News Flash

हातसफाई हातघाई…

हात हा अवयव आपल्याला मराठी माणसांना फक्त वेगवेगळ्या कामांसाठीच नाही, तर तो भाषेच्या पातळीवरही उपयोगाचा आहे.

| June 13, 2014 01:22 am

हात हा अवयव आपल्याला मराठी माणसांना फक्त वेगवेगळ्या कामांसाठीच नाही, तर तो भाषेच्या पातळीवरही उपयोगाचा आहे. आपण हात सैल सांडून खर्च करतो, हातघाईला येतो आणि हातावर हात टाकून बसून राहतो…

आज रविवार असल्याने आम्ही सर्व जण जरा आरामातच उठलो. चहा पिताना सौमित्रने फर्मान सोडले, ‘‘बाबा आज मस्त पैकी फिश आणा. मी मग जेवणावर आडवा हात मारू शकेन.’’
मी सौमित्रला म्हटले, ‘‘चालेल, आणीन तुझ्या आवडीचे पापलेट.’’ चहाचा घोट घेत घेत, मी पद्मजाला म्हटले, ‘‘आज तुझ्या शिकवणीसाठी शब्द मिळाला; तुला आज सांगतो HAND म्हणजे हाताबद्दल. आत्ताच सौमित्र म्हणाला आडवा हात मारेन म्हणून; या वाक्प्रचाराचा अर्थ होतो भरपेट जेवणे.’’
एवढय़ात सौ म्हणाली, ‘‘सौमित्र, पापलेट नाही मिळाले व दुसरा मासा मिळाला तरी जेवशील ना? कारण आजकाल कितीही हात सैल सोडला तरी मनाजोगते मासे मिळतीलच याची खात्री देता येत नाही.’’
नूपुर मध्येच लुडबुड करत म्हणाली, ‘‘ताई, हात सैल सोडणे म्हणजे खूप पैसा खर्च करणे.’’
पद्मजा शाकाहारी असल्याने सौ लगेच म्हणाली, ‘‘पद्मजा काळजी करू नको, तुझ्यासाठी पण मस्त शाकाहारी मेनू बनविते; पावभाजीचा.’’
सौमित्र म्हणाला, ‘‘ताई, माझ्या आईच्या हाताला चव आहे म्हणजेच ती उत्तम कुक आहे.’’
सौ म्हणाली, ‘‘पद्मजा, पावभाजी आवडते ना तुला? आणि रात्री खास तुमचा दाक्षिणात्य मेनू बनविणार आहे इडली व सांबर, तेव्हा दोन्ही वेळी मस्त जेव.’’
प्राजक्ताची तारीफ करण्यासाठी मीही पद्मजाला म्हटले की ‘‘रवा इडली बनविणे म्हणजे हिच्या डाव्या हाताचा मळ आहे. डाव्या हाताचा मळ म्हणजे अगदी सहज सोपे काम असणे.’’
सवयीप्रमाणे मी वर्तमानपत्र हातात घेऊन बातम्या वाचण्यास सुरुवात केली. त्यात लिहिले होते की, महागाईमुळे लोकांनी सणासुदीमध्ये देखील खरेदी करताना हात आखडता घेतला आहे. मी पद्मजाला म्हटले, ‘‘हात आखडता घेणे म्हणजे जपून, काटकसरीने खर्च करणे.’’
दुसरी बातमी होती की, मुसळधार पावसामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. पद्मजाला मी म्हटले की, ‘‘इथे अर्थ होणार जवळपास नक्की झालेली गोष्ट ऐनवेळी न होणे.’’
तिसरी बातमी होती, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाने त्यांच्या विद्यमान नगरसेवकांना हाताशी धरून जागा जिंकण्याची रणनीती बनविली आहे. हाताशी धरणे म्हणजे मदत घेणे हा अर्थ पद्मजाला सांगून मी पेपर वाचन आटोपते घेतले.
एवढय़ात शेजारील बिल्डिंगमधून जोरजोराने भांडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. सौ म्हणाली, ‘‘हे रोजचेच झाले आहे. त्या देशपांडे सासू-सुना दोघीही रोज क्षुल्लक कारणांवरून वाद घालत बसतात.’’
मी म्हटले, ‘‘पण चूक कोणाची असते?’’ तेव्हा सौ म्हणाली, ‘‘कधी एका हाताने टाळी वाजत नसते माहिती आहे न तुम्हाला?’’
मी सौ.ला म्हटले, ‘‘मला माहीत आहे, पण आता पद्मजाला सांगायला हवे ना की एका हाताने टाळी वाजत नसते म्हणजे भांडणामध्ये नेहमी दोन्ही बाजूंची चूक असते हा त्याचा मथितार्थ!’’
मी तयारी करून मासे आणायला बाहेर पडलो. सोबत सौमित्रही होता. काही कारणांमुळे माझी स्कूटर चालू होईना, बराच प्रयत्न केला पण व्यर्थ. तेव्हा शेजारील राकेश धावत आला, म्हणाला, ‘‘काका, तुम्ही बाजूला व्हा. आपला हात जगन्नाथ.’’ असे म्हणत त्याने काही तरी खटपट करून, स्कूटर चालू करून दिली. राकेश म्हणाला, ‘‘काका, स्टार्टरचा प्रॉब्लेम होता. पुढच्या वेळी बदलून घ्या.’’ मी त्याला होय म्हटले, धन्यवाद दिले व अजून एक अर्थ लक्षात ठेवला, आपला हात जगन्नाथ म्हणजे आपणच आपले सर्व प्रॉब्लेम सोडवू शकतो हा सार्थ विश्वास!
यथावकाश मासे घेऊन आम्ही दोघे घरी परतलो. पंख्याचा थंड वारा व थंड पाण्याचे घोट घेता घेता मी नूपुरला टीव्ही चालू करायला सांगितला. बातम्यांमध्ये सांगत होते की परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची बघून पोलिसांनी दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू केली. दुसरी बातमी होती की आध्यात्मिक गुरूला अटक झाल्यामुळे त्याचे भक्तगण पोलिसांबरोबर हातघाईवर आले होते. तिसरी बातमी होती की सणासुदीच्या दिवसात बाजारपेठ माणसांनी फुलून गेल्याने गर्दीत मोठय़ा प्रमाणावर पाकीटमार, लोकांच्या पाकिटांवर हात साफ करून घेत आहेत.
पाण्याचे ग्लास परत घ्यायला आलेल्या पद्मजाला मी म्हणालो, ‘‘बघ अजून तीन अर्थ तुझ्यासाठी सापडले. हात साफ करून घेणे म्हणजे चोरी करणे, हाताबाहेर जाणे म्हणजे कंट्रोल करण्याच्या पलीकडे एखादी परिस्थिती जाणे व हातघाईवर येणे म्हणजे संघर्ष करण्याच्या स्थितीमध्ये येणे.’’
मी पद्मजाला विचारले की, ‘‘नूपुर कुठे दिसत नाही आहे ते?’’ त्यावर आतून सौ.चे बोलणे कानावर आले की नूपुर तिला स्वयंपाक करायला हातभार लावत आहे. त्यावर पद्मजा म्हणाली की, हा अर्थ मला ओळखू दे. हातभार लावणे म्हणजे मदत करणे, बरोबर? मी म्हटले हो.
मी पद्मजाला म्हणालो, ‘‘आता मी तुला एक-दोन अर्थ सांगतो व मग आपली शिकवणी आजच्या दिवसापुरती बंद. दगडाखाली हात असणे म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये सापडल्याने नाइलाज होणे व हातावर हात ठेवून बसणे म्हणजे काहीही कृती न करता आळशीपणा करणे.’’
मी पद्मजाला म्हटले, ‘‘हातावरून अजून अगणित वाक्प्रचार आहेत. जसे की हात दाखवून अवलक्षण करून घेणे, दोनाचे चार हात होणे, अंगावर हात टाकणे, हात-पाय गाळणे.’’
त्यावर पद्मजा मला म्हणाली, ‘‘काका मग हातासाठी अजून एका दिवसाचे सेशन घेऊया का?’’
मी म्हटले, ‘‘बघू, नवनवीन शब्द आधी शिकू व परत कधी तरी हा विषय हाताळू.’’
पद्मजा जरासी हिरमुसली. त्यामुळे मग मी म्हटले, ‘‘चल जाता जाता दोन अर्थ घे लिहून; हात शिवशिवणे म्हणजे एखादी गोष्ट करायला खूप आतुर असणे व हाताखालून जाणे म्हणजे एखाद्याला शिकविणे. उदा. तुझी आई शिक्षिका असल्याने तिच्या हाताखालून बरीच मुले गेली असतील.’’
पद्मजा आता मात्र समाधानी दिसली. ट्रॅफिक हवालदार करतात तशी हाताने थांबा अशी खूण करून तिनेच आपली शिकवणी आवरती घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2014 1:22 am

Web Title: marathi language 21
Next Stories
1 उचलली जीभ…
2 नाकपुराण
3 मराठी तितुकी फिरवावी : पोटासाठी…
Just Now!
X