News Flash

औषधी पदार्थ

कोणत्या आजारावर कोणता पदार्थ औषध म्हणून खावा याचं वाचिक ज्ञान सगळेच एकमेकांना देतात. मात्र, विशिष्ट पदार्थ कोणत्या आजारासाठी योग्य-अयोग्य याचा अभ्यास करणं, याविषयीची माहिती घेणं

| June 26, 2015 01:25 am

01khadiwaleकोणत्या आजारावर कोणता पदार्थ औषध म्हणून खावा याचं वाचिक ज्ञान सगळेच एकमेकांना देतात. मात्र, विशिष्ट पदार्थ कोणत्या आजारासाठी योग्य-अयोग्य याचा अभ्यास करणं, याविषयीची माहिती घेणं गरजेचं असतं.

चुरमुरे
पोटाची काहीही तक्रार नाही, पचनशक्ती चांगली आहे, त्यांचेकरिता चुरमुरे-कुरमुरे हे योग्य खाणे आहे. त्यांना भ्यावयाचे अजिबात कारण नाही. चुरमुरे ज्या पद्धतीने तयार होतात त्यामुळे फाजील पाणी व उष्णता दोन्हीचे पोटात बिघडणारे दोष एकत्रित केले जातात. पोटात चुरमुरे गेले की त्यांचा गोळा गच्च होतो. ज्यांचे पचन मंद आहे, अग्नी बिघडलेला आहे. पोटात वायू धरतो अशांना चुरमुरे मानवत नाहीत. अग्नी मंद असणाऱ्यांनी पोहे खाऊन वर पाणी व काहीही पातळ पदार्थ खाल्ला की लगेच जुलाब सुरू होतात. त्यात तिखट अधिक असेल तर चुरमुरे जास्त बाधतात. नेहमी जुलाब होणाऱ्यांनी, पोट दुखण्याची, अजीर्णाची किंवा पोटात गॅस धरण्याची सवय असणाऱ्यांनी चुरमुरे किंवा त्यापासून बनलेली भेळ, मिसळ, भडंग असे पदार्थ कटाक्षाने खाऊ नयेत.

पोहे
पोहे नेमके लाह्यंच्या उलट गुणधर्माचे आहेत. ज्यांना शारीरिक श्रम करावयाचे आहेत. खूप घाम गाळावयाचा आहे. पोटाची तक्रार नाही. पचन ठीक आहे, एवढय़ातेवढय़ाने पोटात गॅस धरत नाही, एकवेळ शौचाला साफ होतो, त्यांच्याकरिता पोहे मोठे टॉनिक आहे. पोहे शक्यतो कोरडे पण चावून चावून खावे. त्यानंतर सावकाश पाणी घ्यावे. ज्यांना पोहे खूप जड वाटतात त्यांनी ताक, लसूण, जिरे, आले अशा पदार्थाबरोबर पोहे खावे. पोटभर भात खाऊन गॅस निर्माण होत असेल तर त्याऐवजी थोडेच पोहे खावे. भरपूर एनर्जी मिळते. पोह्यंमध्ये तांदळाच्या साळीतील रोगप्रतिकार तेल काही प्रमाणात शिल्लक असते. त्यामुळे डोळे, त्वचा, केस, हाडे यांच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांनी हातसडीचा तांदूळ न मिळाल्यास पोहे जरूर खावे.

लाह्य
यो लाजैर्यजति स यशोवान भवति।
श्रीगणपती अथर्वशीर्षांच्या फलश्रुतीत लाह्यंचे महत्त्व वेगळय़ा कारणाकरिता सांगितले आहे.
भाताची साळ, ज्वारी, राजगिरा अशी धान्ये भाजून त्यांच्या लाह्य तयार केल्या जातात. लाह्य भाजल्यामुळे शरीरास आवश्यक तेवढाच पिष्टमय, पचावयास हलका, अति हलका असा भाग त्यात राहतो. हा भाग पित्त कमी करतो. कफ वाढवू देत नाही. ज्याप्रमाणे टीपकागद किंवा खडूचा तुकडा शाई टिपून घेतो, त्याप्रमाणे आमाशयात गेलेल्या लाह्य वरवर येणारे, डचमळणारे पित्त टिपून घेतात. त्यामुळे आम्लपित्त, उलटी, अॅसिडिटी या विकारांत लाह्य हे नुसतेच अन्न नाही तर औषधाचेही काम करते. कावीळ, जलोदर, यकृतोदर, प्लीहावृद्धी या विकारात लाह्य हे नुसतेच अन्न नाही तर औषधाचेही काम करते. कावीळ, जलोदर, यकृतोदर, प्लीहावृद्धी या विकारात तेल तूप वज्र्य असते. विश्रांतीची गरज असते. पोटाला फार बोजा देऊन चालत नाहीत. अशा अवस्थेत साळीच्या लाह्य भरपूर खाव्या. त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढत नाही. पोट भरते, यकृतावर ताण पडत नाही. किडनी किंवा वृक्काचा कॅन्सर, लघवी कमी होणे, डायलेसिस वारंवार करावयास लागणे या विकारात साळीच्या लाह्यंचा आहार व या लाह्य उकळून तयार केलेले पाणी हा अत्यंत निदरेष आहार होय. मात्र लाह्य या नेहमी ताज्या हव्या. उघडय़ावर असलेल्या, धूळ बसलेल्या लाह्य खाऊ नयेत.
या निदरेष आहारामुळे वृक्काचे कार्य सुधारते, लघवीचे प्रमाण वाढते. डायलेसिस करावयाचा जो काळ आहे तो लांबतो. रक्ताच्या बाटल्या पुन: पुन्हा द्याव्या लागतात, त्यांचा काळ लांबवता येतो.
रसक्षय, डिहायट्रेशन किंवा जुलाब-उलटय़ांमुळे जेव्हा पोटात काही ठरत नाही त्यावेळेस साळीच्या लाह्य कोरडय़ा खाव्या. वर काही काळ काहीही पातळ पदार्थ घेऊ नये. गर्भिणीच्या उलटय़ांमध्ये कोरडय़ा लाह्य खाव्या. कृश व्यक्तीकरिता लाह्यचे पिठाचे लाडू हे परम पौष्टिक टॉनिक आहे. अतिशय माफक प्रमाणात पिठीसाखर व साळीच्या लाह्य दळून केलेले पीठ अशा मिश्रणाचे लाडू मधुमेह नसलेल्या माणसाने जरूर खावे. अॅलर्जी, आग होणे, कफविकार, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, वायगोळा, जखमा, जळवात, नवीन ताप, तोंड येणे, भगंदर, हृद्रोग या विकारात साळीच्या लाह्य पथ्यकर आहार आहे. मात्र मधुमेही व्यक्तींच्या भाताच्या/ साळीच्या लाह्यऐवजी ज्वारी किंवा राजगिरा लाह्य खाव्या.

बाहेरचे खाणे
हा लेख ज्या वर्गाकरिता आहे, त्यातील बरेचसे वाचक हे वैद्य लोकांचे औषध पथ्यापथ्य ऐकत आले आहेत. ज्यांचा रोजचा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा बेकरीशी संबंध येतो, किमान एक जेवण किंवा एखादे खाणे बाहेर असते त्यांना शेव, भजी, चिवडा, गाठी, डाळ, ढोकळा, खारी बुंदी, इडली, डोसा, वडे, पावभाजी किंवा पाव, केक, बटर, खारी बिस्किटे किंवा पेढे, बर्फी, मलई, जिलेबी, लाडू बालूशाही, श्रीखंड, लस्सी इत्यादी पदार्थ खावे लागतात.
ज्यांचा अग्नी चांगला आहे. सकाळचा शौचाचा कॉल एकदम क्लिअर असतो. पोटात कधी गॅस धरत नाही, पोटात अन्न कुजत नाही त्यांना वरील पदार्थाचा सहसा त्रास होत नाही. पण मुंबईसारख्या ठिकाणी बहुतेक नोकरदार लोकांना व्यायामाची आवड नाही, ओळख नाही किंवा वेळ नाही अशी अवस्था असते. त्यात भरीस भर म्हणजे भूक नसताना जेवण व भूक असताना नुसते चहापाणी असे जीवन शहरी नोकरदार व धंदेवाल्यांचे झाले आहे.

प्रश्न असा पडतो की यातील कोणते पदार्थ कोणी खावे, न खावे, काय टाळता येईल, केव्हा खाता येईल, नेहमीच पथ्य पाळावे लागेल का याची उत्तरे आपण शोधत आहोत. ज्यांना वजन वाढवायचे आहे, वजन घटू द्यायचे नाही, भूक मारता येत नाहीत व फरसाण, बेकरी पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्याशिवाय चालत नाही त्यांनी हे पदार्थ जरूर खावे, पण वात, पित्त व कफ या तक्रारीप्रमाणे त्यावरील उतारा अनुक्रमे लसूण, ओवा, लिंबू किंवा ताक, धने, जिरे किंवा तुळस, आले, आवळा यांचा तारतम्याने वापर करावा. ‘अन्न वृत्तिकराणां श्रेष्ठम!’ अन्न खाल्ले नाही तर जीवनाचा गाडा चालवता यायचा नाही.

फरसाण
फरसाणातील बहुतांश पदार्थात मिठाचा व तिखटाचा भरपूर वापर असतो. शिवाय ज्या तेलात हे पदार्थ तयार केले जातात त्या तेलाच्या दर्जाची खात्री देता येत नाही. याकरिता पुढील विकारात फरसाण जरूर वज्र्य करावे. अग्निमांद्य, अजीर्ण, अर्धागवायू, आम्लपित्त, अॅलर्जी, आग होणे, आमांश, आव, अंग बाहेर येणे, उदर, उलटय़ा, उदरवात, कंडू, कफ विकार, कंबर व गुडघेदुखी, कावीळ, केस गळणे, पिकणे, कोड, खोकला गरमी परमा, गोवर, कांजिण्या, वायगोळा, गांधी उठणे, घाम खूप येणे, जखमा, जळवात, जुलाब, जंत, टॉन्सिल्स, डोळय़ांचे विकार, ताप, तोंड येणे, त्वचा विकार, दमा विकार, नागीण, पोटदुखी, पित्तविकार, रक्तदाबवृद्धी, भगंदर, मधुमेह, मलावरोध, महारोग, मुखरोग, मूळव्याध, रक्ताचे विकार, वातविकार, सायटिका, संधिवात, सारायसिस, सूज हृद्रोग व हाडांचे विकार इत्यादी.

बेकरी पदार्थ
बेकरी पदार्थ अग्निमांद्य, अजीर्ण, आम्लपित्त, अॅलर्जी, आग होणे, आव, उदर, कावीळ, खोकला, वायगोळा, पोटात वायू धरणे, जखमा, जुलाब, जंत, टॉन्सिल्स, त्वचा विकार, पोटदुखी, पित्त विकार, बालरोग, मधुमेह, मलावरोध, मुखरोग, मूळव्याध, लठ्ठपणा, वातविकार, अल्पार्तव, कष्टार्तव, सूज, हृद्रोग इत्यादी विकारात कुपथ्यकारक आहेत. ज्यांना घरचे अन्न मिळत नाही, नाइलाजाने बेकरी पदार्थ खावे लागतात, त्यांनी पाव भाजून टोस्ट करून खावा. ‘घरी केलेला’ पाव फार त्रास देत नाही.

ज्यूस
फ्रुट ज्यूस, भाज्यांचे रस हे सदासर्वदा आरोग्य बिघडवणारे आहेत. कारण ज्यूस काढल्याबरोबर त्याच्या पृष्ठभागाचा हवेशी संपर्क होऊन जंत कृमी यांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता तरुणांनी ज्यूस वज्र्य करावे. क्वचित म्हातारे लोकांकरिता ज्यूस वापरावे. ज्यांना दात चांगले आहेत, त्यांनी दातांना काम मिळावे म्हणून फळे व भाज्या चावून खाव्यात.

मिठाई
मेवामिठाई, लग्नमुंजीची जेवणे, पाटर्य़ा, हॉटेलमधील कृत्रिम साखरेचे पदार्थ पुढील विकारात रुग्णांनी खाऊ नये. अग्निमांद्य, अजीर्ण, अर्धागवायू, आमवात, आव, उदर, उलटय़ा, कंडू, वायुगोळा, रक्तदाब किंवा रक्तातील साखर वाढून चक्कर येणे, त्वचाविकार, दातांचे विकार, पोटदुखी, पोटात वायू धरणे, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, मुखरोग, मूळव्याध, लठ्ठपणा, सूज, हृद्रोग इत्यादी. डालडा किंवा अशा कृत्रिम तुपात बनविलेली मिठाई कदापि खाऊ नये.

कोल्ड्रिंक्स
कोल्ड्रिंक्स, लस्सी, बर्फ, फ्रीजचे पाणी, आईस्क्रीम, फ्रुट सॅलड इत्यादी पदार्थ अग्निमांद्य, अजीर्ण, उलटय़ा, कफ विकार, कंडू, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, कानाचे विकार, कावीळ, केसांचे विकार, कॅन्सर, खोकला, गोळा उठणे, छातीत दुखणे, जुलाब, जंत, टॉन्सिल्स वाढणे, डोळय़ाचे विकारात ताप, तोंड येणे, त्वचा विकार, दमा, दाताचे विकार, पांडू, पोटदुखी, फुफ्फुस विकार, बालरोग, ब्लडप्रेशर वाढणे, भगंदर, मधुमेह, मूळव्याध, लठ्ठपणा, पोटात वायू धरणे, वातविकार, शय्यामूत्र, सर्दी, सायटिक, संधिवात, सोरायसिस, सूज, हाडांचे विकार, हृद्रोग व क्षय या विकारात कृपथ्यकारक, शरीराला अपाय करणारे आहेत.

तांदूळ पेज
अनेक विकारात विशेषत: दीर्घ मुदतीचा ताप, कावीळ, जलोदर, मलेरिया, रक्ती मूळव्याध, मोठे शस्त्रकर्म यानंतर काय खावे असा प्रश्न पडतो. अशा वेळेस क्रमाक्रमाने अग्नी संधुक्षण व्हावयास हवे असते. त्यामुळे हळूहळू शरीराचे गाडे ठिकाणावर येते. त्याकरिता कितीही अशक्तपणा आला असला तरी प्रथम सात दिवस तांदुळाची पातळ पेज खावी. चवीला जिरे, धने, आले, लसूण, ओवा, मीठ, कणभर गूळ असे पदार्थ वापरावे. पेज भरपूर खाता येते, गॅसेस होत नाहीत. रक्त वाढते, मांस सावकाश बनते. लघवी साफ होते. रात्री उत्तम झोप लागते. जेवण नकोसे वाटत नाही. आयुर्वेदाच्या रसशास्त्र या औषधी निर्माणात विविध धातूंची भस्मप्रक्रिया करण्याअगोदर, त्या त्या धातूंची सामान्य शुद्धीकरिता पेजेसारखी तांदुळाची कांजी वापरतात. त्यात फक्त तांदूळ हे एकमेव घटकद्रव्य असते.

तांदुळाची धिरडी
लहान बालकांना घरचे अन्न रोजच वेगवेगळे काय द्यावे हा प्रश्न पडतो. याकरिता तांदुळाची ताजी धिरडी हा उत्तम तोडगा आहे. घरी तांदूळ धुवावे. पंचावर वाळवावे. नंतर जात्यावर किंवा मिक्सरमध्ये दळून घ्यावे. निर्लेप तव्यावर साधी धिरडी, गूळ व काकडी, कोथिंबीर, आले, मिरची अशी विविध प्रकारची धिरडी करावी. आपल्या बालबच्च्यांना ताजी द्यावी. पोट भरते, समाधान वाटते. पाव-बिस्किटांपेक्षा अधिक गुणवत्ता धिरडय़ात आहे.

तांदूळ भाकरी
जुलाब, हगवण या विकारांत भल्याभल्यांची मती गुंग होते. त्याकरिता प्रथम एक दिवस पूर्ण लंघन करावे किंवा फक्त ताकावर राहावे. चांगला क्षुद्बोध झाला की तांदूळ भाजून पातळ भात किंवा तांदुळाच्या पिठाची भाकरी खावी. तांदुळाच्या पिठाची भाकरी आमांश, मूळव्याध, स्थौल्य, रक्तदाबवृद्धी, भगंदर, कावीळ, जलोदर, आम्लपित्त, अल्सर, पोटदुखी या विकारांत अमृतासमान आहे. तांदुळाची भाकरी नेहमी ताजीच पाहिजे. या भाकरीसोबत चवीकरिता धने, जिरे व आले असे तुकडे मिसळावे. भाकरी ज्या मानाने खाऊ त्या मानाने शरीरात पक्काशयात निदरेष मळ तयार होतो. या भाकरीबरोबर ताजे ताक, ताकाची आले, लसूण घातलेली कढी पाहिजे. ग्रहणीसारख्या विकारावर यासारखे अन्न नाही.

ज्वारीची उकड
मधुमेह, लठ्ठपणा, मूळव्यादा, भगंदर, सूज, रक्तदाबवृद्धी अशा विकारांत वैद्य मंडळी ज्वारीचा आग्रह धरतात. गहू, भात, बटाटा, रताळे, साबुदाणा, वाटाणा, हरभरा, मांसाहार, मिठाई, बेकार पदार्थ, पोहे, चुरमुरे इत्यादी पदार्थ वज्र्य-कुपथ्य म्हणून सांगतात. पण रुग्णांनी खावे काय असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ज्वारीच्या उकडीत आहे.
पाणी उकळू द्यावे. त्यात थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे. ते पीठ चांगले शिजू द्यावे. मग त्यात थोडे ताजे ताक, आले व कढीलिंब पाने टाकावी. ही उकड थोडी शिजू द्यावी. नाष्टा, ब्रेकफास्ट याकरिता हा उत्तम पदार्थ आहे. रोज खाऊन कंटाळा येत नाही. रक्तशर्करा किंवा वजन वाढत नाही. पोटाला बोजा पडत नाही.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 1:25 am

Web Title: medicine
Next Stories
1 सुकामेव्याचे महत्त्व
2 मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म
3 चटणी-कोशिंबीर
Just Now!
X