चैतन्यप्रेम – response.lokprabha@expressindia.com
शब्दार्त

आयुष्याची गाडी सुरळीत जात असते तेव्हा आपण भविष्यातल्या सुखाची कल्पनाचित्रं रंगवण्यात मग्न असतो. अमुक घडावं, ही अपेक्षा आणि अमुक घडेलच, ही खात्री यानं मन मोहरून गेलं असतं. पण जीवन म्हणजे तर अनपेक्षित प्रश्नसंचांची मालिकाच! सुरळीत मार्गक्रमण करीत असलेल्या स्वप्न आणि अपेक्षांची गाडी अचानक धोक्याच्या वळणावर आदळते. त्या धक्क्यानं खचलेलं मन सरभर होतं. जगाचे आधार ठिसूळ असल्याचा अनुभव येऊ लागतो. ‘दैवी’ उपायांच्या काटेरी वाटेवरही वणवण सुरू होते. बरेचदा वेळ आणि पसा वाया गेल्याचा अनुभव येतो.

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

अशा वेळी माणूस सकारात्मक विचारांचा आधार घेतो, सकारात्मक वृत्तीच्या माणसांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो. जगातील उत्तुंग कर्तृत्वाच्या माणसांनी संकटांचा सामना कसा केला, आपलं मनोबळ कसं टिकवलं आणि संकटांना संधी मानून आपला विकास कसा करून घेतला; हेदेखील वाचून, ऐकून आणि समाजमाध्यमांवरील चित्रफितींतून पाहून धर्याचा कित्ता गिरवू पाहतो.

पण कधी कधी आपल्या वाटय़ाला आलेल्या संकटांची कारणं अज्ञात भासत असतात तेव्हा अज्ञाताचा प्रांतही आपल्याला खुणावू लागतो. या जगात देव असेल, तर त्यालाच या दुखातून तारण्याची प्रार्थना केली पाहिजे, असा विचार मनात येतो तेव्हा मग प्रार्थना, आळवणीच्या वाटेवर आपण जाऊ लागतो. लहानपणापासून देवाचं जे रूप सर्वात आवडतं, आत्मीय वाटतं त्याची उपासना करू लागतो. मग तो विघ्नहर्ता गणपती असेल, संकटहारक कृष्ण असेल, जनहितकारी राम असेल किंवा अघसंहारणी दुर्गा असेल. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज या सदगुरू रूपांची उपासना सुरू होते. त्यांचा मंत्र, त्यांची स्तोत्रं, त्यांच्या पोथ्या यांच्या पठणातून तोच आधार मिळविण्याची धडपड सुरू होते. काहीच नाहीतर ‘देव’ नामक अगम्य, अज्ञात शक्तीची मनोमन आळवणी सुरू होते..

रामकृष्ण परमहंस यांचे एकनिष्ठ भक्त आणि बंगाली रंगभूमीचे जनक गिरीशचंद्र घोष यांच्या आठवणींतला काही अंश हा संकटात सापडलेल्या माणसाच्या मनोदशेचं उत्तम वर्णन करतो. १८८० च्या सुमारास गिरीशांना रामकृष्णांचा सहवास मिळाला त्याआधीचा हा संघर्षांचा आणि कसोटीचा काळ होता. गिरीशांनी तब्बल ८० नाटके लिहिली. त्यातली तीसेक रामकृष्णांच्या कार्यकाळातील आहेत. ते अभिनेते आणि दिग्दर्शकही होते. सगळ्या व्यसनांनी घेरलेले होते. पशाचा जोम पाठीशी होता. बंगालातील मूर्तीपूजाविरोधी आणि नास्तिकतेला अनुकूल अशा वातावरणाचा, रामकृष्णांच्या भेटीआधीच मनावर पगडा होता. रामकृष्णांच्या भेटीआधीच्या म्हणजे १८८० सालाआधीच्या संकटमय काळाचं वर्णन करताना गिरीश म्हणतात, ‘‘(जीवनात) वाईट दिवस येणार हे ठरलेलेच..आणि ते जेव्हा येतात तेव्हा कठोर सत्य शिकवून जातात. त्यांच्यापासून मी मोठाच धडा शिकलो तो हा की, दुष्कम्रे लपविण्याचा कोणताही मार्ग नाही. ‘करावे तसे भरावे,’ हेच सत्य. माझ्या दुष्कर्माची फळे फलद्रूप व्हायला याआधीच आरंभ होऊन चुकला होता. त्यांची भयाण चित्रे माझ्या मनपटलावर ठळकपणे चित्रित होऊ लागली होती. माझ्या नियतीवर घनघोर काळेकुट्ट मेघ दाटू लागले होते. जणू शिक्षा सुरू झाली होती आणि त्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मी केलेल्या दुष्कर्माचा फायदा घेऊन मित्रहीन अशा मला नेस्तनाबूत करण्यासाठी माझे हितशत्रू चोहोबाजूंनी टपलेले होते. नराश्याच्या अथांग सागरात मी हेलकावे खाऊ लागलो. त्या कसोटीच्या प्रसंगी मनात विचार आला, ‘काय देव आहे? माणसांच्या प्रार्थना काय तो ऐकत असतो? मनुष्याला काय तो अंधारातून प्रकाशात जायची वाट दाखवतो?’ माझ्या मनोदेवतेने साद दिली, ‘हो!’ मी तात्काळ डोळे मिटून प्रार्थना केली, ‘परमेश्वरा, तू जर असशील, तर मला पलथडीला ने. माझा भार घे. माझे कोणीही नाही.’ गीतेतले वचनही आठवले की, ‘संकटकाळात जे फक्त माझाच धावा करतात त्यांच्या साहाय्याला मी धावून जातो, त्यांनाही आश्रय देतो.’ हे शब्द माझ्या अंतकरणात खोलवर जाऊन भिडले आणि तशा त्या दुखात मी आश्वस्त झालो. ते शब्द खरे असल्याचे मला दिसून आले. सूर्य जसा रात्रीचा अंधकार पिटाळून लावतो तद्वत माझा आशारूपी सूर्य उदित होऊन त्याने मनातील नराश्याच्या घनघोर मेघांना पिटाळून लावले.. तथापि इतकी वष्रे जोपासलेला, ‘ईश्वर-बिश्वर काही नाही,’ हा संशयी तर्कविचार पुन्हा उफाळून आला. मी (संकटांतून का सुटलो याचा) कार्यकारणभाव लावून विचार करू लागलो. या-या कारणामुळे असे असे घडून आले आणि त्यामुळे मला संकटातून सुटका करून घेण्याचा मार्ग सापडला, (‘देवा’मुळे नव्हे!) असे वाटू लागले.’’ गिरीश उच्च वर्तुळात वावरत होते त्यामुळे त्यांची संकटंही तशीच होती. पण ज्याचं-त्याचं संकट ज्याला-त्याला मोठंच वाटतं आणि त्यावेळी सर्वसाधारण माणसाच्या आंतरिक स्थितीत गिरीश सांगतात तशीच उलथापालथ सुरू असते. आपल्यालाही पलथडीला जायचं असतं, पण त्याचा अर्थ संकटातून पार होणं, इतपतच असतो. संकटात ‘देवा’चा धावा सुरू होतो. त्या देवाचं छोटंसं देवघर आपल्या घरात कुठेतरी सोयीच्या (म्हणजे इतर पसाऱ्याची गरसोय होणार नाही, अशा) ठिकाणी टांगलेलं वा ठेवलेलं असतं आणि त्या चौकटीबाहेर देवाला आपण कधी आणलंच नसतं! त्यामुळे संकट येताच ‘देवा, तू असशील तर आता हे संकट दूर करून तुझ्या अस्तित्वाची खात्री दे,’ अशी आळवणी सुरू होते. जणू आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची देवालाच निकड भासत आहे! मग कालांतरानं संकट निवळतं, पण ते देवाच्या कृपेनं दूर झालं, हे क्वचित ओठी आलं, तरी हृदयात तसा भाव नसतो. आपल्याच ‘कर्तृत्वा’ला श्रेय देत आपण आधीच्याच देहभावात पुन्हा विरघळतो..

पण संकट येताच, शक्य ते सर्व प्रयत्न फोल होत जातात तेव्हा मनाची घुसमट सुरू होते आणि ‘अशक्य ते शक्य’ करेल, अशा आधाराचा शोध सुरू होतो.. त्यातून ज्या काही स्तोत्रांच्या, पोथ्यांच्या, प्रार्थनांच्या आणि मंत्रांच्या माध्यमातून ही आळवणी सुरू होते, त्यातलं अत्यंत चिरपरिचित स्तोत्र ‘तारक मंत्र’ म्हणूनच प्रसिद्ध आहे.. त्याचं मुख्य सूत्रच आहे ते म्हणजे, ‘‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’’!

कबीरांचा एक दोहा आहे..

दुख में सुमिरन सब करै,

सुख में करे न कोय।

जो सुख में सुमिरन करे,

तो दुख काहे को होय॥

म्हणजे, कबीर महाराज म्हणतात की, दुखात तर भगवंताचं स्मरण सगळेच करतात, पण सुखात कोणी करीत नाही. जर सुखातही त्याचं स्मरण राहिलं, तर दुख कधी येणारच नाही!

आता हे ‘स्मरण’ म्हणजे रोजची धावती देवपूजा का? ठरावीक व्रत किंवा उपवास का? रस्त्यातून जाताना दिसलं मंदिर की हात जोडणं का? तर नाही. अहोरात्र आपल्याला आपल्या हवेपणाचं जसं सहज स्मरण आहे, तसं भगवंताचं किंवा सदगुरूचं सहज स्मरण झालं पाहिजे. आता सुखात असं स्मरण झालं, तर दुख येणारच नाही, हे खरं का? तर नाही. जीवन आहे, तर सुखही आहे आणि दुखही अटळच आहे. उलट दुख सुसह्य़ व्हावं म्हणून सुखाची आशा आहे! मग ‘जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे को होय’चा रोख नेमका काय आहे? तर तो असा की, सुखात, अनुकूल परिस्थितीतही जर भगवंताचं वा सद्गुरूचं स्मरण, भगवंत वा सद्गुरूंप्रतिचा आंतरिक प्रेमभाव टिकून असेल, तर दुख वाटय़ाला येईल, पण दुखाची जाणीव खालावल्यानं ते पूर्वीसारखं बोचणार नाही! उलट ते दुख सोसण्याचं बळही पाठीशी आहे, याची जाणीव वाढू लागेल. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘आधी शक्ती येते, मग भोग येतो. नाही तर सांगायला जीवच शिल्लक राहिला नसता!’ तसं आहे. दुखासोबत दुख भोगण्याची शक्तीही असतेच, पण मन खचल्यानं ही जाणीवच उरलेली नसते. पण ही जाणीव सदैव टिकावी, अनुकूल काळातही भक्तीचा संस्कार चित्तात दृढ व्हावा यासाठी खरं तर ही स्तोत्रं आहेत. ती प्रतिकूल काळापुरती नाहीत! त्यामुळे स्वामी भक्तांच्या नित्यपाठातही असलेल्या आणि संकटात मनाला दिलासा देत असलेल्या या प्रख्यात स्तोत्राचं चिंतन आता सुरू करू. या भावनेनं ओथंबलेल्या अमृतशब्दांना मन, चित्त आणि बुद्धीनं स्पर्श करण्याआधी.. ‘‘मं गया नहीं, अब भी जिंदा हूँ’’, अशी अभयगर्जना करीत, जोवर तुमचा ‘मी’ गेलेला नाही, तोवर मी आहेच, अशी आपल्या अनादि अनंत अस्तित्वाची ग्वाही देत असलेल्या पुराणपुरुषाचा जयघोष करू..

अनंतकोटी ब्रह्माण्डनायक स्वामी समर्थ महाराज की जय!!