scorecardresearch

स्मार्ट ‘ती’-नवलाईला कोंदण जुन्याचे..

‘‘नक्की ना.. बघ पुन्हा विचार कर.’’ ‘‘होय, एकदम नक्की.’’ अगदी ठामपणे तिने सांगितले. ‘‘मला एक शंका आहे.’’

स्मार्ट ‘ती’-नवलाईला कोंदण जुन्याचे..

z12‘‘नक्की ना.. बघ पुन्हा विचार कर.’’ ‘‘होय, एकदम नक्की.’’ अगदी ठामपणे तिने सांगितले. ‘‘मला एक शंका आहे.’’ ‘‘तुला आणि शंका?’’ सगळ्यांच्या शंकांचं निरसन करणारा हा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरंच काय पण पडणारे प्रश्नसुद्धा आधीच माहीत असणारा हा मला शंका विचारतोय. कळेचना तिला काही. ‘‘तुला असं अचानक नवीन आयुष्य, नवीन ओळख का हवीशी वाटली?’’ ‘‘मला या माझ्या जुन्या आयुष्याचा खूप कंटाळा आलाय. किती कटकटी कित्ती गुंतागुंत. आयुष्य थांबल्यासारखं झालंय. नवीन असं काही घडतच नाहीये. जुन्याच रामरगाडय़ाने आयुष्यात काही रामच राहिला नाही असं वाटतंय. म्हणून मला या नवीन वर्षांत एक नवीन मी हवीये आणि मला माहीतेय की तू माझी ही इच्छा अगदी नक्की पूर्ण करशील.’’ तिचा तो अधीर चेहरा पाहून तो गालातल्या गालात हसला आणि दुसऱ्याच क्षणी ती घरी होती. स्वत:च्या नव्हे, तर कोणत्या तरी वेगळ्याच. सगळंच अनोळखी होतं.
ती अवतीभवती पाहायला लागली. इतक्यात तिला तो दिसला. तसाच गालातल्या गालात हसत. ‘‘कुठेय मी?’’ ‘‘तुझ्या नव्या आयुष्यात. अगदी तुला हव्या तशा आयुष्यात.’’ ‘‘खरंच?’’ थोडासा आनंद, थोडीशी भीती आणि खूप सारे कुतूहल असलेल्या स्वरात तिने विचारलं. ‘‘अर्थात.. मागच्या जुन्या गोष्टींचा लवलेशही नाहीये इथे. अगदी सगळं नवंकोरं, करकरीत. सो एन्जॉय.’’ आणि त्याने त्याच्या स्टाइलमध्ये एक्झिट घेतली. माझं एक नवीन आयुष्य सुरू झालंय. वॉव.. आता मागच्या गोष्टींचा फालतू त्रास नाही. सगळं मस्त नवीन.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की पुढे काय घडणार आणि गोष्टीचा शेवट काय होणार. पण ही गोष्ट कधी ना कधी आपल्याही आयुष्यात घडावी असं आपल्याला केव्हातरी वाटतंच आणि नवीन वर्ष आलं की हा विचार जरा जास्तच उसळी मारतो. आणि ‘संकल्प’ नामक चोररस्त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक नवीन वर्षी किंबहुना प्रत्येक नवीन दिवशी आपण स्वत:ला पटवून देत असतो की माझं आयुष्य थांबलंय. नवीन असं काही घडतच नाहीये. सगळं जुनंच सुरू आहे. बिचाऱ्या जुन्याची काहीच चूक नसताना आपण उगाच त्याला ‘व्हिलन’ केलेलं असतं. इतकं वाईट असतं का जुनेपण? सगळी ‘पुरानी बातें’ सोडायची असतात का?  हल्लीच्या काळात आपण बऱ्याच गोष्टी विसरत चाललोय. त्यातलीच एक म्हणजे जुन्याचं जुनेपण एन्जॉय करायची. आपल्याला दोनशेच्या स्पीडने पुढे पळायचं असतं. खूप पुढे जायचं असतं. वाटेत आपले आई-बाबा असतात. कोणीतरी जिवाभावाचं तिथेच थांबलेलं असतं. पण आपल्याला नव्याचा ध्यास लागलेला असतो. हे सगळं माझ्याकडे आहे. जुनंच आहे सगळं. आता काहीतरी नवीन हवंय. जुन्या गोष्टींना माणसांना किती गृहीत धरतो ना आपण.
२०-२५ वर्षांनंतर आजोळच्या गावच्या घरात गेल्यावर काय वाटतं. त्या घराकडे जायचा रस्ताच कितीतरी जुन्या आठवणी उलगडून सांगत असतो. घराचे वासे, दारं, भिंती आपल्याला कवेत घेत असतात. ‘एवढय़ा वर्षांनी आठवण आली माझी?’ काय बोलू अन् काय नको असं वाटत असतं त्या भिंतीना. त्यांना केलेल्या स्पर्शातून आठवणी जिवंत होऊन आपल्यासमोर उभ्या राहतात. जुन्या झालेल्या त्या घरात जुनेपणाचा एक आपलासा गंध दरवळत असतो. इतकंच काय अगदी १०-१५ दिवस बाहेर राहिलं तरी घरी कधी परततो असं होतं. घर जुनंच असतं, पण घरी परतायची ओढ मात्र कधीच जुनी होत नाही.
आई तगादा लावते म्हणून आपण आपलं कपाट आवरायला घेतो. आणि ती अडगळीची जागा अलिबाबाची सोन्या-चांदीची गुहा केव्हा बनते कळतच नाही. ‘‘अरे, हा भोवरा अजून आहे माझ्याकडे,’’ ‘‘बाप रे हे तर मी वाचलेलं पहिलं पुस्तक’’, ‘‘ओह.. हे तर मला आजोबांनी परीक्षेसाठी दिलेलं शाईचं पेन’’, ‘‘मला वाटलं हरवलं,’’ ‘‘हे ग्रिटिंग कार्ड इकडे काय करतंय. नशीब कोणी पााहिलं नाही. कित्ती वर्षांनी मिळालं हे’’ आणि ‘‘हा मुकुट .. चौथीत असताना राजा बनलेलो तेव्हाचा. ए .. अजून कसा माझ्याकडे ..’’ कपाटातल्या एकेक वस्तू शोधता शोधता आपणच तिथे हरवून जातो. जुन्याच गोष्टी त्या. म्हणायला निर्जीव, पण सजीवांपेक्षाही जास्त जिवंतपणा भरलेला असतो त्यांच्यात.
आजीच्या साडीने शिवलेली गोधडी कितीही जुनी झाली तरी ऊब तितकीच देते. ती अंगावर लपेटली की लहानपणीचे आपण आज्जीची गोष्ट ऐकता ऐकता तिच्या कुशीत शिरल्यासारखे झोपतो. नवीन गोष्टींना आपलंसं करावं लागतं. जुन्या गोष्टी या आपल्याच असतात. आपल्याच बरोबर राहतात. आणि म्हणूनच आपण त्यांना गृहीत धरतो. नव्याचं नावीन्य एन्जॉय करायचं असतं, पण जुन्याचं जुनेपण मात्र समजून घ्यायचं नसतं समरसून जगायचं नसतं.
येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षी आपल्याला काहीतरी नवीन हवं असतं, वेगळं हवं असतं, पण आपल्याकडे असणाऱ्या जुन्या गोष्टींशी, आठवणींशी आपण किती बोलतो. मृगजळाचा पाठलाग करता करता आपण हातातल्या चांदणचुऱ्याची मूठ सैल करत असतो.
येत्या नवीन वर्षांत नवनवीन गोष्टींना जरूर जवळ करा, पण जुन्याची साथ मात्र सोडू नका. जुन्याच्या पायावरच आपण नव्याचे इमले बांधतो. पायाच डळमळायला लागला तर इमले हवेतच राहतील. नवीन वर्षांच्या दाट नूतन जंगलात जाताना ‘जुन्या’चा कंदील हाती असणे केव्हाही चांगलेच. तेवढाच भरकटायचा धोका कमी. त्यामुळे या नवीन वर्षी हा एक संकल्प जरूर कराच. जुन्याची नव्याने ओळख करून घ्यायचा..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2015 at 01:04 IST

संबंधित बातम्या