स्त्री-मिती
नुकताच आशियातील सहा देशांमध्ये पुरुषांच्या बलात्कारामागच्या मानसिकतेचा शोध घेणारा एक सव्‍‌र्हे करण्यात आला. त्यासाठी दहा हजार पुरुष तसंच तीन हजार स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. काय आढळलं या सव्‍‌र्हेमधून?
दिल्लीत १६ डिसेंबर रोजी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या खटल्याविषयी निकालपत्र जाहीर करण्यात येत होते; त्याच दिवशी आशियातील सहा देशांमध्ये पुरुषांसोबत केलेल्या  एका सव्‍‌र्हेचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. बलात्कारासारखी हिंसक कृत्य करण्यामागे पुरुषांच्या कोणत्या प्रेरणा असतात याविषयी अनेक देशांत एकत्रितपणे केला गेलेला हा पहिलाच सव्‍‌र्हे आहे. आपल्या देशात महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता ह्य अहवालाची दखल घेतली जायला हवी होती – पण त्या वेळी सगळा देश दिल्लीतल्या  खटल्याबद्दल आणि त्यात जाहीर झालेल्या फाशीच्या शिक्षेविषयी उलटसुलट चर्चा करण्यात इतका मश्गूल होता की या महत्त्वाच्या सव्‍‌र्हेकडे बघायला कुणाला फुरसतच मिळाली नाही.
त्या चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली तेव्हा बलात्काराला बळी पडलेल्या त्या मुलीला खरा न्याय मिळाला, असे अनेकाना मनापासून वाटत होते. या कडक शिक्षेमुळे आता यापुढे असे गुन्हे करू पाहणाऱ्यांना चांगली जरब बसेल अशीही बऱ्याच जणांची समजूत आहे. पण माझ्यासारखे अनेक स्त्रीवादी  कार्यकत्रे मात्र फाशीच्या शिक्षेविरुद्ध मत मांडत होते. कारण गुन्हेगार व्यक्तींना फासावर लटकावले म्हणजे, ‘न्याय झाला’ अशी जी लोकप्रिय समजूत आहे तीच मुळात तपासून बघण्याची गरज आहे असे आमचे म्हणणे होते. एका शिक्षेमुळे समाजातून बलात्कार नाहीसा होणार नाही तर त्यासाठी आपल्या समाजात जे बलात्काराला पोषक वातावरण तयार झालेले आहे, ते बदलण्याची गरज आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. मात्र हा खूप वेळखाऊ आणि लांब पल्ल्याचा उपाय आहे असे अनेकांना वाटते. पण जशी आज २०१३ साली फाशीची शिक्षा झाली आहे तशी २००४ सालीदेखील धनंजय चटर्जी नावाच्या माणसाला एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि खून करण्याबद्दल फाशी झाली होती. त्यानंतर मधल्या नऊ वर्षांच्या काळात स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये कितीशी घट झाली आहे? त्याचप्रमाणे आज चार जणांना फासावर चढवल्यामुळे उद्यापासून ताबडतोब सगळ्या महिलांना सुरक्षित वाटायला लागणार नाही, त्यांच्यावर कुटुंबाच्या आत किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारे शाब्दिक, लैंगिक, शारीरिक हल्ले थांबणार नाहीत, तर त्याकरिता बलात्कारामागची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, असे आम्ही मानतो.
बलात्कार करण्यामागे पुरुषांची नेमकी काय मानसिकता असते, त्याचाच शोध या बहुराष्ट्रीय सव्‍‌र्हेच्या ताज्या अहवालातून घेतला गेला आहे. आशियातील श्रीलंका, चीन, बांगलादेश, कंबोडीया, न्यू गिनी आणि इंडोनेशिया या सहा देशांमधल्या दहा हजार पुरुषांसोबत ही पाहणी करण्यात आली होती. या देशातले बलात्कारविषयक कायदे आणि स्त्रियांविरुद्धच्या हिंसाचारासंबंधीच्या कायद्यातही बराच सारखेपणा आढळला. भारताप्रमाणेच या बहुतेक देशांमध्येही विवाहांतर्गत बलात्काराची संकल्पना अस्तित्वातच नाही. म्हणून जरी या सहा देशांत भारताचा समावेश नसला तरीही दक्षिण आशियाची एकूण सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेतली तर या पाहणीचे निष्कर्ष आपल्या देशाच्या संदर्भातही तेवढेच लागू पडतील असे मला वाटते.
२००८ मध्ये युनायटेड नेशन्सशी जोडलेल्या चार एजन्सीज एकत्र येऊन पार्टनर्स फॉर प्रिव्हेंशन या कार्यक्रमाला सुरुवात केली. जगभरातले विविध अभ्यासक तसेच अनेक संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे अनेक विभाग यांच्या सहयोगाने हे काम करण्यात आले. आशियातल्या वैविध्यपूर्ण सामाजिक पाश्र्वभूमी असलेल्या लोकांचा समावेश करता यावा अशा प्रकारे सव्‍‌र्हेचे नमुने निवडण्यात आले होते. या सव्‍‌र्हेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच देशांमध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्था आहे. स्त्रियांवर केला जाणाराहिंसाचार म्हणजे समाजातल्या  पुरुषप्रधानतेचेच दृश्य स्वरूप आहे – हे या कार्यक्रमाचे आधारभूत गृहीतक होते. जरी समाजातल्या विविध संस्थांमध्ये पुरुषांच्या हातात सत्ता एकवटलेली असली तरी सगळेच पुरुषहिंसक वागत नाहीत. त्यामुळे, जेव्हा काही पुरुषहिंसाचार करताना दिसतात तेव्हा त्यामागे कोणती कारणे असावीत आणि हाहिंसाचार रोखण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत – याचा शोध घेण्यासाठी हा सव्‍‌र्हे करण्यात आला.
पुरुषांच्याहिंसक वर्तणुकीशी कोणकोणते घटक जोडलेले असतात; तसेच पुरुष जेव्हा स्वत:चहिंसाचाराला बळी पडतात किंवा त्यांनाहिंसाचार  पाहावे लागतात तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होतो आणि त्याचाही त्यांच्याहिंसक वागणुकीशी काही परस्परसंबंध आहे का-  ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. स्त्रियांवर त्यांच्या पुरुष जोडीदाराकडून म्हणजे नवरा, प्रियकर अशा व्यक्तीकडून होणारा शारीरिक, आíथक, लैंगिक तसेच मानसिकहिंसाचार आणि अपरिचित व्यक्तींकडून करण्यात आलेला बलात्कार ह्यची कारणे समजून घेण्यावर सव्‍‌र्हेचा मुख्य भर होता. त्याचसोबत, पुरुषांनी पुरुषांवर केलेल्या लैंगिक अत्याचारांविषयीदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न या पाहणीतून करण्यात आला आहे. त्यासाठी एकूण दहा हजार पुरुष आणि तीन हजार महिलांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नावली वापरण्यात आल्या होत्या.
सव्‍‌र्हेमध्ये भाग घेणाऱ्या जवळजवळ सगळ्याच स्त्रिया आणि पुरुषांना समानतेला तात्त्विक मान्यता दिलेली दिसते आहे. पण प्रत्यक्षात त्यांचे कुटुंबातले व्यवहार, घरातले महिलांचे स्थान जेव्हा पडताळणी केली, ताडून पाहिले तेव्हा त्यात विषमता दिसून आली. सर्व देशात घरकाम आणि मुलांचे संगोपन या महिलांच्याच जबाबदाऱ्या असल्याचे दिसून आले. स्त्रीने आणि पुरुषाने कसे वागावे याविषयी स्त्रियांची मते जास्त पारंपरिक आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विरुद्ध जाणारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याबद्दलचे नियम अमलात आणण्याचे कामही महिलांकडून जास्त कडवेपणाने होत असल्याची शक्यता दिसून आली. या सर्वच देशांतील पुरुष आपल्या जोडीदार स्त्रियांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारचीहिंसक वागणूक करतात असे दिसले आहे. पुरुषांनी आपल्या वागणुकीमध्येहिंसाचाराचा वापर केला जाणे याला सांस्कृतिक पाठबळ असल्याचेही जाणवले. काही देशांत शारीरिकहिंसेचे प्रमाण जास्त होते तर काही देशात लैंगिकहिंसेचे प्रमाण जास्त होते. महिलांविरुद्ध होणाऱ्याहिंसाचाराला वेगवेगळ्या प्रमाणात सर्वच देशांत मान्यता असली तरी प्रत्येक देशात त्याचे प्रमाण निरनिराळे असल्याचे दिसते आहे. उदा. बायकोला धाकात ठेवण्यासाठी कधी कधी मारले पाहिजे असे इंडोनेशियातल्या पाच टक्के पुरुषांना वाटते, तर बांगलादेशातल्या ६५ टक्के पुरुषांची याला मान्यता आहे. सर्व देशांतील बलात्काराच्या प्रमाणातही असाच फरक दिसून आला.
हा सव्‍‌र्हे बलात्कारामागची कारणे समजून घेण्यासाठी केलेला असला तरी मुलाखतीच्या प्रश्नावलीमध्ये मात्र ‘बलात्कार’ हा शब्द वापरण्यात आला नव्हता. ‘तुम्ही तुमच्या जोडीदाराची इच्छा नसताना तिच्याकडून लैंगिक सुख मिळवले आहे का?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. काही देशांत दहा टक्के पुरुषांनी तर काही देशांत ६५ टक्केपर्यंत पुरुषांनी आयुष्यात कधी ना कधी बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. अपरिचित महिलेवर बलात्कार करण्यापेक्षा  जोडीदारावर बलात्कार करण्याचे प्रमाण बहुतेक सर्वच देशांत जास्त आहे असे दिसले. ज्या पुरुषांनी अपरिचित महिलांवर बलात्कार केला होता त्यांनी स्वत:च्या बायकोवरही बलात्कार केल्याचे सांगितलेले आहे. काही पुरुषांनी पुरुषांवरदेखील लैंगिक जबरदस्ती केल्याची कबुली दिलेली आहे. या पुरुषांपकी बहुसंख्य (७२ ते ९७ टक्के) पुरुषांना कोणतेही कायदेशीर परिणाम किंवा सजा भोगावी लागलेली नाही. कारण बहुतेक देशांमध्ये विवाहांतर्गत बलात्काराची संकल्पना कायद्यात अस्तित्वातच नाही. अपरिचित व्यक्तींवर केलेल्या बलात्कारासाठी मात्र काही प्रमाणात शिक्षा झाल्याचे आढळून आले.
या सगळ्या प्रकारच्या बलात्कारांमागे असलेल्या कारणांचा मागोवा मुलाखातीमधून घेण्यात आला तेव्हा – बहुसंख्य (७० ते ८० टक्के) पुरुषांनी सांगितले की लैंगिक संबंध करण्यासाठी जोडीदाराची सहमती असण्याची त्यांना गरजच वाटत  नाही. स्वत:ची मर्जी असेल तेव्हा लैंगिक संबंध करणे हा त्यांना स्वत:चा हक्क वाटतो. पुरुषांनी स्वत:चा कंटाळा घालवण्यासाठी किंवा राग व्यक्त करण्यासाठी किंवा शिक्षा करण्याची एक पद्धत म्हणूनही लैंगिक जबरदस्ती केल्याचे नमूद केले आहे. जोडीदारावर केलेल्या बलात्काराच्या तात्कालिक कारणांमध्ये कुटुंबात वारंवार भांडणे, एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध असणे, नराश्य, दारू किंवा इतर नशेच्या पदार्थाचा अंमल अशी कारणे दिसतात. पण व्यापक सामाजिक संदर्भात पाहायचे झाले तर – पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पना, स्त्रियांवर वर्चस्व गाजवायची वृत्ती, समाजातील पुरुषप्रधानता आणि त्यामुळे स्त्रियांपेक्षा पुरुषांकडे जास्त सामाजिक सत्ता असणे यामुळे महिलांविरुद्धचाहिंसाचार बोकाळलेला आहे. सगळ्याच आíथक आणि सामाजिक वर्गात स्त्रियांविरुद्धहिंसाचार होत असतो असे या सर्व देशांमध्ये दिसते.
तसाच पुरुषांवरही वेगवेगळ्या कारणांमुळे हिंसाचार होतो. ५० ते ७० टक्के पुरुषांना लहानपणी भावनिकहिंसा अनुभवावी लागली आहे. काहींना दारुडय़ा पालकांकडून मारहाण सहन करावी लागली आहे. काहींना लैंगिक छळाचाही सामना करावा लागला आहे. साधारणपणे, तीन ते सात टक्के पुरुषांनी आपल्यावर बलात्कार झाल्याचे नमूद केले आहे. पुरुषांना वर्ग, वर्ण, धर्म अशा अनेक कारणांमुळे समाजात वावरताना हिंसाचाराचा अनुभव येतो. हा अनुभव त्यांच्या हिंसक वागणुकीला कारण पुरवत असला तरी हे पुरुष बेधडक कुठलाच मागचापुढचा विचार न करता समोर दिसेल त्याच्याशी हिंसक वागणूक करतात असे घडत नाही – तर उलट जी व्यक्ती आपल्याला फारसा प्रतिकार करू शकणार नाही – असे त्याला वाटते आणि ज्या व्यक्तीवर सत्ता गाजवणे याला सांस्कृतिकदृष्टय़ा परवानगी असेल तसेच कायद्यानुसार शिक्षा होण्याची भीती नसेल अशाच संदर्भात हिंसक वर्तणूक दाखवायचे धाडस करतो. अनेक पुरुष हिंसक पद्धतीने वागत नाहीत असेही दिसले.
म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या हिंसाचाराला वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणे असली तरी व्यापक आणि महिलांवर सत्ता गाजवण्याला समाजाची सांस्कृतिक मुभा असलेले वातावरण तयार झालेले आहे. हे सर्व समाजातल्या एकूण स्त्री-पुरुष विषमतेशी जोडलेले आहे. अनेक बाबतीत जेव्हा पुरुषाला स्वत:ला सत्ताहीन असल्याचा अनुभव येतो तेव्हा आपली सत्ताहीनतेची भावना दूर करण्यासाठी तो कमी सामाजिक सत्ता असलेल्या स्त्रीवरहिंसा करून ताकदीचे प्रदर्शन करतो .
पाहणीतून समोर आलेले हे सगळे  निष्कर्ष समजून घेतले तर बलात्काराचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर फाशीच्या शिक्षेऐवजी व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर वर्चस्ववादी पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल, हे स्पष्ट होते!
खरं तर जगात मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे गुन्हे कमी झाल्याची कुठेही नोंद नाही. उलट, फाशी होणार असेल तर बलात्कारानंतर स्त्रियांना ठार मारले जाण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांसाठी वर्मा समितीने सुचवल्याप्रमाणे जन्मठेप असणे आणि खटले तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे.
पण सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे – स्त्रियांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर मुली-स्त्रियांना सर्व दृष्टीने सक्षम होण्यासाठी, निर्भयपणे वावरता येण्यासाठी वातावरण तयार करावे लागेल आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल.