scorecardresearch

नातं हृदयाशी : हृदयविकारांच्या तपासण्या आणि चाचण्या

हृदयविकाराची निश्चिती करण्यासाठी वेगवेगळय़ा तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या यंत्रांमध्ये आणि तंत्रांमध्ये खूपच प्रगती झाली आहे.

00gajananहृदयविकाराची निश्चिती करण्यासाठी वेगवेगळय़ा तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या यंत्रांमध्ये आणि तंत्रांमध्ये खूपच प्रगती झाली आहे. त्याचा रुग्णाला फायदा होऊन लवकरात लवकर हृदयविकाराचे निदान करता येते.

वेगवेगळे रुग्ण हृदयविकाराची वेगवेगळी लक्षणे घेऊन येतात. त्याच्या लक्षणांच्या वर्णनावरून निदानाची दिशा ठरते.
हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत वेदना होणे, यालाच ‘अन्जायना पेक्टोरीस’ (हृदयशूळ.. Angina Pectoris) असे म्हणतात. रुग्णाने सांगितलेली लक्षणे ही हृदयविकाराचे निदान करण्यास महत्त्वाची असली तरी निदानाची खात्री करून घेण्यासाठी वेगवेगळय़ा तपासण्या करणे गरजेचे ठरते. जेणेकरून निदान पक्के करता येते व तपासाची आणि उपचाराची दिशा ठरवता येते.
वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या असामान्य प्रगतीमुळे हृदयविकारासंबंधी नवीन यंत्रे आणि तंत्रे उपलब्ध झालेली आहेत. त्याचा योग्य वापर करून योग्य निदान करता येते. हृदयविकाराचे निदान करण्यासाठी खालीलप्रमाणे वेगवेगळय़ा तपासण्या केल्या जातात.
१) ईसीजी (Electrocardiogram हृदयविद्युत आलेख) – एक विशिष्ट मशीन वापरून, त्याच्या तारा (leads) हातांना आणि पायांना चार आणि छातीवर सहा तारा जोडून आलेख काढला जातो, त्याला ई.सी.जी. म्हणजेच हृदयविद्युत आलेख म्हणतात.
आपल्या हृदयात ज्या विद्युत लहरी (Electrical Activity) निर्माण होत असतात, त्यांचे प्रत्यंतर या ECG  च्या वेगवेगळय़ा लहरीत, आलेखात प्रकट होते. ईसीजीच्या वेगवेगळय़ा लहरींच्या (waves) माध्यमातून रुग्णाला हृदयविकार आहे का? हृदयविकाराचा झटका आला आहे का, आला असेल तर तो अंदाजाने केव्हा येऊन गेला, खूप जुना आहे की, काही तासांपूर्वी आला आहे याचे अवलोकन सहजतेने करता येते.
हृदयविकाराचा झटका केव्हा आला, त्याची तीव्रता किती, कोणत्या भागाला किती, कोणत्या भागाला इजा झाली, हृदयाची गती, असंबंद्ध ठोके यांचेही निष्कर्ष काढता येतात.
ईसीजीच्या चार वेगवेगळय़ा विद्युत लहरी आलेखात ढोबळमानाने आढळतात (P wave, QRS Complex, ST segment AFd¯F T wave) त्यातील एसटी आणि टी लहरींनी हृदयविकाराच्या आजाराचे आणि स्वरूपाचे निदान केले जाते. स्थिर किंवा अस्थिर स्वरूपाचा आजार, हृदयविकाराचा झटका याचे निदान या एसटी आणि टी लहरींच्या बदलांवरून करता येते.
हृदयविद्युत आलेखन हे भविष्यवाणी वर्तवत नाही. भविष्यात झटका येणार की नाही याचा अंदाज ईसीजीवरून करता येत नाही. छातीत दुखत असताना किंवा हृदयविकाराचा झटका आल्यावरसुद्धा सुरुवातीला ईसीजी नॉर्मल असू शकतो. अशा वेळी दर तासा दोन तासांनी ईसीजी परत परत काढणे आवश्यक असते.
फक्त छातीत दुखणाऱ्या पण स्थिर स्वरूपाचा आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये (Chronic Stable Angina) ५० ते ६० टक्के रुग्णात ईसीजी नॉर्मल असू शकतो. म्हणजेच नॉर्मल ईसीजी असणे म्हणजे हृदयविकार नाही असे गृहीत धरणे सोयीस्कर होणार नाही, किंबहुना अशा परिस्थितीत इतर टेस्टची मदत घ्यावी लागते.
ईसीजीचे आकलन आणि निदान नेहमी तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञांकडूनच करून घ्यावे, जेणेकरून लहानसहान बदल नजरेआड होणार नाहीत आणि योग्य ते निदान होईल. रुग्णाची लक्षणे आणि हृदयविद्युत लहरी यांची योग्य सांगड घालून निदान करणे ही तज्ज्ञांची जबाबदारी आहे. हे करण्यात काही समस्या असतील त्रुटी असतील तर तज्ज्ञांनी इतर चाचण्या सुचवाव्यात.
२) स्ट्रेस टेस्ट (Computerised Stress Test – Tread mill Test)
ही साधी सरळ आणि सोपी तपासणी आहे. हृदयाला होणारा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही, छातीचे दुखणे हे अन्जायना तर नाही ना, हे पाहण्यासाठी या चाचणीचा वापर केला जातो. या चाचणीत मनुष्य चालत असताना संगणकाद्वारे ईसीजी काढून रुग्णाचे रक्तदाब, हृदयाचे ठोके, त्याला होणारा त्रास, लागणारा दम किंवा इतर लक्षणे या चार गोष्टींची सांगड घालून हृदयविकाराचे निदान केले जाते.
आपण नेहमी जसे रस्त्यावर चालतो तसेच या मशिनवर चालायचे असते. रुग्णाला जमेल तितकाच वेळ आणि वेग या टेस्टमध्ये निवडता येतो. या आधी ट्रेड मिलवर कसे चालायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते.
या चाचणीसाठी उंची, वजन, वय, रक्तदाब या माहितीची नोंद संगणकामध्ये केली जाते. छातीवर बारा ईसीजीचे लीड्स (चकत्या) लावल्या जातात. दंडावर रक्तदाब मोजणारा पट्टा बांधला जातो. रुग्णाला फक्त ट्रेड मिलच्या पट्टय़ावर चालायचे असते. सुरुवातीला पट्टय़ाचा वेग पण कमीच असतो. रुग्ण सहजपणे चालायला लागल्यानंतर यंत्रांच्या वेगवेगळय़ा प्रोटोकॉलप्रमाणे वेग वाढवला जातो. प्रत्येक क्षणाला रुग्णाच्या ईसीजी/ हृदयाचे ठोके या वर तज्ज्ञ डॉक्टर नजर ठेऊन असतात. त्यामुळे ही चाचणी अत्यंत सुरक्षित तसेच अत्यंत संवेदनक्षम आहे. ही तपासणी रुग्णाला हृदयविकार आहे की नाही याचे निदान करू शकते. ट्रेडमिल टेस्टवर तुम्ही किती मिनिटे चालता यावरून तुमच्या हृदयाची आणि शरीराची रक्तातून ऑक्सिजन शोषण्याची प्रक्रिया व्यवस्थित आहे की नाही, याची माहिती मिळते.
यामध्ये सुरुवातीचा आरामस्थितीतील ईसीजी आणि नंतर चालतानांचे ईसीजी व अंतिम ईसीजी जेव्हा तुम्ही थकता आणि ट्रेडमिल थांबवल्यानंतरचा ईसीजी नंतर पुन्हा आरामस्थितीतील रिकव्हरी स्टेजमधील ईसीजी याची तुलना केली जाते. सुरुवातीचे ईसीजी नॉर्मल असतील आणि चालतानाचे ईसीजी खराब बदल दाखवत (ST-T charges) असतील तर स्ट्रेस टेस्ट ही त्या व्यक्तीला हृदयविकार आहे असे दर्शविते.
तसेच या टेस्टमध्ये चालताना रक्तदाब कमी झाला. छातीमध्ये दुखले, प्रमाणाच्या बाहेर दम लागला किंवा हृदयाची गती असंबंध झाली तरी पण त्या रुग्णाला हृदयविकार आहे असा अंदाज वर्तविला जातो.
तज्ज्ञ डॉक्टरकडूनच ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अननुभवी डॉक्टरकडून या टेस्टचे योग्य मूल्यांकन व अवलोकन होत नाही आणि योग्य निदान होत नाही.
३) हृदयाची सोनोग्राफी : (Echocardiography and Colour Doppler – इको आणि कलर डॉप्लर) : हृदयप्रतिध्वनी आलेख चाचणी म्हणजेच हृदयाची अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी होय. यात हृदयाची रचना, कप्पे, झडपा, त्यांची कार्यक्षमता, त्यांचे आकारमान याबद्दल सविस्तर माहिती मिळते. त्यातच टू-डी (द्विमिती-two dimensional Echo) आणि कलर डॉप्लर (Colour Doppler) या उच्च दर्जाच्या चाचण्या उपलब्ध असून त्यांच्या मदतीने हृदयविकार ओळखणे हे सहजसाध्य झाले आहे आणि तंतोतंत रोगनिदान करून त्यावरील उपाययोजना कितपत परिणामकारक ठरले आहे याचे पण अवलोकन केले जाते.
या चाचणीत अल्ट्रासाऊंड ध्वनीलहरी या शरीरात सोडल्या जातात व त्या आतील अवयवापर्यंत धडकून, प्रवर्तित होऊन शरीराबाहेर, मायक्रोफोनसारख्या ‘ट्रान्सडय़ूसर’द्वारे पुन्हा शोषून संगणकाद्वारे त्याचे अवलोकन करून पडद्यावर चित्राच्या रूपात दाखवल्या जाते व त्याद्वारे हृदयाच्या विविध आजाराच्या कार्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरला मिळू शकते.
एम.मोड (M- Mode Echo,एम मिती) एकोमध्ये हृदयाच्या कप्प्यांचा आकार, भिंतीची जाडी याचे मोजमाप करून हृदयाचा आकार मोठा झाला का, भिंतीना सूज आली आहे का? याचे निदान करता येते.
२-डी एको (2-D Echo- Two Dimentional Echo, द्विमिती इको) यामध्ये हृदयाचे आकुंचन प्रसरण पावणे, हृदयाची कार्यक्षमता, हृदयाच्या वेगवेगळय़ा झडपा आणि त्यांची उघडझाप या गोष्टींचे आकलन चलचित्राद्वारे तज्ज्ञांना करता येते.
‘डॉप्लर’ने रक्त वाहण्याची दिशा, वेग याचे मोजमाप करता येते. प्रामुख्याने झडपांचे कार्य कशा प्रकारे चालले आहे, त्यांची गळती आहे काय, त्याचे आकारमान कमी होत आहे काय, त्यातून वाहण्याऱ्या रक्तप्रवाहाचा वेग योग्य आहे ना? या सर्व गोष्टीची माहिती डॉप्लर तपासणीमध्ये कळते.
‘कलर डॉप्लर’ (Colour Doppler)- या तपासणीमध्ये द्विमिती चित्रीत रंगाचा वापर करून हृदयातील आणि झडपांमधील रक्तप्रवाह कोणत्या दिशेने किती वेगाने होतो आहे याची माहिती मिळते. झडपा आकुंचन-पावल्या (STENOSIS) किंवा झडपांमधून गळती होत असेल (Regurgitation) तर त्याचे निदान आणि त्याची प्रखरता (Staging or grading) या कलर डॉप्लर तपासणीमधून सहजपणे कळते. एकोकार्डिओग्राफी ही हृदयाची आंतरचना आणि कार्यक्षमता बघण्याची अत्यंत सोपी सरळ सुरक्षित तपासणी आहे. रुग्णाला काही त्रास होत नाही किंवा कुठलेही इंजेक्शन न देता पाच ते दहा मिनिटांत ही तपासणी होते.
यामध्ये हृदयाचा आकार, पंपिंग (कार्यक्षमता) स्नायूची स्थिती, झडपांची स्थिती आणि कार्यक्षमता, हृदयाच्या भिंतीचे आजार, भोक, हृदयातील रक्तप्रवाह, झडपांतून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाचा वेग, गळती या सर्व गोष्टींची बिनचूक माहिती आपल्याला मिळू शकते.
ही तपासणी सर्वत्र उपलब्ध आहे. लॅपटॉपच्या आकाराचे असणारे हे मशिन कुठेही सहजपणे नेता येते. कोठेही, केव्हाही व रुग्ण कोणत्याही अवस्थेत असेल म्हणजेच कुठलीही पूर्वतयारी न करता ही तपासणी करता येते.
अतिप्रगत इकोद्वारे काही विशेष तपासण्या करून हृदयाबद्दल अधिक माहिती मिळू शकते. त्यामध्ये
१) अन्ननलिकेतून- हृदय प्रतिध्वनी तपासणी (Trans – oesophageal Echo- TEE, ट्रान्स- ईसोफेजियल इको)
२) स्ट्रेस एको (Stress Echocardiography)
३) कॉन्ट्रास्ट एको- (Contrast Echocardiography)
४) फिटल एको (गर्भपिशवीतील गर्भाच्या हृदयाची तपासणी -Foetal Echo)
ट्रान्स- ईसोफेजियल एको
अन्ननलिकेतून- हृदय प्रतिध्वनी तपासणी: काही कारणांमुळे नेहमीच्या एको टेस्टमध्ये चलचित्र व्यवस्थित दिसत नाही. त्यामागे रुग्णाला असलेले फुप्फुसांचे आजार (COPD), जाडी व्यक्ती (Morbid Obesity) छातीच्या पिंजऱ्यातील हाडांचे दोष, पाठीच्या कण्याचा बाक (Kypho- Scoliosis) छातीचे किंवा हृदयाचे झालेले ऑपरेशन या कारणांचा समावेश होतो.
अशा वेळी ट्रान्स इसोफेजियल एको करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: कर्णिकामधील पडद्यामधील दोष (भोक – Atrial Septal Defect), फुप्फुसांमधून शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नसांची जोडणी डाव्या कर्णिकेला व्यवस्थितपणे आहे ना? (Pulmonary Venous Connection), महारोहिणीचे आजार, उदा. महारोहिणीचा आतला पापुद्रा फाटणे (Dissection of AortaY), महारोहिणी अरुंद होणे किंवा तीत फुगा होणे (Stenosis or Aneurysm), झडपांचे आजार आणि हृदयाच्या काही कप्प्यांतील रक्ताच्या गुठळय़ा याचे निदान या एकोद्वारे योग्यरीत्या होते.
या तपासणीमध्ये रुग्णाला सहा तास उपाशी ठेवले जाते. उपाशीपोटी त्याच्या घशामधून जठरापर्यंत नळी टाकली जाते. त्या नळीच्या टोकाला ट्रान्सडय़ुसर असतो. तो वेगवेगळय़ा कोनातून हृदयाच्या चलचित्राची नोंद घेतो. ट्रान्सडय़ुसर आणि हृदय यामध्ये कोणताही अवयव मध्ये येत नसल्यामुळे हृदयाच्या चलचित्राची अचूक नोंद आणि अचूक निदान होते.
तपासणीनंतर दोन तासांनी रुग्णाला खायला देण्यात येते. नळी टाकताना फक्त घशाचा भाग बधिर करण्यात येतो.
स्ट्रेस इकोकार्डिओग्राफी (STRESS ECHO)
यामध्ये व्यायाम किंवा औषधांनी विशिष्ट असा ताण निर्माण करून म्हणजेच हृदयाची कार्यक्षमता आणि पंिपग क्षमता व्यवस्थित आहे ना, त्यातून हृदयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे ना याची माहिती कळते. नेहमीच्या ट्रेडमिल तपासणीपेक्षा यात हृदयाच्या रक्तपुरवठय़ाची माहिती देण्याची क्षमता ९० ते ९५ टक्के आहे.
व्यायामाच्या अगोदर इको करून हृदयाचे पंपिंग व वेगवेगळय़ा भागांच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण कसे आहे आणि व्यायाम संपल्यानंतर हृदयाची गती अधिक असतानाच त्या त्या भागांच्या आकुंचन-प्रसरणाची क्षमता योग्य आहे की त्यांची हालचाल कमी झाली, हे बघितले जाते. जर हालचाल कमी झाली (Hypukinesia) असेल तर त्या भागाचा रक्तपुरवठा कमी होतो आहे असा निष्कर्ष काढता येतो. ज्या रुग्णांना व्यायाम करता येत नसेल किंवा वैद्यकीयदृष्टय़ा त्यांना व्यायाम करण्यास मनाई असेल अश्या रुग्णांमध्ये काही औषध देऊन (Intravenous Dobutamine, Adenosine etc) हृदयाची गती आणि रक्तदाब वाढवला जातो. या वाढलेल्या ताणामध्ये हृदय कसे काम करते, हृदयाच्या काही भागाची हालचाल कमी होते का, यावरून हृदयाच्या रक्त पुरवठय़ात अडथळा आहे किंवा नाही हे शोधले जाते.
थोडक्यात, इको ही सरळ सोपी सुरक्षित अशी तपासणी असून हृदयविकाराच्या निदानात मदत करणारी महत्त्वाची तपासणी आहे.
४) सीटी कोरोनरी अँजिओग्राफी :
(CT- Coronary Angiography) :
आजही अँजिओग्राफी म्हणजे शरीरात नळी टाकून केलेली तपासणी हे ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ अंतिम सत्य आहे. आता शरीरात नळी न टाकता फक्त इंजेक्शन देऊन नव्या पद्धतीने हृदयाच्या नसांची रक्तवाहिन्यांची तपासणी करता येते. ते सिने सीटी स्कॅनमुळे शक्य झाले आहे.
यात रुग्णांना हातातील शिरेतून रंगद्रव्य (Dye) टोचले जाते व ते रंगद्रव्य महारोहिणीच्या तोंडाशी पोहोचते आणि हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये पोहोचते, तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या चलचित्रांची नोंद सीटी स्कॅन यंत्रांद्वारे केली जाते.
सुरुवातीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे की नाही, याची माहिती सीटी स्कॅन यंत्राद्वारे त्या रक्तवाहिन्यांमध्ये किती प्रमाणात कॅल्शियम जमा झाले आहे यावरून ठरवतात. त्याला ‘कॅल्शियम स्कोअर’ असे म्हणतात. ज्यांच्यामध्ये हा स्कोअर जास्त असतो, त्यांना हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा (Blockage) असण्याचे प्रमाण जास्त असते. हा स्कोअर फारच अधिक असेल तर सीटी कोरोनरी अँजिओग्राफी(CT Coronary Angiography) करणे शक्य होत नाही. अशा वेळी शरीरातून नळी टाकून अँजिओग्राफी करावीच लागते. कॅल्शियम स्कोअर कमी किंवा नॉर्मल असेल तर सीटी अँजिओग्राफी करण्यात येते. आज ६४ किंवा १२८ (Slice) भाग कमीतकमी वेळेत करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांची नोंदणी शक्य झाल्यामुळे नसांचा आकार आणि त्यातील अडथळा याचे निदान शक्य झाले आहे.
या तपासणीमार्फत हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळ्यांचे योग्य निदान आज ७५ टक्के रुग्णांमध्ये योग्य तऱ्हेने करता येते.
हृदय सोडता शरीरातील सर्व अवयव स्थित अवस्थेत असल्यामुळे सीटी स्कॅनने त्यांची तपासणी योग्य तऱ्हेने होऊ शकते, पण हृदय हे सदैव हालचाल करणारे ‘चल’ अवयव असल्यामुळे सीटी स्कॅनच्या मार्फत केलेल्या अँजिओग्राफीने निदानाला बऱ्याच मर्यादा आहेत.
रुग्णांच्या हृदयाची गती ६० प्रतिमिनीटपेक्षा कमी असली तर चित्रीकरण जास्त चांगले करता येते. त्यासाठी रुग्णाला दोन बिटा ब्लॉकर नावाचे औषध घ्यावे लागते, पण बिटा ब्लॉकर सर्वानाच देणे शक्य नाही, कारण बिटा ब्लॉकरचे काही साइड इफेक्ट्स असतात.
काही ठरावीक परिस्थितीतच सीटी कोरोनरी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात येतो. १०० मिलीलिटर रंग्रद्रव्य या तपासणीमध्ये रुग्णाला देण्यात येते. त्यामुळे किडनीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो.
बायपास सर्जरीनंतर रुग्णास पुन्हा त्रास होत असेल तर सर्जनने घातलेल्या ग्राफ्टची जागा आणि खुलेपणा (Location of Graft and Patency) दाखवण्यासाठी ही तपासणी अगदी सर्वोत्तम आहे.
एखाद्या रुग्णाला अगदी तरुण वयात हृदयविकाराची खूप लक्षणे असतील, पण सर्व तपासण्यांद्वारे निदान होते की त्याला हृदयविकार नाही, पण रुग्णाची तसल्ली करण्यासाठी सीटी अँजिओग्राफी करण्यास काही हरकत नाही.
सीटी स्कॅनच्या वेगवेगळ्या यंत्रांची उपलब्धता असली आणि बऱ्याच सुधारणा होत असल्या तरी नळी टाकून केलेली अँजिओग्राफी हीच सध्या तरी गोल्ड स्टॅण्डर्ड आहे.
पण जर हृदयाच्या भोवतीच्या आवरणाचे आजार असतील (Pericardium) किंवा ते हृदयाला चिटकून दबाव आणत असतील (Constrictive Pericarditis) तर सीटी स्कॅनचा उपयोग अपरिहार्य आहे. हृदयाच्या महारोहिणीचे (Aorta) आजार असतील, तसे आतला पापुद्रा फाटणे (Dissection Of Aorta) किंवा महारोिहणी आकुंचन पावणे किंवा फुगविणे (Stenosis or Aneurysm) अशा वेळी सीटी स्कॅन फार उपयोगी पडते.
एमआरआयचासुद्धा हृदयाच्या आजारांमध्ये चांगला उपयोग होता, पण एमआरआयची उपलब्धता आणि तपासणी महागडी असल्यामुळे कार्डिअ‍ॅक एमआरआयचा वापर हृदयविकाराच्या निदानात कमी होतो.
५) न्युक्लिअर कार्डिओलॉजी (Nuclear Cardiology)
(स्ट्रेस थॅलियम टेस्ट ,Stress Thallium Teest)
(परफ्यूजन स्कॅनिंग, Perfusion Scanning)
परफ्यूजन स्कॅनिंग म्हणजे रक्ताभिसरण तपासणी यामध्ये व्यायाम किंवा औषधांनी विशिष्ट असा तणाव-ताण निर्माण करून हृदयाची गती वाढवून हृदयाची चलचित्रे काढली जातात. व्यायाम संपताच ‘थॅलियम’ नावाचे ऊर्जाभरित (रेडिओ आयसोटोप द्रवरूप औषध हाताच्या नसेमधून हृदयाच्या रक्तवाहिनीमार्फत हृदयाच्या स्नायूंमध्ये पोहोचवतात. मग गॅमा कॅमेऱ्याद्वारे खास यंत्रांनी हृदयाची छायाचित्रे काढली जातात. त्यानंतर आराम अवस्थेत एक तास, दोन तास आणि चार तासांनंतर हृदयाची आणखीन छायाचित्रे काढली जातात. रक्तप्रवाहातील अडथळ्यानुसार ही औषधी द्रव्ये स्नायूपेशीमध्ये साकळून राहतात किंवा विरघळतात, त्यानुसार हृदयाच्या स्नायूच्या रक्तपुरवठय़ाबाबत निष्कर्ष काढले जातात.
आरामदायी स्थितीत किंवा व्यायामानंतर हृदयात ‘थॅलियम’ नसणे म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या नॉर्मल आहेत आणि स्नायू व्यवस्थित आहे असे मानले जाते.
रक्ताभिसरण दोष व्यायामाच्या वेळेस सापडतो, पण आरामदायी स्थितीत तो निघून जातो. त्याचा अर्थ त्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा आहे, पण स्नायूपेशी जिवंत आहेत. रक्ताभिसरणाचा दोष व्यायाम व आरामदायी स्थितीत तसाच राहणे याचा अर्थ हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाच्या स्नायूंना पूर्णपणे इजा होऊन स्नायूपेशी मृतावस्थेत आहेत आणि या स्थितीत त्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर केला तरीपण ते स्नायू कार्यरत होणार नाहीत. म्हणजेच अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीचा त्या भागाला काही उपयोग होणार नाही.
या चाचणीमार्फत आपल्याला स्ट्रेस टेस्टपेक्षा अधिक उपयुक्त माहिती मिळते, पण या तपासणीला लागणारा वेळ, तज्ज्ञांची गरज आणि ती फार महागडी असल्यामुळे काही ठरावीक रुग्णांमध्येच या तपासणीचा उपयोग होऊ शकतो.
हृदयविकाराचा मोठा झटका येऊन गेल्यावर हृदयाच्या स्नायूपेशी जिवंत आहेत की मृत आहेत.. त्यानुसार अँजिओप्लास्टी जरुरी आहे का नाही हे ठरवण्यात काही रुग्णांमध्ये ही तपासणी उपयुक्त आहे.
अँजिओग्राफीमध्ये आढळलेला अडथळा जर ५० ते ६० टक्के असेल तर अशा वेळी स्ट्रेस थॅलियम परफ्यूजन स्कॅन करून या अडथळ्यासाठी अँजिओप्लास्टी करणे आवश्यक आहे की नाही याचा निर्णय घेणे योग्य असते (Borderline Block).
हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यास वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत, पण शरीरात नळी टाकून केलेली अँजिओग्राफी (Catheter Coronary Angiography) ही तपासणी गोल्ड स्टॅण्डर्ड आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात..!!!
डॉ. गजानन रत्नपारखी

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heart