29 February 2020

News Flash

वन पीस ड्रेस कसा निवडायचा?

मला वन पीस ड्रेस घालायची इच्छा आहे, पण फिटेड ड्रेस घातल्यावर माझं पोट दिसतं. त्यामुळे असे ड्रेस घालायची भीती वाटते. अशा वेळी मी कोणते ड्रेस

| June 5, 2015 01:08 am

01youthमला वन पीस ड्रेस घालायची इच्छा आहे, पण फिटेड ड्रेस घातल्यावर माझं पोट दिसतं. त्यामुळे असे ड्रेस घालायची भीती वाटते. अशा वेळी मी कोणते ड्रेस निवडावेत?
– प्राची राणे, २५

प्राची, सध्या मुली जीन्स घालण्यापेक्षा ड्रेस घालायला पसंती देऊ लागल्या आहेत. साहजिकच आहे म्हणा ना, सध्याचा अंगाची लाही करणारा उन्हाळा आणि नंतर येणारा पावसाळा लक्षात घेता हा पर्याय उत्तम आहे. अर्थात ड्रेस घातल्यावर टमी दिसणं ही कित्येकींची समस्या आहे. पण म्हणून हे ड्रेस घालायचेच नाहीत असं नाही. या ड्रेसेसमध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. नेहमीच फिटेड ड्रेस घालण्याची गरज नाही. तू अम्ब्रेला स्टाइल किंवा ए-लाइन ड्रेस ट्राय कर. हे कमरेखाली लूझ असतात. त्यामुळे पोट झाकलं जातं. एम्पायर लाइन यावेळी महत्त्वाची भूमिका बजावते. एम्पायर लाइन म्हणजे ड्रेसचे विभाजन करणारी लाइन. बिलो ब्रेस्ट एम्पायर लाइनचे ड्रेस घालून बघ. किंवा लूझ फिटेड ड्रेसला बेल्ट लावून विभाजन करता येतं. त्यामुळे ड्रेसला फिटेड लुक येतो. ड्रेस ढगळ वाटत नाही. याशिवाय एखाद्या पार्टीसाठी तुला फिटेड ड्रेस घालायचा असेलच, तर सध्या बॉडी फिटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्यामुळे पोटाचा घेरा काही प्रमाणात दाबला जातो. ते तू वापरू शकतेस. अर्थात हे फिटर रोज वापरण्यासाठी योग्य नाहीत, कारण यामुळे पोट आवळलं जातं. त्यामुळे यांचा सतत वापर टाळ.

लांब कुर्त्यांची सध्या फॅशन आहे. पण ते सगळ्यांनाच शोभून दिसतात असं नाही. मी उंचीने बुटकी आहे. मग अशा वेळी मला लांब कुर्ते घालायचे असतील, तर कसे कुर्ते निवडावेत?
– सुजाता पळसुले, २३

लांब कुर्ते हे फक्त उंच मुलींसाठी असतात, हा गैरसमज आहे. खरं तर योग्य प्रकारे घातले, तर हे कुर्ते सर्वाना शोभून दिसतात. त्यामुळे सुजाता तुझी उंची कमी असूनही, तुला हे घालावेसे वाटताहेत, यातून तुझा आत्मविश्वास दिसतो. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे तुला थोडी काळजी घ्यावी लागेल. पहिलं म्हणजे, शक्यतो जास्त लूझ फिट कुर्ते निवडू नकोस. त्यामुळे तुझी उंची अजूनच बुटकी वाटेल. तसंच या कुर्त्यांच्या उंचीकडे लक्ष दे. साधारणपणे गुडघ्याच्या उंचीचे किंवा त्यापेक्षा थोडय़ा जास्त उंचीचे कुर्ते तू घाल. पण पायघोळ कुर्ता निवडू नकोस. कुर्त्यांची स्लीट मोठी असेल तर तुझ्यासाठी ते उत्तम असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुर्ते तू कशासोबत घालतेस, याचा विचार कर. सध्या स्ट्रेट फिट सलवार बाजारात आलेत, त्यांच्यासोबत हे कुर्ते घातले जातात. पण याऐवजी तू लेगिंग वापरलेस तर उत्तम ठरेल. सलवार घालायचीच असल्यास मलमल, कॉटनची फिटेड सलवार घाल. सलवार जितकी लूझ असेल, तितकी तू अधिक बुटकी दिसशील. याशिवाय या कुर्त्यांचे स्लिव्ह फुल असतात. ते फोल्ड करून तुला आभास तयार करता येईल. शक्यतो मोठय़ा प्रिंटचे कुर्ते वापरू नकोस. बस या छोटय़ा गोष्टींची काळजी घेतलीस की यू कॅन रॉक धिस स्टाइल..

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 5, 2015 1:08 am

Web Title: how to select one piece dress
टॅग Fashion
Next Stories
1 लेहेंगा साडी कशी निवडावी?
2 उन्हाळ्यातल्या कॉटन पॅण्टस्…
3 उन्हाळा आणि हेअरस्टाइल?
X
Just Now!
X