक वजन वाढवावयास हवे. त्याकरिता किमात एक महिना हिरव्या सालीची दोन केळी, काळी मिरेपूड व शक्य असल्यास चमचा दोन चमचे चांगले तूप असा सकाळी व रात्री खाण्याचा प्रघात ठेवावा. सर्दी, कफ यांचा त्रास असणारांनी सकाळी केळी खावी. केळय़ाचे अजीर्ण होऊ नये म्हणून बरोबर वेलची दोन-चार दाणे खावे.
आग होणे, केस गळणे, रूक्षता, पोटात आग पडणे, डोकेदुखी, दुबळेपणा, क्षय या विकारात केळे योग्य अनुपानाबरोबर खावे.
केळे खाऊन काहींना मलावरोध होतो. पण त्यापेक्षा अधिक संख्येच्या लोकांना उशिराने का होईना मलप्रवृत्ती साफ होते असा अनुभव आहे. दूध व केळे एकत्र घेऊ नये असा आहार शास्त्राचा सांगावा आहे. त्याकरिता शिकरण करून खाण्यापेक्षा केळे खाऊन वर दूधसाखर घ्यावी. मलावरोध होत नाही.
केळीच्या खुंटाचा रस हा मासिक पाळी व्यवस्थित होण्यास उपयोगी पडतो. कष्टार्तव, अल्पार्तव या तक्रारीत दोन-तीन चमचे हा रस नियमाने महिनाभर घ्यावा. हा रस उष्ण आहे.
केळीच्या वाळलेल्या खुंटाची राख लघवी साफ करते. लघवी अडली असल्यास अशी राख चमचाभर, एक ग्लासभर पाण्याबरोबर घ्यावी, लघवी सुटते.
कुपथ्यकारक केळे- माझ्या पथ्यापथ्याच्या लाल कागदात केळे शब्दावर सारखी काट मारावी लागते. कारण केळे हे कृत्रिमपणे, जबरदस्तीने, भट्टी लावून पावडर मारून पिकवले जाते. खूपदा केळे शरीरात आमांश निर्माण करते. आम किंवा शौचाला चिकटपणा व अग्नी मंद करणे हे केळय़ाच्या स्वभावातील दोष आहेत. त्यामुळेच आमांश, कृमी, जंत, कोड, त्वचाविकार, कफविकार, दमा, सर्दी, पडसे, खोकला, टॉन्सिल्सची फाजील वाढ, ताप, फुफ्फुसाचे विकार, मधुमेह, रक्ताचे विकार, शय्यामूत्र, सायटिका, सांध्याचे व वाताचे विकार, सोरायसिस या विकारात केळे पूर्ण वज्र्य करावे.
कोडाच्या पांढऱ्या डागाच्या दुखण्यात तसेच लहान बालकांच्या कफ विकारात केळे जरूर टाळावे. कावीळ व गोवर, कांजिण्या विकारात केळय़ातून औषध देण्याचे फॅड आहे. त्याचा गुणापेक्षा तोटाच जास्त होतो. अपवाद म्हणून वेलची केळे देण्यास हरकत नाही. हे केळे शिळे झाले, साल काळी पडली, तरी आत केळे उत्तम टिकून असते. हे केळे अपायकारक नसते. केळय़ाचे पीठ, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा, शेंगदाणे व खोबरे याचे थालीपीठ हे उपवासाकरिता व एकूण विचार करता उत्तम टॉनिक आहे. मात्र खाणाऱ्याचा पाचकाग्नि मंद नसावा!
डाळिंब
ढोलका, भावनगरी, गणेश, पांढरे दाण्याचे डाळिंब अशी डाळिंबाची विविध नावे आहेत.
डाळिंब लालचुटूक दाण्याचे आकर्षक रंगाचे असूनही आंबा, केळी, द्राक्षे, संत्री, मोसंबी, बोरे यासारखे मोठय़ा प्रमाणावर वापरात नाही. त्याला कारण दाणे चोखून खाण्याचा आळस किंवा त्याची वाढलेली किंमत असावी.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे गोड चवीचे डाळिंब पित्त कमी करते. आंबट चवीचे डाळिंब पित्त वाढवत नाही पण कमीही करत नाही. मात्र कफ करून वाताचे अनुलोमन करते. सर्व प्रकारची डाळिंबे ही हृदयास हितकर, स्निग्ध, फाजील कफ वाढू न देणारी व त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणारी आहेत. मलप्रवृत्तीस आवर घालून अग्निवर्धक व रुची उत्पन्न करण्यास डाळिंबाच्या रसात किंवा दाण्यांचा उपयोग होतो. आयुर्वेदात प्रत्येक रसाच्या पदार्थात अपवादात्मक द्रव्ये सांगितली आहेत. डाळिंब आंबट रसाचे वर्गात असले तरी त्या आंबट रसाचे दुर्गुण नाहीत. उष्णता वाढविणे, रक्तपित्ताचे विकार निर्माण करणे, चक्कर, कंडू, पांडूता, धावरे, गळवे, तहान, शोष हे विकार डाळिंब उत्पन्न न करता उलट या विकारात डाळिंब फायदेशीर पथ्याचे आहे. डाळिंबाचे फूल, डाळिंबाची साल, वाळलेले दाणे व मूळ यांचा औषधात उपयोग आहे. डाळिंब हे कधीही तुरट किंवा आंबट वापरू नये. डाळिंबाचा दाणा मऊ व भरपूर रसाचा असावा. रंगाने पांढरा असला तरी चालेल.
डाळिंबाच्या वाळलेल्या दाण्यांना अनारदाणा नावाने बाजारात ओळखतात. अनारदाण्याची चटणी चव उत्पन्न करते. सोबत फक्त मिठाची गरज असते. थोडाफार अधिक आहार झाला तर सुकवलेले डाळिंब दाणे सुपारीसारखे खावेत. स्त्रियांच्या अत्यार्तव विकारात तसेच रक्ती आव विकारात अनारदाणा उपयुक्त आहे.
टेपवर्म किंवा लांबलचक जंत विकारात डाळिंबाच्या मुळाच्या सालीचा उपयोग होतो. डाळिंबाच्या सुकलेल्या फळाचे चूर्ण, श्वेतप्रदर, धुपणी, राजयक्ष्मा, शोष, थुंकीतून रक्त पडणे या तक्रारींवर उपयुक्त आहे.
डाळिंबाची साल लहान बालकांच्या बाळगुटीतील एक अत्यावश्यक औषध आहे. लहानग्याचा कफ, सर्दी, खोकला वारंवार उद्भवू शकणाऱ्या तक्रारींवर डाळिंबसाल फार उपयुक्त आहे. याच सालीचे चूर्ण वृद्धांच्या खोकल्यावर लवंग चूर्णाबरोबर व मधाबरोबर द्यावे. त्यामुळे ढास थांबते. वृद्ध माणसांनी डाळिंबसाल व खडीसाखरेचा खडा चिघळावा. खोकला कमी होतो.
डाळिंबाचा सर्वात उपयुक्त भाग त्याचा ताजा रस हा आहे. डाळिंबाचा रस व मध हे मिश्रण म्हणजे जुनाट संग्रहणी, अतिसार, जुलाब, कॉलरा, पांडुता, क्षय, जुनाट पित्तप्रधान खोकला, थुंकीतून, कफातून रक्त पडणे या विकारात फारच उपयुक्त आहे. कृश व्यक्तींनी मधाऐवजी तुपाबरोबर डाळिंब रस घ्यावा. भोजनानंतर मलप्रवृत्ती होत असेल तर जेवण थोडे कमी करावे. नंतर डाळिंब दाणे खावे व सुंठ पाणी प्यावे. किंवा जेवणानंतर डाळिंब रस, सुंठ चूर्ण मिसळून घ्यावा. अल्पमोली बहुगुणी खोकला चूर्णात डाळिंबाची साल हे प्रमुख घटकद्रव्ये आहे. सोबत मिरी, टाकणखार लाही, बेहडा, ज्येष्ठमध अशी घटकद्रव्ये आहेत.
स्वरभंग विकारात तसेच शोष पडणे, अम्लपित्त होणे, नागीण या विकारात गोड डाळिंबाचा रस उत्तम काम करतो. पित्तामुळे गर्भिणीच्या उलटय़ांवर डाळिंबाचे नुसते दाणे चघळून खाणे पथ्यकर आहे.
ताडफळ
ताडगोळे किंवा ताडफळ मुंबईत जास्त खाण्यात आहे. उन्हातान्हात हिंडण्याचा ज्यांना त्रास होतो. हॉटेलमधील तिखट पदार्थाने जळजळ, तहान, डोळय़ांची आग, आमाशयाचा दाह, हातापायांची भगभग या विकारात ताडफळे नियमित खावी. जून ताडफळे खाऊ नयेत. आतडय़ांतील रूक्षता, रूक्ष त्वचा, वारंवार गळवे होणे, रसक्षय, चिडचिड, शब्द सहन न होणे, थोडय़ाशाही कामाने थकवा, उष्णतेशी सतत संपर्क याकरिता ताडफळे नियमित खावी. स्थूल व्यक्तींनी निधरेकपणे खावी. ताडफळ मूत्रल आहे. चरबी वाढू देत नाही. शरीरात रसधातू वाढविण्याचे कार्य करते. मधुमेही मंडळींनी ताडफळे जरूर खावीत.
रूक्ष व शिथिल त्वचेकरिता ताडगूळ फारच उपयोगी आहे. अग्निमांद्य विकारामुळे शरीर सुकत चालले असता ताडगूळ खावा. शरीर सुधारू लागते. याशिवाय ज्यांना ताजी निरा मिळते, त्यांनी सकाळी एक ग्लास निरा प्यावी. प्रकृती खुटखुटीत होते. सर्दी, खोकला, दमा या विकारांनी ग्रस्त असणारांनी ताडफळे खाऊ नये. ताडफळांवर गार पाणी पिऊ नये.
द्राक्षे
आंबा हा फळांचा राजा मानला जातो, पण आयुर्वेद शास्त्रकारांनी द्राक्षाला सर्व फळांत श्रेष्ठ मानले आहे. द्राक्ष हे मधुरच हवे, आयुर्वेदातील मधुर द्रव्यांच्या गणात त्याचे वर्णन आहे. पुढील सर्व गुणधर्म हे गोड द्राक्षाचेच आहेत. द्राक्षाच्या सुरुवातीच्या हंगामात द्राक्षे खाऊ नयेत. मार्चमध्ये थोडे ऊन पडू लागल्यावर द्राक्षांना खरी गोडी येते. ती खावी, त्यावेळेस महाग असली तरी खावी.
द्राक्ष थोडेफार तुरट असले तरी चालेल. आंबट अजिबात नको. द्राक्ष थंड गुणाचे असून शुक्रवर्धक आहे. वजन वाढते. डोळय़ांना हितकारक आहे. लघवी व शौचास साफ व्हायला मदत करते. रक्तपित्त, तोंड कडू होणे, तहान, खोकला, दमा, कावीळ, छातीत दुखणे, जलोदर, थुंकीतून रक्त पडणे, क्षय, आवाज बसणे, मूतखडा, अरुची इत्यादी तक्रारीच्या निवारणार्थ द्राक्षांचा किंवा मनुकांचा उपयोग होतो. ताज्या द्राक्षांचा रस, शिरका, नुसती द्राक्षे, मनुका, मनुकांचे उकळून पाणी किंवा मनुकांची वाटून चटणी व मनुकांचा काढा इतक्या विविध प्रकारे द्राक्षे वापरता येतात. मनुकांच्या सहापट ताजी द्राक्षे वापरावी. द्राक्षांचा रस पिण्यापेक्षा ताजी द्राक्षे खावीत. कारण कोणत्याही रसामध्ये हवेच्या त्वरित संपर्काने दोष निर्माण होतात. मनुका धुतल्याशिवाय वापरू नयेत.
अग्निमांद्य, अजीर्ण, तोंडाला चव नसणे, अरुची या तक्रारींकरिता द्राक्षे मोजकीच खावीत. द्राक्षे नसली तरी मनुका व जिरे किंवा आले अशी चटणी खावी. जिभेला रुची येऊन भूक व पचन सुधारेल. विशेषत: चहा, सिगरेट, विडी, तंबाखू, अति जागरण किंवा मद्यपान यामुळे ज्यांची भूक नष्ट होते त्यांच्याकरिता मनुका वरदान आहेत. बिनबियाच्या मनुका खाऊ नयेत. गंधक द्रावात तयार केलेल्या नाशिक किंवा तासगावच्या स्वस्त मनुका खाऊ नयेत.
थंडी संपता संपता किंचित ऊन पडायला लागले की त्या सिझनमधल्या द्राक्षांना परम गोडी असते. ज्यांना द्राक्षांचा ‘अनोखा कायाकल्प प्रयोग’ शरीराच्या टिकाऊ स्वास्थ्याकरिता करायचा आहे त्यांनी पुढीलप्रकारे द्राक्षायोग करावा. दिवसभरात भूक, तहान लागली की फक्त उत्तम दर्जाची गोड गोड द्राक्षे स्वच्छ धुऊन खावीत. दिवसभरात जेमतेम ८०० गॅ्रम द्राक्षे खाल्ली जातात असा माझा व माझ्या ‘गुरुकुल पुणे वर्गातील’ आयुर्वेदप्रेमी, हौशी विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. दिवसभर कितीही श्रम झाले तरी थकवा अजिबात येत नाही. वाचकहो एक दिवस किमान फक्त द्राक्षावर राहूच बघाच. मग ‘द्राक्षा फलोत्तमा’ का म्हणतात हे तुम्हाला कळेल!
यकृताचे कार्य बिघडून जेव्हा कावीळ किंवा जलोदर विकार होतो. त्यावेळेस शौचास साफ होणे आवश्यक असते. त्याचबरोबर ताकद कमी होऊन किंवा पांडुता येऊन चालत नाही. त्याकरिता काळय़ा मनुका रोज पन्नास ते शंभर नग किंवा ताजी गोड द्राक्षे दोनशे ग्रॅमपर्यंत खावीत. काविळीतील रक्तांतील विषार द्राक्षांमुळे कमी होतो. मलमूत्रप्रवृत्ति साफ होते.
अकाली केस पिकणे, गळणे, त्वचा रूक्ष होणे. तरुण वयात त्वचेवर सुरकुत्या येणे, दुबळेपणा, म्हातारपण लवकर आल्यासारखे वाटणे या तक्रारीवर द्राक्षांच्या हंगामात ताज्या द्राक्षांचा रस ग्लासभर किंवा बिया काढून शंभर मनुका फार फायद्याच्या होतात.
यकृताच्या किंवा किडनीच्या कर्कविरात अनुक्रमे यकृत व वृक्क यांना बल मिळणे आवश्यक असते. मलमूत्र साफ ठेवणाऱ्या या दोन यंत्रणेकरिता भरपूर मनुका किंवा ताजी द्राक्षे उपयुक्त आहेत. गोवर, कांजिण्या, घाम खूप येणे, चक्कर येणे या तक्रारीत वयपरत्वे कमी जास्त प्रमाणात मनुका नियमित खाव्या. विशेषत: बालकांना खूप औषधांपेक्षा गोड द्राक्षे किंवा मनुकांचे पाणी द्यावे.
जळवात, डोळय़ांचे विकार, तोंड येणे, नागीण, पित्तविकार, फिटस्, रक्तीमूळव्याध, निद्रानाश या विकारात पित्तामुळे होणारी उष्णता कमी करण्याकरिता मनुका, मनुकांचा काढा किंवा ताजी द्राक्षे दोन चार आठवडे नियमित घ्यावी. डोळय़ाची भगभग, हातापायांची आग याकरिता द्राक्षांचा पेलाभर रस किंवा पंचवीस पन्नास मनुका पाण्यात उकळून ते पाणी घ्यावे.
क्षय, स्वरभंग, आवाज बसणे, कोरडा खोकला या विकारात उष्ण औषधे चालत नाहीत. द्राक्षांचा किंवा मनुकांचा ओलावा, स्निग्धपणा व गोडवा यांचा उपयोग होतो. थुंकीतून रक्त पडणे थांबते, फुफ्फुसातील व्रण भरून येतो. घरगुती स्वरुपाचे द्राक्षांच्या रसात उकळून सिद्ध केलेले तूप हे राजयक्ष्मा विकारांकरिता उत्तम टॉनिक आहे. तीव्र मलावरोध, खडा होणे, भगंदर, मूळव्याध, गुदद्वाराचा संकोच, स्ट्राँग औषधांच्या सवयीचे दुष्परिणाम याकरिता पंधरा दिवस सतत दोनशे ग्रॅम द्राक्षे किंवा शंभर मनुका चावून खाव्या. पक्वाशयाचे कार्य खात्रीने सुधारते. एड्स या दुर्धर विकारात अनेक प्रयोगांप्रमाणे गोड द्राक्षे किंवा मनुकांचे प्रयोग करून पहावा.
अनमोल ठेवा- नारळ
विधात्याने आपल्या प्रजेकरिता या पृथ्वीवर नारळ हा मोठा अनमोल ठेवा ठेवलेला आहे. अन्न, वस्त्र व निवारा या तीनही जीवनावश्यक गोष्टी प्राचीन काळापासून मानव नारळापासून मिळवत आहे. वापरत आहे. तसेच आरोग्यरक्षण व रोगनिवारण या कार्यातही नारळाचा मोठा वाटा आहे. नारळाचे खोबरे, तेल, पाणी एवढेच काय पण करवंटीसुद्धा औषधी उपयोगी आहे. यालाच नारिकेल तेल असे म्हणतात. नारळाच्या करवंटीपासून एककाळ करवंटी अर्क काढला जात असे. पुणे मंडईतील पावती नारळवाल्यांच्या मातोश्री असा अर्क काढून विविध त्वचा विकारांकरिता, त्यांचेकडे येणाऱ्या गरजू त्वचाविकारग्रस्त रुग्णांना देत असत. यावर अधिक संशोधन व्हावे.
नारळाचे पाणी स्निग्ध, मधुर, शुक्रवर्धक, थंड गुणाचे तरीही शरीरात फाजील चरबी न वाढवणारे आहे. तहान, पित्त व वायूचे एकत्रित विकारावर उपयुक्त आहे. काही प्रमाणात अग्निवर्धक व मूत्राशयाची शुद्धी करणारे आहे. असे आयुर्वेद शास्त्र सांगते. शहाळय़ामध्ये ग्लुकोज, प्रोटन ही द्रव्ये अधिक असतात. पक्व नारळात क्लोराईड किंवा क्षार थोडे अधिक असतात. त्यामुळे नारळाचे पाणी वापरायचे असेल तर कोवळे शहाळय़ाचेच वापरणे योग्य होय. नारळाच्या पाण्यात ए व बी व्हिटॅमिन आहेत. ओल्या खोबऱ्यामध्ये मांसवर्धक पदार्थ, वसा व ताडगूळ असतो. ओल्या खोबऱ्याच्या दुधात साखर, डिंक, अल्ब्युमिन, चिंचेसारखे आम्ल, खनिज ही द्रव्ये असतात. काही नारळाच्या जातीपासून चांगला गूळ तयार होतो. खोबऱ्यापासून साठ टक्के तेल निघते. आयुर्वेदाप्रमाणे खोबरे वातपित्तनाशक, बलवर्धक व शरीर पुष्ट करणारे आहे. रक्तविकार, उर:क्षय, क्षय व ज्वरात उपयुक्त आहे.
चहा कॉफी, दारू, सिगरेट इत्यादी व्यसनांमुळे किंवा जागरणाने भूक मंदावली असेल तर नारळाचे पाणी शरीराचा क्षोभ कमी करून भूक सुधारते. आम्लपित्त विकारात आतडय़ाचा दाह होत असल्यास ओल्या नारळाचे दूध प्यावे. अल्सर किंवा आतडय़ाचा व्रण मग तो पेपटिक किंवा डिओडिनम असला तरी नारळाचे दूध किंवा नारळाचे दूध आटवून केलेले खोबरेल तेल उत्तम उपाय आहे. एका नारळाचे खवून खोबरे काढावे. स्वच्छ फडक्यांत पिळून घ्यावे. लहान पळीत आटवावे. साधारण दोन-तीन चमचे तेल तयार होते. हे घरगुती खोबरेल उत्तम औषधी गुणाचे आहे.
ज्यांचे केस अकाली गळत आहेत. पिकले आहेत, नवीन मुळे कमजोर आहेत, जुनाट ताप, स्ट्राँग औषधे घेऊन डोळे व केस निस्तेज झाले आहेत. त्वचा रूक्ष झाली आहे त्यांनी मोठाली टॉनिक घेण्याऐवजी असे तेल नियमित प्यावे. दीड-दोन महिन्यात गुण मिळतो.
असेच तेल कृश व्यक्तींच्या संधिवातावर, विशेषत: गुडघे, पाठ, कंबर यांतील सांध्यातील वंगण कमी झाले असल्यास उपयोगी पडते. मात्र अशा रुग्णांना रक्तदाबवृद्धि, फाजील चरबी, असा विकार असता कामा नये.
अंग बाहेर येणे, रक्ती मूळव्याध, भगंदर या विकारात बाह्येपचारार्थ खोबरेल तेलाची घडी वापरावी. जळवात, निद्रानाश, हातापायाची, डोळय़ांची आग या विकारात या प्रकारचे हातपाय व कानशिलास खोबरेल तेल चोळावे. बाळंतपणातील कंबरदुखी, लहान बालकांना पहिले तीन महिने खोबरेल तेल मसाजाकरिता वापरावे. कृश व्यक्तीने, दूध कमी येत असलेल्या बाळंतिणीने ताजे खोबरे व चवीप्रमाणे साखर किंवा आल्याचा तुकडा नियमितपणे सकाळी खावा. दिवसभर ज्यांना श्रमाचे काम करावयाचे आहे त्यांच्याकरिता खोबरे मोठे टॉनिक आहे. गोवर, कांजिण्या, गरमी, परमा, लघवीची आग, लघवी कमी होणे, मूतखडा, युरिनरी इन्फेन्शन, घाम खूप येणे, तोंड येणे या विकारात शहाळय़ाचे ताजे पाणी हा उत्तम उपाय आहे. लघवी कमी होत असल्यासच नारळाचे किंवा शहाळय़ाचे पाणी प्यावे. ज्यांना लघवी भरपूर होते पण मार्गावरोध झाला आहे. त्यांनी नारळाचे पाणी घेऊ नये. तसेच पोटात वायू धरण्याची खोड असल्यास नारळपाणी पिऊ नये.
हृद्रोग, क्षय, फिटस् येणे, कर्करोग, हाडांचे विकार, सोरायसिस, मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून जास्त जाणे या तक्रारीच्या कृश व्यक्तींनी नारळ दूध किंवा तेल किंवा पाणी प्यावे. कावीळ, जलोदर, रक्तदाबवृद्धी या विकारात खोबरेल पिऊ नये. कानात कधीही खोबरेल तेल टाकू नये.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

More Stories onऔषधेMedicine
मराठीतील सर्व औषधाविना उपचार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fruits for health
First published on: 24-04-2015 at 01:21 IST