विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
आजारी पडल्यावर तर प्रत्येक व्यक्ती आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. मात्र जागरूक व्यक्ती आरोग्य उत्तम राखण्यासाठी नेहमीच काळजी घेत असते. आजपर्यंत केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य असे ढोबळ वर्गीकरण केले जात होते. आता त्यात डिजिटल आरोग्याची भर पडली असून ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यांवर परिणाम करणारे आहे.

आजवरचे मानवी आयुष्य हे एका अर्थाने नवे तंत्रज्ञान आणि मानवी उत्क्रांती यांचे एक अव्याहत चक्र आहे. ज्या ज्या वेळी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती झाली, त्या त्या वेळी माणूस उत्क्रांत होत गेला आणि त्याच्यातील उत्क्रांतीने भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दिशेने मार्गक्रमणाचा त्याचा मार्ग प्रशस्त केला. मानवी उत्क्रांतीच्या कालखंडांची गणनादेखील अश्मयुग, ताम्रपाषाणयुग किंवा लोहयुग अशी तंत्रज्ञानाधारितच आहे.

loksatta kutuhal artificial intelligence technology recognizing human handwriting
कुतूहल : हस्ताक्षर ओळखणारे तंत्रज्ञान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
kismet robot
Kismet-First Social Robot: AI तंत्रज्ञानाची आजी ‘किस्मत’ कोण होती?
The use of artificial intelligence AI technology is also starting in the construction sector Pune print news
‘एआय’ची अशीही कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला कळेल संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक
Loksatta explained Will the study of Future Warfare change the strategy of the Indian Army
‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासातून भारतीय सैन्याची रणनीती बदलणार का?
It is important to carry out research in the new educational policy
शिक्षणात पुढे जाताना…
ED seized assets worth Rs 43 crore 52 lakh in case of defrauding bank group
बापरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक

एकुणात तंत्रज्ञानातील बदलाने मानवी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवत माणसाचा इतिहासही बदलण्याचे काम केले. आताही आपण मेटाव्हर्स, फाइव्हजी आणि वेब ३.० या एका नव्या तंत्रक्रांतीच्या उंबरठय़ावर उभे आहोत. या टप्प्यावर समाजाची स्थिती समजून घेणेही तेवढेच आवश्यक ठरते. मोबाइलची अवस्था तर मानवाचा एक विस्तारित अवयवच असल्यासारखी झाली आहे. रील्स असोत किंवा समाजमाध्यमे, त्यानिमित्ताने मोबाइलमध्ये किती वेळ जातो याची त्याला कल्पनाच येत नाही आणि समजते तेव्हा वेळ हातची निघून गेलेली असते. आपण आभासी जगाच्या आहारी जात आहोत का? नेटफ्लिक्सचा सीईओ म्हणतो की, आमची स्पर्धा कंपन्यांशी नाही तर मानवी झोपेशी आहे, त्या वेळी त्याला नेमके काय म्हणायचे असते? मानवी आयुष्य नेमके कोणत्या गर्तेत आहे याची कल्पना आपल्यापेक्षा त्यालाच अधिक आहे का?

सध्या एक नवे अर्थशास्त्र जन्माला आले आहे- अटेन्शन इकॉनॉमी. वापरकर्त्यांचे लक्ष अधिकाधिक वेधून घ्यायचे. त्याला उपकरणांशी जोडून ठेवायचे, असे काही तरी समोर द्यायचे की, तो उपकरण हातातून खाली ठेवणारच नाही. शब्दश: तहानभूक हरपून तो पाहातच राहील. कारण त्याच्या या पाहण्यातून, अटेन्शनमधूनच तर या कंपन्यांना पैसे मिळतात. तो वापरकर्ता अनमोल वेळ गमावतो आणि प्रत्यक्षातील सोडून आभासी विश्वात रममाण होण्याचा प्रयत्न करतो. जाणीव हरपवणाऱ्या तंत्रज्ञानाने त्याला गुलाम केले आहे आणि त्यातून निर्माण झालेले अर्थशास्त्र प्रबळ आहे. कारण ते अर्थशास्त्र आहे आणि ते नेहमीच प्रबळ असते. त्यात त्याचाच बळी जाण्याची शक्यता आहे. कुणी काही युक्तिवाद केला तर केवळ तंत्रज्ञानाने आपले आयुष्य सोपे केल्याचे आणि वेळ वाचवल्याचे दाखले दिले जातात. आता प्रश्न असा की, पूर्वीसारखे पाटा-वरवंटा घेऊन काम करावे लागत नाही, मिक्सरने वेळ वाचवला; पण मग तो वाचलेला वेळ गेला कुठे? बैलगाडीने जाण्याऐवजी मोटार आली, तिने वेळ वाचवला; पण मग तो वेळ गेला कुठे? बदललेल्या जीवनशैलीचे आजार-विकार जडतात आणि डॉक्टर शरीराकडे लक्ष देण्यास सांगतात. तेव्हा सर्व रुग्ण म्हणतात, डॉक्टर, व्यायामाला वेळच नाही मिळत. मग तंत्रज्ञानाने वाचवलेला वेळ गेला कुठे? याचा विचार आपण करणार का आणि केव्हा?

ज्या ज्या वेळेस माणसाने तंत्रज्ञान जाणीवपूर्वक वापरले त्या त्या वेळेस क्रांती- उत्क्रांती झाली; पण आता तर माणूस तंत्रज्ञानाचा गुलामच झाल्यासारखी अवस्था आहे. यातून बाहेर पडायचे तर डिजिटल स्वातंत्र्यासाठी (यात खासगीपणाला अनन्यसाधारण महत्त्व असेल), डिजिटल आरोग्यासाठी नवी गुढी उभारावी लागेल!

गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा!