आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पावलोपावली विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करत असतो पण आपल्याला त्याची जाणीव नसते. मुंबईत होणाऱ्या नॅशनल सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने या लेखात विज्ञान-तंत्रज्ञान आणि रोजचं जगणं यांचा संबंध उलगडून दाखवला आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे आपल्या रोजच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळं, आपल्याला न समजणारं, आपल्या आवाक्याबाहेरचं अशी खूपदा समजूत असते. प्रत्यक्षात मात्र आपल्या रोजच्या जगण्यात विज्ञान ठासून भरलेलं असतं. पदोपदी आपण विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, एवढंच नाही तर आपणही विज्ञान-तंत्रज्ञानाचा एक भागच असतो, पण त्याची आपल्याला जाणीव असतेच असं नाही. खरं म्हणजे नसतेच. त्यामुळेच विज्ञान ही एक वेगळी गोष्ट आहे, आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही असंच अनेकांना वाटत असतं.
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना ज्याबद्दल अतिशय कुतूहल असतं ते आपलं शरीर हेच एक चालतंबोलतं विज्ञान आहे. शरीराची रचना, त्याचं काम चालवणारे वेगवेगळे विभाग यामध्ये भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. आपल्या चालणं, धावणं, उठणं-बसणं, खाणं, त्याची पचनक्रिया, नव्या जिवाची निर्मिती या सगळ्यामध्ये शास्त्र आहे. आपण भिंतीला टेकून उभे राहिलो आणि आपल्याला खाली बसायचं असेल तर पाय गुडघ्यात वाकवल्याशिवाय आपल्याला खाली बसता येत नाही. आपलं शरीर वाकवणं, वळवणं, उडय़ा मारणं, चढणं, उतरणं, पोहणं,  इतर हालचाली या सगळ्या गोष्टी या आपल्या शरीराच्या तंत्रज्ञानाचाच भाग आहेत. हेच शरीर जेव्हा आजारी पडतं तेव्हा दिली जाणारी औषधं, करावी लागणारी ऑपरेशन्स, त्यासाठीची उपकरणं हे सगळं विज्ञान-तंत्रज्ञानाचंच फळ आहे.
आपल्या रोजच्या जीवनातला अपरिहार्य भाग म्हणजे वाहतूक. माणसाला चाकाचा शोध लागला तेव्हापासून म्हणजे चाकाच्या निर्मितीपासून विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. बैलगाडी, सायकल या प्राथमिक वाहनांपासून ते आजच्या अद्ययावत वाहनांपर्यंतचा प्रवास पाहा. दर टप्प्यागणिक त्यामागचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आहे. आता सायकलसारखं वाहन घ्या. सायकल नुसती उभी केली तर ती स्थिर उभी राहात नाही, पडते. मग ती पडू नये म्हणून तिला स्टँड लावावा लागतो. पण त्याच सायकलवरून बसून ती चालवत निघालं की तशाच उभ्या अवस्थेत असते, पण पडत नाही. आगगाडीच्या चाकांचं घर्षण कसं होतं, त्यातून गती कशी निर्माण होते, आगगाडी रुळांवरूनच का धावते, ती जमिनीवरून का जाऊ  शकत नाही हे सगळे प्रश्न सगळ्यांना पडत असतात. त्यांची उत्तरं मिळवायला गेलं की विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जीवनाचा भाग कसा आहे ते समजतं. एवढंच नाही तर त्या वाहनांसाठी जमिनीचा पृष्ठभाग म्हणजेच रस्ता कसा असावा, तो टिकाऊ कसा बनवायचा याचंही वेगळं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आहे. हे सगळं विज्ञान-तंत्रज्ञानच आहे, आपण त्याचा वापर करत असतो, पण त्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान म्हणून बघत नसतो एवढंच. ती आली तर आपली विज्ञानाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी आपोआप विकसित होत जाईल.
वाहतुकीइतकाच आजच्या काळातला महत्त्वाचा घटक आहे संवाद-कम्युनिकेशन. आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले संगणक पन्नास वर्षांपूर्वी नव्हते. तीच गोष्ट पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या आणि आज अपरिहार्य झालेल्या मोबाइलची आणि टेलिव्हिजनची. या दोन-तीन घटकांनी आपलं सगळं आयुष्य कसं बदलून टाकलं आहे ते आपण अनुभवतोच आहोत.
बंगलोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये नुकतंच भारतरत्न सी. एन. आर. राव यांचं भाषण झालं. आपल्या भाषणात त्यांनी इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक इंडक्शनचा शोध लावणाऱ्या, ब्रिटिश रॉयल सोसायटीचा अध्यक्ष असलेल्या मायकल फॅरेडे यांचं एक उदाहरण सांगितलं. मायकल फॅरेडे दर शुक्रवारी विज्ञानावर भाषण देत असत. त्यांना इंडक्शनच्या शोधाबद्दल विचारलं गेलं की याचा उपयोग काय?  फॅरेडे यांचं उत्तर मार्मिक होतं. ते म्हणाले, ‘मूल जन्माला येतं तेव्हा याचा या जगात उपयोग काय असा प्रश्न कुणी विचारत नाही. तसंच माझ्या शोधाचं आहे. त्याचा उपयोग होईलच आणि तुम्ही राजकारणी उद्या त्यावर टॅक्सही लावाल.’ आज आपण इंडक्शनचा उपयोग कसा होतो ते पाहतो आहोत.
इंडक्शनचा विषयच निघाला आहे तर स्वयंपाकघर हीसुद्धा प्रयोगशाळा म्हणता येईल इतकं तिथे विज्ञान-तंत्रज्ञान असतं. दुधाचं दही बनवणारे सूक्ष्म जीवजंतू हे विज्ञान नाही तर काय आहे? शिजवणं, उकडणं, भाजणं, वाफवणं, तळणं, वाटणं या सगळ्या क्रिया हे विज्ञानाचंच रूप आहे. आणि आता त्यासाठी वापरली जाणारी मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, रेफ्रिजरेटर हे सगळे तंत्रज्ञानाचा आविष्कार आहेत. म्हणूनच विज्ञान कुठे आहे, यापेक्षा विज्ञान कुठे नाही असाच प्रश्न विचारायला लागेल.
आपल्याला विज्ञानाची दोन गटांत विभागणी करता येईल. एक म्हणजे मानवनिर्मित आणि दुसरं म्हणजे निसर्गनिर्मित. आता प्लास्टिकचंच उदाहरण घेतलं तर त्याचा किती प्रकारे उपयोग केला जातो ते आपण पाहतो आहोत. त्याचप्रमाणे काच, सिरॅमिक, वेगवेगळे धातू, सिमेंट, फायबर, कागद, कापड या सगळ्याचा वापर हे विज्ञानाच्या विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचाच आविष्कार आहे. खूपदा असंही होतं की मूळचं विज्ञान समजत नाही पण त्यातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर मात्र भरपूर होतो. फोटोग्राफी हे याचं उदाहरण आहे. आपण फोटो काढतो म्हणजे नेमकं काय करतो हे कित्येकांना माहीत नसेल, पण आज अगदी मोबाइलमधूनही फोटो काढले जातात.
वर उल्लेख केलेल्या चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या भाषणात सी. एन. आर. राव यांनी असंही सांगितलं की वनस्पती आपलं अन्न फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे तयार करतात. हे फोटोसिंथेसिस आता कृत्रिमरीत्या करता येईल का, यावर जगात काम सुरू आहे. या संशोधनाचा माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
हवा, पाणी, जमीन, ध्वनी, प्रतिध्वनी, ध्वनीचा वेग, कानाची रचना, ध्वनीचं प्रदूषण हे सगळे मुद्दे हे सामान्य माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचं विज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे.
माणसाच्या आदिम अवस्थेत सूर्य, चंद्र, ग्रह, तारे हे त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग असले तरी त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. रोज उगवणारा सूर्य प्रकाश द्यायचा म्हणून त्याला तो देव वाटायचा. पाऊस पडल्यावर अन्न उगवायचं म्हणून त्याला तो वरुणदेव वाटायचा. या सगळ्याबद्दल माहिती मिळत गेली तसतशा त्याच्या संकल्पना स्पष्ट होत गेल्या.
युर्गेन हाबरमास नावाच्या समाजशास्त्रज्ञानं असं सांगितलं आहे की आपण कोणत्याही गोष्टीची वैज्ञानिक माहिती घेतो त्यामागे आपले तीन प्रकारचे इंटरेस्ट असतात. एक म्हणजे ज्ञान मिळवणं, दुसरं म्हणजे तांत्रिक इंटरेस्ट आणि तिसरा कोणत्याही विचारसरणीपासून दूर जाऊन प्रश्न विचारून ज्ञानाच्या पातळीवर पुढे जाणं. याचाच आधार घेऊन असं म्हणता येईल की सामान्य माणसाने स्वत:च्याच जीवनाविषयी, आचारविचारांविषयी तीन इंटरेस्टचा विचार केला तर अंधश्रद्धेचा प्रश्नच येणार नाही.  
हे झालं रोजच्या जीवनातल्या विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल. त्याशिवाय आपल्या रोजच्या जीवनात लगेचच थेट उपयोग होत नाही, पण कालांतराने ते सामान्य माणसाच्या थेट उपयोगाचं ठरतं अशी विज्ञान-तंत्रज्ञानाची कितीतरी उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ आता अवकाशातील संशोधनासाठी अंतराळयानातून अंतराळवीर जातात. तिथे त्यांना दोनतीन महिने राहायचं असतं. या काळात तिथे तेवढा काळ टिकतील, त्यांना उपयोगी पडतील अशा कित्येक गोष्टी असतात, ज्यांचा नंतर सामान्य माणसासाठी उपयोग होतो. अंतराळवीरांसाठी तयार केली गेलेली पेयं हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. स्पेसशिप इंजिनीअरिंग खूप पुढे गेलं आहे. मुंबईत स्पेससाठी लागणारे वेगवेगळे सूक्ष्म भाग बनवले जातात. त्यात विकसित झालेलं तंत्रज्ञान आणि त्याचं कौशल्य याचा नंतर समाजाला खूप मोठा उपयोग होतो. किंवा स्पेसमधल्या वातावरणात उपयोगी पडतील असे स्पेससूट  बनवले गेले, ज्यांचा नंतर पृथ्वीवर अनेक कारणांसाठी वापर करता आला. नॅनोतंत्रज्ञानाचं उदाहरण यासंदर्भात चपखल आहे.
हीच गोष्ट एलइडीची (लाइट एमिटिंग डायोड). त्याचा शोध १९६० साली लागला. आधी तांबडय़ा एलइडीचा शोध लागला. मग हिरव्या रंगाच्या इलइडीचा शोध लागला आणि १९९३ मध्ये निळ्या रंगाच्या एलइडीचा शोध लागला. हे तिन्ही एलइडी एकत्र करून पांढऱ्या रंगाच्या एलइडीची निर्मिती झाली. त्याचा उपयोग करून बल्ब तयार केले गेले. हे बल्ब सामान्य बल्बच्या तुलनेत हजारो पट अधिक क्षमतेचे आहेत. त्यामुळे विजेचा वापर कमी होऊ  शकतो आहे. एलईडीचा शोध लावणाऱ्या जपानी संशोधकाला  त्यामुळेच यंदाचं नोबेल मिळालं आहे.
हॉर्ब्स बॉम हे केंब्रिजमधले एक इतिहासकार म्हणतात की पूर्वी एखादा शोध लागला की त्याचा प्रत्यक्ष जगण्यात वापर व्हायला शंभर-दीडशे वर्षे लागायची. आता पाच-दहा वर्षांत त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश होतो. तसा विचार करणारं उपयोजित तंत्रज्ञान ही शाखा विकसित झाली आहे, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
(शब्दांकन- वैशाली चिटणीस)

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
ग्रामविकासाची कहाणी
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा