विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

एका बाजूस टाळेबंदीचे डोक्यावर असलेले सावट आणि पलीकडच्या बाजूस सचिन वाझे प्रकरण, त्यावरून सुरू असलेले राजकारण, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असे सुरू झालेले वाक् युद्ध आणि नंतर राष्ट्रपती राजवटीची झालेली मागणी या गदारोळामध्ये आपल्याला हवेच्या दर्जासंदर्भातील जागतिक अहवालाकडे पाहायलाही वेळ नाही. पण खरे तर हा अहवाल कोविडपेक्षाही भयानक असलेल्या स्थितीकडे लक्ष वेधणारा आहे. एक वेळेस लसीकरण, त्यानंतर येणारी हर्ड इम्युनिटी आणि लोकांचेही त्यास सरावणे यानंतर कोविड कमीही होईल किंवा नष्टही, पण वायू प्रदूषण हे भावी पिढय़ांनाही ग्रासणारे असेच दीर्घकाळाचे ग्रहण आहे. मात्र त्याचे गांभीर्य आपल्याला अद्याप लक्षातच आलेले नाही.

लॅन्सेट या जागतिक दर्जाच्या शोधपत्रिकेमध्ये डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या शोधप्रबंधानुसार प्रत्येक आठ व्यक्तींमागे एकाचा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे झालेला असतो तर गेल्या काही वर्षांमध्ये तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्युसंख्येलाही वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने मागे टाकले आहे. याचाच अर्थ हे सारे कोविडपेक्षाही भयानक आहे. कोविड येण्यापूर्वीही हीच स्थिती होती आणि आता कोविडोत्तर काळात सर्व उद्योग सुरू झाल्यानंतरही स्थिती अतिगंभीर होण्याच्या दिशेने प्रवास करते आहे.

भारताच्या बाबतीत बोलायचे तर सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या ठिकाणांमध्ये जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर नवी दिल्ली आहे. जगातील ३० सर्वाधिक शहरांमध्ये एकटय़ा भारतातील २२ शहरांचा समावेश आहे, हे निश्चितच आपल्यासाठी भूषणावह नाही. भूषण-दूषण हा तर नंतरचाच भाग झाला, हे सारे थेट जिवावर बेतणारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्याच आकडेवारीनुसार, भारतातील शहरामध्ये वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या विकारांच्या आणि पर्यायाने मृत्यूंच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील येल या नामांकित विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या जनुकीय संशोधनामध्ये तर असे लक्षात आले आहे की, कर्करोगासारख्या अनेक असाध्य विकारांच्या मुळाशीही हेच वायू प्रदूषण आहे आणि त्याची मजल आता माणसाच्या जनुकीय रचना बदलण्यापर्यंत पोहोचली आहे. जनुकीय रचना ही आपली मानवी ठेव आहे, जी आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो. तो मानवी जन्माचा अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण असा भाग आहे. त्यातील बदल हे भावी पिढीचेही जीवन काळवंडणारे आहेत. भावी पिढी आरोग्यदायीच असायला हवी. हवेतील पार्टिक्युलेट मॅटरचे प्रमाण अधिक असेल तर ते श्वसनाद्वारे थेट शरीरात जाऊन आपल्या रक्तामध्ये शोषले जातात. कर्करोगासारख्या अनेक असाध्य विकारांच्या मुळाशी तेच आहेत.

लक्षात घेण्याजोगा भाग असा की, गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे भारतातील अनेक शहरांनी स्वच्छ हवेत श्वास घेतला. कुणी कैक वर्षे न दिसलेला हिमालय चंदिगडहून पाहिला तर कुणी मुंबईतून माथेरान- प्रबळगडचा डोंगर. पण या सर्व कालखंडातही प्रदूषण कमी झालेले असले तरी पार्टिक्युलट मॅटरचे प्रमाण दिल्ली आणि मुंबईत कमी झालेले नव्हते. ही अतिगंभीर बाब आहे.

कोविडकाळातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होती, त्यांना तो झाला नाही किंवा होऊनही गेला पण कळलाच नाही. कारण त्रासच झाला नाही. वायू प्रदूषणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते थेट तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करून तिला क्षीण करते. त्यामुळे भारतीय संशोधकांनीही केलेल्या संशोधनात असेच लक्षात आले आहे की, त्यामुळेच श्वसनसंस्थेच्या विकारग्रस्तांची आणि असाध्य विकार झालेल्यांची संख्या अनेक पटींनी चिंताजनक वाढते आहे. किंबहुना टाळेबंदीत वायू प्रदूषण कमी झाल्यानंतर घेतलेल्या अनुभवानंतर तरी माणसाचे डोळे उघडणे आवश्यक होते. कारण आपण काय गमावले त्याचा साक्षात्कार होण्यासाठी ते पुरेसे होते. पण तसे झालेले सध्या तरी दिसत नाही. प्रश्न असा की, त्या अनुभवानेही काही कळणार नसेल तर डोळे उघडणार तरी केव्हा?