विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच!’’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे उद्गार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनावर बालपणीच कोरले गेलेले असतात. टिळकांनी सुरू केलेले केसरी वर्तमानपत्र आपल्याला लक्षात आहे. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’ हा बाणेदारपणाही तेवढाच लक्षात राहातो. टिळकांवर ब्रिटिश सरकारने चालविलेला राजद्रोहाचा खटला आणि त्या संदर्भात शिक्षा होत मंडालेला झालेली रवानगी, गीतारहस्यचे लिखाण एवढेच टिळक आपल्याला बव्हंशी माहीत असतात.  स्वातंत्र्यसंग्रामातील या जाज्वल्य नेत्याची स्मृतिशताब्दी आजपासून देशभरात पाळली जाणार आहे. यानिमित्ताने शालेय क्रमिक पुस्तकापलीकडे टिळक समजून घेणे महत्त्वाचे ठरावे. अगदी वानगीदाखल घ्यायचे तर लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याची माहिती असली तरी त्या खटल्यात लोकमान्यांनी कायद्याचा अभ्यास करून स्वतच युक्तिवाद करत स्वतची बाजू मांडली हे फारच कमी जणांना माहीत असते. ते केवळ कायद्याचे अभ्यासक नव्हते तर ते उत्तम खगोलविद होते. खगोलशास्त्राच्याच आधारे वेदांची कालनिश्चिती करण्याचा संशोधनप्रकल्प त्यांनी एकहाती तडीस नेला. हे काम सोपे खचितच नव्हते. याचबरोबर ते उत्तम अर्थतज्ज्ञही होते. राजद्रोहातील खटल्यानंतर टिळक परत येणारच नाहीत, असे ब्रिटिशांना वाटले होते. मात्र लोकमान्य त्याला पुरून उरले. मंडालेहून परतल्यानंतर तर त्यांनी स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असल्याचा पुकारा केला आणि स्वातंत्र्यसंग्रामही अधिक जाज्वल्य केला.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

लोकमान्यांचा कणखरपणा आणि जहाल भाषा ही पत्रकारितेला लाभलेली अनमोल देणगीच आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न विचारणारे लोकमान्य पुनश्च हरिओमचीही हाळी देतात तेव्हा लोकमनांत अंगार फुलायचा. त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीचे वार करत परजायची! किंबहुना म्हणूनच ब्रिटिश सरकारला लोकमान्य गजाआड गेलेले हवे होते. त्यासाठी म्हणूनच त्यांनी न्यायिक सदसद्विवेकबुद्धीलाही राजद्रोहाच्या खटल्यात फाटा दिलेला दिसतो. केवळ एका व्यक्तीसाठी अख्खे सरकारच कामाला लागावे, अशीच ती अवस्था होती!

लोकमान्यांच्या अनेकविध पैलूंपैकी सर्वाधिक लक्षात राहिलेला पैलू म्हणजे परिस्थिती कोणतीही आणि कशीही असली तरीही उद्देशापासून न ढळता अखंड काम करत राहणे. त्यासाठी त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग आपण समजून घ्यायला हवा. लोकमान्यांना दीर्घकाळ तुरुंगवास झाल्यानंतर काही काळ स्वातंत्र्य चळवळीचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याच  वेळेस त्यांच्या कुटुंबातील दोन निकटवर्तीयांचे अचानक निधन झाले. इतर कुणीही व्यक्ती अशा वेळेस कोलमडली असती. ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्येही टिळकांचे चाहते होतेच. त्यातील एका अधिकाऱ्याने टिळकांना सांत्वनपर पत्र लिहिले, त्यात म्हटले की, एकापाठोपाठ एक घटनांमुळे तुमची अवस्था आभाळच कोसळल्यागत झाली आहे. आता या अवस्थेत स्वातंत्र्य चळवळ कशी पुढे जाणार असाही प्रश्नच आहे.. त्याला दिलेल्या उत्तरात जाज्वल्य लोकमान्य दिसतात, जाणवतात. उत्तरादाखल लोकमान्य म्हणाले, ..तुटलेल्या आभाळाच्या तुकडय़ांवर उभा राहून मी स्वातंत्र्यसंग्राम पुढे नेईन, चिंता नसावी!

किंबहुना म्हणूनच लोकमान्य एकमेवाद्वितीय ठरतात. त्यांना समस्त जनतेने लोकमान्य म्हटले आणि त्यांचे लोकमान्यत्व स्वीकारले. टिळकांनंतर गेल्या १०० वर्षांत या महाराष्ट्रात असे लोकमान्य नेतृत्व उदयास आलेले नाही, ज्याला संपूर्ण देशाने स्वीकारले! म्हणूनच टिळक हे  पहिले आणि कदाचित अखेरचे लोकमान्य! आणि म्हणूनच एकमेवाद्वितीयही!