तृषार्त…
व्हावे बेभान आयुष्य
द्यावे उधळून मन
आलिंगुनी आकाशाला
भोगून घ्यावे हे रितेपण ।।धृ।।
कधी जाऊन चंद्रप्रदेशी
छंद जिवाला घ्यावा लावून
कधी कळ्यांना चुंबून घ्यावे
अंतापर्यंत जावे न्हाऊन
त्या धुंदीने त्या मस्तीने
बहरून जावे सारे जीवन ।।१।।
कधी क्षितिजावर आसक्त राधा
नित आळवीत एक विराणी
कधी भयभीत विसावलेली
मिठीत राऊच्या कुणी मस्तानी
या प्रीतीने मोहरून यावे
फुलून यावे, व्हावे मीलन ।।२।।
कधी सागरा प्राशून घ्यावे
तृषार्त हृदया द्यावे चेतन
कधी तिमिरा कापित जावे
वेचून घ्यावा प्रकाश कण-कण
आर्त ओढ ही संपत नाही
कसे निवावे हे तन हे मन।।३।।
प्रा. संजयकुमार बामणीकर, नांदेड.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


औकात

आगा राज्या तलाठय़ा
तूं त् बह्य़ाडच राह्य़ला रे!
शंभर दिडक्याच्या लाचेसाठी
अटक झाली कारे?
‘सांपळे’ रचनारे बी
फाटक्याइच्याच मागं (मागे) राह्य़तेत
करोडोचे बोफोर्स आन
व्ही.आय.पी. हेलिकॉप्टर्स
दृष्टीआड करतेत!
तूं बी बहान्या!
करोडोचे घापले केले राह्य़ते
तं् तुलेबी ते पचले राह्य़ते!
लोकं बी लेकाचे
गरिबालेच पकडून देतेत
टूजी आन् कोळशाचे काळे हात मात्र
‘पांढरे’ होतेत!
तवा हेच जन्ता डोळे झाकून घेते!
अरे लेका! खायचंच व्हतं
त् चारा खाता..
भूखंडाचं श्रीखंड खाता
आत्महत्या करनाऱ्या शेतक ऱ्याच्या टाळूवरचं लोनी खाता!!
कवाबी येकटय़ानं काय पन नाय खावं
म्हंजे ‘तेरीबी चूप- मेरीबी चूप’ करावं!!
लेका तुही औकातच दरिद्री हाय
खरी लोकशाही तुले त् समजलीच नाय!
तूं कंदी सुधरू नोको! त्याहीलेच वोट दे
आन् देशाचे रान चरायले मोकळं करून दे
सुधा पांढरे, रामदास पेठ, नागपूर.


कीर्ती मंदिरावर माकड चढले

कीर्ती मंदिरावर माकड चढले
वर जाणाऱ्याने तट पकडले
खालच्याने त्याचे शेपूट वढले।
कीर्ती मंदिरावर..
कोणी थांबले, कोणी पडले
अजून कोणी दुसऱ्यास धरले।
कीर्ती मंदिरावर..
चढा-वढीच्या व पडीच्या खेळातले
अढी धडी व नडीच्या वावरातले।
कीर्ती मंदिरावर..
कोणी पोचला टोकेवर
न राही त्याचे डोके वर।
कोणी दमला मध्यंतरी
तर कोणी रमला अधांतरी।
कीर्ती मंदिरावर..
जितेंद्र गवळी, वडोदरा.

भाषांतरे
मौनांची भाषांतरे
करीत जातो
व्यक्ताचे मूग मिळून
प्रश्नांचा गुंतवळा
सोडत नाही पिच्छा
उत्तरं आपसूक सांडतात
पानापानांतून.. अदृश्यच
अपेक्षा मात्र प्रश्नांना जन्माला घालते
आगंतुकपणे.. स्वत:च्याच आवर्तनातून.
शब्दांचीही नसते कुरकुर
की नसते आसक्ती व्यक्ताची
जाऊच नये उत्तरास्तव प्रश्नांकडे
करावी तडजोड व्यक्ताची
मौनांची भाषांतरे उठवतात वादळे
अन् वाहून जातात
संदर्भ मुळासकट संवादाचे
संवादच बनतात अश्रू जेव्हा
खचत जाते एक एक भिंत
राखून ठेवलेली मौनाची..
विनायक येवले, नांदेड.

आम्ही कोण?
‘आम्ही कोण?’ म्हणुनी काय पुसता दांताळा दाखवुनी॥
फुकटचे हमाल उभे बायकोपुढे कान धरुनी॥
भल्यामोठय़ा पिशव्या घेऊन बाजारात तुम्ही आम्हास नाही का पाहिले?
घेऊनी हाती डब्बे घासलेटच्या रांगेत आम्हीच होतो उभे राहिलेले
बायको आमची प्यारी तिचे काम करण्याची आम्हा हौस भारी
खाली करून मिशा आम्ही धुतो कपबश्या गुपचूप घरी॥
आम्ही नवरे सगळे गाढव, बायको आमची शहाणी
पगाराच्या दिवशी सायंकाळी करून घेते मनमानी
येताजाता म्हणते हे ते घ्या ना लावुनी प्रेमाचा लळा
खिसा खाली होता पोटात उभा राहतो कर्जाचा गोळा॥
बायको वटारता डोळे तिच्यापुढे आमचा दंडवत घडे
पुरविता तिचे लाड सगळे आमचा प्राण कंठाशी भिडे
‘आणा आणा’ मंत्राने तिने बांधले आमचे गाठोडे
नाही म्हणताच झोपताना करी तोंड भिंतीकडे॥
लग्नास किती होतो उतावळा तेव्हा बुद्धी झाली होती नाठी
चुकता थोडेसेही, आज बायको उचलते कान आमचे राती
करती मुले आज आमची टिंगल, परी जेव्हा होईल त्यांचे शुभमंगल
सतत करूनी गोष्टी गुलूगुलू तेही बायकापुढे नांगी टाकतील॥
आम्हास वगळा कठीण होईल आमच्या बायकांचे जगणे।
आम्हास वगळा मुश्किल होईल आमच्या बायकांचे जागणे॥
– प्रा. देवबा शिवाजी पाटील,
खामगाव, बुलडाणा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poem
First published on: 04-04-2014 at 01:08 IST