सोनल चितळे

मेष

भाग्यस्थानातील गुरू मंगळाच्या युतीमुळे चांगले विचार आचरणात आणाल. क्रियाशीलता वाढेल. आपल्या कृतीमुळे इतरांनादेखील लाभ होतील. नोकरी-व्यवसायातील जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाल. वरिष्ठांचा विश्वास सार्थकी लावाल. सहकारी वर्गातील सर्जनशीलतेचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्याल. जोडीदाराला थोडा वेळ द्या. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामाचा मानसिक ताण घेऊ नका. रक्तदाब आटोक्यात ठेवा.

वृषभ

चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे आपल्या आवडीनिवडी, छंद जपाल. आपल्या सादरीकरणाला उत्तेजन तसेच नावलौकिक मिळेल. नोकरी-व्यवसायात, कलेच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. सहकारी वर्गाची मोलाची मदत कायम स्मरणात राहील. जोडीदाराच्या यशामुळे मन आनंदून जाईल. त्याच्या अधिकारात भर पडेल. परदेश दौरा कराल. कुटुंबात एकोप्याने मिळून मिसळून राहाल. उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपा. पाणी पिण्याचे प्रमाण योग्य राखा. त्वचा कोरडी होऊ देऊ नका.

मिथुन

भाग्यस्थानातील बौद्धिक राशीतील चंद्र-बुधाच्या युती योगामुळे अडचणींवर मात कराल. परिस्थितीचा साकल्याने विचार करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल.  वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाची समजूत घालावी लागेल. जास्त मागे लागू नका. जोडीदाराला यशप्राप्ती होईल. त्याचा सल्ला उपयोगी पडेल. आर्थिक लाभ होतील. विचारपूर्वक गुंतवणूक करा. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. पोटाचे विकार सतावतील. आहारावर नियंत्रण ठेवा.

कर्क

शुक्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे मन कल्पनांच्या राज्यात रमेल. नातेवाईक, मित्रमंडळी, जुने शेजारी यांच्या आठवणी येतील. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. नवे तंत्रज्ञान व कला यांचा समन्वय साधाल. उच्च शिक्षणात प्रगती कराल. सहकारी वर्गाची मदत मिळणे कठीण! जोडीदाराची चांगली साथ मिळेल. तो त्याच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावेल. मानसन्मान मिळवेल. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा. सावधान! आहार, विहार आणि विश्रांती यांचा मेळ साधाल.

सिंह

बुध-हर्षलच्या लाभ योगामुळे कुशाग्र बुद्धीचा योग्य उपयोग कराल. नव्या अनुभवातून व्यवहारज्ञानाचे धडे मिळतील. हातातील कार्यात यश मिळवाल. नोकरी-व्यवसायात आगेकूच कराल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदाराच्या निर्णयाला दुजोरा द्याल. त्याच्या हुशारीचे कौतुक कराल. हजरजबाबीपणाची चुणूक दाखवाल. कुटुंब सदस्यांच्या आजारपणामुळे दिवस धावपळीत जातील. हाडे, सांधे, स्नायुबंध यांची विशेष काळजी घ्यावी. औषधोपचार घ्यावा. व्यायामाची गरज भासेल.

कन्या

चतुर्थस्थानातील ज्ञानकारक गुरू तसेच धडाडीचा मंगळ  यांच्या युतीयोगामुळे आत्मविश्वास वाढेल. ज्येष्ठांचे साहाय्य लाभेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा मान राखून आपले मुद्दे स्पष्ट कराल. त्यांना ते पटवून द्याल. सहकारी वर्गाच्या समस्या व्यवस्थापकांपुढे मांडाल. कौटुंबिक प्रश्न सोडवण्यामध्ये जोडीदाराचे योगदान वाखाणण्याजोगे असेल. त्याच्या कामगिरीचे कौतुक कराल. मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर दिसेल.

तूळ

गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे गरजूंना मदत कराल. होतकरूंच्या कलेला प्रोत्साहन द्याल. नोकरी-व्यवसायात कार्यान्वित केलेल्या नव्या योजनांचा  संस्थेला, कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.  सहकारी वर्गाला हक्काची आर्थिक मदत मिळवून द्याल. जोडीदाराशी मदाभेद टाळा. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याला यश मिळेल. कुटुंब सदस्यांच्या प्रश्नांवर तोड सुचवाल.  कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सर्दी, सायनस, डोकेदुखी असे त्रास सहन करावे लागतील. पथ्य पाळणे आवश्यक!

वृश्चिक

चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. भावनांवर ताबा ठेवा. मानापमानाच्या कल्पना दूर ठेवा. दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वत:ला करून घेऊ नका. नोकरी-व्यवसायात मनाजोगते काम करण्यात यश तसेच आनंद मिळवाल. संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात प्रगती कराल. जोडीदारासह मिळतेजुळते घ्या. त्याचा मूड सांभाळा. चिडचिड उपयोगाची नाही. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. दंड, खांदे दुखणे, भरून येणे हे त्रास उद्भवतील.

धनू

चंद्र व नेपच्यून या भावनाकारक ग्रहांच्या युतीयोगामुळे सादरीकरणात उत्स्फूर्तता येईल. लेखन प्रसिद्ध होईल. आपला प्रभाव पाडाल. नोकरी-व्यवसायात नवी दिशा सापडेल. बुद्धीच्या जोरावर महत्त्वाचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गाच्या समस्यांवर साकल्याने विचार करून मार्ग सुचवाल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध नव्या संधींचे तो चीज करेल. कौटुंबिक वातावरण धावपळीचे असेल. घरच्यांची जबाबदारी वाढेल. ओटीपोटाचे दुखणे अचानक उद्भवेल.

मकर

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे धाडसी निर्णय घ्याल. शब्द जपून वापरा. राग डोक्यात घालून घेऊ नका. एक घाव दोन तुकडे नको. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. सहकारी वर्ग तसेच वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. जुने सहकारी मित्र भेटतील. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराच्या मतांचा आदर कराल. एकमेकांच्या साथीने कठीण प्रसंगातून मार्ग काढाल. घशाला संसर्ग होईल. पथ्यपाणी सांभाळावे. उष्णतेचे विकार बळावतील. औषधोपचार घ्यावेत.

कुंभ

चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे विचारांना कृतीची साथ मिळेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. रखडलेली कामे नव्या जोमाने पूर्ण करायला घ्याल. नोकरी-व्यवसायात शांत डोक्याने विचार करून अडचणीतून मार्ग काढा. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. जोडीदाराचे म्हणणे पूर्णत: पटले नाही तरी जास्त ऊहापोह नको. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. अति विचाराने थकून जाल. मित्रमंडळींसह मोकळे वाटेल.

मीन

चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे आवडत्या कामासाठी वेळ काढाल. गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात तंत्रज्ञान तसेच अधिकाराचा योग्य वापर कराल. वरिष्ठांपुढे नव्या संकल्पना मांडाल. कामे पूर्ण करण्यासाठी सहकारी वर्गाच्या मागे लागावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. पित्त आणि डोकेदुखीचा त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांना कामाचा ताण जाणवेल. आजारपण येईल.

response.lokprabha@expressindia.com