भक्त देवाला आळवतो, विनवतो हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण देव भक्ताला साद घालतो असं कधी ऐकलंय? नाही ना? मग वाचाच

‘जय देवाधिदेवा!’ म्हणून परमेश्वरानं भक्ताला साद घातलेली कधी कुणी ऐकलीय! पण तशी साद प्रत्यक्ष देवाधिदेवानं मला घातली त्याची ही कहाणी.
दिवसभराचे नित्याचे काम आटोपून रात्री अंथरुणावर पडलो. पहिला थोडा वेळ सैरभैर विचारांत या कुशीवरून त्या कुशीवर चाळवाचाळव करण्यात गेला. मग कधीतरी गाढ निद्रेत शिरलो. त्या दिव्य निद्रेत मी जे अनुभवलं ते थरारकच, अद्भुत आणि अनपेक्षितही होतं. मी खरोखर चक्रावलो.
एक तेजोवलय आकारत आकारत माझ्या अगदी सन्निध आलं. नि बघता बघता देवाधिदेव गजानन साक्षात माझ्यासमोर उभे राहिले. मी नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि चरणस्पर्श करणार त्याआधीच देवाधिदेव मला साद घालते झाले.
‘देवाधिदेवा- भक्तसख्या!’
मी चमकलोच. गणानाम्त्वाम् गणपती म्हणून सर्व पूजाअर्चाच्या आधी ज्याचे पूजन करतो तो परममहान महागणपती मला पामराला चक्क देवाधिदेव म्हणून साद घालू लागले! खरंच याचा अर्थ काय! प्रयोजन काय! का देव माझा परिहास करताहेत!
माझ्या गोंधळलेल्या मुद्रेकडे एकटक पाहात देव वदले ‘चक्रावू नकोस वत्सा- अरे भक्त हा देवाधिदेवच असतो. स्वर्गलोकीच्या आम्हा देवमंडळींची महात्मता, भूतलावरील या देवाधिदेवावरच निर्भर असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूलोकी, निराकार देवांच्या देवपणावर श्रद्धा ठेवून त्यांना आकार-स्वरूपांत स्थापित करून श्रद्धेवर जगणारे तुझ्यासारखे कितीक आहेत. यंत्राच्या युगांत प्रविष्ट होतानाही देवांचे अनुष्ठान तुम्ही अव्हेरलेले नाही. समारंभपूर्वक पूजाविधी संपन्न करण्यासाठी तुम्ही आम्हाला मूर्तिस्वरूप दिलेत, नामजपाचे महत्त्व मान्य केलेत. देव आहे या दृढ भरवशावर या भवसागरात आपली जीवननौका लोटणारे तुम्ही चरितार्थी! खरंच सांगतो, न दिसणाऱ्या, पण जळीस्थळी, पाषाणी तो आहे अशी नितांत श्रद्धा जो ठेवतो, त्या भक्ताला ‘देवाधिदेव!’ म्हणून हाक मारावीशी वाटली हे यथायोग्यच नव्हे का! भाव असणं हेच देवाचं खरं अधिष्ठान असतं.- पण भक्त आज मात्र एक वेगळीच याचना घेऊन मी तुझ्याकडे धाव घेतली आहे. मागणं एकच आहे, मला या बंदिवासातून सोडव, माझा फार कोंडमारा होतोय.’
‘बंदिवास! तो कसला परमेश्वरा! आणि याचना काय म्हणताहात- देवाधिदेवा, आम्ही क्षुद्र जीव याचक असतो. दानी तुम्ही असता. आम्ही तुम्हाला बंदिवासात कोंडू?’
‘सांगतो, भक्तसख्या, ज्याला मी बंदिवास म्हणतोय तो तुमचा जल्लोष असतो. लखलखाटाशिवाय, चकमकाटाशिवाय आणि बडिवाराशिवाय केलेली पूजाअर्चा देवाला पोहोचत नाही असा का कुणी ग्रह करून दिलाय तुमचा! त्या ग्रहाचा विग्रह करून काही खुलासा करावा, आणि हा तुमचा भ्रम यापुढे तरी राहू नये म्हणून हा खटाटोप आहे.
प्रिय भक्ता- अलीकडे अलीकडे गेली काही वर्षे मी पाहतोय, दहा दिवस मला लखाखत्या रोषणाईत खिळवून ठेवण्याचे नवे तंत्र तुम्ही मंडळींनी सुरू केलाय. मला असे विराजीत करून बाहेर एक मंच असतो. त्यावर गडद अंधार करून तुम्ही भक्तगण दहा दिवस रंगारंग सिनेमे पाहता, किंचाळणारे ऑक्रेस्ट्रे ऐकता, त्याला शिटय़ांनी, टाळ्यांनी दाद देता, पायठेका धरता, ‘होहो’च्या हाहाकारांनी वाहव्वा करता, उत्साहापोटी स्पर्धा लावता, माझ्या नावे लॉटरी काढता, बुद्धिदाता म्हणून मला बिरूद लावून, बुद्धीशी काडीचाही संबंध नसलेल्या स्पर्धा जिंकणाऱ्यांना तुम्ही पारितोषिके वाटता, त्यासाठी दरडोई भरमसाट वर्गणी तुम्ही हक्काने वसूल करता. एवम्च लक्ष्मीला तुम्ही मनमर्जी नाचवता, धनाची अशी नासाडी करण्याची दुर्बुद्धी तुम्हाला का व्हावी! या अशा सार्वत्रिक उत्सवीपणामुळे चुकीचे आणि नको ते संदेश जातात याकडेही तुमचे भान नसते. यालाच मी कोंडलेपण म्हटले रे!
निष्ठापूर्वक माझी प्राणप्रतिष्ठा करून मला आसन द्या आणि विधिवत साधेपणाच्या उपचारांनी मला उत्सवमूर्ती करा. आणि माझे विसर्जनही त्याच नेमस्तप्रकारे पार पाडा. एवढा साधा आचार बास आहे. पण हे साधेपण इतिहासजमा होत चाललाय. आधीच महाकाय असलेल्या माझ्या देहाच्या आणखी महाकाय मूर्ती बनविण्याचा सोस कशाला! मग विसर्जन करतेवेळी तुम्हीच प्राणप्रतिष्ठेने स्थापित केलेल्या त्या निर्जीव मूर्तीचे विडंबन आणि विटंबना तुम्ही सराइताप्रमाणे तिऱ्हाईत होऊन पाहता. हे शल्य बोचतं रे! त्याऐवजी समुद्रात सर्वार्थाने विसर्जित होईल अशीच नेटकी मूर्ती का नाही स्वीकारत! भव्यतेची स्पर्धा लागावी म्हणून देवांनाच साधन करायचे हे जरा पटत नाही. कलाकौशल्यपटुता प्रकट करायला भव्यता आणि अगडबंब रचनांचे निर्माण करायला देवांव्यतिरिक्त अगणित विषय या सृष्टीत आहेत. तिथे दृष्टी एकाग्र करा, ती रेखाटनं आणि रचना तुमची कलासिद्धी प्रकट करायला यथोचित आहेत आणि उदंडही आहेत. पण भक्ता, कर्तुमअकर्तुम असे सामथ्र्य असूनही ते कुठे उपयोगात आणावे यांतला विवेक हरवत चाललाय. पुढाऱ्यांच्या टोप्या आमच्या माथी चढवून, हुतात्म्यांचे वेश पांघरून नि नटाच्या लकबीचा मुद्राभिनय आमच्या मूर्तीत साकारून अधिष्ठापना करण्याचा नेमका हेतू काय! हुबेहूब व्यक्तिमत्त्व साधणे ही कलाकाराची सिद्धी आहे कबूल- पण आम्हाला का माध्यम करायचे! यात त्या देवत्वधारी मूर्तीच्या बीजरूपाचा नव्हे तर वरकरणी दिसणाऱ्या रूपाचा गुणगौरव करता हे का लक्षात येऊ नये!
मी मात्र या वेषांतर-रूपांतराच्या शिक्षेनं पुरता लज्जित होतो. माझी तीच पुरातन-सनातन प्रतिमा तुम्हाला का सलते! माझे वास्तव दर्शन तुम्हाला अप्रिय आहे का! – कुठेतरी तोल सुटतोय. प्रिय भक्तांचा देवावर निश्चित अधिकार असतो. भक्ताच्या हट्टासाठी देव जेवतो, कष्टात सहभागी होण्यासाठी दळू लागतो, पाणी भरू लागतो इतका उत्कट अनुबंध असतो हा. पण म्हणून माझी मुद्राच बदलण्याचा अधिकार वत्सा तू हातात कारे घ्यावास? – पत्रम्, पुष्पम्, फलम्, तोयम् यो माम भक्त्यां प्रयच्छते म्हणून देवाधिकांनी निर्वाणीचं सांगून टाकल्यावरही-फुलांचा बडिवार, फळांचे ढिगारे, नि हारांचे डोंगर म्हणजेच भक्ती अशी चुकीची कल्पना धरून तू दंगून जातोस. तुझ्या परमभक्तीचा आविष्कार म्हणून या तुझ्या हव्यासाचेही मी कौतुक करतो. पण मला जे परमप्रिय त्याचाच या अवडंबरांत तुला विसर पडतो याचे वैषम्य वाटते.
विजेच्या झगमगाटांत, तमसोर्माम ज्योतिर्गमय म्हणून जिची प्रार्थना करतो ती माझी आवडती ज्योत हरवलीय रे. अंधाराचा नाश करण्यासाठी समईमध्ये संथ तेवणारी, प्रसन्न लावण्यमयी ज्योत आणि तिचा तो प्रकाश मला फार आवडतो. एकच मागेन मी ती ज्योत माझ्याजवळ तेवती ठेवा. षोडषोपचार पूजा नको, आरत्यांच्या नावावर घातलेला तो कल्लोळ, खणखणाट आणि कंठशोष नको. सुंदर प्रासादिक स्वरांतल्या मोजक्या आरत्या भक्तिलीन होऊन म्हणा. तेवढं पुरतं देवाला. मला दिमाख, अवडंबर आवडतो, हे तुम्हाला कुणी बापडय़ाने सांगितले?
गरिबीची खाई, वाढणारी महागाई यांची दाणादाण असताना, पैशाची बेविचार उधळपट्टी अकारण आणि अनावश्यक आहे. लक्ष्मीचा कोप भयानक असतो वत्सा, ती आपला प्रताप केव्हा, कसा दाखवील सांगता येत नाही. म्हणून अतीच्या नादाला लागू नये हा सावध इशारा!
माझं एवढंच म्हणणं ध्यान देऊन ऐक- झगमगाट व भव्यदिव्य रोषणाई, देखावे यामध्ये मला आसनस्थ करू नका. माझ्या उत्सवाप्रीत्यर्थ बुद्धीच्या स्पर्धा लावा, विचारवंतांचे अभ्यासू विचार श्रवण करा, परिसंवादांतून बोध व तार्किकता शिका, प्रवचनांतून तत्त्वज्ञानाशी एकलय साधा, नामगजरांतून एका असीम आनंदाची प्रचीती अनुभवा, कीर्तनातून इतिहास, पुराण व कार्यकारणभाव याचा एकाच वेळी प्रत्यय घ्या, सुश्राव्य संगीताच्या एकतानतेत रंगून जा, अंतर्मुख होऊन परिशीलन करा. यासाठी धावपळीतही सवड काढा. यापैकी जमेल आणि परवडेल असे कार्यक्रम आयोजित करा. मग बघा हा उत्सवी जल्लोष तुम्हाला पुढच्या काळासाठी नवी चेतना देईल. आणखी एक मुद्दा आहे माझ्यासमोरचा- तो गोणपाटाचा पडदा हटवा- माझे दर्शन खुले करा. दानपेटी भरण्यासाठी किंवा गंगाजळीत भर पडावी म्हणून मला प्रेक्षणीय करू नका. जो दर्शनोत्त्सुक असेल त्याने सहजपणे यावे. मनसोक्त माझ्याशी बोलावे, मनीचे गूज सांगावे हा भक्तीचा रिवाज आहे. भक्त आणि देव यांचा हृदयंगम संवाद सहजपणात असतो हे लक्षात असू द्यावे.
मला उत्सवमूर्ती बनवून आपल्या दैनिक कर्तव्य कर्मापासून दूर राहाणेही मला अमान्य आहे. सर्व आन्हिके यथासांग पार पाडा. श्रद्धेचे एक तेवते निरांजन माझ्यासाठी बास आहे. कंठाळी गाणी लावून तो आवाजाचा विकृत गदारोळ मला आता सोसवत नाही. मी संयमी धोरणाने थांबलो होतो. अतीची मर्यादा तुमची तुमच्या लक्षात येईल म्हणून प्रतीक्षेत राहिलो. पण अहमहमिकेपायी मर्यादेचे भान तुम्हास येईल हा भरोसा वाटेना. माझ्यावर समारंभ व बडेजाव लादत चालला आहे. त्यात एक आक्रमकता आणि अग्रहक्काचा हट्ट आहे म्हणून हीच वेळ आहे- अति सर्वत्र वज्र्ययेत! विघ्नहर्त्यांलाच विघ्नांत टाकायची भक्ता ही रे कुठची भक्तीची रीत?
म्हणून सांगतो, भक्तगुणनिधी, मला असे कोंडू नका. हे घुसमटणे मला आता सोसवत नाही. तुमच्या कल्पना वैचित्र्याच्या फलश्रुतीसाठी माझे रूप वापरू नका. समारंभातील अवैध ते सगळे वगळा. वेळेचा अपव्यय टाळा, श्रद्धेचा देखावा टाळा, आरत्यांचा गोंगाट थांबवा, अचकटविचकट अंगविक्षेपांचे ते सैराट आणि बेताल नर्तन थांबवा, बाबांनो! ती झिंग आहे. त्या हातवाऱ्यांचे नि शरीर लचकविण्याचे प्रयोजनच काय? त्याऐवजी सात्त्विक श्रद्धेच्या अबोल स्थितीत जा. पूर्वीच्या सनातन परंपरेचा पुन्हा एकदा अभ्यास करा, त्यातले नेटके आणि काळानुरूप असेल तेच अनुसरा. चिरंतन भक्ती आणि मनोमनी भाव असल्यावर आणखी वेगळे मखर आणि डोलारे हवेतच कशाला! ‘देवाधिदेवा गजानना’ म्हणून माझ्या नावाने गाऱ्हाणे घालणारे भक्तगण तुम्ही आणि ‘होय देवा’ असे माझ्याच वतीनं म्हणत माझाच कौल अधिकारवाणीने उच्चारणारे तुम्ही! तुमची ताकद प्रचंड आहे, माझ्यावरची हुकमत प्रेमाची आहे म्हणून विनम्रतेनं एक गाऱ्हाणे घेऊन आलोय. या उपचार प्रस्थांतून मला मुक्त करा. बहिरंगापेक्षा आतल्या अस्सल भक्तीरंगाकडे नजर वळवा. तुमची आराधना मला सक्ती वाटेल इतके मला गृहीत धरू नका. कलात्मकता आणि पूजाअर्चा यातला समतोल ढळू देऊ नका. तुझा दास होऊन मी हा आग्रह धरला तर मानशील ना? तुमच्या इच्छा आकांक्षा सुफलित होण्यासाठी, सारा जीवनप्रवास निर्धोक व सुखमय होण्यासाठी मी माझा वरदहस्त युगानुयुगे सिद्ध ठेवला आहे. म्हणून तर याचकाची भूमिका घेऊन ही अकल्पित आणि अचानक योजना आखली- करणार ना मला मुक्त? तुझ्या नव्या निर्णयाने मी तुझा अधिकच ऋणानुबंधी होईन रे उत्सवकारा!

नेहमीच्या पद्धतीने ‘होय देवा!’ म्हणून प्रतिसाद दिला, डोळे उघडून भवताली पाहिले- कुठे गेला तो चैतन्यमयी, मंत्रून टाकणारा आवाज, तो अलौकिक प्रकाश कुठे हरवला? गेली कुठे ती मुकुटधारी, चतुर्हस्र, एकदंत मूर्ती? – मलाच माझ्या तथाकथित उत्सवी मनोभूमिकेतून वेळीच सावरण्याचा तो संकेत तर नव्हता? – माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला देव भेटतो काय, बोलतो काय, मनोव्यथा सांगतो काय! सारेच अतक्र्य अगम्य! – पण ही भेट मी प्रसाद मानतो. नावीन्याच्या प्रवाहात मी वहावत चाललो होतो, मला मर्यादेचा किनारा दाखवण्यासाठी तुम्ही अवतरलात. दासाच्या विनयवृत्तीनं बोललात, भावबंधाच्या ऋणाची ओढ घेऊन आलात, -भक्तांच्या अगणित याचना पुऱ्या करणाऱ्या दयाघनाची एक याचना पुरी करणं माझं काम आहे. माझे डोळे उघडलेत. सर्व मित्रसवंगडय़ांना मी हे सांगेन. प्रथम विरोधही होईल, देवाधिदेवाने हा संकेत दिला म्हटल्यावर चेष्टाही होईल. कदाचित मी कटापही होईन. पण दिवस सरकतील तसा हळूहळू प्रतिसाद मिळेल. देवाच्या विनवणीला ‘होय देवा’ म्हणून मी भरलेला होकार वाया कसा जाईल. शेवटी माझी अर्चना देवाला सजा वाटू लागली तर भक्त म्हणून मी काय उरलो देवाधिदेवा? खूप लज्जित आणि अपराधी वाटतंय-
भपक्याचा सोस वाढता वाढता वाढे अशा विकृत पद्धतीने साजरा करण्याच्या उन्मेषात विपरीताकडे जातोय ही जाग मला यावी म्हणून तुला याचक होऊन माझ्यापुढे उभे रहावे लागेल- क्षमा करा देवा, शतदा क्षमा करा हा एकच धावा.
अनावश्यक अवडंबरांतून मी आपणास मुक्त करीन देवा! निश्चित मुक्त करीन तुझ्या स्वप्नभेटीचा हा सुवर्णक्षण सार्थकी लावण्यासाठी माझी मानसिकता मी बदलेन. नजरबाह्य़ झगमगाटांतून आंतरज्योतीकडे स्थिर करीन.
देवाधिदेवा गजानना! मात्र तुमचा तो वरदहस्त चिरंतनपणे असाच आम्हा लेकरांच्या माथ्यावर राहू दे हीच तुझ्या चरणाशी विनम्र प्रार्थना!