कालिदासाचा यक्ष आता अलकानगरीत पोहोचला आहे. प्रवासादरम्यान कुठे कुठे, काय बघ हे त्याला सांगणारा कालिदास आता त्याला अलकानगरीतल्या स्त्रिया कशा सुंदर आणि चतुर आहेत, तिथले प्रासाद कसे देखणे आहेत याबद्दल सांगतो आहे..

मेघ अलकेच्या दारात उभा ठाकला आहे. ज्येष्ठ व्यक्तीच स्वागत दीपारती घेतलेल्या स्त्रिया करतात ही आपली परंपरा. अलकेत आलेल्या मेघाचं स्वागत करणार आहेत, त्या नगरीतील दिव्यांप्रमाणे तेजस्वी प्रासाद.
मेघाचा अभिमान इथे गळून जाणार आहे, कारण ज्या विशेष गुणांनी तो युक्त आहे ते सारे गुण इथे अलकेतील प्रासादांमध्ये आहेत. कालिदासाने हा श्लोक असा रचला आहे की ते वर्णन एकाच वेळी अलकेतील प्रासाद व मेघालाही लागू होईल.
विद्युत्वन्तं ललितवनिता: सेन्द्रचापं सचित्रा:
संगीताय प्रहतमुरजा स्निग्धगम्भीरघोषम्।
अन्तस्तोयं मणिमयभुवस्तुङगमभ्रंलिहाग्रा:
प्रासादास्त्वां तुलयितुमलं यत्र तस्तर्वशिेष:॥
‘‘बा मेघा, तुझ्याकडे विद्युत आहे तर अलकेतील प्रासादांत तेजस्वी सौंदर्य धारण करणाऱ्या स्त्रिया आहेत. तुझ्या रंगीत इंद्रचापाचा किंवा इंद्रधनुष्याचा तुला अभिमान वाटत असेल तर येथील प्रासादांतील सुंदर रंगीत चित्रे इंद्रधनुष्याशी तुलना करण्यास योग्य आहेत. तू घनगंभीर ध्वनी करत असशील तर संगीताच्या निमित्ताने प्रासादांतून घनगंभीर असा मृदुंगध्वनी होत राहतो. तुझ्यात रंगहीन जलराशी आहे तर अलकेतील गच्चा रत्नमय असल्याने जणू रंगहीन तरीही तेजस्वी आहेत. तू जर फार उंचावरून फिरत असल्याचा अभिमान बाळगत असशील तर अलकेतील प्रासाद इतके भव्य आहेत की ते थेट आकाशाला जाऊन भिडतात.’’
कालिदास हा उपमा अलंकारासाठी विख्यात आहे. येथे आलेल्या उपमा दोन्हीकडे इतक्या नेमकेपणाने लागू होतात की येथे पूर्णोपमा अलंकार आहे. श्लोकात संगीतासाठी अलकेतील स्त्रिया मृदुंगध्वनी करतात असं जेव्हा कालिदास सांगतो तेव्हा त्याला विशिष्ट अर्थ आहे. संगीतरत्नाकरात संगीत शब्दाची व्याख्या ‘नृत्यं वाद्यं तथा गीतं त्रयं संगीतमुच्यते’। अशी केली आहे. त्यामुळे अलकेतील सुंदरी संगीताच्या वेळी वाद्यवादन करणारच.
अलका व मेघातील साम्य दाखवल्यावर अलकेतील स्त्रियांच्या साज-शृंगाराचं वर्णन येतं. त्यांनी हातात कमलं धारण केली आहेत, केसात कुंदफुलं माळली आहेत, लोध्रफुलांपासून बनवलेली पावडर लावलेली त्यांची मुखं शोभून दिसत आहेत, केसात नवकुरबकांची पुष्पं माळली आहेत. कालिदास येथे अनुविद्ध असा शब्द वापरतो. अनुविद्ध म्हणजे केवळ माळणं नाही तर वेणीत ती टोचून घालणं, बसवणं आहे. कानात शिरीषफुलं आणि केसांतील भागांत नीपफुलं असा सारा नसíगक शृंगार आहे. ही सारी फुलं वेगवेगळ्या ऋतूंत येतात. कमल ही शरद ऋतूची संपत्ती, कुंद हेमंताची, लोध्र शिशिराची, कुरबक वसंताची, शिरीष ग्रीष्माची तर नीप ही वर्षां ऋतूची संपत्ती आहे. एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगण्यापेक्षा त्याचे सूचन हे जास्त समर्पक व सुंदर असते. नीपपुष्प वर्षां ऋतूत उमलतात हे सांगण्यासाठी कालिदास ‘त्वदुपगमज’ तुझ्या येण्याने उमलणारी नीपपुष्प असा शब्दप्रयोग करतो. इथे सारे ऋतू सदैव निवास करत असतात, असं सांगण्यापेक्षा या साऱ्या फुलांचा एकाच वेळी उल्लेख करून कालिदास ऋतूंचा संनिकर्ष स्पष्ट करतो.
आपण जिथे वास केला आणि जिथला निवास आनंददायी असतो त्याचं वर्णन किती करू आणि किती नको असं आपल्याला होऊन जातं. यक्षाचीही तीच अवस्था आहे. स्मृतीतील अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी तो आपल्या डोळ्यांसमोर आणून त्यांचं वर्णन करतो. जी अलका यक्षासाठी स्मृतिरूप आहे ती अलका यक्ष मेघासाठी दृश्यरूप करतो. इथल्या स्थावर-जंगम प्रत्येक गोष्टीचं वर्णन करताना तो अगदी रंगून जातो. यक्षाच्या डोळ्यांसमोर त्याची अलका म्हणजे वैभव आणि सारे सुखोपभोग! कारण त्याच्या मते ‘वित्तेशानां न च खलु वयो यौवनादन्यदस्ति’, वैभवसंपन्नासाठी वयोमर्यादा नसते, ते नेहमीच तरुण असतात.
अलकेतील स्त्रियांच्या साजशृंगाराचं वर्णन केल्यावर इथले प्रासाद, पुष्करिणी, इथले लोक असं सगळ्याचं वर्णन यक्ष करताना दिसत आहे,
‘अलकेतील वृक्ष नित्य पुष्पयुक्त असल्याने भ्रमरांचा गुंजारव त्यांच्याभोवती ऐकू येत आहे. कमलवेली नित्य कमलांनी व हंसश्रेणींनी युक्त आहेत. इतर ठिकाणी केवळ वर्षांकाळी पिसारा फुलवून नाचणारे मेघ अलकेत मात्र सदैव आपला पिसारा फुलवून नृत्य करताना दिसतात, नित्य चंद्रप्रकाशित असल्याने येथील रात्री अंधकार रहित आहेत.
येथे डोळ्यांत पाणी उभे राहते ते केवळ आनंदाने, मदनबाणांचा दाह सोडला तर इथे दुसरा कोणताही ताप नाही, इथे लोकांच्या वाटय़ाला वियोग असेलच तर तो केवळ प्रणय कलहातला इतर कोणताच नाही.’
यक्षनगरी वैभवसंपन्न आहे, असं मी उगीच म्हणत नाही. हे बघ तिचं वैभव, ‘रात्रीच्या चांदण्यांत आपल्या प्रियतमांना घेऊन कल्पवृक्षांपासून तयार केलेल्या रतिफल नावाच्या मद्याचा आस्वाद घेण्यासाठी यक्ष ज्या गच्च्यांवर जातात त्या गच्च्यांची भूमी पांढऱ्या रत्नांनी घडवलेली आहे. त्यामुळे आकाशातील नक्षत्रांची प्रतििबब जेव्हा त्यांत पडतात तेव्हा त्या भूमीवर पुष्परचना केल्याचा भास होतो.
येथील कन्या मंदाकिनीच्या तटावरील रत्नमिश्रित सुवर्णसिकता आपल्या मुठींत धरून त्यातील रत्न शोधण्याचा खेळ खेळत असतात. अशा वेळी त्यांचा थकवा दूर करायला नदीवरील मंद वाऱ्याच्या झुळुका व तटावरील कदंब वृक्षांच्या सावल्या पुढे सरसावतात.
मेघा, ज्या स्त्रियांची अभिलाषा देवांनाही आहे अशा स्त्रियांबरोबर आपल्या शयनगृहात यक्ष असताना तिथलं वैभव कसं आहे माहीत आहे? सामान्यांच्या शयनगृहात तलपूर्ण सुतरप्रदीप असतात. पण या यक्षांच्या शयनगृहात रत्नप्रदीप आहेत. या सुरतक्रीडेतील प्रदीपांमुळे शृंगारक्रीडेला अजून न सरावलेल्या या स्त्रियांची कशी गडबड होते ते ऐक आता. यक्षांच्या पक्विबबाप्रमाणे अधरोष्ठ असलेल्या स्त्रिया प्रियकरांकडून त्यांच्या वस्त्रांच्या गाठी वेगाने सोडल्या जाताना लज्जेने रत्नप्रदीपांवर केशरचूर्णाच्या मुठी तो दीप विझवायला टाकतात. अर्थात त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग या स्त्रियांची काय कुचंबणा होते हे काही तुला वेगळं सांगायला नको.
अप्सरांसह संपन्नशाली प्रासादांतून हे यक्ष वैभ्राज या उपवनात धनपती कुबेराची किन्नरांकडून अखंड गायली जाणारी स्तुती ऐकण्यात मग्न असतात.
मी यक्षांच्या शयनगृहांचं वर्णन केलं म्हणून ते सारं पाहण्यासाठी तू शयनगृहांमधून जाशील तर तुला काळजी घ्यायला हवी, कारण तुझ्याप्रमाणे इतरही काही मेघ तिथे गेले होते पण त्यांची कशी वाताहत झाली ते तुला सांगतो. तू श्रेष्ठ असलास तरी तुमच्यावर सत्ता आहे ती सदागताची म्हणजे वायूची. तुमच्या नकळत तो तुम्हाला सप्तमजली प्रासादांच्या सौधांवर कधी नेईल ते कळणार नाही. अशा वेळी जलमुच अशा तुमच्यातील जल पडून तेथील चित्रं खराब होतील या भीतीने जाळीदार गवाक्षांतून घाईघाईत बाहेर पडण्याची धडपड करताना अनेकदा ते विदीर्ण होऊन खाली पडतात. तुझी ती अवस्था होऊ नये म्हणून मी हे तुला सांगितलं.
स्वर्गात इच्छापूर्तीसाठी कल्पवृक्ष उभा असल्याने कसलीच उणीव नसते. अलकेतसुद्धा स्त्रियांच्या साजशृंगारासाठी कल्पवृक्ष तत्पर आहे,
वासश्चित्रं मधु नयनयोर्वभ्रिमादेशदक्षं
पुष्पोद्भेदं सह किसलयर्भूषणानां विकल्पम्।
लाक्षारागं चरणकमलन्यासयोग्यं च यस्या
मेक: सूते सकलमबलामण्डनं कल्पवृक्ष:॥
स्त्रियांच्या प्रसाधनासाठी लागणाऱ्या चार मुख्य गोष्टींचा उल्लेख कवी करतो – वास म्हणजे उत्तम वस्त्र, मधू म्हणजे मद्य, कचधार्य म्हणजे केसांचे प्रसाधन आणि विलेपन म्हणजे काही लेप व उटय़ा. आणि या साऱ्या गोष्टी द्यायला एकटा कल्पवृक्ष समर्थ आहे. तो वासश्चित्रम् म्हणजे उत्तम वस्त्र देतो. तरुण स्त्रियांचे नेत्र चंचल असतात अशी कविकल्पना आहे. कल्पवृक्षापासून तयार झालेला मधू हा ‘मधू नयनविभ्रमादेशदक्षं’ म्हणजे स्त्रियांच्या नेत्रांना आवश्यक ते चांचल्य देणारा आहे. केसात माळण्यासाठी कोवळ्या पालवीसह फुलं आणि पायांना लावण्यासाठी लाक्षाराग.
पूर्वी केसात केवळ फुलं नाही तर पानंही माळण्याची पद्धत होती, त्यामुळे कालिदासाने मुद्दाम किसलय म्हणजे कोवळ्या पानांचा उल्लेख केला आहे.
आतापर्यंतच्या वर्णनावरून अलकेतील स्त्री-पुरुष केवळ शृंगाराचाच अनुभव घेतात, इतर कोणतेही कार्य करत नाहीत, असा विचार वाचकांच्या मनात येईल अशी भीती कालिदासाला वाटली असावी. जीवनात सगळेच रस महत्त्वाचे. त्यामुळे यक्षांच्या शृंगारासाठी आवश्यक त्या उद्दीपनाचं आणि प्रत्यक्ष शृंगाराचं वर्णन केल्यावर येतो तो वीररस.
रावणाने कुबेराचे पुष्पक विमान पळवून नेण्यासाठी अलकेवर हल्ला केला, अशी पुराणकथा आहे. त्या वेळी रावणाशी झालेल्या लढाईत यक्षांच्या अंगावर उठलेल्या रावणाच्या चंद्रहास या खड्गाच्या खुणा पराक्रमाच्या खुणा म्हणून ते मोठय़ा अभिमानाने मिरवत आहेत. हे सारे वर्णन वीररसमय आहे, प्रत्यक्ष सूर्याच्या अश्वांशी स्पर्धा करणारे काळसर हिरव्या रंगांचे अश्व येथे आहेत. तू जलवर्षांव करतोस तसेच मदवर्षांव करणारे पर्वतप्राय हत्ती अलकेत उभे असतात. आणि यांचा उपयोग करणाऱ्या इथल्या युद्धातील अग्रणी अशा वीरांनी आपल्या अंगावरील आभूषणांचा त्याग करून रावणाशी झालेल्या युद्धातील जखमा आपल्या देहावर एखाद्या आभूषणाप्रमाणे धारण केल्या आहेत.
कालिदासाची तीनही नाटकं, कुमारसंभवातील पहिले आठ सर्ग आणि मेघदूत या साऱ्या काव्यात शृंगार हा प्रधान रस आहे. शृंगार हा संभोग किंवा विप्रलंभ असा दोन प्रकारचा आहे. मेघदूतात विप्रलंभ असला तरी शृंगार हाच रस आहे. मात्र केवळ शृंगार म्हणजेच आयुष्य नाही याचं भान कालिदासाला आहे. त्यामुळे त्याने आपल्या साहित्यात इतर रसांचाही योग्य तो मान ठेवला आहे. तो सारे रस इतक्या सहजपणे वापरतो की सोढ्ढल नावाचा कवी त्याला रसेश्वराची उपमा देतो. पार्वती किंवा कुमार काíतकेयाच्या वर्णनात कालिदास सहजपणे भक्तिरसाचा शिडकावा करतो तर वरील श्लोकात कालिदासाने शृंगाराला वीररसाची जोड दिली आहे.
फार दुरून दिसणारी अलका, मग जवळ असलेल्या प्रमदवनातून दिसणारी अलका, नंतर नगरीत प्रवेश, आता नगराधिपतीचा प्रासाद आणि मग यक्षाचा स्वत:चा निवास असा मेघाचा प्रवास चालला आहे.
यक्षाधिपती कुबेर हा शंकराचा स्नेही. शिवाय शंकराचा वास नेहमी कैलासावर त्यामुळे यक्ष सांगतो, मदन भ्रमरांची प्रत्यंचा असलेले आपले धनुष्य शिवाच्या भयाने येथे आणत नसला तरी त्याचे कार्य शृंगाररसात प्रवीण अशा स्त्रियांच्या नेत्रकटाक्षाने होताना जिथे दिसते अशा त्या कुबेराचा प्रासाद आता तुला दिसेल. त्याच्याबरोबर उत्तरेला कुणाच्याही सहज लक्षात येईल असे माझे निवासस्थान आहे. दुरूनसुद्धा माझे गृह लक्षात येण्याचे कारण म्हणजे माझ्या घराबाहेरील एखाद्या इंद्रधनुष्यासारखे असणारे तोरण. या तोरणाच्या जवळ माझ्या कान्तेने पुत्राप्रमाणे वाढवलेला आणि पुष्पांच्या भाराने वाकलेला मंदारवृक्ष आहे.
कालिदासाच्या साहित्यातून स्थापत्यातील अनेक गोष्टी त्यातल्या बारकाव्यांसकट पुढे येतात. प्राचीन भारतीय स्थापत्यात तोरण ही एक वैशिष्टय़पूर्ण रचना आहे. पुष्पतोरण, चित्रतोरण, रत्नतोरण असे तोरणांचे विविध प्रकार सांगितले आहेत. विविध रंगांनी युक्त अशा यातील एखाद्या तोरणाने यक्षाचा प्रासाद सजला आहे.
येथे कालिदासाच्या नायिकांचा एक महत्त्वाचा गुण पुढे येतो. शकुंतला, पार्वती किंवा यक्षपत्नी या सगळ्याच स्त्रिया वृक्षवेलींवर अपत्यवत स्नेह करतात. शकुंतला वृक्षांना पाणी घातल्याशिवाय मुखात पाणी घालत नाही. तिला यौवनसुलभ नटण्या-थटण्याची आवड आहे. पण पुष्प ही वनस्पतींची अपत्य आहेत आणि त्यांना तोडणं म्हणजे माता व अपत्याची ताटातूट करणं या विचाराने ती फुलं माळत नाही. पार्वती आणि यक्षपत्नींनी आपापल्या घरांसमोर अपत्यवत वाढवलेले वृक्ष आहेत. पार्वतीच्या बाबतीत तर काíतकेयाच्या जन्मानेसुद्धा पार्वतीचा या पहिल्या पुत्रावरील स्नेह जरासुद्धा कमी झालेला नाही.
यक्षाच्या डोळ्यांसमोर त्याच्या प्रासादाचा कोपरान्कोपरा उभा आहे. तेथील अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी, आपल्या नसण्याने आलेलं औदासीन्य सारं सारं तो वर्णन करतो,
‘प्रासादाबाहेर असलेल्या छोटय़ा तळ्यात वैदुर्य मण्यांनीयुक्त सुवर्णकमलं उमलली आहेत. आत उतरण्याचा मार्ग पाचूंनी मढवला आहे. आणि या वापीतील पाणी मानससरोवरासारखं स्वच्छ असल्याने मानस जवळ असूनही हंस तिकडे जायची इच्छा करत नाहीत. या तळ्याच्या काठी सुवर्णकदलींनी वेढलेला इंद्रनीलमण्यांनी युक्त असा क्रीडाशैल आहे. या क्रीडाशैलावर माधवीलतेच्या मंडपाजवळ रक्ताशोक आणि केसरवृक्ष आहेत. त्या दोन वृक्षांमध्ये रत्नजडित सोन्याचा स्तंभ आहे. या स्तंभावर सायंकाळी तुझा सखा मयूर माझ्या पत्नीच्या टाळ्यांच्या तालावर नृत्य करत असतो. मी सांगितलेल्या या साऱ्या खुणा तुझ्या मनात साठव.
यानंतर ज्या घराच्या दारावर तुला शंख आणि पद्म अशी शुभ चिन्ह अंकित केलेली दिसतील. ते माझं घर आहे. सारं वैभव आणि शुभचिन्ह असूनही माझ्या नसण्याने तिथे तुला उदासवाणी छाया दिसेल.
हे घर दिसल्यावर त्याच्यासमोर असलेल्या क्रीडाशैलावर तुझा आकार लहान करून तू बस आणि मग तुझ्या विद्युतरूपी नेत्रांनी माझ्या घराच्या आत नजर टाकशील तेव्हा तुला स्त्री सौंदर्याची सगळी परिमाणं ल्यालेली माझी पत्नी दिसेल.’
संस्कृत काव्यात चक्रवाक पक्षी विरहाचं प्रतीक म्हणून येतात. त्यांच्या वाटय़ाला हा विरह रामाच्या शापामुळे आला आहे. सीतेच्या विरहात अश्रू ढाळणाऱ्या रामाला पाहून हसल्यामुळे रामाने त्यांना विरहाचा शाप दिला अशी कल्पना आहे. या शापामुळे दिवसा ते जोडीने फिरतात पण रात्री त्यांचा विरह होतो. दोघं नदी किंवा तळ्याच्या दोन तीरांवर राहतात व सारी रात्र एकमेकांना हाका मारतात. त्यांचे कधीच मीलन होत नाही. पण हे प्रेम केवळ शारीर पातळीवर नसतं. त्यामुळे शरीराने मीलन झाले नाही तरी एकमेकांवर प्रेम करणारी अतिशय प्रामाणिक अशी ही चक्रवाक जोडी आहे. याच कारणाने विरहातसुद्धा वैवाहिक जीवनातील स्थर्याचं प्रतीक म्हणून ती पुजली जाते. आणि याच प्रतीकांचा उपयोग करून यक्ष आपल्या पत्नीला चक्रवाकीची उपमा देतो, अल्प बोलणारी, सुंदर आणि माझ्यापासून दूर असणारी एखादी चक्रवाकीच जणू अशी माझी पत्नी ही माझा दुसरा प्राण आहे. या विरहामुळे मला निश्चितपणे माहीत आहे की अतिशैत्याने गारठून गेलेल्या कमलिनीप्रमाणे बारीक होऊन गेली असेल. हातावर मुख ठेवलेली, अतिदु:खाने नेत्र सुजलेली, उष्ण नि:श्वासांच्या अतिरेकाने पांढरट पडलेले ओठ आणि सल सुटलेल्या केसांतून अर्धवट मुखचंद्र दिसणारी माझी पत्नी कृष्णमेघाच्या अडसरातून दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे तुला दिसेल.
यक्षाच्या डोळ्यांसमोर त्याच्या विरहात अत्यंत कठीण काळ कंठणारी त्याची पत्नी आहे. पती दूर असल्याने साज-शृंगाराचं भान नसलेली, त्याच्या विचारात बुडालेली, मलिन वस्त्र धारण केलेली, केशरचना विस्कटलेली अशी प्रोषितभर्तृका नायिका! तिचं शब्दचित्र उभं करताना तो म्हणतो,
‘व्यथित अशी ती काही शांती पूजा करण्यात गुंतलेली असेल किंवा विरहात बारीक झालेल्या माझे कल्पनेतून तयार होणारे चित्र काढताना दिसेल किंवा मधुर आवाजाच्या सारिकांना माझी आठवण येत नाही का, असं पुन:पुन्हा विचारताना दिसेल. मांडीवरील मलिन वस्त्रावर तिने वीणा ठेवलेली असेल. तिच्या डोळ्यांतील पाणी तारांवर पडले आहे, अशी वीणा जुळवण्यात तिला कसेबसे यश येईल. ज्या गाण्यात माझं नाव गुंफलं आहे असं गाणं मोठय़ाने गाण्याची इच्छा तिला असेल. पण तिची ही इच्छा तिला पुन:पुन्हा येणाऱ्या मूच्र्छेने काही केल्या पुरी होणार नाही.
विरहाच्या पहिल्या दिवसापासून शापाचे उरलेले दिवस मोजण्यासाठी ती उंबरठय़ावर फुलं मांडत असेल किंवा कल्पनेतच मला भेटल्याचा आनंद ती घेत असेल. दिवसा ती कुठल्या ना कुठल्या कार्यात व्यग्र असेल पण मला भीती आहे ती रात्रीची. रात्री तिचं दु:ख फार मोठं असेल अशा परिस्थितीत तुझी जबाबदारी वाढेल. तिची काळजी कशी घ्यायची ते मी तुला सांगतो..’

या लेखातील ‘मेघदूता’ची चित्रे ‘कालिदासानुरूपम्’ या वासुदेव कामत यांच्या चित्रमालिकेतील आहेत.