कबड्डी हा या मातीतला अस्सल खेळ. अलीकडेच झालेल्या प्रो कबड्डीच्या लिलावात कबड्डीपटूंवर लाखो रुपयांची बोली लागली आहे. पैसा आला की विकास होतो या गृहितकाच्या धर्तीवर कबड्डीला चांगले दिवस येतील?
‘प्रो कबड्डी’च्या लिलावात खेळाडूंवर काही लाखांची बोली लागली, या निमित्ताने ‘अच्छे दिन आयें है..’ याची प्रचीती कबड्डीला खऱ्या अर्थाने आली. पाटणाने राकेश कुमारला सर्वाधिक १२ लाख ८० हजार रुपये बोली लावून जिंकले. लक्षाधीशांच्या वरच्या रांगेत भारतीय रेल्वे, हरियाणा आदी प्रामुख्याने उत्तरेच्या खेळाडूंचा भरणा होता, तर काशिलिंग आडके, नितीन मदने इत्यादी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी घेतलेली भरारीसुद्धा नेत्रदीपक अशीच आहे. खेळात पैसा आला की, खेळाचा विकास होतो, अशी क्रीडाक्षेत्रातील धारणा असते. कबड्डीतही ‘न भूतो, न भविष्यती’ असा धनवर्षांव झाला आहे. या पाश्र्वभूमीवर हे वास्तव क्षणभंगुर तर ठरणार नाही ना, हा प्रश्न सच्चा कबड्डीपटूच्या मनात रुंजी घालणे स्वाभाविक आहे.
तीन वर्षांपूर्वीची गोष्ट कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) नामक असाच एक फॅ्रन्चायझींवर आधारित फॉम्र्युला कबड्डीमध्ये राबवण्यात आला होता. पण सरकारी वाहिनीवरील प्रक्षेपण, तांत्रिक गोष्टींचा अभाव, ना ग्लॅमरचा तडका, ना खेळाडूंवरील बोली अशा निस्तेज वातावरणात केपीएलचे पहिले पर्व हैदराबादमध्ये पार पडले. केवळ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारखी एखादी स्पर्धा आमच्या खेळातसुद्धा झाली, ही शेखी मिरवण्यापलीकडे कबड्डीमधील धुरिणांना आणखी करता आले नाही. त्यामुळे केपीएलचा दुर्दैवी अंत झाला. कबड्डीमधील विश्वचषक केव्हा होणार, केपीएल केव्हा होणार यांसारखे अनेक प्रश्न भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या दरबारी खितपत पडले होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाचा चाप सर्व संघटनांवर बसला. पण भारतीय कबड्डीवर एकछत्री अंमल असणाऱ्या जनार्दनसिंग गेहलोत यांनी आपली अध्यक्षपदाची मुदत संपते आहे, हे लक्षात येताच पत्नी मृदुल गेहलोत यांना त्यांनी सत्तेवर आणले. त्यामुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीची सत्ता गेहलोतच सध्या उपभोगत आहेत. पण कबड्डीची प्रीमियर लीग व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी करण्याची क्षमता या धूर्त राजकीय नेत्याकडे मुळीच नव्हती, हे सत्य सर्वाना ठाऊक होते.
अनुभवी समालोचक चारू शर्मा गेली काही वष्रे कबड्डीच्या व्यावसायिकतेचा गांभीर्याने विचार करीत होता. रणजी क्रिकेट पाहायला ५० प्रेक्षकसुद्धा नसतात. परंतु स्थानिक कबड्डी सामन्यांना मोठी गर्दी होते. महाभारतापासून असलेला खेळाचा इतिहास हा अतिशय प्रेरक आहे. या खेळाला मनोरंजनाचे कोंदण मिळाल्यास तो घरोघरी पोहोचेल, हे सूत्र जपून ‘प्रो कबड्डी’ नामक नवा फंडा शर्मा यांनी मशाल स्पोर्ट्स कंपनीद्वारे जगासमोर आणला. आपले नातलग आनंद महिंद्रा यांनासुद्धा हा फॉम्र्युला अतिशय भावला. अभिनेता अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रूवाला, सुरेश कलपाठी, किशोर बियानी, राणा कपूर आदी दिग्गज मंडळींची मोट बांधून एक शानदार लिलावसुद्धा शर्मा यांनी घडवून आणला. सर्वसामान्यांचा, तळागाळातल्या मंडळींचा खेळ ही कबड्डीची ओळख. पण खेळाडूंवर लागणाऱ्या लाखांच्या बोलींमुळे सर्वानाच त्याचे कौतुक वाटले. आता प्रत्यक्ष प्रो कबड्डी स्पध्रेला जवळपास दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या कालखंडात संयोजकांना बरीचशी आव्हाने पेलायची आहेत.
महाराष्ट्राची कबड्डी जागतिक झाल्यावर मातीतून मॅटवर गेली, पण सध्या तरी ती अगतिक झाली नाही. गेल्या काही वर्षांतसुद्धा आशियाई, इनडोअर आशियाई, विश्वचषक आदी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कबड्डीचे सुवर्णपदक भारताने कोणत्याही अन्य राष्ट्राकडे जाऊ दिले नाही. गेल्या काही वर्षांत पाकिस्तान, इराणसारख्या देशांचेसुद्धा संघ खंबीरपणे भारताला भिडू लागले आहेत, हे वास्तव गंभीर आहे. प्रो कबड्डीसाठीच्या लिलावात इराण, पाकिस्तान या देशांतील खेळाडूंनीसुद्धा अपेक्षेप्रमाणेच आपली छाप पाडली. प्रो कबड्डीमध्ये सहभागी होणाऱ्या ९६ खेळाडूंपैकी २४ म्हणजेच एक चतुर्थाश खेळाडू हे परदेशी आहेत. सध्या ३३ देशांना आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची मान्यता आहे, हा आकडा ५०पर्यंत गेल्यास या देशी खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल. या पाश्र्वभूमीवर विविध देशांतील खेळाडूंना व्यावसायिकदृष्टय़ा परिपक्व करण्याची जबाबदारी ही खेळातील पितृत्वाच्या नात्याने भारतावरच असणार आहे. त्यामुळे प्रो कबड्डीच्या निमित्ताने खेळाचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने जागतिक स्तरावर होऊ शकेल. या स्पध्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅटचासुद्धा स्वतंत्र विचार करण्यात आला आहे. तसेच स्पर्धा संपल्यावर हे मॅट स्थानिक असोसिएशन्सलाच वापरण्यासाठी भेट म्हणून दिले जाणार आहे. ही खेळासाठी चांगली गोष्ट आहे.
क्रिकेट घरोघरी पोहोचण्यात टीव्हीची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. परंतु सरकारी वाहिन्यांना व्यावसायिकतेचे गणित ना तेव्हा कळले, ना आता. १९८३च्या विश्वचषकातील भारत-झिम्बाब्वे सामना तसा ऐतिहासिकच. ५ बाद १७ अशा केविलवाण्या स्थितीनंतर कपिलने १७५ धावांची वादळी आणि संस्मरणीय खेळी साकारून भारताला तो सामना जिंकूनही दिला होता. दुर्दैवाने त्या वेळी क्रिकेटरसिकांना त्या खेळीऐवजी व्यत्यय पाहण्याची पाळी आली होती. पण आता स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन, सोनी, टेन स्पोर्ट्स आदी अस्सल क्रीडावाहिन्यांची बाजारपेठ मोठी आहे. प्रो कबड्डीसाठी स्टार स्पोर्ट्सशी दहा वर्षांचा करार झाला आहे. याशिवाय हा खेळ प्राइम टाइमला प्रक्षेपित करण्यात येणार आहे. खेळाला मनोरंजनाची व्यवस्थित जोड देऊन त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कबड्डी खेळ हा अतिशय वेगवान. प्रत्येक चढाईनंतर पुढची चढाई असा. पुरुषांसाठी २०-२० मिनिटांची दोन सत्रे, तर महिलांसाठी १५-१५ मिनिटांची दोन सत्रे. प्रत्येक सत्रात प्रत्येक संघाला दोनदा अध्र्या मिनिटाची विश्रांती घेण्याची मुभा आहे. परंतु प्रो कबड्डीसाठी सामन्यांच्या मिनिटांचे गणित जसे बदलले जाणार आहे. तसेच त्यात आणखी उसंत मिळेल यासाठी अभ्यास सुरू आहे. क्रिकेटमध्ये जसे प्रत्येक चेंडू फेकल्यानंतर फलंदाजाने कोणत्या कसबीने फटका खेळला आणि क्षेत्ररक्षकाने कौशल्याने तो अडवला किंवा झेलला हे सारे काही रिप्लेद्वारे पाहता येते, कबड्डीच्या प्रक्षेपणात या रिप्लेची भर घातली जाणार आहे. याचप्रमाणे आणखी अनेक तांत्रिक बदल या खेळात पाहायला मिळतील. अनेक व्यक्ती, वेबसाइट्स किंवा संस्थांकडे क्रिकेट या खेळाची सांख्यिकी, आकडेवारी उपलब्ध आहे. कबड्डी या खेळातील आजपर्यंतची कोणतीही माहिती साठविण्यासाठी विशिष्ट अशा विभागाची रचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे एका चढाईत सर्वाधिक गडी बाद करणे, एका सामन्यात सर्वात जास्त गडी बाद करणे, सर्वाधिक बोनस गुणांची कमाई, सर्वाधिक पकडी, सर्वात जास्त सांघिक गुण अशा प्रकारे विक्रमांची कधीच गणती झालेली नाही. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहता येऊ शकते, ही जाणीव प्रो कबड्डीच्या निमित्ताने खेळातील कर्त्यांधर्त्यांना झाली तरी पुष्कळ आहे. प्रो कबड्डीच्या लिलावाच्या वेळी संयोजकांनी त्या सहभागी होणाऱ्या खेळाडूंची माहिती करून देणारे एक पुस्तक तयार केले होते. या पुस्तकात प्रत्येक ख्ेाळाडूचा परिचय हा त्याचा जन्मदिनांक, संघ, महत्त्वाचे क्षण, स्थानिक संघ, राष्ट्रीय संघ, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या स्पर्धा या माध्यमातून करून देण्यात आला. हा विचारसुद्धा आजमितीपर्यंत कबड्डीमध्ये कुणीच केला नव्हता.
कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी आता नावलौकिक मिळू लागला असला, देशातील बहुतांशी राज्यांमध्ये राजाश्रय जरी मिळू लागला असला तरी या खेळाचे संघटक आणि प्रशासक यांनी आता व्यावसायिक होण्याची गरज आहे. स्थानिक कबड्डी आजही नेत्यांना मुजरा करते तर खेळाडूंना त्यांच्या भाषणांसाठी तिष्ठत ठेवते. सांघिक पारितोषिके आणि वैयक्तिक पारितोषिके यांच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक पाहुण्या राजकीय व्यक्तिमत्त्वांसाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठासाठी (स्टेज) पैसे खर्ची घातले जातात. देशाचा संघ प्रामाणिकपणे निवडला जातो का, याविषयी कबड्डीक्षेत्रातच संशयाने पाहिले जाते. प्रो कबड्डीमध्येसुद्धा ही घुसखोरीची वाळवी लागणार नाही, याची काय खात्री देता येईल. कारण कबड्डी हा खेळ, खेळाडू, संघटक, गटातटाचे राजकारण आदी गोष्टींविषयी प्रो कबड्डीमध्ये पैसा ओतणारे फ्रॅन्चायझी आणि संयोजक अनभिज्ञ आहेत. पण प्रो कबड्डीच्या निमित्ताने खेळाला एक व्यावसायिक चालना मिळते आहे, भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या हाका ऐकण्याची कबड्डीक्षेत्राला आता नितांत गरज आहे.