कोण म्हणतो की पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या एकमेव पापासाठी गांधीजींचा वध करण्यात आला? याशिवायही अनेक पापं त्यांच्या माथ्यावर टाकता येतील आणि मग आपल्याला दरवर्षी ३० जानेवारीचं आन्हिक उरकण्याचीही गरज उरणार नाही.

या ३0 जानेवारीला महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची पुण्यतिथी साजरी करायची की थोर पत्रकार पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्यांचे अनावरण करायचे, हा मोठाच सवाल अनेकांच्या राष्ट्रप्रेमी डोक्यामध्ये पिंगा घालणार यात काही शंकाच नाही. आजवर पं. गोडसे यांची या राष्ट्राने मोठीच अवहेलना केली. त्यांना माथेफिरू म्हटले. पण ते तसे नव्हते, हे आता हिंदुस्थानातील किमान ३१ टक्के मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. हे प्रमाण वाढतच जाणार यात शंका नाही. त्यादृष्टीने आपले आदरणीय नेते साक्षी महाराज यांच्यासारखी मंडळी कार्यरत आहेच. त्यांचे कार्य दुहेरी पद्धतीने सुरू आहे. एकीकडे पं. गोडसे यांचे पुतळे उभारून जनजागृती करायची आणि दुसरीकडे आसिंधुसिंधु हिंदुबंधूंची संख्या वाढवत न्यायची. त्याचे दोन उपाय. घर वापसी हा जवळचा आणि हिंदू मातांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती व्हावे यासाठी जागृती करणे हा दूरवरचा उपाय. दरम्यानच्या काळात महात्मा गांधी यांना पुसण्याचे आपले काम आपण सुरूच ठेवू या.
त्यात काहीसा अडथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे हे मान्य. पण त्याचे फारसे भय नाही. गांधीजींची काही अमोघ शस्त्रे होती. उदाहरणार्थ, सत्याग्रह, अहिंसा, आर्थिक बाबतीत चरखा आणि देशातील अस्पृश्यता नष्ट करण्यापासून आरोग्यापर्यंतच्या बाबतीत झाडू. यातली झाडू तेवढा मोदींनी उचलला. आपल्या घरात कोणी साधा पाहुणा येणार असला तरी आपण खाटेवरचा पसारा आवरून केरकचरा काढून टाकतो. हा तर देशाचा प्रश्न आहे. देशात गुंतवणूक घेऊन विदेशी मंडळी येणार. आपल्याला मारे डाग अच्छे वाटतात, पण त्या मंडळींच्या स्वच्छतेच्या कल्पना अधिक निर्मळ आहेत. त्यांनी येथील गंदगी पाहिली तर देल्ही बेलीची आठवण होऊन ते पळूनच जातील. एकदा ‘मेक इन इंडिया’ म्हणून त्यांना आवतण दिल्यावर हे कसे चालेल? शिवाय येथील जनता जनार्दनाच्या आरोग्याचा वगैरे प्रश्न आहेच. आपले ११० कोटी देशवासी हातात झाडू घेऊन छायाचित्रे काढू लागल्यावर जगात कोणाची ताकद राहील का, आपला देश अस्वच्छ करायची? तेव्हा मोदी यांनी गांधीजींचा बाकीचा दृष्टिकोन नजरअंदाज करून त्यांचा चष्मा तेवढा स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीत नेऊन ठेवला. पुन्हा या ना त्या निमित्ताने ते गांधींचे गोडवे गातच असतात. पण मोदींच्या तोंडात गांधी असले म्हणून काय झाले, त्यांच्या बगलेत नथुरामप्रेमी आहेतच. तेव्हा मोदी यांच्या या गांधीगौरवास फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. एकीकडे गांधीजींचे नाव रोज प्रात:समयी न विसरता घेता घेता दुसरीकडे पं. नथुराम गोडसे हे कसे राष्ट्रभक्त होते हे सांगत राहिले की झाले.
आता पं. गोडसे हे महान राष्ट्रभक्त होते हे सांगण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गांधीजी हे कसे राष्ट्रद्रोही होते हे सांगावे लागणार आहे. त्यांच्यामुळेच फाळणी झाली, ते जन्मले नसते तर या महान राष्ट्राचे असे तुकडे पडले नसते आणि हा प्रिय आमुचा हिंदुस्थान – त्यातील आजच्या किती तरी कोटी बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांसह – अखंड राहिला असता. या राष्ट्रामध्ये मग आपण सारे गुण्यागोविंदाने राहिलो असतो. मोहम्मद अली जीना यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत अनेकांनी द्विराष्ट्राच्या सिद्धांताला मान्यता दिली होती. तो मान्य करून हा देश एकत्र ठेवता आला असता. मुसलमानांच्या अनेक उलेमांना तरी देशाची फाळणी कुठे मान्य होती? पण ती अमान्य करता करता या लोकांनी फाळणी व्हावी असे वातावरण निर्माण केले. बरे फाळणी होऊ नये म्हणून तेव्हाच्या आपल्या हिंदुत्ववाद्यांनीही किती सबुरीचे धोरण स्वीकारले होते. त्यांनी ना फाळणीच्या बाजूने आंदोलन केले, ना फाळणीच्या विरोधात. ते नगर-पुण्याकडे गावठी बॉम्ब फोडत राहिले आणि गांधीजींचे पाप असे की त्या वृद्धाने ही फाळणी थांबविण्यासाठी काहीच केले नाही. उलट ती होऊ दिली. शेवटी ती जेव्हा झाली तेव्हा येथे कापाकापीला सुरुवात केली. हिंदु-शिखांनी मुसलमानांना आणि मुसलमानांनी त्यांना दणके दिले. उद्देश हा की निदान त्या दंगलींमुळे तरी फाळणी रद्द होईल. पण गांधींनी सगळाच कार्यनाश केला. पं. नथुराम यांनी त्याची शिक्षा त्यांना केली. त्यांचा वध केला. त्याला कारण घडले ते ५५ कोटी रुपयांच्या प्रकरणाचे. फाळणीनंतर पाकिस्तानला द्यायचे ठरले होते ७५ कोटी रुपये. त्यातले २० कोटी दिले होते. बाकीच्याला आपण नाही म्हटलो नव्हतो. पण तेवढय़ात पाकिस्तानी टोळीवाल्यांनी गुपचूप काश्मीरवर हल्ला चढवला. तेव्हा जम्मू-काश्मीर हा काही भारताचा भाग नव्हता. तेथला राजा हरिसिंग भारतात यायला तयारच नव्हता. हल्ल्य़ामुळे तो घाबरला. तेलही जायचे आणि तूपही, असे त्याला वाटले. तेव्हा त्याने सामीलनामा केला आणि जम्मू-काश्मीर भारतात आला. मग अहिंसावादी गांधींचा राजकीय वारस म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी तिकडे सैन्य घुसवले. आता ५५ कोटी रुपये विसरा असे ते पाकिस्तानला म्हणाले. पण गांधींची धार्मिक नीतिमूल्ये आड आली. त्यांनी ते द्यायला लावले. म्हणूनच पं. नथुराम यांनी त्यांचा वध केला. नाही तर त्यांना मारण्याचे कारण नव्हते. हे एकदा लोकांना पटवून दिले की गांधी कायमचे संपलेच म्हणून समजा.
अर्थात त्यासाठी इतिहासाचे थोडेसे पुनर्लेखन करावे लागणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जी. डी. तेंडुलकर यांचे गांधीचरित्र. अत्यंत अधिकृत मानले जाते ते. त्याच्या तिसऱ्या खंडातल्या २० व्या प्रकरणात गांधींवरील एका बॉम्बहल्ल्याची माहिती दिली आहे. गांधींनी १९३४ मध्ये अस्पृश्यतानिवारणासाठी देशव्यापी दौरा सुरू केला होता. १९ जूनला ते त्यासाठी पुण्यात आले. २५ जूनला नगरपालिका सभागृहात ते भाषणासाठी गेले. त्या वेळी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर बॉम्बहल्ला करण्यात आला होता. बॉम्ब फेकणाऱ्याचा समज असा होता की, गांधीजी पुढच्या गाडीत आहेत. ते होते मागच्या गाडीत. त्यामुळे ते बचावले. पण पालिकेचे मुख्याधिकारी, दोन पोलीस यांसह सात जण त्यात जखमी झाले. हा हल्ला पुण्यातल्या सनातन्यांच्या गटाने केला होता. हे फारसे कोणाला माहीत नाही, पण ते पुसावे लागणार आहे. कारण तेव्हा ५५ कोटींचे प्रकरण नव्हते.
यानंतर दहा वर्षांनी, जुलै १९४४ मध्ये असाच एक छोटेखानी प्रयत्न झाला होता. आजारी गांधी पाचगणीमध्ये विश्रांतीसाठी आले होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी पुण्याहून १५-२० जणांचा एक गट आला. त्यांनी दिवसभर गांधींच्या नावाने शिमगा केला. गांधींनी त्यांना भेटायला बोलावले. त्यांनी नकार दिला. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी मात्र त्यातला एक तरुण घुसला आणि हातात सुरा घेऊन गांधींच्या दिशेने धावून गेला. मणिशंकर पुरोहित आणि साताऱ्याचे भि. दा. भिलारे गुरुजी यांनी त्याला पकडले. त्या तरुणाचे नाव नथुराम गोडसे. त्यांनी ‘अग्रणी’चे वार्ताहर जोगळेकर यांना आधीच सांगितले होते, की साताऱ्याहून आज महत्त्वाची बातमी येणार आहे. ती आली पण ती होती सभेत झालेल्या या गोंधळाची. ‘पूना हेरल्ड’चे संपादक ए. डेव्हिड यांनी न्या. कपूर आयोगासमोर तशी साक्ष दिली आहे. पण ही माहितीही खोटी ठरवावी लागणार आहे. कारण तेव्हा ५५ कोटींचे प्रकरण नव्हते.
त्यानंतर दोन महिन्यांनी सप्टेंबर १९४४ मध्ये पुन्हा सेवाग्राममध्ये नथुराम गोडसे आणि त्यांच्या ल. ग. थत्ते या साथीदारास जंबियासह पकडण्यात आले. तेव्हा गांधी तेथेच होते.
गांधींना मारण्याचा आणखी एक प्रयत्न १९४६ मध्येही झाला होता. २९ जून १९४६ रोजी गांधीजी मुंबईहून पुण्याला रेल्वेने निघाले होते. त्या ट्रेनचा उल्लेख गांधी स्पेशल असा करण्यात आला आहे. त्या ट्रेनला अपघात व्हावा या उद्देशाने कोणी तरी नेरळ-कर्जतच्या दरम्यान रेल्वेमार्गावर मोठमोठय़ा दरडी टाकल्या होत्या. गाडी पूर्ण वेगात होती. पण चालकाने प्रसंगावधान दाखवून अपघात टाळला. गांधी बचावले. ही माहिती ‘हरिजन’च्या ७ जुलै १९४६ च्या अंकातही आहे. ती तर दाबलीच पाहिजे. कारण या वेळीही ५५ कोटींचे प्रकरण नव्हते. गांधी तेव्हाही फाळणीच्या विरोधातच होते. त्यांना मारण्याचे तसे कोणतेच कारण नव्हते. म्हणजे होते, पण त्याचे कारण वेगळेच होते. त्याचा सगळा ऊहापोह ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांनी ‘महात्म्याची अखेर’ या पुस्तकातून केला आहे.
गांधीजी स्वत: जरी त्यांना मारण्याचे प्रयत्न सात वेळा झाले होते असे सांगत असले, तरी त्याची माहिती फारशी कोणाला नाही. असली तरी हरकत नाही. ५५ कोटींचे प्रकरण आपण जेवढे म्हणून उच्च आवाजात सांगू तेवढे इतिहासाचे पुनर्लेखन सहजी होऊन जाईल.
तेव्हा गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हे आवर्जून लक्षात ठेवायचे, की
१. गांधींना ५५ कोटींच्या प्रकरणामुळेच मारण्यात आले. आधीच्या एक-दोन हल्ल्यांशी पं. नथुराम यांचा संबंध असला आणि तेव्हा फाळणीचा काहीही संबंध नसला, तरी कारण द्यायचे ते हेच.
२. १९०९ मध्ये विभक्त मतदारसंघ जाहीर झाले होते. १९१६ साली लो. टिळक व जीना यांच्यात लखनौ करार झाला होता. त्यानुसार वेगळा सिंध प्रांत अस्तित्वात आला. तोवर गांधी देशाचे नेते झाले नव्हते. झाल्यानंतरही त्यांनी या कराराच्या पुढे एक पाऊलही टाकले नाही. तोंडाने मात्र मुसलमानांना ते सगळा देश देऊ करीत होते. हे कुठेही बोलायचे नाही. गांधीजी हे मुसलमानांचा अनुनय करीत असत हे मात्र सतत सांगायचे.
३. सावरकर, जीना ही मंडळी हिंदुस्थानात दोन राष्ट्रे नांदतात असे म्हणत असत. त्याचे परिणाम आपण विसरायचे आणि गांधींवरच फाळणीचे पाप टाकायचे.
४. अशी बरीच पापे गांधींवर टाकता येतील. उदाहरणार्थ, थोर कम्युनिस्ट नेते सरदार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी व्हावी म्हणून गांधींनी प्रयत्न केले असेसुद्धा आपल्याला सांगता येईल. गांधीजी हे विकृत होते. त्यांना बायका लागत असे ठाकरी शैलीत आपणासही आवर्जून सांगता येईल. ते रेटून सांगायचेच. खोटे जेवढे मोठे तेवढे लोकांना ते खरे वाटते हे सत्य नेहमी ध्यानी ठेवायचे.
एकदा इतिहासाचे असे भजे केले की आपण छानच मोकळे होऊ आणि मग आणखी काही वर्षांनी आपल्यासमोर हा प्रश्नच नसेल, की ३० जानेवारीला गांधींची पुण्यतिथी साजरी करायची की नाही?
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असला म्हणून काय झाले? मोहनदास करमचंद गांधी नावाचा हा महान आत्मा अखेर आपल्यासारख्या देशप्रेमींचा गुन्हेगारच!!
रवि आमले