नथ, ठुशी असे आपले पारंपरिक दागिने आता थोडा नवा साज घेऊन अँटिक बनून फॅशनच्या जगतात पुन्हा अवतरताहेत.

दंडाला वाकी, गळ्यात तन्मणी, लफ्फा किंवा ठुशी, पोहेहार, चपलाहार, हातात तोडे, पाटल्या, बांगडय़ा, गोठ वगैरे अशी भरगच्च दागिन्यात नटलेली गृहस्वामिनी एकीकडे आणि गळ्यात स्टेटमेंट नेकपीस, हातात ब्रेसलेट, दंडावर अँटिक आर्मलेट अशी ‘ड्रेस अप’ झालेली आधुनिक स्त्री दुसरीकडे. बारकाईनं पाहिलंत तर लक्षात येईल दोन्हीकडच्या दागिन्यांची नावं वेगवेगळी असली, तरी प्रत्यक्षात मूळ साचा समान आहे आणि हाच सध्याचा ट्रेण्ड आहे. जुन्या दागिन्यांची नावं विस्मृतीत गेली असली तरीही त्या दागिन्यांची कलात्मकता आजही जिवंत आहे. ती कला कायम आहे. म्हणूनच जुन्या दागिन्यांना नवीन रूपात सादर करण्याचा प्रयत्न अनेक ज्वेलरी डिझायनर करत आहेत.
आपल्याकडच्या पारंपरिक जुन्या दागिन्यांना एक प्रकारचा ‘युनिकनेस’ होता. भारतीय दागिने जगभरात उठून दिसू शकतील असं वैशिष्टय़ त्यामध्ये होतं. प्रांतानुसार त्या दागिन्यांची ठेवण, बाज वेगळा असायचा. प्रांतच कशाला अगदी एकाच प्रांतातल्या दोन वेगळ्या समाजातही दागिन्याचं नाव सारखं पण ठेवण वेगळी होती. नथ या दागिन्याचं यासाठी उदाहरण देता येईल. ब्राह्मणी नथ, कोकणी नथ, मराठा नथ असे अनेक प्रकार त्यामध्ये दिसतात. प्रांतोप्रांतीचं वैविध्य लक्षात घेतलं तर या पारंपरिक दागिन्यांमध्येही आजच्या भाषेत अक्षरश: प्रचंड व्हरायटी होती, हे लक्षात येईल. सध्याचा जमाना हा अशा वैविध्याचा आहे. एकसारखा दुसरा पीस असू नये, असं आजच्या युवतीला वाटतं. काहीतरी वेगळं, लक्षवेधी आणि उठून दिसणारं घालायला मिळावं अशी आजच्या आधुनिक स्त्रीची इच्छा असते. जास्तीत जास्त दागिने अंगावर दिसले की चांगलं, ही भावना आता अजिबात राहिलेली नाही. उलट एखादाच दागिना पण तो उठून दिसणारा हवा, युनिक हवा असं म्हणणारी ही पिढी आहे. मुळात पारंपरिक भारतीय दागिने ठसठशीत होते. तोच उठावदारपणा आजच्या युवतीला हवा असतो, पण थोडय़ा वेगळ्या रूपात आणि म्हणूनच जुन्या पारंपरिक दागिन्यांमध्ये काही बदल करून त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आजचे ज्वेलरी डिझायनर करत आहेत. या प्रयत्नामधून विस्मृतीत गेलेले किंवा कालबाह्य़ झालेले दागिने पुन्हा येत आहेत. जुन्या दागिन्यांचा हा ट्रेंड नव्या रूपात येत आहे.
हल्लीच्या आधुनिक स्त्रीला भारतीय पारंपरिक वेश आणि दागिने याचं आकर्षण असतंच पण त्यांना आधुनिक बाज दिलेला त्यांना जास्त भावतो. म्हणूनच साडी आणि पंजाबी सूटला ‘एथनिक वेअर’ म्हटलं की जास्त ‘आधुनिक’ वाटतं. तीच गोष्ट दागिन्यांच्या बाबतीत. अँटिक ज्वेलरी या नावानं जुन्या दागिन्यांची डिझाइन्स परत येताहेत आणि पारंपरिक मराठी दागिनेदेखील एक वेगळं रूप घेऊन ‘मॉडर्न’ होताहेत.
भरगच्च लफ्फा
हल्ली ज्वेलरी शोमध्ये सादर होणारे लक्षवेधी दागिने पाहिले आणि बाजारात आलेले आधुनिक दागिने पाहिले तरी त्यांच्यावरचा भारतीय पारंपरिक दागिन्यांचा प्रभाव लक्षात येईल. लफ्फा, तन्मणी, चिंचपेटी हे गळ्यातले पारंपरिक दागिने. यातला लफ्फा हा प्रकार लफ्फेदार खरा. हल्ली चोकर नावानं बाजारात दिसणारे दागिने लफ्फ्याच्या जवळ जाणारे आहेत. चोकर म्हणजे गळ्याशी भिडलेला लफ्फेदार दागिना. हा एकच दागिना घातला तरी पुरेसा वाटतो. पारंपरिक लफ्फा खडे (परवडत असतील तर हिरे) आणि मोती यांपासून घडवला जात असे. हल्लीचे चोकर मात्र खडय़ांबरोबरच कुंदन, अमेरिकन डायमंड्स वापरून घडवतात. सोन्यात किंवा चांदीत घडवलेला चोकर कधी अँटिक गोल्डमध्येसुद्धा दिसतो आणि मग त्याचा वेगळेपणा नजरेत भरतो. मध्यंतरी कान महोत्सवात अभिनेत्री सोनम कपूर तिच्या आईचा जुना पारंपरिक चोकर घालून अवतरली होती. फॅशन दिवा सोनमचा तो चोकर त्या वेळी गाजला होता.
ठसठशीत ठुशी
ठुशी हादेखील पारंपरिक मराठी दागिना. घरातल्या बुजुर्ग स्त्रियांकडे अजूनही त्यांची जुनी ठुशी आवर्जून सापडते. सध्या ज्वेलरी डिझायनर्स या ठुशीमध्ये अनेक प्रयोग करत आहेत. हा दागिना एथनिक वेअरवर आवर्जून घातला जातो. सोन्या-चांदीमध्ये घडवला जाणारा हा अलंकार ठसठशीत असतो. त्यामध्ये हल्ली रंगीत खडे, डिस्को मणी वापरले जातात. ठुशीच्या डिझाइनमध्ये पेंडंट आणून डिझायनर ठुशी हल्ली बाजारात आली आहे. स्टेटमेंट नेकलेस या नावाखाली अशाच जुन्या दागिन्यांशी साधम्र्य सांगणाऱ्या दागिन्यांचा ट्रेण्ड आला आहे. सोन्याऐवजी अँटिक गोल्डमध्ये हे दागिने केलेले असल्यानं त्याचा आधुनिक बाज कायम राहतो आणि तरीही ते पारंपरिक वाटतात आणि पारंपरिक भारतीय वेशावर अगदी उठून दिसतात.
बिंदी, बिजवरा आणि हेड अ‍ॅक्सेसरीज
जुन्या काळातील स्त्रियांमध्ये डोक्यावर आणि केसांमध्येही दागिने घालायची पद्धत होती. त्याला प्रांताप्रांतानुसार वेगवेगळी नावं होती. नऊवारी साडीवर खोपा घालून ते खोपा सोनेरी फुलानं सजवलेला आपण जुन्या फोटोंमध्ये पाहिला असेल. अंबाडा आणि खोप्याची शोभा वाढवणारे अनेक सोन्या-चांदीचे दागिने केसांमध्ये खोचण्याची पद्धत तेव्हा होती. आता तीच पद्धत पुन्हा येतेय. अर्थातच विस्मृतीत गेलेल्या या दागिन्यांची नावं आणि डिझाइन्स आधुनिक आहेत. पण मूळ ढाचा कायम आहे. हेड अ‍ॅक्सेसरीज या नावानं हल्ली बाजारात काही दागिने मिळू लागले आहेत. ते या जुन्या दागिन्यांचीच आठवण करून देतात. यंदाच्या वर्षी बहुतेक सगळ्या बडय़ा फेस्टिव्ह कलेक्शनच्या फॅशन शोमध्ये आणि ज्वेलरी शोमध्ये हेड अ‍ॅक्सेसरीज वापरल्या गेल्या.
बिंदी, बिजवरा सणासमारंभांना आवर्जून घातले जायचे. पूर्वीची िबदी हल्ली मांगटिका म्हणून प्रसिद्ध होत आहे. बिजवरा म्हणजे चंद्रकोरीचा आकार असलेल्या पदकाची एकेरी बिंदी. ही मांगटिकाची फॅशन आता भारतभरातल्या तरुण मुलींमध्ये दिसतेय.
बाजूबंद आणि वाकी
बाजूबंद आणि वाकी हेदेखील असेच पारंपरिक भारतीय दागिने. या दागिन्यांचं आता आर्मलेट झालंय. मुळात सोनं, चांदी किंवा मोत्यांमध्ये घडणाऱ्या या दागिन्यांचं आर्मलेट होताना पुन्हा एकदा व्हाइट मेट, चांदी, सोनं याला अँटिक लुक देण्यात येतोय. नवरात्रीनिमित्त काही प्रसिद्ध ज्वेलर्सनी आपलं कलेक्शन सादर केलं तेव्हा अशी आर्मलेट या कलेक्शनच्या अग्रभागी होती.
नथ आणि नथनी
एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात अभिनेत्री विद्या बालन नथनी घालून सहभागी झाली होती. अशा समारंभांमध्ये भारतीय अभिनेत्री साडी नेसून यापूर्वीही जात होत्या. पण नाकात नथ किंवा नथनी घालायची पद्धत मात्र जुनी आणि टाकाऊ समजली जायची. आता मात्र हीच नथ फॅशनच्या रॅम्पवर अवतरली आहे. नथ आणि कपाळावर ठसठशीत कुंकू हे फॅशन स्टेटमेंट ठरू पाहातंय. अनेक मोठय़ा फॅशन डिझायनर्सनी प्रसिद्ध मॉडेल्सना नाकात नथ किंवा नथनी घालून यंदा रॅम्पवर उतरवलं. या फॅशन स्टेटमेंटला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
(सौजन्य पीएनजी ज्वेलर्स)

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती