कथा : हरवलेला महाराष्ट्र

देशनामे जवळजवळ १० वर्षांनंतर पत्नीसह मायभूमीच्या भेटीस आले होते. तसे ते परदेशातून दरवर्षी येत असत, पण अलीकडे वयोमानाप्रमाणे त्यांची ही वारी काहीशी खंडित झालेली होती. शेवटचे आले ते त्यांच्या…

देशनामे जवळजवळ १० वर्षांनंतर पत्नीसह मायभूमीच्या भेटीस आले होते. तसे ते परदेशातून दरवर्षी येत असत, पण अलीकडे वयोमानाप्रमाणे त्यांची ही वारी काहीशी खंडित झालेली होती. शेवटचे आले ते त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त. परदेशात जाऊन आता ५० वर्षे झाली तरी देशनामेचं देशप्रेम तिळमात्र कमी झालं नव्हतं. त्यात त्यांचा जन्म महाराष्ट्रातला. गर्जा महाराष्ट्राची कीर्ती तिथे जन्माला आलेल्या त्याच्या मुलांना आणि नातवंडांना सांगताना त्यांचा ऊर भरून येई. याच प्रेमापोटी त्यांनी मुलांना आणि नातवंडांना मराठीचे धडे दिले. सुरुवातीला मुलांचा उत्साह दांडगा होता, पण काळाच्या ओघात तो ओसरला, असं असलं तरी नातवंडाच्यात आपल्या महाराष्ट्राबद्दलचं प्रेमाचं बीज रुजवण्यात ते यशस्वी झाले होते.
नातीच्या मनात रुजवलेलं हे बीज चांगलंच फुललं होतं. आतापर्यंत महाराष्ट्राची यशोगाथा फक्त ऐकली होती, पण आता प्रत्यक्ष बघण्याचा ध्यास तिला लागला होता.
नातीला.. जिज्ञासाला घेऊन ते महाराष्ट्रात आले ते वर्ष होतं महाराष्ट्राचं शतकमहोत्सवी वर्ष. म्हणजेच महाराष्ट्र शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत होता. देशनामेंसाठी हा योग काही खास होता, कारण ते ज्या वर्षी परदेशात निघून गेले ते वर्ष ५०वे म्हणजेच महाराष्ट्राचं सुवर्ण वर्ष होतं. असं असलं तरी आता महाराष्ट्र सरकारचं पर्यटन विभाग बंद झाला होता. आणि खासगी पर्यटन करण्याबद्दलसुद्धा र्निबध लादले होते. देशमाने हताश झाले. नातीला महाराष्ट्र दर्शन घडवण्याचं त्यांचं स्वप्नं अपूर्ण राहणार असंच त्यांना वाटत होतं. यावर तोडगा काढताना त्यांना लक्षात आलं, सरकारने शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्या निमित्ताने ‘महाराष्ट्र सांस्कृतिक कलादालन’ नावाचं भव्य वस्तुसंग्रहालय नुकतेच सुरू केलं. आणि तेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्याचं आकर्षण होतं. क्षणाचा विलंब न करता ऑनलाइन बुकिंग करून त्यांनी वस्तुसंग्रहालयात प्रवेश केला.
वस्तुसंग्रहालयाचा बाहेरील दर्शनीय भाग हा एखाद्या भव्य अशा जुन्या ऐतिहासिक वाडय़ाच्या स्वरूपात होता. वाडय़ाचा आवारही प्रशस्त होता. वाडय़ाच्या समोरच एक छानसं तुळशीवृंदावन होतं. वाडय़ाच्या भव्य अशा दरवाजावर सुंदर कोरीव काम केलेलं होतं. दारावरच्या भिंतीमध्ये गणपतीची सुबक मूर्ती कोरलेली होती. त्याच्याबरोबर खालच्या बाजूला दाराला आंब्याची टाळ आणि सुंदर तोरण लावलेले होते. वाडय़ाच्या उंबरठय़ाच्या वरती दोन्ही बाजूला सुंदर नाजूक लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक काढलेलं होतं. त्याबरोबर जवळच गोपद्म-सूर्य-चंद्र-शंख काढलेले होते. त्यांची हळद-कुंकू, फूल वाहून यथासांग पूजा केलेली होती.
वाडय़ाचं असं रूप बघून जिज्ञासा भारावून गेली. आपण कुठल्या तरी जादूच्या विश्वात पर्दापण केलं असंच तिला वाटत होतं. या सगळ्या गोष्टी तिने आजी-आजोबांकडून ऐकल्या होत्या, पण पहिल्यांदाच बघितल्या होत्या. काय आणि कुठून वाडा बघायला सुरुवात करायची हे ठरवणं तिला अवघड वाटत होतं. वाडय़ामध्ये काही दुर्मीळ आणि इतिहासजमा वस्तूंबरोबर काही लोप झालेल्या व काही दुर्मीळ झालेल्या संस्कृतींचं दर्शन, शिल्पमय चित्रमय व दृकश्राव्य स्वरूपात होतं किंवा वस्तूच्या बाजूला त्याच्याबद्दल विस्तारित माहिती दिली होती. माहिती देण्याचे फलक तीन भाषेत होते. त्यांचा क्रमांक पुढीलप्रमाणे होता- १. इंग्रजी २. हिंदी ३. मराठी. वाडय़ाच्या बाहय़ भागापासून त्यांनी संग्रहालय बघायला सुरुवात केली.
वाडय़ाच्या एका बाजूला विहिरीचं सुंदर शिल्प होतं. त्याच्या बाजूला जुने दुर्मीळ झालेलं पाणी साठवण्याचे मोठमोठे रांजण ठेवले होते. विहीर बघताच क्षणी जिज्ञासा धावतच विहिरीजवळ गेली आणि वाकून बघू लागली, पण काही क्षणात तिला लक्षात आले हे विहिरीचं शिल्प आहे. तरीसुद्धा न राहून तिने विहिरीच्या रहाटाला फक्त हात लावून समाधान मानलं. पुढे काही अंतरावरची बैलगाडीनेसुद्धा तिची निराशा केली. न चालणाऱ्या बैलगाडीला बघण्यात मज्जा मानवी लागली. पुढे गाई-म्हशीच्या गोठय़ाचं शिल्प होतं. त्यात गाईचं दूध काढताना गवळी दाखवला होता. एका बाजूला त्या गवळ्याच्या मोठमोठय़ा दुधाच्या किटल्या आणि दूध मोजण्याची जुनी भांडी होती. जिज्ञासाने गाई-म्हशीचं दूध मशीनच्या साहय़ाने काढताना बघितलं होतं. यानंतर एकामागोमाग शेतकरी, गवंडी, चांभार, कुंभार, माळी, सुतार, लोहार, तांबट, कलई करणारे यांसारखे काम करणाऱ्या अनेक व्यक्तींची शिल्पं असतात, त्याचबरोबर त्यांच्या कामाच्या उपयोगी पडणाऱ्या औजारांची एका बाजूला मांडणी केली होती. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचे शिल्प बघताना जिज्ञासाला खूप आश्चर्य वाटले. याआधी नांगर धरलेला शेतकरी तिने बघितला नव्हता. तिला चांभार, कुंभार, माळी, सुतार, लोहार, तांबट, कलईवाला या सगळ्यांना समजणं कठीण जात होतं. एक एक बाहेरील शिल्प बघून तिघांनीही वाडय़ाच्या मुख्य दारात प्रवेश केला.
वाडय़ाच्या बाहेर असलेलं तुळशीवृंदावन बघून जिज्ञासाला खूप नवल वाटलं, कारण त्यांच्या घरी तुळस ही बोन्साय प्रकारात होतं. तिथे दिलेल्या माहितीवरून तुळस बाहेर अंगणात असते हे समजलं. अंगण म्हणजे काय हे तिला प्रथमच समजलं. तिच्या इथल्या घरी किंवा आजूबाजूच्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये अशी मोकळी जागा तिने बघितली नव्हती.
वाडय़ाच्या आतमध्ये प्रवेश करताना तोरण, उंबरठा त्याबाहेरील रांगोळी बघून आपल्या घरच्या दारात यामधली कोणतीही गोष्ट नाही याची तिला जाणीव झाली. वाडय़ामध्ये प्रवेश केल्यावर सनई-चौघडय़ाचे मंजुळ स्वर कानी पडले आणि तिथे ठेवलेल्या वाद्य वाजवणाऱ्या शिल्पाकडे तिचे लक्ष गेलं. ही वाद्यं वाजवणाऱ्या व्यक्ती आता असित्वात नसल्यामुळे रेकॉर्ड लावण्यात आली, हे तिच्या पुन्हा लक्षात आले. घरामध्ये आल्यावर दरवाजाच्या एका बाजूला आयताकृती लाकडी झोपाळा होता आणि दुसऱ्या बाजूला भारतीय बैठक होती. तिथे असलेल्या व्यक्तीने त्यांना गूळ-शेंगदाणे व गूळ-पोहे देऊन स्वागत केलं.
वाडय़ाच्या पहिल्या दालनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराची छोटेखानी प्रतिकृती होती. त्याचबरोबर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, जेजुरीचे खंडोबाचे मंदिर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या छोटेखानी प्रतिकृती होत्या. जिज्ञासाने आतापर्यंत या सगळ्या देवांचं दर्शन ऑनलाइन घेतलं होतं. बहुतेक करून मूर्ती जीर्ण झालेल्या आणि मंदिरांची पडझड झाल्यामुळे भाविकांसाठी अभिषेक आणि पूजा ऑनलाइन पद्धतीने करण्याची सोय होती. या मंदिराच्या पुढे सुंदर नक्षीकाम केलेलं लाकडी देवघर होतं. ते जिज्ञासाच्या देवघरापेक्षाही खूप वेगळं आणि मोठं होतं. देवघरात ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ होते. त्याचप्रमाणे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मुक्ताबाई यांसारख्या अनेक संतांनी केलेल्या कार्याविषयी माहिती होती.
यापुढील दालन हे दृकश्राव्य स्वरूपाचं होतं. ज्यामध्ये वेगवेगळे लघुपट दाखवण्यात येत होते. जसं जत्रा, गोंधळ, भारूड, पोवाडा, वासुदेव, वाघ्या-मुरली, जोगतीण, अभंग, कीर्तन, भजन, ओवी, मैदानी खेळ, साहसी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम इत्यादी लघुपटांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येकाची माहिती होती. त्याचबरोबर आधीच्या काळी चित्रित केलेले कार्यक्रम दाखवण्यात आले. जसं ‘जत्रा’ नावाच्या लघुपटामध्ये पूर्वीच्या काळी जत्रेला का महत्त्व दिलं गेलं? कुठल्या देवस्थानची जत्रा कधी असते? पालखी म्हणजे काय? बगाड म्हणजे काय? इत्यादीबद्दल सविस्तर माहिती होती. हे सगळे लघुपट बघत असताना जिज्ञासाला आपण कुठल्या तरी अनोळखी विश्वात प्रवेश केला आहे, असंच वाटत होतं.
या सगळ्या लघुपटामध्ये ‘मनोरंजनाचे कार्यक्रम’ नावाचा लघुपट तिला खूपच आवडला, ज्यामध्ये रामलीला, लावणी, कव्वाली, बैलगाडय़ांची शर्यत, रेडय़ांची झुंज, शक्तिवाले-तुरेवाले यांचा बाल्यानाच, मंगळागौरीचे खेळ इत्यादी अनेक पारंपरिक खेळांचा त्यामध्ये समावेश होता. हे सगळे बघितल्यावर आपण खूप कमनशिबी आहोत, अशी भावना तिच्यामध्ये निर्माण झाली. कारण तिच्यासाठी मनोरंजन म्हणजे फक्त ऑनलाइन गेम होते.
यानंतरच्या दालनामध्ये काळाच्या ओघात ढासळलेल्या आणि लोप पावलेल्या महाराष्ट्रातील काही किल्ल्यांच्या छोटेखानी प्रतिकृती होत्या. त्यामध्ये जलदुर्ग, भुईकोट किल्ले यांच्या समावेश होता. त्याचबरोबर ढाल, तलवारी, भाले, दांडपट्टा यांसारखी हत्यारे होती, पण ती कशी वापरावी याचं नीट ज्ञान कोणालाही नव्हते.
वस्तुसंग्रहालयामध्ये अशा अनेक वस्तू होत्या ज्या तिने आधी कधी बघितलेल्या नसतात. त्याचबरोबर तिला बरंच काही नव्याने माहीत झालं. जसं कोणे एके काळी संस्कृत नावाची भाषा अस्तित्वात होती. पूर्वीच्या काळी आतासारखं पिण्याचं पाणी म्हणून समुद्राचं पाणी फिल्टर करून वापरायची गरज नव्हती. गॅस सिलेंडरबद्दल तिला नव्यानेच माहिती मिळाली. तिच्या आताच्या काळामध्ये गॅसचा पुरवठा पाइपलाइनने केला जातो, तो सुद्धा सकाळी सहा ते दुपारी बारा आणि पुन्हा पाच वाजल्यापासून रात्री दहापर्यंत. घंगाळ हे खरे तर शोपीस नसून त्याचा वापर अंघोळीसाठी केला, हेसुद्धा नव्यानं समजलं. दिवाळीत मातीचा किल्ला घरी बनवला जायचा हे सुद्धा नव्याने समजले. तसंच खाण्याचे काही पदार्थ जसं मोदक, पुरणपोळी, श्रीखंड, लोणचं, पापड फेण्या, दिवाळीचे पदार्थ खरे तर घरी करता येतात. बाहेरून विकत आणण्याची गरज नाही याची नव्यानेच माहिती मिळाली. या सगळ्या गोष्टी पाहताना जिज्ञासाची जिज्ञासा अधिक वाढत होती.
संपूर्ण संग्रहालय बघेपर्यंत संध्याकाळ झाली होती. वाडय़ाबाहेर तुळशीवृंदावनमध्ये दिवा लावला होता आणि त्याचबरोबर ‘शुभंकरोती कल्याणम्..’ चे स्वर ऐकू येत होते.
या संग्रहालयातून घरी जाऊच नये, असं जिज्ञासाला वाटत होतं. संग्रहालयातल्या वस्तू तिला खूप आवडल्या होत्या, पण त्या आता फक्त संग्रहालयापुरत्याच मर्यादित आहेत याची जाणीव झाल्यावर तिला खूप वाईट वाटतं. ती काहीशी रागावून आजोबांकडे बघते. आजोबांनी वर्णन केलेला महाराष्ट्र आणि तिने संग्रहालयात बघितलेला महाराष्ट्र यामध्ये आकाशपाताळाएवढा फरक होता. महाराष्ट्र प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव तिला घेता आला नाही. ‘गर्जा महाराष्ट्रा’ची कीर्ती सांगणाऱ्या देशनाम्यांची मान शरमेने खाली गेली. महाराष्ट्रात पर्यटन करण्यासारखे आता काही शिल्लक नसल्यामुळे तो विभाग बंद केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. औद्योगिक प्रगती झाली असली तरी सांस्कृतिक वारसा जोपासण्यात दुर्लक्ष झालं. महाराष्ट्रात स्मारक बघण्यापलीकडे काही उरलं नव्हतं.
संग्रहालयातून बाहेर पडून अरबी समुद्रात असलेलं शिव स्मारक बघायला जायचं त्यांचं मन तयार झालं नाही. हय़ा सगळ्याला जिज्ञासाने आजी-आजोबांना जबाबदार ठरवलं. शिवस्मारक बघण्यापेक्षा किल्ल्यांचं संवर्धन करण्यास आजोबांनी काहीसा हातभार लावला असता तर? आजी पारंपरिक पदार्थ करायला शिकली असती तर? खरं तर देशच सोडला नसता तर आज संग्रहालय बघायची वेळ आली नसती. जिज्ञासामुळे देशनाम्यांना चुकीची जाणीव होते खरी, पण वेळ निघून गेलेली होती.
दीप्ती वारंगे – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra