‘इंडियन कार्टून गॅलरी’ या बंगळुरुमधील व्यंगचित्रकारांच्या संस्थेने नुकतेच शंभरावे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यानिमित्त गेल्या सात वर्षांत एवढा पल्ला गाठणाऱ्या या संस्थेच्या कामाचा एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने घेतलेला आढावा-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रकला हे ६४ कलांमधील महत्त्वाचे अंग. चित्रकलेच्या वृक्षाचा कोंब गुहेतून फुटून जोमाने बाहेर पडला आणि त्याला अनेक ‘वादां’ (इझमस्)च्या फांद्या फुटल्या. जसे, वास्तववाद, अमूर्तवाद, क्युबिझम वगैरे.. साधारण हे झाड बाराव्या शतकापासून जोमाने वाढू लागले आणि सोळा-सतराव्या शतकामध्ये उपहासात्मक वर्णन करण्याजोगी एक फांदी त्या झाडाला फुटू लागली. म्हणजेच व्यंगचित्रकलाशदृश्य कलेचा जन्म झाला, परंतु पूर्णत: व्यंगचित्रकलेचा आकार निर्माण होण्यास अठरावे शतक उजाडावे लागले.
इटालियन शब्द ‘CARTONE’ म्हणजेच सुरुवातीचे स्केच तयार करण्यासाठी लागणारा मोठ्ठा पेपर वा फ्रेस्को पेंटिंग. ब्रिटनच्या पार्लमेंटसाठी वॉल पेंटिंग तयार करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली १८४३ साली. त्या स्पर्धेत समाविष्ट केलेल्या चित्रांचे CARTONES विडंबनात्मक चित्रांकन चित्रकार व चित्रपरीक्षक जॉन लीच याने केले व ती विडंबनात्मक चित्रे ब्रिटनमधील ‘पंच’ या मॅगेझिनने प्रसिद्ध केली व त्याला ‘पंच कार्टून्स’ हे नाव पडले. त्यानंतर ‘कार्टून’ हा शब्द प्रचलित झाला. त्याचप्रमाणे इटालियन ‘अ‍ॅनिबल करास्सी’ या बंधूनी व्यक्तिचित्रणामध्ये आकारामध्ये अतिशयोक्तीचा (exaggerated) व विनोद निर्माण होईल अशा आकार व रेषांचा वापर करून व्यक्तिचित्र तयार केले व त्याला नाव पडले ‘कॅरिकेयर’. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये व्यंगचित्रांना जगामध्ये मानाचे स्थान दिले. त्यामध्ये इंग्लंडमधील ‘पंच’, ‘लाइफ’ व अमेरिकन ‘जज’ (judge) या नियतकालिकांनी.
व्यंगचित्र हे समाजाची उपहासात्मक प्रतिमा असलेला आरसा आहे. पंडित नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘व्यंगचित्रकार हा फक्त गमतीजमती करणारा नसून त्याने प्रत्येक घटनेमधील गर्भाचे महत्त्व आपल्या ब्रशच्या काही फटकाऱ्यांमध्ये मांडून जगाचे लक्ष वेधले पाहिजे.’’
व्यंगचित्रकला हे साहित्य आहे. साहित्याचे सर्व गुण त्यामध्ये आहेत. चित्रामध्ये मांडलेले विचार हे साहित्य, तर रेषा, आकार, रंग हे त्याचे व्याकरण आहे. व्यंगचित्रांची छाप सर्व सामाजिक स्तरावर पडलेली आढळते. सामाजिक, राजकीय, औद्योगिक, खेळ, आर्थिक अशा विषयांवर नेहमीच व्यंगचित्रे पाहावयास मिळतात. वर्तमानपत्रांतील राजकीय व्यंगचित्रे भल्याभल्यांना वाकवतात, हादरवतात. मग तो सरकारचा प्रमुख हुकूमशहा, मंत्री, नेता, पुढारी वगैरे. दुसऱ्या महायुद्धात हिटलर युरोप पादाक्रांत करीत होता, पण इंग्लंड त्याच्या हातात येत नव्हते. अक्राळ-विक्राळ हुकूमशहा हिटलरच्या भीतीने ब्रिटिश राज्यकर्ते, विचारवंत, नेते, जबाबदार नागरिक भीतीच्या ढोलीत लपून बसले होते. त्यांना आपल्या व्यंगचित्रांनी हिटलरविरुद्ध लढण्याची ईर्षां, धैर्य यांची चेतना निर्माण करीत होता व्यंगचित्रकार डेव्हिड लो व त्याचाच परिणाम म्हणून हिटलरने लो याला जिवंत वा मेलेला आपल्यासमोर आणण्याचे फर्मान सोडले. एवढी व्यंगचित्रकार व व्यंगचित्रांची ताकद आहे.
भारतामध्ये जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार झाले व आहेत. उदा. के शंकर पिल्ले- व्यंगचित्रकलेचे पितामह, आर. के. लक्ष्मण, मारियो मिरांडा, अबू अब्राहम, उन्नी वगैरे.
भारतीय व्यंगचित्रकलेची वाटचाल जोमाने चालू आहे, परंतु त्यासाठी अनेक व्यंगचित्रकारांना त्यांच्यामध्ये ‘चमक’ असूनही व्यासपीठ मिळत नाही. दक्षिण भारतामध्ये काही संस्था व्यंगचित्रकार व व्यंगचित्रकलेच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्रात ‘कार्टूनिस्ट्स कम्बाइन’ नावाची संस्था मराठी व्यंगचित्रकारांच्या उद्धारासाठी ३०-३२ वर्षे काम करीत आहे. परंतु तिचे दुर्दैव असे की, संस्था घोळका जमविण्यासाठी असावी की, कायदेशीररीत्या योग्य व्यासपीठावर ठेवावी की एखाद्या ठेकेदाराच्या वेठीस ठेवावी यावर सतत विचारविनिमयाच्या तुपात घोळली जात आहे.. अनेक वर्षे!
व्यंगचित्रकारांना त्यांच्या कलेच्या प्रसारासाठी हक्काचे व्यासपीठ, त्यांची प्रदर्शने भरावीत, परिसंवाद घडवावेत, त्यांचा मानसन्मान करावा, लोकांमध्ये व्यंगचित्रकलेसंबंधी शिक्षण जागृती, आपुलकी निर्माण करणे तसेच जागतिक व्यंगचित्रकारांना त्यांच्या व्यंगचित्रकलेचे दर्शन व आस्वाद भारतीयांना करून द्यावा, व्यंगचित्रकलेच्या स्पर्धा भरविणे ही सर्व उद्दिष्टे ठेवून संपूर्ण भारतामध्ये व्यंगचित्रकारांसाठीच असलेली आर्ट गॅलरी म्हणजे ‘इंडियन कार्टून्स गॅलरी, बंगळुरु, कर्नाटक’.
८ जून २००१ साठी व्यंगचित्रकार बी. व्ही. राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्ट, बंगलोर’ ही संस्था स्थापन झाली. व्ही. जी. नरेंद्र, बी.जी. गुजरप्पा व बी. एन. चंद्रकांत हे सर्व मॅनेजिंग ट्रस्टीज आणि याच वेळी भारतातील अंदाजे शंभर व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याच वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रकलेसंबंधी आपले विचार मांडले व नवोदित व्यंगचित्रकारांबरोबर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही साकारला.
अशा प्रकारे प्रदर्शने, परिसंवाद व नामांकितांचा सन्मान असे कार्यक्रम जोमाने चालू होते; परंतु संस्थेला स्वत:ची आर्ट गॅलरी नव्हती. यासाठी हात दिला तो उद्योगपती, राजकीय नेते अशोक खेनी यांनी. त्यांनी आर्ट गॅलरीसाठी कायमस्वरूपी दोन हजार चौरस फुटांची जागा निर्माण करून दिली, बेंगलोरच्या मध्यवर्ती ठिकाणी. त्या गॅलरीचे नाव ‘इंडियन कार्टून गॅलरी बेंगलोर’ असे करण्यात आले. १६ ऑगस्ट २००७ साली कर्नाटकचे राज्यपाल टी. एन. चतुर्वेदी यांच्या हस्ते गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले.
अनेक निवडक नामवंत व्यंगचित्रकारांची प्रदर्शने नियमित सुरू झाली. सर्वसाधारण बारा दिवस प्रत्येक व्यंगचित्रकाराला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन करण्यासाठी कालावधी दिला जातो, अल्प मोबदल्यात. प्रत्येक व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांच्या प्रती (आर्चिव्ह) लायब्ररीसाठी साठवल्या जातात.
व्यंगचित्र रसिकांसाठी नवनवे उपक्रम हाती घेणे सुरूच होते. २००९ साली प्रसिद्ध व्यंगचित्रकार स्व. माया कामत मेमोरियल अ‍ॅवार्ड -माया कामत यांच्या परिजनांकडून- व्यंगचित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी देण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी दर वर्षी प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांची स्पर्धा ठेवून स्पर्धेमध्ये विजयी कलाकारांना भरघोस पुरस्कार दिला जातो.
२००९ साली या स्पर्धेमध्ये आणखी एका पुरस्काराची भर टाकण्यात आली. उत्तम, उदयोन्मुख व्यंगचित्रकार. संस्थेचे महत्त्वाचे आणखी एक कार्य म्हणजे ज्या ज्या व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रकलेला जे आपल्या कौशल्याने योगदान दिले त्याचा सन्मान करणे. त्यासाठी ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड’. अनेक सन्मानित झाले- मारियो मिरांडा, एस. के. नाडीग, शि. द. फडणीस, प्राण, गोपुलू, बापू, येसूदासन, आर. के. लक्ष्मण, काक, वसंत सरवटे, टी. वेंकटराव, प्रभाकर रावबेल, टॉम्स, मदन इत्यादी. २००९ साली आंतरराष्ट्रीय अर्कचित्र (कॅरिकेचर) स्पर्धा विषय होता सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग. अनेक पारितोषिकांपैकी प्रथम विजेत्यास एक लाख रुपये (रु. १०००००) बक्षीस देण्यात आले.
वरील गॅलरी २००७ पासून सुरू झाली आणि आतापावेतो अनेक निवडक प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची प्रदर्शने भरविण्यात आली. उदा. डेव्हिड लो, आर. के. लक्ष्मण, मारियो मिरांडा, केशव, उन्नी, श्री. वसंत सरवटे, बापू, प्रभाकर रावबेल, अबू अब्राहम, सुरेंद्र, बी. व्ही. राममूर्ती, रंगा, माया कामथ, पुन्नप्पा, मदन, टॉम्स्, श्रेयस्क नबरे, माझे व अनेक नामवंतांची व्यंगचित्रे प्रदर्शित केली गेली. १४ जून २०१४ रोजी ज्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले ते आहे शंभरावे प्रदर्शन. म्हणजेच २००७ पासून २०१४ पर्यंत शंभर प्रदर्शने आयोजित केली गेली. वर्षांला किती याचा हिशोब वाचकांनी करावा.
सदर प्रदर्शनामध्ये १०१ व्यंगचित्रकारांची ११२ व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. एच. एच. बलराम (एशियन न्यूज नेटवर्क) यांच्या हस्ते झाले.
२००८ साली ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये इंडियन कार्टून गॅलरीचे नाव कोरले गेले.
अनेक नामवंतांनी वेळोवेळी अनेक व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, एम. एन. वेंकटाचलय्या, न्यायमूर्ती ए. जे. सदाशिव, कॅ. जी. आर. गोपीनाथ (जनपथ अ‍ॅवार्ड विजेता), गिरीश कर्नाड, पो. यू.आर. राव, एम. एस्. धीम्मप्पा, उपकुलगुरू बेंगलोर विद्यापीठ वगैरे.

या गॅलरीची जबाबदारी स्वत: उचलून अशोक खेनी व्यंगचित्रकला व व्यंगचित्रकारांना उच्च पातळीवर नेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत आणि याचेच फळ म्हणजे शंभरावे व्यंगचित्र प्रदर्शन. या त्यांच्या कामात मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून व्ही. जी. नरेंद्र आपल्या अपत्याप्रमाणे कार्टून गॅलरीसाठीची उत्तम वाढीसाठी आईच्या मायेने कार्यरत आहेत.
अशा भारतातील एकुलत्या एक इंडियन कार्टून गॅलरीचे कार्य व नाव जागतिक पातळीवर ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहू दे, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो..
सुरुवातीस उल्लेख केलेल्या कलेचा वृक्ष महाराष्ट्रातही बहरला, पण त्याला फुटलेली ‘व्यंगचित्रकलेची’ फांदी काहीशी खुरपटली.. उदास सरकार, माध्यमे आणि जनाधारच्या सूर्याची किरणे त्या फांदीपर्यंत पोहोचतच नाहीत.. पुरोगामी महाराष्ट्राच्या बहरलेल्या बागेच्या सौंदर्याला गालबोट लावण्यासारखे आहे…

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cartoon gallery bangalore
First published on: 20-06-2014 at 01:21 IST