विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
वातावरणात गारवा फारसा नसला, तरी आजूबाजूला वाजू लागलेल्या फटाक्यांमुळे दिवाळीला सुरुवात झाल्याची जाणीव अरुणला झाली होती. दिवाळी साजरी करण्याचा उत्साहच नव्हता. घरात, ऑफिसमध्ये किंवा अगदी आजूबाजूलाही समाजात सारे काही वाईटच सुरू आहे, अशी भावना मनात मूळ धरू लागली होती. पसे गाठीशी राहावेत, काही चांगले कमवावे म्हणून तो शेअर बाजारात उतरला आणि बाजार गडगडला.. मंदीसदृश वातावरण, वरुणराजानेही आखडत्या घेतलेल्या हातामुळे आलेले दुष्काळाचे सावट, तिसरीकडे जागतिक अर्थकारणात तेलाचे वाढत चाललेले दर आणि त्याचा महागाईवर होणारा परिणाम.. सारे काही नकारात्मक.

महिनाअखेरीस हाती श्रीशिल्लक काहीच राहात नव्हती. दीपोत्सवावरही एकूणच या साऱ्याचा परिणाम झालेला. या खेपेस आई-वडील आणि आजोबांनाही काही नवे घ्यावे असे ठरवलेले, पण शक्यच नव्हते, त्यामुळे तो हिरमुसला होता. अभ्यंगस्नानासाठी आईने खुपदा उठवायचा प्रयत्न केला पण मन काही उभारी घेईना. त्याचवेळेस आजोबांचा मायेचा स्पर्श केसांतून फिरला..

ते म्हणाले, अरे दिवाळी आहे. उचकलेला अरुण म्हणाला, दिवाळं निघाल्यासारखी अवस्था आहे.

आजोबा म्हणाले, परिस्थिती आहे अशी हे बरोबर आहे, पण म्हणून आपण दिवाळी नाही का साजरी करायची? हा सणांचा राजा आहे अरे. यातून पुढच्या वर्षभरासाठी ऊर्जा घ्यायची, प्रकाशाचा धर्म स्वीकारायचा आणि पाळायचाही. ती खरी दिवाळी! पैसे असले किंवा नसले तरी लहानथोर सारेच दिवाळी करतात साजरी. रस्त्यावरची मुलं कधी दिवाळीत हिरमुसली होऊन बसतात का? तीही करतातच दिवाळी त्यांच्या पद्धतीने साजरी. कारण ऊर्जा त्यांनाही हवी असते.

नकारात्मक गोष्टी तर काय घडतच असतात दर वर्षी. यंदा थोडय़ा अधिक झाल्या. पण म्हणून काय आपण आपला धर्म सोडावा? ‘अहो, आजोबा िहदू धर्म का सोडेन मी?’ अरुण म्हणाला.

त्यावर आजोबा म्हणाले, अरे तो धर्म नव्हे, प्रकाशाचा धर्म. अरे, प्रकाशाचीही एक वेगळी गंमत असते आणि दिव्याच्या ज्योतीचीही. ‘ज्योतसे ज्योत जलाते चलो’ उगाच का म्हणतात.. म्हणून तर दीपप्रज्वलन करतो आपण प्रतीकात्मक! ते प्रकाशाचा धर्म सांगण्यासाठीच असतं. अंधार नाहीसा करून आसमंत उजळण्याबरोबर ती सकारात्मक प्रेरणा एकाकडून दुसऱ्याकडे जावी यासाठीही ते असतं.

पूर्वी वीज नव्हती. तेव्हा दिवे घरोघरी लावले जायचे; कुठे तेलाचे तर कुठे रॉकेलचे. आता चायनीज दिव्यांच्या माळाही आल्या. तरी पणतीचे महत्त्व कमी नाही झालेले, आजोबा म्हणाले. आईदेखील घासूनपुसून घरातले सगळे दिवे दिवाळीला लख्ख करते तेव्हा कविवर्य ग्रेस आठवतात, ते म्हणायचे घासून पुसून लख्ख केली जाते ती समई आणि पण लावून जळते ती पणती!

पण लावून जळते ती पणती हे शब्द ऐकल्यावर अरुण अंथरुणातून ताडकन उठला. आईने बाहेर दरवाजाजवळ लावलेल्या पणतीकडे त्याने पाहिलं. मग जाणवलं त्यालाही की हो, पणतीच्या त्या छोटय़ाशा प्रकाशातही गंमत आहे.. आजोबा म्हणाले, आसमंत काळोखलेला म्हणून ती तिचा धर्म सोडत नाही. तिच्या परीने तिच्या पद्धतीने ती प्रकाश देतच राहते अखेपर्यंत.. म्हणजे वात संपेपर्यंत!

हाच खरा प्रकाशाचा धर्म!  ती सर्वस्व अर्पण करते आणि प्रकाश देते! तुझे तर नावच अरुण, तू असे करून कसे चालेल? बाहेर अंधार खूप आहे.. पण लावून जळणाऱ्या त्या पणतीकडून प्रकाशाची, सकारात्मक ऊर्जेची प्रेरणा घेऊ प्रकाशाचा धर्म जपायलाच हवा! प्रकाशधर्म जपणाऱ्या दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा!