भूषण तळवलकर – response.lokprabha@expressindia.com
१९७१च्या भारत-पाक युद्धातील बावनकशी विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून चालू आठवडा हा त्या युद्धाचा प्रत्यक्ष कालखंड आहे. भारतीय नौदलाने या युद्धात गौरवास्पद कामगिरी करत युद्धाच्या पहिल्याच दिवसापासून देदीप्यमान विजयांची मालिका सुरू केली. बंगालच्या उपसागरात किनाऱ्यालगत असलेली विक्रांत ही आपली विमानवाहू युद्धनौका युद्धापूर्वीच बुडवण्यासाठी पाक नौदलाची गाझी ही पाणबुडी आली होती. नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल नीलकांता कृष्णन यांनी ३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री तिला विशाखापट्टणम बंदराच्या मुखाशी चुचकारत आणले आणि अत्यंत चतुराईने तिचीच कबर खोदली. त्यांनी या विजयमोहिमेचा एवढय़ा दणक्यात आरंभ केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफझलखान वध प्रकरणाची आठवण यावी! स्वतंत्र भारताच्या नौदल इतिहासातील या सोनेरी पानाचा घेतलेला हा मागोवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६५ चे युद्ध भडकल्यानंतर सोव्हिएत रशियाने केलेल्या आवाहनानुसार ताश्कन्द करारान्वये युद्धबंदी झाली असली, तरी हा सामना काहीसा अनिर्णित अवस्थेत संपल्यामुळे पाक पुन्हा असे दु:साहस करणार याची कल्पना तत्कालीन रिअर अ‍ॅडमिरल कृष्णन यांच्यासह अनेक भारतीय नौदल अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे पाकिस्तानातील १९७० च्या निवडणुकांनंतर तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाईटद्वारे पूर्व पाकिस्तानची मुस्कटदाबी सुरू करताच वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे, याचा अंदाज भारताच्या राजकीय आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाला आला. पूर्व पाकिस्तानी निर्वासितांचे लाखोंच्या संख्येने भारतात येणारे लोंढे भारताला या संघर्षांत खेचू लागले. १९७० साली नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख असलेले कृष्णन पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाच्या अनेक योजना कार्यान्वित करत असताना त्यांची बदली नौदलाचे पूर्व विभागप्रमुख म्हणून विशाखापट्टणम इथे करण्यात आली. काहीशा नाराजीतच २७ फेब्रुवारी १९७१ रोजी त्यांनी पदग्रहण केले आणि सर्वप्रथम त्यांच्यासाठी असलेल्या ‘द रिट्रीट’ (निवारा, आश्रय) या अधिकृत निवासस्थानाचे नाव बदलून ‘नेव्ही हाऊस’ असे केले. लगोलग आपल्या संपूर्ण सेनेला स्फूर्तिदायक संभाषणांनी प्रेरित करत, पूर्व विभागाच्या सामर्थ्यांचा आणि कच्च्या दुव्यांचा सखोल अभ्यास करत त्यांनी एकीकडे सागरी नाविक सराव जोरात सुरू केला तर दुसरीकडे अ‍ॅडमिरल नंदा, व्हाइस अ‍ॅडमिरल कोहली, देशाचे राजकीय नेते यांच्या सतत संपर्कात राहून संरक्षणाबरोबरच प्रतिहल्ल्याच्या अनेक पदरी योजना ते आखत राहिले. अशातच ६ ऑक्टोबर १९७१ रोजी त्यांच्या ताफ्यात असलेल्या आयएनएस विक्रांतला पश्चिम किनाऱ्यावर जाण्याचा आदेश नौदल मुख्यालयाने दिला तेव्हा त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला. मुंबईला निघालेल्या विक्रांतला नौदल मुख्यालयाने मग परत माघारी पाठवले आणि नकळत गाझीच्या सागरसमाधीचा पहिला अध्याय लिहिला गेला! 

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan war 1971 end of pakistan submarine ghazi smaran dd
First published on: 10-12-2021 at 18:01 IST