सक्तीचे आणि मोफत शिक्षण अलीकडेच सुरू झाले असले तरी त्याचे स्वप्न नामदार गोखले यांनी शंभर वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यांच्या शिक्षणविषयक द्रष्टय़ा विचारांचा वेध.
ना. गो. कृ. गोखले हे हिंदुस्थानच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उत्थापनास कारणीभूत असलेल्या विभूतींपैकी एक अलौकिक रत्न. न्या. रानडे यांचे पट्टशिष्य असलेले गोखले हे नेमस्त राजकारण्यांचे पुढारी. हिंदुस्थानमध्ये प्रथम सामाजिक, शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत, असे मत हिरिरीने मांडणाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. लोकांमध्ये राजकीय जागृती होण्यासाठी शिक्षणाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला पाहिजे, हे त्यांचे ठाम मत होते.
गोखले स्वत: अत्यंत कठीण परिस्थितीत शिकले. त्यांच्या थोरल्या बंधूंनी आणि वहिनींनी आर्थिक ओढाताण सहन करूनही त्यांचे शिक्षण पूर्ण केले. या सर्व पाश्र्वभूमीमुळे गोखले शिक्षणाचे महत्त्व ओळखून होते व आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी लोकांना सक्तीचे व विनाशुल्क शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणावरील प्रेमामुळेच ते टिळक, आगरकर आदी राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या युवकांनी स्थापन केलेल्या, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले. सुरुवातीला त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. फग्र्युसन कॉलेजमध्ये त्यांनी व्याख्याता, प्राध्यापक व प्राचार्य म्हणूनही काम केले. गोखले प्रथम गणित विषय शिकवत. नंतर ते इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्रही शिकवू लागले. गोखले यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. ते अत्यंत कळकळीने शिकवत व आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची काळजी घेत. होतकरू विद्यार्थ्यांना ते सूचना व मार्गदर्शन करत. राजकीय पुढारी म्हणून वावरत असतानाही शिक्षण क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ कधी तुटली नाही. त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या शिक्षणविषयक विचारांचा हा मागोवा!
जनतेला शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी
लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, नागरिकांना शिक्षण देणे हे सरकारचे आद्यकर्तव्य आहे हे ठासून सांगताना त्यांनी १८५४ साली ईस्ट इंडिया कंपनीने प्रसृत केलेल्या शिक्षणविषयक खलित्याचा दाखला दिला. या खलित्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, Among many Subjects of Importance none can have a stronger claim to our attention than that of education. कंपनी सरकारने लोकांना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे हे मान्य करून ते साध्य करण्यासाठी सखोल मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. अशा तऱ्हेने १८५४चा हा खलिता म्हणजे Great charter of Indian educationl असाच होता. ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपल्यानंतरही ब्रिटिश सरकारने हेच धोरण कायम ठेवले.
शिक्षणावरील सरकारी खर्च
लॉर्ड रिपन या उदारमतवादी व्हॉइसरॉयनी १८८२ साली कमिशन नेमून भारतातील शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला. भारतातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारने जादा खर्च करण्याची आवश्यकता आहे, असे कमिशनने स्पष्टपणे नमूद केले. लॉर्ड रिपन यांनी त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे ठरवले. परंतु रिपन यांच्यानंतर व्हॉइसरॉय म्हणून आलेल्या लॉर्ड डफरीन यांनी मात्र शिक्षणावरील खर्च कमी करण्याचे धोरण अवलंबिले. यासाठी देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे कारण देण्यात आले. गोखलेंनी सरकारच्या धोरणावर टीका करताना प्रश्न केला की, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तर ब्रिटिश सरकार आपल्या नोकरशहांना युरोपमध्ये पैसे पाठवण्यासाठी Exchange Compensation Allowance का देते? लष्करावर इतका खर्च का? गोखलेंनी विचारले की, इंग्लंडमध्ये किंवा इंग्लंडच्या इतर वसाहतीमध्ये लोकांनी दिलेल्या कराच्या दहा ते वीस टक्के भाग शिक्षणासाठी खर्च होतो, मग हिंदुस्थानातच शिक्षणावरती फक्त दोन टक्के इतका कमी खर्च का?
शिक्षण पद्धतीचे विश्लेषण
शिक्षण क्षेत्राचा संख्यात्मक (Quantitative) विचार करत असतानाच त्यांनी शिक्षणाच्या दर्जासंबंधी, गुणवत्तेसंबंधी (Qualitative aspect) विचार मांडले होते. तत्कालीन शिक्षण पद्धतींतील दोषांवर नेमके बोट ठेवताना Cramming (घोकंपट्टी) हाच मोठा शाप आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. ते म्हणत सध्याची शिक्षण पद्धती केवळ घोकंपट्टीला पोषक असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेस चालना मिळत नाही. त्यामुळे चांगले गुणवंत पदवीधर तयार होत नाहीत. आपली प्राथमिक शिक्षण पद्धतीही निरस, कंटाळवाणी व केवळ तांत्रिक झाली आहे. तीच क्रमिक पुस्तके, शिकवण्याची एकच पद्धती, त्यामुळे शिक्षक व विद्यार्थीही एकाच दर्जाचे! याउलट पाश्चात्त्य देशांमध्ये शिक्षण पद्धतींत नावीन्य आणण्याचा सतत प्रयत्न केला जातो. त्यांची पुस्तके सचित्र व आकर्षक असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होते. आपल्या येथे मुलांचा कल किंवा त्यांची आवड-निवड यांचा विचार केला जात नाही. त्यातच दररोजची शाळेची वेळ संपल्यानंतर मुलांना गृहपाठ करावयाचा असतो. हासुद्धा घोकंपट्टीचा एक प्रकार! मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला जात नाही. मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण केली जात नाही, ज्यामुळे पुढील संघर्षमय आयुष्यास तोंड देण्याची मुलांची मानसिक तयारी होते. विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवण्यात पुस्तक प्रकाशकही हातभार लावतात. या पुण्यकर्मात सामील होण्यासाठी अनेक शिक्षक, प्राध्यापकही उत्सुक असतात. या गाइड्समुळे मुलांना तयार प्रश्नोत्तरे मिळतात. त्यांना स्वत:ची बुद्धी वापरण्याची, स्वतंत्र विचार करण्याची गरजच भासत नाही. केवळ घोकंपट्टी केली की काम झाले! या सर्व दोषांना केवळ सरकार किंवा शिक्षण खातेच जबाबदार नसून पालकही तितकेच जबाबदार आहेत. किती पालक आपल्या पाल्याला मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल विचार करतात? मुलांना शाळेत प्रवेश मिळाला की आपले कर्तव्य संपले असे बहुसंख्य पालकांना वाटते. अशा या एकसुरी शिक्षण पद्धतींत बदल अनिवार्य आहे, असे त्यांना वाटत होते.
ना. गोखलेंनी सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेले शिक्षणविषयक विचार आजही लागू आहेत. आधुनिक विद्यार्थ्यांवरही निरनिराळे क्लासेस, गाइड्स यांचा मारा होतो. ठरावीक साचांच्या प्रश्नपत्रिकांमुळे घोकंपट्टीला आजही महत्त्व आहे. या संदर्भात गोखले म्हणाले होते, ”The character of the examinations of the university influences very materially the character of the studies of the young men who seek success in those examinations.”
प्राथमिक शिक्षणासंबंधीचा ठराव
मोर्ले-मिंटो सुधारणा मसुद्यान्वये कायदे मंडळांतील नॉन ऑफिशियल सभासदांनाही जनहिताच्या प्रश्नासंबंधी ठराव मांडून त्यावर मतदानाची मागणी करण्याची मुभा होती. गोखलेंमधल्या अस्सल संसदपटूने ही संधी बरोबर हेरली व भारतीय जनतेच्या जिव्हाळय़ाच्या अनेक प्रश्नांवर ठराव मांडून चर्चा घडवून आणली. त्यापैकी सर्वाधिक महत्त्वाचा ठराव होता शिक्षणविषयक! १८ मार्च १९१० रोजी गोखलेंनी लेजिस्लेटिव असेंब्लीमध्ये मांडलेला ठराव असा होता, ‘‘That this council recommends that a begining should be made in the direction of Making elementary education free and compulsory throughout the country and that a mixed commission of officials and non officials be appointed at an early date to frame definite proposals..’’
इतर सांस्कृतिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांप्रमाणेच हिंदुस्थान सरकारनेही सार्वजनिक शिक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी योजना आखून तिची अंमलबजावणी करावी, असा या ठरावाचा रोख होता. शिक्षण क्षेत्रात प्रगती केल्यामुळेच युरोपमध्ये सांस्कृतिक, औद्योगिक क्रांती झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांत त्यांनी विविध देशांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी व हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची तुलना करून हिंदुस्थानात ती किती अल्प आहे हे दाखवून दिले. शाळांच्या संख्यांची आकडेवारी देऊन त्यांनी हे पटवून दिले की, आपल्या देशात शिक्षणाची वाढ कूर्मगतीने होत आहे. एकूण उत्पन्नाच्या फारच कमी टक्के खर्च सरकार शिक्षणावर करत आहे, त्याच वेळेस विविध सरकारी खाती, लष्कर, रेल्वे यांच्यावर अवाढव्य खर्च होत आहे. हे प्रमाण खूपच व्यस्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
ब्रिटनसह जगातल्या अनेक देशांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची कास धरल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारून त्या राष्ट्रांची परिस्थिती सुधारली, परंतु आपल्याकडे असे करण्यात काही व्यावहारिक, आर्थिक व सामाजिक अडचणी आहेत हे त्यांना मान्य होते. या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले. खर्चाच्या बोजाचा विचार करता सुरुवातीला फक्त मुलांनाच शिक्षण सक्तीचे करावे. (स्त्री शिक्षणाचे महत्त्व ते ओळखून होते तरीही स्त्रियांना शिक्षण सक्तीचे करण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटे.) केंद्र सरकार व प्रांतिक सरकार यांनी खर्चाचा बोजा उचलावा, याकामी खासगी व्यक्ती व इतर संस्था यांनीही पुढाकार घेण्यास हरकत नसावी. सक्तीच्या शिक्षणाची योजना राबवण्याचे पूर्ण अधिकार प्रांतिक सरकारांना द्यावेत व सक्तीचे शिक्षण सहा ते दहा वर्षे कालावधीचे असावे, अशी सूचना त्यांनी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सक्तीचे शिक्षण विनाशुल्क असावे व प्रत्येक वर्षी शिक्षण क्षेत्राचा प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध करावा, अशीही एक सूचना होती.
सक्तीच्या शिक्षणासाठी लागणारा अतिरिक्त पैसा उभा करण्यासाठीही त्यांनी काही उपाययोजना सुचवल्या, त्या अशा,
१) शिक्षणाव्यतिरिक्त इतर सरकारी खात्यांवर होणाऱ्या खर्चास कात्री लावावी.
२) इंपोर्ट डय़ुटी वाढवून साडेसात टक्क्यांवर न्यावी.
३) जूट व इतर वस्तूंच्या एक्सपोर्टवर ५ टक्के कर आकारावा.
४) या सर्व उपाययोजनांमुळेही गंगाजळीत वाढ झाली नाही, तर मिठावरील करात आठ आणे वाढ करावी.
या ठरावावरील भाषणाचा शेवट करताना गोखले म्हणाले, ‘‘The increased efficiency of the individual, the higher general level of intelligence, the stiffening of the moral backbone of large sections of the community – none of these things can come without such education. In fact the whole of our future as a nation is inextricably bound up with it.’’
सक्तीच्या व मोफत शिक्षणाचे गोखलेंचे हे स्वप्न बरोबर शंभर वर्षांनंतर पूर्ण झाले. एप्रिल २०१० मध्ये सार्वभौम भारताच्या संसदेमध्ये ‘Right To Education Act’ मंजूर होत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, ‘About a hundred years ago a great son of India, G.K. Gokhale urged the imperial legislative assembly to confer on the Indian people the right to education’ असा ना. गोखलेंचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
विद्यार्थ्यांना सल्ला
तत्कालीन शैक्षणिक स्थितीविषयी विचार करत असताना सक्तीच्या व विनाशुल्क शिक्षणाच्या योजनेसंबंधी चर्चा करताना त्यांनी विद्यार्थ्यांचेही प्रबोधन केले.
गोखलेंच्या मते ज्ञानवंत, प्रज्ञावंत विद्यार्थी तयार करणे हे जगातील प्रत्येक विद्यापीठाचे ध्येय असते. विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला खतपाणी घालण्याची कामगिरी विद्यापीठांनी करावयाची असते. परंतु सद्य:परिस्थितीत आपल्या देशात ही गोष्ट फार मोठय़ा प्रमाणात शक्य होणार नाही, याची त्यांना कल्पना होती. (आपल्या देशातील तत्कालीन विद्यापीठे व विद्यालये नवीनच असल्यामुळे त्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे उच्च संशोधनासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री उपलब्ध करणे त्यांना शक्य होत नव्हते.) गोखले विद्यार्थ्यांना सल्ला देतात की, ‘‘You can recognise this education as a new factor in your life, as an ennobling influence under which you have now placed yourselves. And that means that your studies should not end when your college career is over. ’’ विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली तर ते उच्च सांस्कृतिक पातळीवर जातील. त्यांचे आचरण शुद्ध होईल, कॉलेजचे शिक्षण संपले तरी जीवनातील सर्वसामान्य कर्तव्ये पार पाडण्यास ते उत्तम तऱ्हेने सिद्ध होतील.
कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतरही विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा उपयोग कशा तऱ्हेने करू शकतात याचे मार्गदर्शन करताना ते म्हणतात,
१) अशिक्षित व अंधश्रद्ध समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न.
२) स्त्रियांचा सामाजिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे कार्य.
३) जुन्या धार्मिक संस्थांचे कार्य योग्य दिशेला वळवणे.
४) राजकारणाची आवड असलेल्यांनी, स्वातंत्र्यलढय़ांत भाग घेणे.
५) ज्यांना शक्य असेल त्यांनी देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे.
सर्वसाधारण समजूत अशी असते की, काही मूठभर लोकांमुळे देश प्रगतिपथावर जातो, परंतु ही समजूत चुकीची आहे. गोखले म्हणतात, ‘‘It is however a mistake to think so. A nations true greatness depends upon its average men and women. It is in the life, thoughts and actions of the average citizens that the solid strength of a nation really lies.’’
विद्यार्थ्यांनो, तुम्ही कदाचित मोठे संशोधक किंवा विचारवंत होऊ शकणार नाहीत, ज्ञानाच्या क्षेत्रांत तुम्ही भरीव कामगिरी करू शकणार नाहीत तरीही You must live within your own particular sphere a better, a more earnest, a more dutiful life तुम्हाला मिळालेल्या शिक्षणामुळे हे सहज साध्य होईल. थोडक्यात काय तर नुसते परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हा! मोठे बुद्धिवंत झाला नाहीत तरी चालेल, परंतु जागरूक नागरिक व्हा! उत्तम माणूस बना! गोखलेंनी वेळोवेळी व्यक्त केलेले शिक्षणविषयक विचार व विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला आजही तितकाच उद्बोधक आहे.