अमिताभ घोष – response.lokprabha@expressindia.com

एखाद्या सुनसान रस्त्यावर तुम्ही तुमचं वाहन वेगाने चालवत निघालेले आहात अशी कल्पना करा. असा सुनसान रस्ता बघायला मिळणं हाच खरं तर पर्यटकासाठी ‘सोने पे सुहागा’ असा अनुभव असतो. गर्दीत जाणं आवडत नाही अशी व्यक्ती एकही माणूस किंवा मोटारगाडी दिसत नाहीये अशा रस्त्यावर तासन्तास अगदी आनंदाने ड्रायव्हिंग करू शकते. कारण तो परिसर निर्मनुष्य असतो. तिथे डोंगर असतात, दऱ्या असतात. खुलं आकाश असतं. रात्री तेच आकाश चांदण्यांनी चमचमत असतं. मंगळावर गाडी चालवण्याचा अनुभव काहीसा असाच असेल. तिथे इथल्यासारखे रस्ते नसतील, पण तिथे रोव्हर मात्र त्याला वाटेल तिथे आणि शक्य होईल तिथे कुठेही जाऊ शकेल. अर्थात मंगळावर अजून तरी कुठल्याही माणसानेच नाही तर यंत्रानेदेखील ड्रायव्हिंग केलेलं नाही. म्हणूनच मंगळावर सगळ्यात आधी आपलं रोव्हर उतरवायचं आणि चालवायचं यासाठी काही देशांची घाईगडबड सुरू आहे.

 

‘नासा’च्या आजवरच्या मंगळ मोहिमा

मंगळावर यान उतरवण्याच्या ‘नासा’च्या  मोहिमांची सुरुवात झाली २३ वर्षांपूर्वी, म्हणजे १९९७ मध्ये. त्या वर्षी ‘नासा’च्या ‘पाथफाइंडर मिशन’मधून ‘सोजर्नर’ रोव्हर मंगळाच्या मातीवर उतरलं. ‘पाथफाइंडर’च्या मंगळ मोहिमेचा भाग होणं अविस्मरणीय अनुभव होता. या मिशनसाठीची आर्थिक तरतूद एवढी कमी होती की ‘मिशन पाथफाइंडर’ यशस्वी होईल आणि त्यामुळे ‘नासा’च्या मंगळ मोहिमांचा इतिहास बदलेल असं फार कुणाला वाटत नव्हतं. उलट अनेकांना या मोहिमेला यश मिळणार नाही असंच वाटत होतं. ‘नासा’ने २००३ मध्ये मंगळावर ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ असे दोन जुळे रोव्हर पाठवले. त्यानंतर २०१२ मध्ये ‘क्युरिओसिटी’ हा रोव्हर पाठवला. तर या आठवडय़ात ‘नासा’ने ‘पर्सिव्हरन्स’ हा रोव्हर मंगळावर पाठवला आहे.

‘नासा’ने मंगळावर ‘सोजर्नर’ हा रोव्हर तांत्रिक प्रात्यक्षिकं घेण्यासाठी पाठवलेला होता. त्याने मंगळावर तब्बल ८३ दिवस काम केलं. तर ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ हे दोन रोव्हर्स तिथे अनुक्रमे सहा आणि १५ र्वष कार्यरत होते. मंगळावर दोन रोबोंनी एवढे दिवस टिकून काम करून दाखवण्याचं हे अभूतपूर्व उदाहरण होतं. २०१२ मध्ये मंगळावर उतरलेलं ‘क्युरिऑसिटी’ आजही कार्यरत आहे. मंगळावर पाठवण्यात आलेल्या रोव्हर्सच्या प्रत्येक पिढीगणिक (जनरेशन) शास्त्रीय उपकरणांची संख्या आणि गुंतागुंत वाढत गेली आहे. ‘सोजर्नर’ हा रोव्हर लहान मुलांच्या एखाद्या खेळण्यासारखा अगदी छोटासा होता. त्याच्या तुलनेत ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपाच्र्युनिटी’ एखाद्या गोल्फ कोर्टाच्या आकाराचे होते. तर ‘क्युरिऑसिटी’ आणि ‘पर्सिव्हरन्स’ आकाराने एखाद्या लहानशा मोटारगाडीएवढे आहेत.

पण रोव्हर्सच्या अगदी पहिल्या पिढीपासून त्यांनी केलेली कामगिरी मात्र लक्षणीय आहे. मंगळाभोवती फिरणाऱ्या यानातून मंगळावरच्या एखाद्या ठिकाणाची जी छायाचित्रं आणि त्यातून जी माहिती मिळते, त्यापेक्षा रोव्हर त्या ठिकाणाची किती तरी अधिक पट हाय रिझोल्यूशनची छायाचित्रं पाठवतात. रोव्हरमध्ये ड्रिलपासून ते स्पेक्ट्रोमीटर आणि मायक्रोस्कोपिक इमेजर्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात. या उपकरणांच्या माध्यमातून मंगळाचा प्रत्यक्ष स्थानिक भौगोलिक परिसर समजून घ्यायला मदत होते. उदाहरणच द्यायचं तर एखादा भूगोलतज्ज्ञ पृथ्वीवरच्या दगडांचा ज्या पद्धतीने अभ्यास करेल, अगदी त्याच पद्धतीने रोव्हरमुळे मंगळावरच्या दगडांचा अभ्यास करणं शक्य होतं. ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’ या रोव्हर्सनी तर चक्क मंगळावरच्या फिरत्या हवामान स्थानकासारखंच काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या सहा आणि १५ वर्षांच्या काळात सातत्याने मंगळावरच्या वातावरणातले बदल नोंदवले आहेत.

रोव्हर्सच्या प्रत्येक नव्या पिढीमध्ये (जनरेशन) ‘नासा’ने नवनव्या क्षमतांचा आणि महत्त्वाच्या शास्त्रीय प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नवनव्या उपकरणांचा समावेश केला. उदाहरणार्थ ‘स्पिरिट’ आणि ‘ऑपॉच्र्युनिटी’मध्ये एका ड्रिलचा तर ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरमध्ये मंगळावरच्या वेगवेगळ्या घटकांच्या आयसोटोप्सची मोजमापं घेण्यासाठी एका उपकरणाचा समावेश करण्यात आला होता. ‘पर्सिव्हरन्स’ या रोव्हरच्या चौथ्या पिढीमध्येदेखील ‘नासा’ने ही परंपरा पुढे नेली आहे.

‘पर्सिव्हरन्स’मध्ये नवीन काय?

‘पर्सिव्हरन्स’ने मंगळावर ‘मॉक्सी’ (MOXIE – Mars Oxygen ISRU Experiment) हे एकदम आगळंवेगळं उपकरण नेलं आहे.  मंगळावरच्या वातावरणात भरपूर प्रमाणात असलेला कार्बन डाय ऑक्साइड वापरून या उपकरणाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मंगळावर ऑक्सिजन (molecular oxygen) तयार केले जाणार आहेत. या सगळ्यामुळे ‘इस्रू’ (ISRU means In Situ Resource Utilization) या संकल्पनेच्या वापरात वाढ होईल. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून मानवाच्या किंवा संबंधित यानाच्या गरजा भागवणं म्हणजे ‘इस्रू’. या संकल्पनेचा वापर केला नाही तर पुढच्या दशकांमधल्या मंगळ मोहिमा अतिशय खर्चीक आणि त्यामुळे अशक्य होत जातील. दोन वर्षांचा प्रवास करून मंगळावर जाऊन परत येण्यासाठी अंतराळवीराला प्राणवायू, पाणी, रॉकेटसाठीचं इंधन बरोबर घेऊन जावं लागणार असेल तर ती मोहीम किती खर्चीक होऊ शकते ते आपण समजू शकतो. हे म्हणजे एखाद्या प्रवाशाने न्यू यॉर्कमध्ये दोन र्वष राहायचं आहे म्हणून तेवढा काळ पुरेल एवढा प्राणवायू, अन्नपदार्थ आणि विमानाचं इंधन घेऊन निघण्यासारखं आहे. या सगळ्याचा दर प्रवाशागणिक खर्च प्रचंड होईल. मंगळावर आपल्याला काही प्रमाणात प्राणवायू मिळवता आला तर त्याचे दोन फायदे होतील. एक म्हणजे तो प्राणवायू मंगळावर जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी वापरता येईल आणि यानाला परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या इंधनाच्या निर्मितीसाठी प्राणवायूचा वापर करता येईल. अशा पद्धतीने ‘मॉक्सी’ यशस्वी झालं तर ‘नासा’ सहजपणे शंभर पटीने जास्त प्रमाणात प्राणवायूची निर्मिती करू शकेल.  त्याचा भविष्यातल्या मंगळ मोहिमांसाठी मोठा उपयोग होईल.

दुसरं म्हणजे ‘पर्सिव्हरन्स’ने स्वत:बरोबर ‘इनजेन्यूटी’ हे हेलिकॉप्टर मंगळावर नेलं आहे. हे मंगळावर उडणारं पहिलं हेलिकॉप्टर असेल. त्याच्यामुळे ‘नासा’ पहिल्यांदाच एखाद्या दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर हेलिकॉप्टर उडवणार आहे. ‘इनजेन्यूटी’ हे तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक आहे. कारण मंगळावरच्या विरळ वातावरणात हेलिकॉप्टर चालवणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जाता येत नाही त्या ठिकाणी ड्रोन पाठवून त्यांच्यामार्फत छायाचित्रं घेऊन माहिती मिळवली जाते, त्याप्रमाणे हे हेलिकॉप्टर मंगळावर रोव्हर ज्या ठिकाणी सहजपणे जाऊ शकणार नाही त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे नमुने घेण्यासाठी मदत करेल. ‘इनजेन्यूटी’चा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यातल्या मंगळ मोहिमांमध्ये अशा हेलिकॉप्टर्सची भूमिका खूप महत्त्वाची असेल.

तिसरं म्हणजे या मंगळ मोहिमेच्या नियोजनानुसार ‘पर्सिव्हरन्स’ मंगळावरच्या दगडांचे नमुने घेऊन परत येणार आहे. त्या दगडांचं पृथ्वीवरच्या प्रयोगशाळांमध्ये विश्लेषण केलं जाणार आहे. आजवरच्या मंगळ मोहिमांमध्ये तिथले नमुने पृथ्वीवर आणण्याचा हा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. मंगळावर जीवसृष्टी आहे का किंवा यापूर्वी होती का याचा त्यातून शोध घेणं हा त्यामागचा हेतू आहे. ‘पर्सिव्हरन्स’ हे दगडांचे नमुने गोळा करेल आणि पुढील दशकामधल्या भावी मंगळ मोहिमेतून ते नमुने पृथ्वीवर अभ्यासासाठी आणले जातील.

मंगळावरून पृथ्वीवर आणलेल्या या दगडांचं विश्लेषण केल्यानंतर मंगळावर यापूर्वी जीवसृष्टी होती का किंवा आहे का याबद्दलची खात्रीशीर माहिती मिळवायला मदत होईल.

मंगळामध्ये इतका रस का?

मानवजातीसाठी मंगळ हा अतिशय आकर्षक ग्रह आहे. एक तर तो तुलनेत सगळ्यात जवळ आहे. (जवळपास २०० दशलक्ष किलोमीटर) एक तर माणूस मंगळावर जायची महत्त्वाकांक्षा बाळगू शकेल आणि तिथं जास्त काळ वास्तव्य करू शकेल एवढा तो आवाक्यात आहे.  मंगळावर पूर्वी कधीतरी वाहतं पाणी तसंच वातावरण आणि कदाचित जीवसृष्टी तग धरू शकेल अशी परिस्थिती होती, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

पण अलीकडच्या काळात मंगळासंबंधी लोकांचा रस वाढला आहे तो इलॉन मस्क यांच्या अंतराळप्रवासाच्या संभाव्य व्यावसायिक महत्त्वाकांक्षी योजनांमुळे. मंगळावर मानवी मोहीम ही ‘नासा’सह अनेक अंतरिक्ष संस्थांची महत्त्वाकांक्षा आहे. अशी मोहीम तंत्रज्ञानाच्या पातळीवर शक्य असली तरी ती इतकी महाग होती की कुणी ती करू धजत नव्हतं. ५०० अब्ज डॉलर्स किंवा ‘नासा’च्या बजेटच्या २० पट एवढा या मोहिमेचा अपेक्षित खर्च आहे. ‘नासा’कडे तेवढा निधी नसल्यामुळे मंगळावर माणूस पाठवण्याची नासाची कल्पना महत्त्वाकांक्षेच्या पातळीवरच आहे.

इलॉन मस्क यांनी मंगळावर जाण्याचा खर्च हजारपटीने कमी होईल अशा नव्या वाहनांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. पुन्हा वापरात येण्याजोगे प्रक्षेपणयान आणि यानाच्या प्रदक्षिणापथामध्येच इंधन भरण्याची सोय यामुळे खर्च मोठय़ा प्रमाणावर कमी होईल. त्यांच्या मते या सगळ्यामुळे त्याच्या ‘स्टारशिप स्पेसक्राफ्ट’मधून मंगळावर जाण्याचा प्रति प्रवाशाचा खर्च साधारणपणे दोन लाख डॉलर्स किंवा दीड कोटी रुपये असेल. ते निर्माण करत असलेलं ‘स्टारशिप स्पेसक्राफ्ट’ हे मंगळावर जाण्यासाठीचं यान आजवरच्या सगळ्या यानांमधलं सगळ्यात उत्तम यान असेल. पृथ्वीच्या कक्षेतून १०० मेट्रिक टन एवढं वजन नेऊ शकेल एवढी त्याची क्षमता असेल. तर ‘स्पेसेक्स’ हे त्यांचं यान २०२३ मध्ये खासगी प्रवासी घेऊन चंद्राभोवती फिरून येणार आहे. तर २०२४ मध्ये मंगळावर मानवी मोहिमेचं त्यांचं नियोजन आहे. बोका चिका या दक्षिण टेक्सासमधल्या शहरात ‘स्टारशिप’ची उभारणी आणि चाचण्यांचं काम सुरू आहे. ‘स्पेसेक्स’मुळे अंतराळ प्रवासाची सगळी दिशाच बदलून जाण्याची शक्यता आहे. माणसाला वेगवेगळ्या ग्रहांना निवासी करण्याचं इलॉन मस्क यांचं स्वप्न ‘स्पेसेक्स’मुळे प्रत्यक्षात यायची शक्यता आहे.

(दि इंडियन एक्स्प्रेसमधून)

(अनुवाद- वैशाली चिटणीस)