0kedareवर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही चित्रपट  ही सगळी माध्यमे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची बनलेली आहेत. पण या सगळ्यांवर कडी करणारे माध्यम म्हणजे अर्थातच ‘सोशल मीडिया’! व्हॉट्सअप, ट्वीटर, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्यांनी तर आपल्या मनावर गारूड केले आहे.
माध्यमे केवळ देशविदेशाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचेच काम करतात असे नाही, तर अनेक व्यक्तींशी आपली ओळख सामाजिक माध्यमांद्वारे (२्रूं’ ेी्िरं) होऊ  शकते. जगभरातले आपले नातेवाईक आपल्या सतत संपर्कात असतात. परदेशात शिकायला गेलेल्या आपल्या मुलाला किंवा मुलीला स्काइप, फेसटाइमच्या साहाय्याने आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि आपोआपच दुरावा नाहीसा होतो. सर्जनशील व्यक्तीसाठी तर ब्लॉग असणे, त्यावर कविता, लेख, कथा मांडणे यातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी सहजपणे प्राप्त होते. स्वभावाने संकोची, लाजाळू व्यक्ती प्रत्यक्ष भेटीत कदाचित स्वत:चे विचार व्यक्त करणार नाही, परंतु फेसबुकवर मात्र मोकळेपणाने व्यक्त होईल. इतरांशी नातेसंबंध जोडण्यासाठी त्याला अशा माध्यमाचा नक्कीच उपयोग होतो.
इतकी सतत आणि सर्वत्र आपल्याला माध्यमांची सवय झाली आहे. माध्यमांचे फायदे अनेक आहेत, पण त्याबरोबरच त्यांचा आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतानाही दिसून येतो आहे.
एकदा एका पाच-सहा वर्षांच्या मुलाला घेऊन त्याचे आई-वडील ओपीडीत आले. ‘हल्ली हा रात्री नीट झोपत नाही. अनेकदा दचकून उठतो, रडत रडत उठतो.’ आईने काळजीने सांगितले. त्याला भीती वाटत होती हे दिसतच होते, पण कारण काय ते लक्षात येत नव्हते. त्याच्याशी सहज त्याच्या दिनक्रमाविषयी गप्प मारल्या. गेले दोन महिने तो ‘आहट’ ही भयावह (ँ१११) मालिका पाहायला लागला होता. बघताना त्याला खूप मजा वाटायची, पण खरे तर मनात एक भीती बसली होती. त्यामुळेच झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या. रात्री झोप पूर्ण झाली नाही की शाळेत झोप यायची, लक्ष लागायचे नाही. त्याला ती मालिका न पाहण्याविषयी समजावून सांगावे लागले. काही दिवसांनी त्याचा त्रास बंद झाला.
लहान मुले आणि किशोरावस्थेतील मुले यांच्यावर माध्यमांचे असे अनेक दुष्परिणाम दिसून येऊ  लागले आहेत. टीव्हीवरील कार्टूनमाधूनसुद्धा अनेकदा हिंसा, आक्रमकता दाखवली जाते. व्हीडीओ गेम्स तर मुलांना जास्तीतजास्त अपघात घडवा, जास्तीतजास्त शत्रूंना मारा असे आव्हानच देतात. यातून मुलांमधील आक्रमकता वाढते आहे. सहजपणे अपशब्द वापरणे, हमरीतुमरीवर येणे यात कही गैर आहे असे वाटेनासे होते. जीवनमूल्ये त्यातून ठरत जातात.
विशेषत: चित्रपटांमध्ये हिंसेबरोबरच लैंगिक अत्याचारही सहजपणे दाखवले जातात. त्यातून आपोआपच आपली ‘नजर मरते’. हिंसा आणि बलात्कारासारख्या घटना जणू ‘नॉर्मल’ आहेत आणि म्हणून समाजमान्य आहेत असे वाटू लागले. आपल्या गर्लफ्रेंडवर जबरदस्ती करताना ‘त्यात काय विशेष’ असे वाटण्याची शक्यता जास्त असते. मग स्त्रीविषयी आदर, समान वागणूक या गोष्टी तर दूरच. मालिकांमधील ‘पती पत्नी और वह’ अशी नाती इतक्या मोठय़ा प्रमाणात पाहून तीच मूल्ये आता समाजमान्य आहेत अशी शिकवण मिळते. मनातल्या निराशेला, अपयशी असल्याच्या भावनेला हिंसेद्वारे वाट करून दिली जाते.
एखाद्या अपघातानंतर किंवा आपत्तीनंतर त्याची सतत दृश्ये बातम्यांमधून पाहून अनेकांना मनात अनामिक भीती निर्माण होते. आपल्याही जीवनात अनिश्चितता आहे असे सारखे वाटू लागते. अतिचिंतेचे विकार जडतात आणि मानसोपचाराची गरज भासते.
‘ये जवानी है दिवानी’सारखा लोकप्रिय सिनेमा पाहताना असे वाटते की जगातले पाणी संपून  केवळ दारूच उरली आहे की काय! उपचारार्थ सुरुवातीला दारू, तंबाखू यांच्याविषयीची सूचना दाखवून चित्रपटभर दारू पिताना हिरो दाखवला तर मनावर प्रभाव जास्त कसला पडणार? मुलामुलींना अर्थातच सिगरेट, दारू यांचे आकर्षण वाटते. वाढत्या व्यसनाधीनतेचे एक महत्त्वाचे कारण माध्यमांचा प्रभाव हे आहे. मनातील उदासीनता, नैराश्य संपवण्याचा मार्ग म्हणून या साधनांकडे पाहिले जाते.
आत्महत्येच्या बातम्या साधारणत: पहिल्या पानावर असतात. त्यात रसभरीत वर्णने केलेली असतात. कधी कधी आत्महत्येसाठी वापरलेल्या साधनांचेही वर्णन येते. निराश मान:स्थितीतल्या एखाद्याला अशा बातमीनेच आत्महत्या यशस्वीपणे करता येते असे वाटू शकते. अनेकदा सिनेमातल्या नायकनायिकेप्रमाणे आत्महत्या करणारी प्रेमी युगुले असतात हे माहीतच आहे.
माध्यमांच्या कोणत्याही प्रतिनिधीशी बोलले तर अर्थातच ते म्हणतात,’ जबाबदारीने पाहणाऱ्याने निवड करावी.’ खरेच आहे. विशेषत: आपल्या मुलांनी किती हिंसा पाहावी, खेळण्यात वापरावी, किती उद्दीपित करणारी दृश्ये त्यांनी कुठल्या वयात पाहावीत हे पालकांनीच ठरवले पाहिजे. तेच असेल सुजाण पालकत्व. नाहीतर तीन वर्षांची मुलगी ‘वाजले की बारा’ किंवा ‘चिकनी चमेली’वर नाच करते आणि सगळे कौतुकाने टाळ्या वाजवतात!
ज्या माध्यमांनी करमणूक होते त्याच माध्यमांनी ज्ञानही. मिळते. त्यासाठी त्यांचा वापर करणे आपल्याच हातात असते. चांगले चित्रपट, चांगले कार्यक्रम, चांगले संगीत याची आपली मुलांची ओळख आपणच करून द्यायला हवी.
परंतु माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. बातम्या सनसनाटी न बनवता आवश्यक ती खरी माहिती पोहोचवणे ही त्यांची जबाबदारी आहे. आत्महत्येच्या बातम्या देताना त्या पहिल्या पानावर न छापणे, अनावश्यक तपशील न देणे अशाबरोबरच आत्महत्येला प्रतिबंध करण्याचे उपाय सुचवणे असेही केले पाहिजे. किंबहुना जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी माध्यमांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
माध्यमे प्रभावी आहेत. माहिती आणि ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांचा आपल्या सर्वाच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे आपण जबाबदारीने त्यांचा वापर करून आपले मन:स्वास्थ्य टिकवून ठेवूया.

-डॉ. जान्हवी केदारे

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…