News Flash

गल्ली चित्रपटांचे जादुई दिवस…

आता चाळिशी पार केलेल्या पिढीला गणेशोत्सव म्हटलं की आठवतं ते दहा दिवस रोज रात्री रस्त्यामध्ये मोठा पडदा लावून दाखवले जाणारे सिनेमे.. त्या जादुई दिवसांची सफर

| August 29, 2014 01:02 am

आता चाळिशी पार केलेल्या पिढीला गणेशोत्सव म्हटलं की आठवतं ते दहा दिवस रोज रात्री रस्त्यामध्ये मोठा पडदा लावून दाखवले जाणारे सिनेमे.. त्या जादुई दिवसांची सफर

‘गल्ली चित्रपट’ म्हणजे सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या बहुरंगी-बहुढंगी वाटचालीतील एक सांस्कृतिक घटक.
आजच्या मल्टिप्लेक्स व घरबसल्या चोवीस तास उपग्रह वाहिन्यातून होत असलेल्या माहिती व मनोरंजनाच्या अखंड प्रवाहाच्या काळात ही ‘गल्ली चित्रपट’ संस्कृती मागे पडली आहे. पण समाजाच्या किमान तीन पिढय़ांना मात्र गल्ली चित्रपटां’चा उत्साह चांगलाच ज्ञात आहे. किंबहुना वाचकांतील चाळिशीपार पिढी एव्हाना ‘फ्लॅशबॅक’मध्ये गेलीदेखील असेल व त्यांना पूर्वीच्या गणेशोत्सवाच्या काळात आपल्या व आजूबाजूच्या परिसरात पाहिलेले किती तरी ‘गल्ली चित्रपट’ एव्हाना ‘आठवणीच्या पडद्यावर’ दिसतसुद्धा असतील.
साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात ही ‘गल्ली चित्रपटा’ची संस्कृती विशेष जोरात होती. श्रीगणेशोत्सवासह ‘शिवजयंती’, ‘महाराष्ट्र दिन’, ‘सत्यनारायण पूजा’ अशा कारणास्तव हे ‘गल्ली चित्रपट’ साजरे होत. समाजातील सर्व घटक एकत्रपणे या ‘गल्ली चित्रपटा’चा आनंद घेत हे यात जास्त महत्त्वाचे. चित्रपट प्रेक्षकांना एकत्र आणताना त्यांच्यातील विविध भाषा, धर्म, पंथ व जात यांमधील भेद संपुष्टात आणतो हे कायमस्वरूपी सत्य हे या ‘गल्ली चित्रपट’ संस्कृतीत प्रकर्षांने दिसे.
या गणेशोत्सवाच्या काळातील कार्यक्रमाचे नियोजन करताना विविध ठिकाणच्या उत्सव समितीपुढील आपल्याकडे यावर्षी कोणते चित्रपट दाखवावेत हा प्रश्न तेवढा सोपा, तेवढाच अवघडदेखील ठरे. प्रत्येक सार्वजनिक मंडळ, एक मराठी चित्रपट दाखवायचे ठरवून मराठीशी असलेली आपली बांधीलकी जपे. ‘मोलकरीण’, ‘अन्नपूर्णा’, ‘एकटी’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’, ‘दाम करी काम’, ‘सोंगाडय़ा’, ‘एकटा जीव सदाशीव’ हे त्या काळातील गल्लीसाठी सर्वाधिक पसंती असणारे चित्रपट. पण हिंदी चित्रपटांची निवड करताना मात्र मंडळातील राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, शम्मी कपूर यांचे चाहते आपल्या(च) हीरोचा चित्रपट प्रामुख्याने दाखवला जावा म्हणून आग्रही असत. राजेश खन्नाच्या विलक्षण चलतीच्या काळात जवळपास प्रत्येक गल्लीत ‘इत्तेफाक’, ‘आनंद’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘दुश्मन’, ‘अपना देश’, ‘आन मिलो सजना’, ‘सच्चा झूठा’ दाखवला गेला. अमिताभचे दिवस येताच ‘जंजीर’, ‘अदालत’, ‘त्रिशूल’, ‘डॉन, ‘गंगा की सौगंध’, ‘बेनाम’ आले. अर्थात, चित्रपटगृहातून उतरल्यावर साधारण दोन वर्षांनी चित्रपट ‘गल्लीच्या पडद्यावर’ येई. त्यासाठी त्या चित्रपटाचे सोळा एम.एम.चे स्वतंत्रपणे अधिकार विकले जात. काही हुशार मंडळे गल्लीसाठी कोणता चित्रपट नव्याने उपलब्ध झाला आहे यावर खास लक्ष ठेवत व ‘आमच्याच गल्लीत सर्वप्रथम’, असा फलक लावत. साधारणपणे दुपारी दीड-दोन वाजता प्रत्येक गल्ली अथवा सोसायटीच्या नाक्यावर ‘आजचे कार्यक्रम’ सांगणारा फलक लागे. त्या काळातील चित्रपटाचे चाहते साधारण चार वाजता संपूर्ण विभागात फेरी मारून आज कोणत्या बरे मंडळातील चित्रपट पाहायचा याचा निर्णय घेत. ‘फूल और पत्थर’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘सावन भादो’, ‘हरे राम हरे कृष्ण’, ‘उपकार’ हे जवळपास सर्वच मंडळांनी ‘गल्लीतील पडद्यावर’ दाखवलेले चित्रपट आहेत.
श्रीगणेशासमोर चित्रपट दाखवताना सामाजिक भान ठेवले जाई. त्यामुळे ‘फक्त प्रौढांसाठी’च्या चित्रपटांना त्यात स्थान नसे. तर गर्दीच्या मानसिकतेचा विचार करून क्लिष्ट वा दुबरेध चित्रपटांनाही गल्लीत स्थान नसे. ज्याला समांतर चित्रपट म्हणतात त्याचे सोळा एमएमचे हक्क कधी विकले गेले असतील असे वाटत नाही. कोणत्या मंडळाला हो गर्दीशिवाय चित्रपट दाखवायला आवडेल?
गल्ली उभी-आडवी-चिंचोळी वाकडी असो, पटांगण लहान-मोठे-चौकोणी-त्रिकोणी असो, मैदान केवढेही असो, मधोमध सोळा एम.एम.चा पडदा लावला जाई. प्रोजेक्शनच्या बाजूला स्त्री प्रेक्षक व विरुद्ध बाजूला पुरुष प्रेक्षक अशी सर्वसाधारण मांडणी. बऱ्याचदा स्त्रियांकडची बाजू मंडपाखाली येई, त्यामुळे रात्रौ येणाऱ्या पावसाचा त्यांना त्रास नसे, याउलट पुरुष प्रेक्षकांना अशा वेळी आडोसा शोधावा लागे. तरी त्यांचा चित्रपटाबाबतचा ओलावा कायम असे. पण अशा विभागणीमुळे पुरुष प्रेक्षकांना दिलीपकुमार डाव्या हाताने भूमिका करताना दिसला तरी त्याचा अभिनय उजवा असे. डावा अमिताभ दोन्ही बाजूनं अभिनयात उजवा, त्यामुळे तो गल्ली चित्रपटांतही भरपूर टाळय़ा, हसे वसूल करे. तेथेही तोच ‘नंबर वन’
गल्ली चित्रपट म्हणजे एका अधिकृत मध्यंतरसह आणखी दोन मध्यंतरे. पण तीन मध्यंतरमुळे चित्रपटाच्या रंगतीत विघ्न पडत नसे, यालाच आपल्याकडच्या चित्रपटाच्या प्रेक्षकांची ‘सही’ संस्कृती म्हणतात. काही ठिकाणी मंडळ परिसरात या ‘रात्रौच्या खेळा’ला चणे-शेंगदाणे-फुटाणे-वडापाव यांची जोरदार विक्री होई. गिरगावातील आंबेवाडीतील श्रीगणेशोत्सवात श्रीगणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी चित्रपट दाखवत व तोदेखील आर.के. फिल्म बॅनरचा असावा यावर त्यांचा भर असे. ‘श्री ४२०’, ‘जिस देश में गंगा बहती हैं’ हे त्यांनी दाखवत बाजी मारली. गिरगावातील काही चाळी दाटीवाटीच्या, त्यामुळे काही ठिकाणी पडद्याबाहेर सिनेमा जाई व मागच्या खोलीवर पडे, पण त्याचेही कोणालाच गैर वाटत नसे. मूळ दक्षिण मुंबईतील ही ‘गल्ली चित्रपट संस्कृती’ सहजपणे मुंबईभर पसरली, मग राज्यभर पोहचायला वेळ लागला नाही. याचे कारण, या चित्रपटासाठीचा खर्च अथवा भाडे अन्य कार्यक्रमांपेक्षा कमी असे, शिवाय स्टेजचीही गरज नाही आणि चित्रपट हे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम असल्याने गर्दीची हमी. त्या काळात चित्रपटगृहात एक-दोनदा पाहिलेला ‘नमकहराम’ अथवा ‘तिसरी मंझिल’, ‘जॉनी मेरा नाम’ पुन्हा गल्लीत पाहण्याची हौस असणारा मोठा वर्ग होता. रात्रौ दहा वाजता कार्यक्रम संपवा अशी तेव्हा अट नव्हती, खरं तर बऱ्याच ठिकाणी गणेशाची महाआरती झाल्यावर रात्रौ दहा वाजता चित्रपट सुरू होऊन एक वाजता संपे. गणेशोत्सवाचा एकूणच माहोल व चित्रपटाचे वेड यामध्ये ते जमून जायचे. कित्येक लहान मुले असा ‘गल्ली चित्रपट’ एन्जॉय करीत मोठी झाली, त्यांच्या भावविश्वाचा तो आनंद होता.
आपल्या देशात १९८२ साली चित्रफित अर्थातच व्हीडिओ व रंगीत दूरदर्शनचे युग आले आणि ही समाजात पूर्णपणे रुजलेली ‘गल्ली चित्रपट संस्कृती’ मागे पडू लागली. दोन-चार वर्षांतच भाडय़ाने व्हीसीआर व चित्रफित मिळू लागली व त्यावर चित्रपट दाखवणे सुरू झाले. आणखी दशकभराने, म्हणजे १९९१-९२ साली झी वाहिनीचे व पाठोपाठ अन्य उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले आणि ‘गल्ली चित्रपट’ ही संस्कृती आणखीनच मागे सरकली. क्वचित कुठे गल्लीत पडदा लावून असा एखादा चित्रपट दाखवला जाई, पण ‘गल्ली चित्रपट’ पाह्यचा आहे म्हटल्यावर जी दुपारपासून उत्सुकता वाटे, त्यातील ‘जान’ हळूहळू ओसरली.
काळ, माध्यमे व उत्सवाचे स्वरूप हे सगळेच पुढे सरकताना ‘गल्ली चित्रपटा’वरचा ‘पडदा’ वाढत वाढत गेला, आता केवळ तो वर करून आठवणी काढायच्या. कोणत्या गल्लीत गोणपाटावर बसून ‘वाट चुकलेले नवरे’ पाहिला, कोणत्या चाळीत चक्क उभे राहून ‘पारसमणी’च्या नृत्याचा भरपूर आनंद घेतला व कोणत्या मैदानावर जाताना घरच्या वृत्तपत्राच्या कागदावर बसून ‘गाइड’पाहिला.. आपल्याकडच्या चित्रपट पडद्यावर दाखवायची व पाह्यची हौस-मौज गणेशोत्सवासारख्या प्रचंड मोठय़ा सणाचाही भाग ठरली…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:02 am

Web Title: ganesh vishesh 11
Next Stories
1 पुन्हा एकदा चॅनलवॉर!
2 सोशल अभिव्यक्ति‘स्वातंत्र्य’!
3 आधी देश… मग आपण
Just Now!
X