मेष मौजमजेवेळी सर्वजण बरोबर असतात. परंतु अडचणीच्या वेळी आपण एकटेच असतो. असा अनुभव देणारा हा आठवडा आहे. प्रत्येक निर्णय घेताना किंवा कृती करताना बुद्धिबळातील चालीप्रमाणे त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा नीट विचार करा. तुमचे खरे हितचिंतकच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. व्यापार उद्योगात खूप काही नवीन करावेसे वाटेल. परंतु पैशाची टंचाई असल्यामुळे आधी तरतूद करावी लागेल. घरामध्ये सगळ्यांशी सबुरीचे धोरण ठेवणे हेच तुमच्या दृष्टीने हितावह ठरेल.

वृषभ स्वभावत: तुम्ही व्यवहारी आहात. त्या चौकटीत राहूनच काम केलेले तुम्हाला आवडते. पण कधी कधी मात्र भावना व्यवहारावर विजय मिळवतात. तशी तुमची या आठवडय़ात स्थिती होण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगामध्ये ज्या कामाला आज ताबडतोब महत्त्व नाही त्या गोष्टींमध्ये तुम्ही रममाण व्हाल. त्यातून जास्त पैसे खर्च होतील. नोकरीमध्ये अयोग्य व्यक्तीच्या संगतीमुळे नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागेल. मुलांचे महागडे हट्ट पुरवावे लागतील.

मिथुन अनेक गोष्टी करण्याचा तुमचा उत्साह असेल. परंतु ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याकडून कितपत सहकार्य मिळेल याची शंका वाटते. त्यामुळे ‘विना सहकार नाही उद्धार’ याची आठवण होईल. व्यवसाय उद्योगात काही कारणाने ज्या व्यक्तींशी हितसंबंध जोडले गेले होते त्यामध्ये आता खंड पडण्याची शक्यता आहे. त्या जागी काहीतरी नवीन करावेसे वाटेल. नोकरीमध्ये जे काम पूर्वी केले होते त्यामध्ये काही त्रुटी राहिल्याने तेच काम परत करावे लागेल. घरामध्ये न टाळता येणारे कर्तव्य पार पाडण्यात तुमचा बराच वेळ जाईल.

कर्क तुमच्या व्यक्तिमत्त्वातले वेगवेगळे कंगोरे दिसून येतील. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्ही नवनवीन कल्पनांचा वापर कराल. ज्या व्यक्तींना पूर्वी तुमचा चांगला अनुभव आला होता त्या व्यक्ती तुम्हाला नवीन काम देऊ इच्छितील. पैशाची आवक चांगली असेल. नोकरीमध्ये तुमचा उत्साह अपूर्व असेल. त्याचा तुमच्यापेक्षा सहकाऱ्यांना आणि संस्थेला जास्त फायदा मिळेल. घरामध्ये तुम्ही प्रियजनांसाठी सर्वकाही कराल. पण त्यांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना त्या कमीच वाटतील. तरुणांना प्रेमात रुसवेफुगवे सहन करावे लागतील.

सिंह ग्रहमान तुमच्या मनाची द्विधा निर्माण करणारे आहे. मनाच्या कोपऱ्यात मौजमजा करण्याचा मूड असेल. परंतु कर्तव्यालाही तितकेच महत्त्व द्याल. व्यापार उद्योगात विक्री चांगली होईल. फायद्याचे प्रमाण वाढल्याने काही जुनी देणी देऊ शकाल. नोकरीमध्ये संस्थेतर्फे कर्ज किंवा काही विशेष सवलती मिळाल्या असतील तर त्याचा तुम्ही आनंद घ्याल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आनंद तुमच्या उत्साही स्वभावामुळे आणि रसिकतेमुळे वाढेल. सामाजिक कार्यक्रमात नेतृत्व कराल.

कन्या त्यामुळे पैसा आणि कर्तव्य या दोन गोष्टींना तुम्ही सगळ्यात जास्त प्राधान्य देता. हे सर्व विसरून तुम्ही स्वप्नमयी दुनियेत रममाण व्हाल. खर्च वगैरे गोष्टींचा विचार न करता आलेल्या क्षणाचा आनंद लुटाल. व्यापार उद्योगामध्ये थोडे पैसे कमी मिळाले तरी गिऱ्हाइकांना खूश करण्याकडे तुमचा कल राहील. नोकरीमध्ये ठरविलेली कामे वेळेच्या आधी संपवाल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या समवेत करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. एखाद्या क्षेत्रात तुमचे प्रावीण्य असेल तर तुम्हाला ते दाखविण्याची संधी मिळेल.

तूळ तुम्ही इतरांना चांगला सल्ला देता, पण या आठवडय़ात मात्र तुमचे बोलणे आणि कृती यांमध्ये समन्वय नसल्याने समोरच्या व्यक्ती कोडय़ात पडतील. व्यापार उद्योगामध्ये पैसे चांगले मिळतील. त्यातून पूर्वीच्या कर्जाची परतफेड करायचे ठरवाल. पण आयत्या वेळेला वेगळ्याच कारणाकरता त्याचा विनियोग कराल. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी बोलताना संस्थेविषयी कोणतेही मतप्रदर्शन करू नका. घरामधील व्यक्तींना तुमचे विचार पटणार नाहीत. तरुणमंडळींना एखाद्या व्यक्तीची भुरळ पडेल.

वृश्विक एखाद्या प्रश्नामध्ये बराच काळ शांत राहून तुम्ही विचार करता. पण जेव्हा प्रश्न हाताबाहेर जाईल असे वाटते तेव्हा उग्र स्वरूप धारण करता. या आठवडय़ात तुमचे असे रूप पाहायला मिळेल. व्यवसाय-उद्योगात पैशाचा किंवा इतर धोक्यांचा विचार न करता जे योग्य वाटेल ते निर्णय ताबडतोब कृतीत आणा. नोकरीमध्ये वरिष्ठांनी दिलेली सूचना तुम्हाला आवडली नाही तर त्यावर बंड करून उठाल. घरामध्ये इतरांनी तुम्हाला विरोध केलेला चालणार नाही. त्यावरून इतरांशी तुमचे खटके उडतील.

धनू जगाची फारशी पर्वा न करता तुम्ही तुमच्याच मस्तीत मश्गूल असाल. पण सभोवतालच्या व्यक्तींना मात्र कोडय़ात टाकाल. व्यापार उद्योगात कामाचा वेग हळूहळू मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधूनच तुमच्या मनावर एक प्रकारचे दडपण येईल. पूर्वी कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर त्याची वेळीच परतफेड करा. नोकरीमध्ये जरी तुमचा काम करण्याचा मूड नसला तरी वरिष्ठ मात्र एखादी युक्ती करून तुमच्याकडून जास्त काम करवून घेतील. घरातल्या व्यक्तींशी आपुलकीने वागा.

मकर कर्तव्यात कसूर करायची नाही आणि जीवनाचा आस्वाद घ्यायचा असा दुहेरी हेतू तुम्ही साध्य करू शकाल. व्यवसाय उद्योगात कामाचे प्रमाण सुरुवातीला चांगले असेल, पण नंतर ते हळूहळू कमी होईल. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ दिसाल. जोडधंदा असणाऱ्यांनी मिळालेल्या पैशातून पूर्वीची कर्जे कमी करावीत. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामात वरिष्ठांवर आणि सहकाऱ्यांवर अवलंबून राहिल्यामुळे तुमची थोडीफार गैरसोय होईल. पण परस्पर कोणताही निर्णय घेऊ नका. तरुणांनी योग्य व्यक्तींशी संगत करावी.

कुंभ मनाप्रमाणे आनंद लुटण्याकडे तुमचा कल असेल. एखादी गोष्ट तुमच्या मनात एकदा आली तर तुम्ही मागचापुढचा विचार न करता ती तुम्ही करून टाकता. हा तुमचा हट्टी स्वभाव जागृत होईल. व्यवसाय उद्योगात गिऱ्हाइकांना खूश करण्याकरता गिऱ्हाइकांना बढाया माराल. नोकरीमध्ये कामाची बरीच धावपळ असेल. सगळी कामे एकदम न करता एक एक काम हातावेगळे करा. घरामध्ये स्वत:च्या हौसेकरता काही गोष्टी कराल. दीर्घ काळानंतर एखाद्या व्यक्तीशी गाठभेट झाल्याने जुन्या आठवणी ताज्या होतील.

मीन तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाला पूरक असे ग्रहमान आहे. ज्या इच्छा-आकांक्षा मनामध्ये काही कारणाने दडपून ठेवल्या होत्या त्या उफाळून येतील. व्यापार उद्योगात नवीन संकल्प सुरू करावासा वाटेल. जोडधंदा असणाऱ्यांना एखादे मोठे काम दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये जे काम तुमच्या हातामध्ये असेल त्यामधे जरी कष्ट जास्त असले तरी ते काम तुम्ही आवडीने कराल. घरामधे आवडत्या व्यक्तींचा सहवास हवाहवासा वाटेल.